होई मन सुध्द तुझं....
मानसशास्त्र या विषयावर बोलणं सुरू असताना, अचानक माझ्या मैत्रिणीने एबीपी माझावर सुरू असलेल्या ‘होई मन सुध्द तुझं...’ या मराठी मालिकेविषयी बोलायला सुरुवात केली. मी याबाबत पूर्ण अनभिज्ञ होते, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून ती म्हणाली, मला ठाऊक आहे, तू मराठी मालिका बघत नाहीस, पण ही बघ. मी सांगतेय म्हणून नक्की बघ. नयन ही माझी खूप जवळची मैत्रीण, ती सांगते म्हणजे त्यात नक्कीच चांगलंच असणार असा विचार करून मी यू ट्यूबवरून या मालिकेचा एक एक एपिसोड बघायला सुरूवात केली आणि माझ्या अतिरेकी स्वभावानुसार बहुतांशी एपिसोड एका दमात बघितले.
‘होई मन सुध्द तुझं...’ या मालिकेचे लेखक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांनी इतक्या सुरेख रीतीने या कथा लिहिलेल्या आहेत की या कथांच्या, त्यातल्या पात्रांच्या प्रेमात पडावं. मग मालिकेची पटकथा/संवाद बघितले तर प्रशांत दळवी हे नाव दिसलं आणि वा, क्या बात है असं मन म्हणायला लागलं. यातले अनेक कलाकार माहीत असलेले दिग्गज आणि अनेक माहीत नसलेले पण कसदार अभिनय करणारे, अशा सगळ्यांचीच कामं अप्रतिम अशी. अभिनय न वाटता, त्या प्रसंगातून, त्या संकटातून, त्या कठीण परिस्थितीतून ही माणसं जाताहेत असंच त्यांच्याकडे बघून वाटत राहिलं. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रुंनी माझ्याही डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हासू फूलताच, मीही हसले. कथानकातलं, संवादातलं, कलाकारांच्या अभिनयातलं अस्सलपण बाहेर काढणारा आमचा मित्र चंदू - चंद्रकांत कुलकर्णी याचं दिग्दर्शन असल्यामुळेच तर ही मालिका इतकी सहजसुंदर आणि खरीखुरी आणि जिवंत झाली आहे.
केशवराव भोळे यांनी संगीतबध्द केलेलं कुंकू या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटातल्या गाण्याच्या ओळी आठवल्या :
मन सुद्घ तुझं गोस्त हाये पृथ्वीमोलाची
तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, पर्वा बी कुणाची..
हे गाणं आठवण्याचं कारण ‘होई मन सुद्ध तुझं...’ या मालिकेचं दासू यांनी लिहिलेलं शीर्षक गीतही असच अप्रतिम ... याला संगीत दिलंय, अशोक पत्की यांनी. मालिका सगळ्यांनीच बघितली असणार किंवा आहेच....मलाच बघायला उशीर झाला. मात्र अनेक वर्षांनी इतकी इतकी सुंदर मालिका बघण्याचं समाधान मिळालं. त्याच त्याच विषयांत घुटमळणाऱ्या, पाणी घालून घालून पाचंट केलेल्या किंवा झालेल्या, वास्तवापासून फारकत घेतलेल्या, भरकटण्यास उत्तेजन देणाऱ्या, वेळखाऊ, मनातले दबलेले विकार-विकृती यांना प्रोत्साहन देणाऱ्या, अशा मालिकांचं पेव फुटलेलं असताना ‘होई मन सुद्ध तुझं...’ ही मालिका एबीपी माझाने आणून इतकी मोलाची गोष्ट केलीय, की त्यांचे आभार कसे मानावेत हा प्रश्न आहे.
आज नव्हे तर पुढला काळ मानसिक विकार आपले हातपाय वेगाने पसरवणार असा तज्ज्ञांचा कयास आहे आणि अशा वेळी या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक विकार या विषयाचं महत्व लक्षात घेऊन त्याच क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या, लिखाणाचं कौशल्य असलेल्या, नंदू मुलमुले नावाच्या एका संवेदनशील डॉक्टरांना बरोबर घेऊन जिगिषा टीमने हा विषय निवडला. यातून एबीपी माझा बरोबरच जिगिषा टीमचंही सामाजिक भान लक्षात येतं. अशा प्रकारच्या जनजागृती आणणाऱ्या अभ्यासपूर्ण आणि तरीही रंजक अशा मालिका, अशा प्रकारची पुस्तकं आणि अशा प्रश्नांवर झटून काम करणारे कार्यकर्ते आणि संस्था यांची आज नितांत गरज आहे. अशा वेळी कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत या मालिकेनं आपल्या घरात, आपल्या आसपास असलेल्या प्रश्नांना समोर आणलं. त्या प्रश्नांची तीव्रता नजरेत आणून दिली, तर कधी त्या प्रश्नांकडे, त्या त्या नात्यांमधल्या गुंतागुंतीकडे कसं बघायला हवं हेही सांगितलं. वेगवेगळे मानसिक विकार, त्यांचा स्वीकार कसा करायला हवा, त्यांची लक्षणं, त्यावरचे उपाय आणि दिलासा देणारं एक वातावरण तयार करणं हे इतक्या सुंदर पद्घतीने या मालिकेतून दाखवलंय की खरोखरंच संपूर्ण टीमला हॅट्स ऑफ!
‘मन सुद्ध तुझं...’ या मालिकेतलं सगळ्यात लाडकं पात्र म्हणजे डॉक्टरांचं याने की रसरशीत अशा स्वप्नील जोशीचं! स्वप्नील जोशी म्हणजे चॉकलेट बॉय, ....मला स्वत:ला तो फारसा कधी आवडला नाही. मात्र या मालिकेत त्यानं माझंच नव्हे तर माझ्यासारख्या हजारो लोकांचं मत बदलवून टाकलं आहे. स्वप्नील जोशी मधला सायकॉलॉजिस्ट बघताना मला सतत डॉ. आनंद नाडकर्णी यांचा भास होत होता. तसंच हसणं, तशाच पद्धतीने बोलणं आणि समोरच्याला आश्वस्त करणं, त्याच उत्सुकतेनं समोरच्याचं म्हणणं ऐकणं, ती सहजता जितकी सहज, तितकाच त्यामागचा डॉक्टरांचा दांडगा अनुभव, संयम आणि हाताळलेला कठीण प्रसंग बघताना मला स्वप्नील जोशी की डॉ. नाडकर्णी नेमकं कोण माझ्यासमोर आहे हा प्रश्न पडला. चंदूच्या मनातही नक्कीच डॉ. नाडकर्णींच्या लकबी रुजलेल्या असाव्यात असं वाटलं. दिग्दर्शक चांगला असला की एखाद्या कलाकाराची पूर्ण प्रतिमा बदलून जाते तसं काहीसं स्वप्नील जोशीच्या बाबतीत घडलंय असंच मला वाटलं. अतिशय सुरेख काम स्वप्नील जोशीने केलंय हे मात्र खरं!
चंदूने लवकरच ‘मन सुद्ध तुझं...’ दुसरा भाग प्रेक्षकांसमोर आणायचं जाहीररीत्या कबूल केलंय, त्यामुळे आता प्रतीक्षा आहे, माहिती, ज्ञान आणि मनोरंजन असलेल्या पुढल्या सीझनची!
(लवकरच या मालिकेतल्या सगळ्या भागांवर लिहीन.)
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
Add new comment