द डेविल
काल सायंकाळी धनूबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात ‘ द डेविल’ हे नाटक बघितलं. फेरेंझ मोल्नार या हंगेरियन नाटककारानं १०० वर्षांपूर्वी हे नाटक लिहिलं असून भारतात प्रथमच आणि तेही मराठीतून सादर झालं. यात ललित कला केंद्राच्या बीए नाट्यशास्त्राच्या २५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मराठीतून नाट्यानुवाद प्रदीप वैद्य यांनी अतिशय सशक्तपणे केलाय. मराठीच्या साच्यात बसवताना मूळ नाटक आणि मराठीतला नाट्यानुभव, यातली पात्रं, याचा विषय काहीही परकं वाटत नाही.
डेविल म्हणजे पाप किंवा राक्षस म्हणू या. माणसाच्या मनातलं नैतिक-अनैतिक कल्पना आणि विचारांचं द्वंद्व, पाप-पुण्याच्या कल्पना, मनात येणारे राक्षसी तर कधी पलायनवादी विचार, मनातले विचार मनातच दडपून टाकायची सवय लागलेलं मन, असूया, संशय, पझेसिव्हनेस, अवलंबित्व, दुबळेपणा, अनुभवातून येणारं शहाणपण, प्रेम, लग्न, विवाहबाह्य संबंध या आणि अशा अनेक गोष्टींवर हे नाटक भाष्य करतं. या नाटकाचं संगीत अर्थातच पाश्चात्त्य शैलीचं असून पात्रांची वेषभूषाही त्याला साजेशी आहे. या नाटकामुळे आताची तरुणाई किती बिनधास्त आणि समजून उमजून आपली भूमिका साकारू शकते याचा प्रत्यय आला. विषयाचं आकलन, भूमिकेची मागणी आणि आत्मविश्वास यांचा जबरदस्त संयोग मला या तरुणाईमध्ये दिसला आणि भावला. (पहिल्या अंकानंतर सभागृहाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये काही भाग सुरु होता, तेव्हा प्रेक्षकांशी देखील LIVE संवाद सुरु असताना धनूला त्यातल्या एका पात्राने चक्क नाना पाटेकर करून टाकलं आणि स्वाक्षरी देखील मागितली.)
नाटक संपल्यावर व्यासपीठावर दिग्दर्शक पीटर वॉल्क्स नावाची गोड व्यक्ती आली. त्यांनी दोनच मिनिटं बोलून आभार मानले. प्रदीप वैद्य यांची भेट परवा ‘काजव्यांचा गाव’च्या वेळी झाली होतीच. नाटक मला किंचित पसरट वाटलं. आजच्या वेगानं धावू पाहणार्या जगात आता हा संथपणा सतावायला लागतो हेही तितकंच खरं. पण तरीदेखील जरूर पहा आणि एक वेगळा अनुभव घ्या - ‘द डेविल’!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment