आणि काय हवं?
खरं तर मी मराठी आणि हिंदी कुठल्याही मालिका बघत नाही. त्यामुळे माझं त्याबाबतचं सामान्यज्ञान अगदीच कमी आहे. म्हणजे जवळ जवळ नाहीच. पण अपूर्व किंवा त्यातल्या जाणकार माणसानं मला सुचवलं की मी लगे हातो बघून टाकते. तसंच काहीसं या वेब सीरिज बाबत झालं. फेसबुक मित्र डॉ. प्रशांत पाटील यांनी सुचवल्यामुळे ‘आणि काय हवं?’ ही सहा भागांची सिझन टूची वेबसीरिज एका दमात बघून संपवली. लईच आवडली. मोगॅम्बो एकदम खुश हो गया!
'आणि काय हवं?' ही वेब सीरिज आवडण्याची कारणं म्हणजे एक तर यात एकदम फ्रेश, ताजी, टवटवीत दिसणारी जोडी आहे. हो, उमेश कामत आणि प्रिया बापट यांची! यातही हे दोघं नवरा-बायकोच आहेत. त्यांचा अभिनय सहजसुंदर! दिसतातही अगदीच साधे, म्हणजे आपल्यासारखेच वाटतात. त्या नेहमीच्या (भुक्कड) मालिकांमध्ये दाखवतात तसे भरपूर मेकअप केलेले आणि सणासुदीला भारी-भरजरी कपडे-दागिने घरात घातल्यासारखे नव्हे! या वेबसीरिजमध्ये त्यांचं घरही खूप सुरेख दाखवलं आहे. मला तर हॉल असो की बेडरूम - ते झुळझुळीत पडदे, लॅम्प शेड सारं काही खूपच आवडलं.
यातल्या प्रत्येक भागात काहीतरी वेगळं घडतं. म्हणजे प्रियाला कधी कुत्रा पाळावासा वाटतो, तर उमेशला मांजर. दोघांमध्ये अनेक गोष्टीत मतभेद आहेत, पण ते टोकाला न नेता त्यातून ते कसा मार्ग काढतात हे बघणं खूप आनंददायी आहे. संगीत आणि त्यातल्या दिग्गजांबद्दल वाटणारं आकर्षण आणि मग त्यांच्या वस्तूंबद्दलही एक अनामिक ओढ वाटून त्यातूनही हे येडे प्रेमिक काय काय करतात ती मजा आणि ते झपाटलेपण अनुभवण्यासारखं आहे. एका एपिसोडमध्ये उमेशला सर्दी होते आणि मग तो किती नाटकं करून प्रियाकडून लाड करून घेतो. एवढंसं झालेलं सर्दीसारखं दुखणंही डोंगराएवढं करून सोडतो हे सगळं बघताना मला आमच्या अपूर्वचीच आठवण आली. उमेश आणि तो सारखेच दिसायला लागले. इतकंच नाही तर मीही त्या उमेशसारखी भासायला लागले. (कारण मी आजारी पडले की मी अपूर्वला असाच त्रास देते असं माझ्या मैत्रिणींचं म्हणणं असतं!) त्यानंतर माणूस जवळ असताना जे वाटतं, ते तो माणूस दूर असताना आणखी तीव्रतेनं वाटतं आणि मग त्याची वाट बघणं एका एपिसोडमध्ये सुरू होतं. लहानसहान गोष्टीतल्या आठवणी तो विरह मोठा करून टाकतात. मूल होऊ द्यायचं की नाही या बाबतीत सुद्धा या दोघांमध्ये मतभिन्नता असतानाही हाही प्रसंग किती कुशलतेनं आणि मध्ये कुठेही अहंकार न आणता, टोकाला न जाता कसा हाताळता येतो हे यातल्या शेवटच्या एपिसोडमध्ये कळतं. जगणं अशा पद्धतीनं घेतलं तर किती सुंदर बनू शकतं, नातं किती घट्ट होऊ शकतं आणि लहानलहान गोष्टीतले आनंद आयुष्याला किती वेगवेगळे अर्थ देऊन जातात हे 'आणि काय हवं?' ही वेबसीरिज बघताना जाणवत राहतं.
या मालिकेचा दिग्दर्शक आणि लेखक वरूण नारवेकर याचं खूप खूप अभिनंदन. सध्याच्या क्रूरता, हिंसा दाखवणार्या, सेक्सचं भडक चित्रण दाखवणार्या, हेवेदावे आणि सूड घेऊ पाहणार्या मालिकांपेक्षा जे आम्हा प्रेक्षकांना दिलंय, त्याबद्दल खूप खूप आभार. लव यू वरूण!
विशेष म्हणजे कुटुंबासोबत बघा की एकटे बघा, ही मालिका बघताना चुकूनही अवघडलेपण येत नाही! एक आल्हाददायक अनुभव घ्यायचा असेल तर 'आणि काय हवं?' ही सिझन टू वेबसीरिज जरूर जरूर बघा!
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
Add new comment