अस्तु....असो.....!
आत्ताच डॉ. मोहन आगाशे निर्मित 'अस्तु' बघितला. बघायला जरा उशीरच झाला हेही लक्षात आलं.....पण झाला खरं उशीर! सुमित्रा भावेंची कथा, पटकथा आणि सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचं दिग्दर्शन....शब्दच नाहीत....चित्रपटाची सुरुवातच सत्य म्हणजे काय हा प्रश्न निर्माण करून होते.....जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत सत्य असेल तर मग जाणीव संपली तर.....? हा प्रश्न खूप खूप मोठा होत जातो! खरं तर सगळं सुसंबंद्ध व्यक्त करणं कठीणच आहे. पण हा चित्रपट खूप म्हणजे खूप मनाच्या आतपर्यंत स्पर्शून गेला. मनातल्या भावनांचे किती किती पदर यातून उलगडत गेलेले दाखवले आहेत.
अल्झायमर, स्मृतिभ्रंश झालेल्या डॉ. चक्रपाणी शास्त्री नावाच्या एका विद्वानं संस्कृत पंडिताची गोष्ट....खरं तर एका दिवसाचीच ही गोष्ट.........न विसरता येण्याजोगी.....! इरावतीचं आपल्या वडिलांवरचं प्रेम, काळजी, त्याचबरोबर तिचा त्यांच्यावरचा राग....या सगळ्या गोष्टी अशा सहजपणे आपल्याला कळत जातात.....इरा आणि राही या दोघी बहिणींमधला स्वभावातला फरक, एक प्रॅक्टिकल तर दुसरी त्याच्या विरुद्ध, जगताना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा, पण तितकंच आपल्या वडिलांवर असलेलं प्रेम....जावई असलेला माधव (मिलिंद सोमण) याच्यातला समंजसपणा/समजुतदारपणा.....हत्तीवाला आणि त्याची मुलगी यांचं अप्पाशी हळूहळू जुळत गेलेलं नातं, हत्तीवाल्याची बायको अप्पाला आपलं लहान मूल समजून त्यांची करत असलेली सेवा, तिच्यातली माणुसकी आणि लहानपणीच आई-वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेले, स्मृतिभ्रंश झालेल्या अप्पांना हत्तीवाल्याच्या बायकोत आपली आई दिसणं....सगळंच अनाकलनीय, अजब, तितकंच मनाला भिडणारं! एकीकडे या विकाराची तीव्रता दाखवलीय, तर त्याच वेळी त्या रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी कसरतही दाखवलीय.
एकीकडे अशा संस्थांमध्ये दाखल झालेले स्मृतिभ्रंशाचे रुग्ण एखाद्या निर्विकार, यंत्रवत हालचाल करणार्या रोबोटसारखे भासतात, तर त्याच वेळी हा प्रश्न किती गंभीर बनत चाललाय आणि यासाठी किती व्हॉलिंटियर्सची गरज आहे हे बोलणार्या दीपा लागू इथंच भेटतात. वर्तमानच खरा बाकी काही नाही हे झेन तत्वज्ञान सांगणारे अप्पा, सगळं काही विसरलं तरी त्यांच्या मनात रुजलेल्या अनेक गोष्टी त्यांना जशाच्या तशा लक्षात असल्याचंही यात दाखवलंय. अनेक तर्हेनं हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघायला हवा.
डॉ. मोहन आगाशे यांच्याबद्दल काय बोलावं? मी शाळेत असल्यापासूनचे त्यांचे अनेक चित्रपट बघितलेत....पण या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेनं मला हलवून सोडलं. त्यांचं कासावीस होणं, त्यांच्यातलं मूल जागं होणं, त्यांच्यातली विद्वत्ता, त्यांच्यातली मानवता, त्यांच्यातलं निरागस मन .....प्रत्येक प्रसंग या माणसानं जिवंत करून, खरा करून सोडलाय. डॉक्टर, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम! हीच गोष्ट अमृता सुभाषची! एका गरीब हत्तीवाल्याची ही बायको....इतक्या गरीबीतही तिच्यातला माणूस जिवंत असणं, तिच्यातली आई, तिच्यातलं मातृत्व जागं असणं....आणि या भूमिकेला अमृतानं अगदी योग्य न्याय दिलाय.
यात मिलिंद सोमण, इरावती हर्षे, देविका दफ्तरदार, दीपा श्रीराम, ज्योती सुभाष, ओम भूतकर, नचिकेत पूर्णपात्रे आणि शेखर कुलकर्णी या सगळ्यांच्याच भूमिका चांगल्या झालेल्या आहेत. हा चित्रपट बघताना मन पुन्हा पुन्हा म्हणत होतं, आपण किती सुदैवी आहोत....सुदैवी शब्द बरोबर की नाही मला ठाऊक नाही. पण या क्षणी तरी दुसरा शब्द सापडतही नाही. या पुणे शहरात डॉक्टरांसारखे, अमृतासारखे, सुमित्राताई आणि सुनील सुकथनकर सारखे गुणी कलाकार आहेत आणि आपल्याला त्यांनी निर्मिलेले उत्तमोत्तम अविष्कार बघायला मिळताहेत...त्यामुळे 'आपण सुदैवी' असं मन सारखं म्हणत राहिलं. अस्तुच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन! खूप खूप !
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment