फोबिया
राधिका आपटे हिची प्रमुख भूमिका असलेला ‘फोबिया’ हा चित्रपट नुकताच बघितला. मानसिक विकारावर आधारित असलेला हा चित्रपट अतिशय सुरेख असून राधिका आपटे हिनं अप्रतिम अभिनय केला आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित हा चित्रपट २७ मे २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सायकॉलॉजिकल थ्रिलर असं म्हणता येईल. काही जण या चित्रपटाची तुलना राम गोपाल वर्माच्या ‘कौन’ या चित्रपटाशी करतात. पण ‘कौन’ मध्ये चित्रपटातून नेमका प्रश्न लक्षात येण्याऐवजी उर्मिला मातोंडकरचं दिसणंच केवळ लक्षात राहिलं होतं. इथं मात्र तसं होत नाही. दिग्दर्शकाची प्रचंड मेहनत आणि राधिका आपटेनं अतिशय समजून केलेली भूमिका या चित्रपटात जाणवते.
‘फोबिया’ या चित्रपटात महेक ही अतिशय बुद्धिमान तरुणी ऍगरोफोबियाची शिकार कशी होते हे दाखवलं आहे. एकदा रात्रीच्या वेळी मद्य घेतलेल्या अवस्थेत घरी परतत असताना महेकला टॅक्सीत झोप लागते. तिला झोप लागल्याच पाहून टॅक्सी ड्रायव्हर गाडी थोडी आडबाजूला घेतो आणि मागच्या सीटवर येऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या स्पर्शानं ती जागी होते आणि घाबरून जोरजोरात ओरडते. ती शुद्धीवर येते, तेव्हा तिच्या आसपास लोकांची गर्दी जमलेली असते आणि ते तिला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती जोरात किंचाळते आणि पुन्हा बेशुद्ध पडते. इथूनच तिच्या फोबियाची सुरुवात होते. तिला त्या प्रसंगामुळे स्पर्श आणि गर्दीची भीती वाटायला लागते. सार्वजनिक ठिकाणी जाण्याची भीती वाटायला लागते. ती आपलं काम बंद करून तासनतास स्वतःला घरात कोंडून घेते. घरातला कचरा देखील बाहेर ठेवण्याचं काम ती करू शकत नाही. तिला तिचा मित्र शान त्याच्या मित्राच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये राहायला जागा देतो. ती एकटी राहिली तर आपोआप तिच्यात सुधारणा होईल असं त्याला वाटतं. पण असं होत नाही.
त्या रिकाम्या घरात महेकला अनेक गोष्टी दिसायला लागतात आणि त्याचा संबंध ती वास्तवाशी लावू पाहते. तिला अनेक ऍटॅक येतात, त्यातून ती हिंसकही बनते. एकीकडे हा चित्रपट रहस्यमय वाटायला लागतो, त्याच वेळी आपणही वास्तव आणि भ्रम यांच्या चक्रव्युहात अडकतो. या सगळ्यांचा शेवट काय होणार याची उत्कंठाही लागते. या फोबियामधून ती बाहेर येते का यासाठी हा चित्रपट जरूर बघायला हवा. या चित्रपटात भीतिदायक वातावरण जरूर आहे, पण कुठेही हडळ, स्मशान, किंवा भयंकर हिडीस मेकअप असा काही वापर न करता अभिनयातूनच आपल्यासमोर ते ते वातावरण उभं करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
चित्रपटाचं नाव ‘फोबिया’ आहे. तर ‘फोबिया’ म्हणजे काय? फोबिया म्हणजे भयगंड! अच्युत गोडबोले यांच्या मानसशास्त्रावरच्या ‘मनात’ या पुस्तकावर आम्ही काम करत असताना अनेक मनोविकारांचा अभ्यास करता आला. त्यातच 'फोबिया'विषयी देखील विस्तारानं जाणून घेता आलं. भीतीची भावना ही माणसाच्या अनेक भावनांपैकी एक महत्त्वाची भावना आहे. ती काही प्रमाणात उपयोगी आणि गरजेचीही आहे. यामुळेच ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेत निर्माण झाली असावी आणि टिकली असावी असं उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञ (इव्होल्यूशनरी सायकॉलॉजिस्ट्स) म्हणतात.. उदाहरणार्थ, कित्येकजणांना रक्ताची भीती वाटते. अशा लोकांना रक्त बघितलं की प्रथम ह्रदयाचे ठोके आणि रक्तदाब खूप वाढतो आणि नंतर तो खाली जातो. जर आपल्याला भीतीच वाटली नसती तर आपण वन्य पशूकडे किंवा आगीत स्वत:हून गेलो असतो आणि मेलो असतो. त्यामुळे भीती ही हवीच. पण हीच भीती जर वाजवीपेक्षा प्रचंड जास्त वाटायला लागली आणि जर ती आपल्या दैनंदिन आयुष्याच्या मध्ये यायला लागली तर मात्र त्याला ‘भयगंड’ किंवा ‘फोबिया’ असं म्हणतात. ‘फोबिया’ हा शब्द १७८६ साली पहिल्यांदा वापरला गेला. वैद्यकशास्त्राचा जनक ग्रीक तत्ववेत्ता हिपोक्रिटस यानं फोबियाग्रस्त रुग्णांचं वर्णन करुन ठेवलं आहे. निकॅनॉर नावाच्या तरुणाला बासरीचे सूर ऐकू आले की तो त्या ठिकाणाहून घाबरुन पळून जात असे. डेमोक्लिस नावाच्या राजाला ओढा किंवा नाला ओलांडण्याची प्रचंड भीती वाटत असे. राणी एलिझाबेथ हिला गुलाबांच्या फुलांची प्रचंड भीती वाटत असे असं म्हणतात. अल्फ्रेड हिचकॉकला अंड्यांची भीती वाटायची. अंड्याचा कुठलाच पदार्थ तो खात नसे. मर्लिन मन्रोला देखील ऍगोराफोबियानं ग्रासलं होतं. तिला मोकळ्या जागांची भीती वाटे. शेकडो तर्हेच्या गोष्टी किंवा प्रसंग यांच्या भीतीतून शेकडो तर्हेचे फोबियाज किंवा भयगंड माणसांमध्ये निर्माण होऊ शकतात.
या फोबियाजची यादी प्रचंडच मोठी आहे. फक्त अल्फाबेट्सप्रमाणे या फोबियाजची यादी केली तरी ती खूप मोठी आहे. फक्त `A' किंवा `P' या अक्षरांपासून सुरु होणारे प्रत्येकी ६०च्या वर फोबियाज आहेत! फोबियाजचेही शेकडो प्रकार असले तरी मनोविकारांच्या डीएसएम-चार च्या मॅन्यूअलप्रमाणे त्याचे तीन प्रमुख प्रकार मानले आहेत. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट फोबियाज, सोशल म्हणजे सामाजिक फोबियाज आणि तिसरा प्रकार म्हणजे ऍगोराफोबिया (सार्वजनिक ठिकाणं किंवा गर्दीची भीती). डीएसएम-४ च्या वर्गीकरणाप्रमाणे फोबियाजच्या तिसरा गटात ऍगोराफोबिया मोडतो. या विकारानं ग्रस्त असलेली मंडळी सार्वजनिक जागी जायला प्रचंड घाबरतात. रस्ते, दुकान, मॉल्स, चित्रपटगृह, ट्रेन, बसेस, उपहारगृहं अशी अनेक ठिकाणं यात येतील. या रुग्णांना अशा ठिकाणी जबरदस्ती नेलं तर पॅनिक ऍटॅक येतो. अनेकांना चक्कर येणं, छातीत धडधडणं, घाम येणं असंही होतं. अशा फोबियानं त्रस्त रुग्णांना ती ठरावीक गोष्ट (उदा. प्राणी, लिफ्ट...) दिसल्याबरोबर एकदम भीतीचा ऍटॅकच येतो. मग असा ऍटॅक येऊ नये म्हणून अशा गोष्टी किंवा वस्तू हे लोक टाळायला लागतात आणि तसं टाळण्यासाठी कुठल्याही थराला जातात. उदाहरणार्थ, लिफ्टची भीती वाटणारे लोक लिफ्ट असतानाही १५-१५, २०-२० मजले चढून जातात! फोबिया किंवा अशा प्रकारचे मानसिक विकार आपल्याला माहीत असायला हवेत. तसंच घरात, आसपास अशा प्रकारचे रुग्ण असले तर त्या वेळी भूतबाधा, पुनर्जन्म, अशा अंधश्रद्धांना खतपाणी देणार्या गोष्टींपासून दूर राहायला हवं आणि त्यावरचे अघोरी उपाय टाळायला हवेत.
अशा प्रकारचे रुग्ण घरात असतील, तर त्यांना स्वतःला आणि आसपासच्या लोकांना या गोष्टींचा खूप त्रास होतो. त्या रुग्णाचा स्वतःचा स्वतःशी चाललेला झगडाही आपल्याला अस्वस्थ करतो. मात्र अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपाय करणं हे आणि हेच करायला हवं. माझी या विकाराची प्रत्यक्ष ओळख झाली जेव्हा माझा ठाण्याचा एक मित्र या विकाराने ग्रस्त झाला तेंव्हा. तो मला भेटायला वाशी इथे येणार होता ....घरातून निघाला पण माझ्याकडे पोचलाच नाही. फोनला उत्तर नाही. आठ दिवसांनी अस्वस्थ होवून मीच त्याला भेटायला गेले तेव्हा मला त्याची अवस्था बघायला मिळाली. तो स्टेशनवर किंवा घराबाहेर जायला प्रचंड घाबरत होता ....सुरुवातीला तो काम टाळण्यासाठी असं वागतोय का असंही वाटून गेलं. पण नंतर प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं. त्याने डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडून उपचार घेतले आणि आज तो संपूर्ण बराही झाला आहे.
दीपा देशमुख
२७ ऑगस्ट २०१७.
Add new comment