नेटफ्लिक्सवर ‘रे’
रे - सत्यजीत रेंच्या चार लघुकथांवर आधारित चार स्वतंत्र एपिसोड असलेली वेबसिरीज नुकतीच म्हणजे 25 जून 2021 या दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. खरं तर ट्रेलर बघितल्यापासून वाट बघत होते. यातला अली फजलचा फरगेट मी नॉट, के के मेननचा बहुरुपिया आणि मनोज बाजपेयीचा हंगामा क्यूँ है बरपा असे तीन एपिसोड मी बघितले आणि मन म्हणालं, वा, क्या बात है!
‘फरगेट मी नॉट’ या कथेत इप्सित रामा नायर हा एक बिझिनेसमन असून त्याची बुद्धिमत्ता एखाद्या कम्प्युटरसारखी असते. एकदा त्याला एक तरुणी भेटते आणि आपण औरंगाबादच्या कैलाश हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र येऊन कशी मौज केली हे सांगते. मी कधीही औरंगाबादच्या कैलाश हॉटेलमध्ये गेलो नाही आणि तुला तर मुळीच ओळखत नाही असं तो सांगतो आणि तिला तिथून जायला सांगतो. मात्र पुढे असे काही प्रसंग येतात की खरोखरंच आपण त्या तरुणीबरोबर ७ दिवस एकत्र व्यतीत केले की नाही हा संभ्रम तयार व्हायला लागतो, त्याच्याही मनात आणि प्रेक्षक म्हणून आपल्याही मनात. एखाद्या जीनियससारखी त्याची तीव्र स्मरणशक्ती आणि त्याला या सात दिवसांचा हिशोब न लागणं यामुळे तो खूप अस्वस्थ होतो आणि हा सगळा उत्कंठावर्धक प्रवास पुढे कुठे कुठे नेतो हे सांगणारी गोष्ट म्हणजे फरगेट मी नॉट. यात अली फझल या तरुणानं इप्सितची भूमिका मस्त साकारली आहे.
त्यांनतर ‘बहुरुपिया’ मध्ये मेकअप आर्टिस्ट असलेला केके मेनन या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून माणूस स्वार्थ, मोह, कपट, अपेक्षा, महत्वाकांक्षा या गोष्टी साध्य करण्यासाठी कसा एक मुखवटा धारण करतो आणि नंतर नंतर तो मुखवटा हीच त्याची ओळख बनतो, तो चेहरा ओरबाडून काढायचा ठरवलं तरी वेळ निघून गेल्यावर हाती काहीच उरत नाही आणि होतो तो वेदनादायी अंत - आधी प्रतिमेचा आणि त्यानंतर स्वत:चा. के के मेनन हा तर अभिनयात बाप माणूस आहे, त्यात सत्यजीत रे यांचं कथानक आणि त्याला योग्य न्याय देणारे दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी, अभिषेक चौबे आणि वासन बाला असल्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहणार.
या वेळी घाईगडबड करत एकाच दिवशी सगळे एपिसोड बघायचे नाहीत, तर आस्वाद घेत, मस्त मजेत, एक एक करत बघायचं मनाशी ठरवल्यामुळे आज तसाही व्ही स्कूलच्या टीमबरोबर हंगामा केला होताच, त्यामुळे मनोज बाजपेयी याचा हंगामा क्यँ है बरपा हा तिसरा एपिसोड बघितला.
रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या कंपार्टंमेंटमधून प्रसिद्ध गझल गायक मुसाफिर अली आणि पत्रकार आणि कुस्तीपटू असलम बेग हे प्रवासी भोपाळ ते दिल्ली असा प्रवास करताना एकमेकांशी गप्पा मारतात. कुस्तीपटू असलेल्या असलम बेगचं अतिशय सुंदर घड्याळ मागे झालेल्या एका प्रवासात मुसाफिर अलीनं चोरलेलं असतं. ज्या वेळी हे घड्याळ त्याने चोरलेलं असतं, त्या वेळी बेकारी आणि गरिबी यामुळे तो वैतागून गेलेला असतो आणि त्यातच त्याला लहानपणापासून वस्तू चोरण्याचा किप्टोमॅनिया नावाचा आजार जडलेला असतो. त्याचाच परिणाम या घड्याळ्याच्या चोरीत झालेला असतो. फ्लॅशबॅकमधून आपल्याला हे सगळं उलगडत जातं. मात्र वर्तमानात पुन्हा दोघंही प्रवास करताना मुसाफिर अलीला हे सगळं आठवतं, मात्र असलम बेगने मुसाफिर अलीला अजिबात ओळखलेलं नसतं. यातून काय काय घडतं हे खूपच रोचक आहे. या सगळ्या प्रवासातून माणसातल्या चांगुलपणाबरोबर त्याला चिकटलेल्या अशा काही प्रवृत्ती की त्याला अपराधी भावनेनं ग्रासतात, त्याला त्या सोडायच्या असल्या तरी तो कित्येकदा त्यांच्यापुढे हतबल बनतो, अनेकदा त्याच्यातली सद्विवेकबुद्धी त्याला अंतर्मनात डोकावून बघायला शिकवते आणि त्याच्यातला चांगुलपणा त्याला मनाची सफाई करायला लावतो. मनोज बाजपेयीनं मुसाफिर अली असा काही रंगवला आहे की ‘तौबा’ हेच शब्द मनातून आणि मुखातून बाहेर पडतात. मनोज बाजपेयीला साथ देणारा गजराज राव (बधाई हो मधला नीना गुप्ताचा नवरा किंवा आपल्या जितूभैय्याचा बाप!) हा माणूस तर लैच भारी माणूस आहे. आणि हो, आवडता अभिनेता रघुवीर यादव हा देखील यात आहे.
तर जरूर बघा, ‘रे’ ची वेबसिरीज नेटफ्लिक्सवर.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment