सीमा 

सीमा 

तू प्यार का सागर है, तेरी इक बूँद के प्यासे हम 
लौटा जो दिया तुमने, चले जायेंगे जहां से हम 
तू प्यार का सागर है.... 
घायल मन का पागल पंछी, उड़ने को बेक़रार 
पंख हैं कोमल आँख है धुँधली, जाना है सागर पार 
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम 
तू प्यार का सागर है... 
इधर झूम के गाये ज़िंदगी, उधर है मौत खड़ी 
कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी 
कानों में ज़रा कह दे, कि आएँ कौन दिशा से हम 
तू प्यार का सागर है... 

१९५५ साली अमिय चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेला एक क्लासिक चित्रपट म्हणजे बलराज साहनी आणि नुतन यांच्या अभिनयानं नटलेला ‘सीमा’! आज ६० वर्षांनतरही हा चित्रपट मनाला तितकाच भिडतो. त्याचं कथानक, त्यातली मूल्यं, त्यातला मानवतावाद, त्यातली गाणी, त्यातलं संगीत त्यातल्या पात्रांचा अभिनय काय काय सांगावं? ‘सीमा’ हा चित्रपट मी लहानपणापासून कितीतरी वेळा बघितला, पण त्याची जादू आजही तसूभरही कमी होत नाही. तो मनावर तितकाच परिणाम साधत राहतो. गौरी असलेल्या नुतनच्या सुखदुःखाशी प्रेक्षकाला समरस करून सोडतो.

बलराज साहनीसारखा आर्दशवादी माणूस शोधण्यासाठी आपण सगळेच आतुर असतो. नुतनमधली बंडखोर, हट्टी मुलगी, आपल्या सगळ्यांमध्येच असते. त्यामुळे तिचं पळून जाणं, खोट्या आरोपाविरुद्ध न्यायासाठी बंड करणं, रागामुळे तोडफोड करणं, ‘मी वाईट आहे तर आहेच वाईट’ म्हणून ओरडणं हे सगळं बरोबरच वाटायला लागतं. त्याच क्षणी आपल्याही चेहर्‍यावर जणू काही ती आपलीच प्रतिकृती असावी इतकं साम्य वाटतं. तिसरी-चौथीत असताना हा चित्रपट मी पहिल्यांदा बघितला. तेव्हा तो सगळाच कळला असा भाग नव्हता, पण आवडला होता. त्यानंतर १० वीत असताना मी ‘सीमा’ बघितला, तेव्हा थोडा कळला आणि खूप आवडला. मग ३५ च्या वयात पुन्हा हाच सिनेमा बघितला, तेव्हा त्यातले अनेक कंगोरे कळत गेले, आणखीनच आवडला आणि आज पुन्हा पाहतानाही त्यातली ताकद कळत गेली.

लहानपणीच आई-वडिलांना पोरकी झालेली गौरी आपल्या काका-काकूकडे आश्रयाला येते. काका-काकूची परिस्थितीही गरिबीचीच असते. काकूचा जाच आणि काकाचं बायकोपुढे काहीही न चालणं, यात गौरीचं बालपण कोमेजतं. लहान वयात तिला लोकांच्या घरची कामं करावी लागतात. त्या घरातल्या मालकिणीची वाट्टेल ती बोलणी ऐकावी लागतात. अशा वेळी तिच्यावर चोरीचा खोटा आळ येतो आणि पोलीस तिला पकडतात. आयुष्यात कुठलाही प्रसंग आला, तरी उपाशी राहिलेली ती पोर या आरोपानं चवताळते, पोलिसांना सत्य सांगायचा प्रयत्न करते. तिचं वय लहान असल्यानं कोर्ट तिची सुटका करतं, पण वस्तीत, काका-काकूपुढे ती गुन्हेगार, चोर म्हणून शिक्का बसलेली असते. ते तिला घराबाहेर काढतात. जाईल तिथे ती चोर म्हणून काम मिळत नाही. ज्या चोर असलेल्या बाके नावाच्या नोकरानं मुद्दाम घडवून आणलेल्या डावामुळे आपल्याला हे सहन करावं लागतंय, त्याला धडा शिकवायच्या हेतूनं गौरी पेटून उठते, पण पुन्हा तिची रवानगी पोलीस स्टेशनमध्ये होते.

पोलीस अधिकारी भला माणूस असतो, तो तिच्या काका-काकूला बोलावून तिला घरी न्यायला सांगतो, पण ते तयार नसतात. तसंच आता गौरीमध्येही बंडाची ठिणगी पडलेली असते. इतकं सहन करून जेव्हा तिच्या खरेपणावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार होत नाहीत, तेव्हा तिलाही त्या घरात परतायचं नसतं. अखेर पोलीस तिला एका अनाथाश्रमात पाठवायचं ठरवतात. या अनाथाश्रमाचा प्रमुख म्हणजे अशोक उर्फ बाबुजी म्हणजेच बलराज साहनी! पोलिसांनी गौरीच्या मनाविरुद्ध तिला आश्रमात आणलेलं असतं, तो प्रसंग इतका अप्रतिम आहे की पुन्हा पुन्हा अनुभवावा. बाबुजी असलेल्या बलराज साहनीची शांत, प्रसन्न मुद्रा आणि त्याच वेळी गौरीचा आक्रस्ताळेपणा, खूपच मस्त! गौरी त्या आश्रमात नीट राहत नाही. तसंही तिला तिथून पळून जायचंच असतं. ती हरप्रकारे सगळ्यांच्या नाकात दम आणते, सगळ्यांना खूप त्रास देते. त्यातच शुभा खोटे ही एक पूर्वाश्रमीची बनेल चोर तिथे असते, तिनं चोर म्हणताच गौरीच्या अंगाचा तिळपापड होत असतो. त्या दोघींची तर एकमेकींचे केस उपटण्यापर्यंत मारामारी होते. मात्र बलराज साहनीचं संयमी वागणं यामुळे आश्रमातल्या वातावरणात गौरी हळूहळू रुळायला लागते, पण त्या बाके नावाच्या नोकराला अद्दल घडवण्याचा विचार तिच्या डोक्यातून गेलेला नसतो. एकदा शुभा खोटेच्या मदतीनं ती आश्रमातून पळून जाते आणि बाकेच्या घरात पोहोचून त्याला खूप बदडून काढते. शुभा खोटेला परत येईन हा शब्द दिल्यानुसार ती परत येते. पण त्या वेळात आश्रमात ती पळून गेल्याचं कळतं. पोलिसांना कळवायचं असतं, पण बाबुजीचा माणसातल्या माणुसकीवर प्रचंड विश्‍वास असतो. तो वाट बघूया असं ठरवतो. मात्र मनातून तो खूप अस्वस्थ होतो. ती अस्वस्थता त्याची ‘कहॉं जा रहा है तू ऐ जानेवाले’ या अप्रतिम गीतातून व्यक्त होते.

एकीकडे आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेली गौरी पण त्याच वेळी तिच्या मनातलं द्वंद्व सुरू होतं. आता आपण मुक्त होऊ शकतो, आपल्याला या कैदखान्यात जायची गरजच काय असंही तिला वाटतं. या संधीचा फायदा घेऊन वाट्टेल तिथं जाऊ असंही तिचं मन म्हणतं. पण बाबुजीचा आर्त आवाज तिच्या पावलांना पुढे जाऊ देत नाही. ती माघारी वळते. गौरी परतते, तेव्हा ती कुठे गेली होती या प्रश्‍नाचं उत्तर ती बाबुजीला देत नाही. तुला पळून जायला कोणी मदत केली याचंही उत्तर ती देत नाही. तेव्हा बाबुजी तिला एक दिवस इतर मुलींपासून वेगळं ठेवायचा आदेश देतो. खरं तर सुरुवातीला तिला इतर मुलींपासून वेगळंच ठेवलेलं असतं. पण तिची सुधारलेली वागणूक बघून तिला सगळ्यांमध्ये राहायची परवानगी मिळालेली असते. तिच्या आताच्या वागण्यानं तिला पुन्हा सगळ्यांपासून तोडल्याचा आदेश मिळतो. गौरी चिडते. खेालीत शिरल्यावर ती त्या खोलीची नासधूस करते. खिडक्यांच्या काचा फोडते. उशांमधला कापूस काढून फाडून खोलीभर भिरकावते. कोणी दार उघडलं तरी ती हातातली वस्तू फेकून मारते. इकडे शुभा खोटे आपणच गौरीला पळून जायला मदत केल्याचं बाबुजी जवळ कबूल करते. तो तिला माफही करतो. ती खरं बोलते याचा त्याला आनंद होतो. गौरीचा उच्छाद पाहून बरं नसतानाही तो ते सगळं थांबवण्यासाठी येतो. तेव्हा दार उघडायला सगळेच घाबरतात. पण तो स्वतःच दार उघडतो. गौरीच्या हातात मारण्यासाठी एक काच असते. तो आत येतो. तेव्हा काचा फोडत असताना तिचं गुणगुणनं त्यानं ऐकलेलं असतं. तिनं केलेली नासधूस न बघता तो तिला तिचा आवाज किती छान आहे आणि गाऊन दाखव असं सांगतो. ती खजिल होते. त्याला ‘मनमोहना’ हे जयजयवंती रागातलं गाणं गाऊन दाखवते. तो तिची प्रशंसा करतो आणि त्याच बरोबर आपल्या सहकार्‍याला सांगून ती कुठे गेली होती याचा शोध लावतो. बाकेला तुरुंगात टाकून तिला न्याय मिळवून देतो.

बाबुजीचं आश्रमातल्या प्रत्येकासाठी झटणं, त्या त्या प्रत्येकीची दुःखं दूर करून त्या मुलीला तिचं हक्काचं घर मिळवून देणं यासाठी झटत असतो. स्वतःच्या प्रकृतीकडेही तो जराही लक्ष देत नसतो. गौरी हे सगळं बघत असते. त्याच्या वागणुकीनं इतरही आपोआप बदलत जातात. गौरी तिच्याही नकळत बाबुजीकडे आकर्षिली जाते. तिला या गोष्टीचा पत्ताही नसतो. तसंच गौरीच नाही, तर आपणही तिच्यात खोलवर गुंतलो असल्याचं बाबुजीच्याही लक्षात येतं. पण स्वतःची नाजूक होत चाललेली प्रकृती, वाढतं वय या सगळ्याचा विचार करून आपला विचार करण्यापेक्षा गौरीचं हित कशात आहे हे स्वतः ठरवतो आणि तिच्यावर दबाव टाकून तिला आपल्याच सहकार्‍याबरोबर लग्न करण्यासाठी राजी करतो. आता या सगळयातून दूर जाण्यासाठी तो तिथून बाहेर पडतो. समुद्रकिनारी त्याला छातीत दुखायला लागतं आणि तो तिथेच कोसळतो. विमनस्क अवस्थेत बसलेल्या गौरीला बाबुजीचा सहकारी येऊन सांगतो, की तिनं आश्रमात आल्यापासून प्रत्येक वेळी बाबुजीचा हुकूम नेहमीच मोडला आहे आणि आज ती त्याचं अचानक का ऐकायला लागलीये. आजही तिनं स्वतःसाठी नाही तर त्याच्या सुखासाठी तो हुकूम मोडायला हवा. त्याच क्षणी ती तिरासारखी धावत सुटते आणि त्याच्याजवळ जाऊन पोहोचते. त्याचं मन, त्याच्या हृदयातलं स्थान हेच तिचं घर असतं. दुसरं तिला काहीच नको असतं. आयुष्यात कितीही आणि कसेही चढ-उतार आले तरी आपल्या व्यक्तीचं मनातलं स्थान कायम तेच असतं. त्याच्याविषयी मनात दुरावा निर्माण होऊच शकत नाही. तो कुठेही असला तरी त्याच्याबद्दल त्याच कोमल भावना असतात. हे सगळं नातं आपल्याला विनासंवादातून कळत जातं. फार कुठलेही डायलॉग न घडता बलराज साहनी नुतनच्या आधारानं परततो. दोघांची स्वप्नं मानवतेच्या कल्याणासाठीचीच असतात. ती एकत्रपणे पूर्ण करण्यासाठी दोघंही आश्रमाकडे वळतात आणि चित्रपट संपतो.

या चित्रपटाला फिल्म फेअर ऍवार्डनं पुरस्कृत केलं होतं. यातलं तू प्यार का सागर है, सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी, कहॉं जा रहा है, हमे भी दे दो सहारा, मनमोहना, बात बात पे रुठो ना, ही शंकर-जयकिशनच्या संगीतानं नटलेली आणि मन्नाडे, म. रफी आणि लता यांनी गायलेली आणि शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेली सगळीच गाणी अप्रतिम आहेत. या चित्रपटात बलराज साहनी जेव्हा एका बायकोला मारहाण करणार्‍या, तिला वस्तू समजणार्‍या नवर्‍याला -आश्रमात फिरवतो आणि हीच समाजातली प्रतिष्ठित म्हणून मिरवणारी खोटी माणसं असे आश्रम निर्माण करायला भाग कसे पाडतात हे दाखवतो. त्या वेळी अनाथाश्रमातली ती निरागस मुलं दाखवून, त्या अनाथ, कोणाच्या तरी जबरदस्तीनं उदध्वस्त झालेल्या मुली दाखवतो, तेव्हा प्रत्येकानं अंतर्मुख व्हावं असा तो प्रसंग बोलत राहतो.

बलराज साहनीचा अभिनय हा त्याला कुठल्याही भूमिकेत टाकला तरी तो त्या भूमिकेचा होतो. माझ्या दृष्टीनं तर तो ‘बाप’ माणूस आहे! या चित्रपटात गौरी झालेली नुतन बलराज साहनीसारख्या बरोबर अभिनयात टक्कर तर देतेच, पण अनेक प्रसंगात ती बलराज साहनीलाही ओलांडून पुढे जाते. तिच्यातली हट्टी मुलगी, तिचं निरागस मन, तिचा स्वाभीमान, तिचं दुखरेपण, तिच्यातली प्रत्येक अस्वस्थ भावना आपल्याला तिच्या डोळ्यातून कळत जाते. या चित्रपटाच्या वेळी नुतनचं वय अवघं १९ वर्षांचं, तर बलराज साहनीचं ४२ वर्षांचं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीला बलराज साहनी या कलाकारानं आपल्या आयुष्याची २५ वर्षं दिली आणि १२५ चित्रपटांत काम केलं. माणसातलं नष्ट होत चाललेलं माणूसपण, त्याची र्‍हास होत चाललेली मूल्यं, सामाजिक भेदाभेद या सगळ्या गोष्टींना पुन्हा बदलणारा सशक्त ताकदीचा कलाकार म्हणून बलराज साहनीकडे बघावं लागतं. दलित, शोषित, वंचित आणि उपेक्षित वर्गाचं प्रतिनिधित्व या कलाकारानं केलं. शिक्षणानंतर आपलं आयुष्य पत्रकारितेत या माणसानं झोकून दिलं. रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन विद्यापीठात त्यांनी हिदीं विषय शिकवण्याचं कामही केलं. वर्ध्याला म. गांधीच्या आश्रमातही काही काळ वास्तव्य केलं. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लंडनची बीबीसीमधली नोकरी सोडून स्वातंत्र्यलढ्यात हा माणूस उतरला. लंडनमध्ये राहिलेला, तिथे बीबीसीमध्ये नोकरी केलेला, डाव्या विचारसरणीचा, शेक्सपिअरची नाटकं आपल्या समर्थ अभिनयानं जिवंत करणारा, बर्नार्ड शॉच्या नाटकात काम करणारा, इतका मोठा कलाकार असूनही साधेपणानं सामान्य जीवन जगणारा, अतिशय संवेदनशील व्यक्ती असलेला बलराज साहनी मला इतका भावतो की बस्स! तसंच तो मलाच काय, पण कोणालाच कधीच परका वाटू शकत नाही हेही तितकंच खरं!

हा चित्रपट मी कथानक सांगितलं असलं तरी प्रत्येकानं जरूर बघावा!!! कारण त्यातल्या अनेक जागा, अनेक प्रसंग आयुष्याचं खूप मोठं तत्वज्ञान सांगून जातात. 

कहाँ जा रहा है तू ऐ जानेवाले 
अंधेरा है मन का दिया तो जला ले 
ये जीवन सफर एक अंधा सफर है 
बहकना है मुमकिन भटकने का डर है 
संभलता नहीं दिल किसीके संभाले 
जो ठोकर ना खाए नहीं जीत उसकी 
जो गिर के संभाल जाए है जीत उसकी 
निशां मंज़िलों के ये पैरों के छालें ...
कभी ये भी सोचा के मंज़िल कहाँ है 
बड़े से जहां में तेरा घर कहाँ है 
जो बाँधे थे बंधन क्यों तोड़ डाले ...

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.