थॉमस अल्वा एडिसन  -   (११ फेंब्रुवारी १८४७-१८ ऑक्टोबर १९३१)    - वयम 2017

थॉमस अल्वा एडिसन  -   (११ फेंब्रुवारी १८४७-१८ ऑक्टोबर १९३१)    - वयम 2017

कितीही अंधार असो, आपण एक बटण दाबताच क्षणात विजेच्या दिव्यानं लख्ख प्रकाश पसरतो आणि सारा परिसर उजळून जातो, तसंच आपण सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो आणि फोनवरही बोलतो ते केवळ आणि केवळ एडिसननं लावलेल्या शोधांमुळेच. एडिसन व्यवहारकुशल असल्यामुळे आपण लावलेल्या प्रत्येक शोधाचं पेटंट त्यानं घेतलं. ‘जी गोष्ट विकली जाणार नाही, ती मी कधीच बनवणार नाही’ असं तो म्हणत असे आणि खरोखरंच त्याने लावलेल्या शोधातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी पुढे सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या.
 
एडिसनचं पूर्ण नाव थॉमस अल्वा एडिसन होतं. अमेरिकेतल्या ओहायो राज्यातल्या मिलान नावाच्या गावात ११ फेब्रुवारी १८४७ या दिवशी सॅम्यूएल आणि नॅन्सी या जोडप्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. एडिसनचे वडील हॉटेलचा व्यवसाय करत, तर आई शिक्षिका होती. एडिसनच्या जन्माच्या वेळी त्याचे आई-वडील अत्यंत काळजीत होते. कारण एडिसनच्या जन्मापूर्वी त्यांची तिन्ही मुलं अर्भकावस्थेतच मरण पावली होती. त्यामुळे तीन मुलांच्या दगावल्यानंतर हे चौथं मूलं वाचेल की नाही याची चिंता त्यांना होती. एडिसनच्या नावाची गोष्टही मजेदार आहे. बाळाचं नाव काय ठेवायचं यावर सॅम्यूएल आणि नॅन्सी यांची चर्चा झाली आणि त्यात दोघांच्याही आवडीचं एक एक नाव बाळाचं ठेवायचं असं ठरलं. कॅप्टन अल्वा ब्रॅडले हा त्या जोडप्याचा जिवलग मित्र होता, त्याची आठवण म्हणून नॅन्सीने अल्वा नाव सांगितलं. तर सॅम्यूएलनं थॉमस हे नाव सुचवलं. बाळाच्या नाकाकडे पाहून तो एडिसनच असू शकतो यावर सॅम्यूएलचं ठाम मत होतं. यातूनच थॉमस अल्वा एडिसन असं बाळाचं नामकरण झालं.

घरात सगळ्यांच्या कोडकौतुकाच्या वातावरणात एडिसन वाढत होता. शाळेत आपल्या शिक्षकांना एडिसन त्याला वाटणार्‍या कुतुहलापोटी अनेक प्रश्‍न विचारत असे. त्याचं टोपणनाव ‘व्हाय’ असंच पडलं होतं. वर्गात एका जागी बसून राहणं त्याला आवडत नसे. ए फॉर ऍपल हे तर ठीक आहे, पण काही सफरचंद लाल आणि काही हिरवी असतात, ती तशी का असतात? डोंगरावरून पाणी वाहत खालीच का येतं? बर्फ हिवाळ्यातच का पडतो असे अनेक प्रश्‍न तो विचारी आणि मग त्याच्या प्रश्‍नाचं समाधानकारक उत्तर देता न आल्यानं शिक्षकही चिडत. त्याला गप्प बसण्यास सांगत. 

एके दिवशी एडिसन गृहपाठ न करता शाळेत गेला. त्याच्या शिक्षकांनी त्याची शाळेतून चक्क हकालपट्टी केली. त्याचं कारण त्याच्या शिक्षकाला विचारताच त्यांनी उत्तर दिलं होतं ते खूपच मजेशीर होतं. ते म्हणाले, ‘‘हा मुलगा बुद्धीनं मंद असल्यामुळे शिकू शकणार नाही.'' पण एडिसनच्या आईचा आपल्या मुलावर नितांत विश्‍वास होता. ती त्या शिक्षकाला म्हणाली, ‘‘एक दिवस थॉमस एडिसन हे नाव सगळं जग लक्षात ठेवेल मात्र त्या वेळी तुमचं नावही कोणी विचारणार नाही.'' तरीही अर्थातच एडिसनची शाळा सुटली ते सुटलीच. मात्र त्याच्या आईनं एडिसनची शाळा जरी सुटली, तरी त्याला घरीच उच्च दर्जाचे संस्कार आणि विज्ञानाचं शिक्षण दिलं. याचाच परिणाम म्हणजे पुढे एडिसननं आपल्या आईची भविष्यवाणी खरी करून दाखवली आणि तब्बल १०३३ शोधांची पेटंट्स त्याच्या नावावर लागली! त्यानं इतके शोध लावले की त्याच्या शोधांची यादी करावी म्हटलं तर ती करणं अशक्य व्हावं. विजेचा दिवा असो वा फिल्म असो, फोनोग्राफ असो वा ग्रॅहमच्या फोनमधल्या सुधारणा या शोधांबरोबरच एडिसन यानं विजेवर चालणार्‍या मतमोजणीच्या मशीनचाही शोध लावला.

चिमुरडा एडिसन शाळा सोडून घरीच बसायला लागला. संपूर्ण दिवस त्याला रिकामा असल्यामुळे त्याच्या खोड्यांना ऊत येत असे आणि घरातली मंडळी त्याच्या या उपद्व्यापांमुळे वैतागून जात. तसंच त्याला आजूबाजूला दिसणार्‍या अनेक गोष्टींबद्दल इतरांना ना ना प्रश्‍न विचारून तो भंडावून सोडत असे. लहानपणी एडिसन कोंबड्यांच्या मागे धावत असे, कोंबडी हातात सापडली की तो तिचे पिसं उपटून काढण्याचा प्रयत्न करत असे. कारण काय तर ही पिसं चिकटवून बसवलेली आहेत असं त्याला वाटे. पिसं ओढल्यामुळे कोंबड्या चिडून एडिसनला चिडून चोचीने टोचा मारत आणि पळून जात. एकदा एडिसनला कळालं की अंड्यावर बसल्यामुळे नंतर त्यातून कोंबडीची पिल्लं जन्माला येतात. मग काय, एडिसननं कोंबडीची बरीच अंडी गोळा केली आणि छान एका टोपलीत ताज्या गवतात ठेवली. ती अंडी त्याने गोलाकार रचली आणि त्यावर तो बसून राहिला. एडिसन कुठे दिसत नाही म्हणून घरातल्या मंडळींनी जेव्हा शोधाशोध सुरू केली, तेव्हा अंडयांच्या टोपलीवर बसलेला एडिसन त्यांना सापडला. त्याला प्रश्‍न करताच, तो उत्तरला, ‘‘मी अंड्यांतून पिल्लं बाहेर काढतो आहे.’’  एडिसन अंड्यांवर बसल्यामुळे ती फुटली तर होतीच, पण त्याचे सगळे कपडेही खराब झाले होते. त्याच्या या प्रतापावर जराही न वैतागता एडिसनच्या आईनं त्याला ही अंडी कोंबडीच कशी हळुवारपणे उबवू शकते आणि त्यातून पिल्लांना तीन आठवड्यांनतर जन्माला घालू शकते हे समजावून सांगितलं. गंमत म्हणजे त्या कोंबडीच्या खुराड्यात नेमकी त्याच वेळी एक कोंबडीनं अंडं उबवून त्यातून पिवळट रंगाचं पिल्लू बाहेर पडत होतं. एडिसन भारावून गेल्यासारखा हे दृश्यं पाहातच राहिला. 

कधी कधी एडिसन बदकाचे पाय चिकटलेले का आहेत हा प्रश्‍न पडून बदकाला पकडून ठेवत असे. त्या भेदरलेल्या बदकांची सुटकाही एडिसनच्या आईच्या लक्षात येता करावी लागे. अशा प्रकारचे चित्रविचित्र प्रयोग चालत. शेवटी घरच्यांनी चिडून त्याला घराच्या पोटमाळ्याची जागा त्याच्या उद्योगांसाठी दिली. मग काय, एडिसन महाशयांनी त्या पोटमाळ्यावर थाटामाटात आपली प्रयोगशाळा सुरू केली. प्रयोग करण्यासाठी त्याला अनेक प्रकारची रसायनं लागत. ती मिळवण्यासाठी तो वर्तमानपत्रं विकून पैसे कमवत असे आणि त्यातून प्रयोगशाळेचा खर्च भागवत असे. मिलान या गावात एडिसनचा जन्म जरी झाला असला, तरी त्याचे वडील र्पोट हुरान या गावी उदरनिर्वाहासाठी गेले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम बेताचीच होती. एडिसन रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रांबरोबरच फळं विकण्याचंही काम करत असे. त्याच्या कष्टाळू आणि मेहनती स्वभावामुळे रेल्वेचे अधिकारी त्याची प्रशंसा करत. त्यांना त्याचं खूपच कौतुक वाटे. हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात आल्यानं त्यांनी रेल्वेचा एक रिकामा पडून असलेला डबा एडिसनच्या प्रयोगशाळेसाठी म्हणून उपलब्ध करून दिला होता. या डब्याच्या एका कोपर्‍यात एडिसननं त्याला हव्या त्या वस्तू जमा करून स्वतःची प्रयोगशाळा थाटली होती. शाळा तर केव्हाच सुटली होती. पण विज्ञानाची गोडी असल्यामुळे तो वेळ मिळाला की विज्ञानाची पुस्तकं वाचत असे. पुस्तकातून मिळालेली माहिती आणि स्वतःच्या कल्पना यांची सांगड घालून तो वेगवेगळे प्रयोग करून बघत असे.

एडिसन बरेचदा सॅम विन्चेस्टर नावाच्या माणसाच्या धान्याच्या गिरणीत जात असे. या सॅमलाही हवेत उडू शकेल असं उपकरण शोधून काढायचा असा नाद लागला होता. ते पाहून एडिसनलही आपणही असाच प्रयोग करायला हवा असा ध्यास घेतला. त्यानं लगेचच प्रयोगासाठी अनेक रसायनं एकत्र केली आणि एखाद्या माणसाला पकडायचं आणि त्याला ही रसायनं खाऊ घालायची, मग तो हवेपेक्षा हलका होऊन हवेत उडू लागेल अशी एडिसनची धारणा होती. त्यानं प्रयोगासाठी त्याच्या वडलांकडे काम करणारा मायकेल ओट्स नावाच्या एका माणसाला या प्रयोगासाठी तयार केलं आणि ही रसायनं खाण्यास भाग पाडलं. एडिसनला वाटलं, आपला प्रयोग आता यशस्वी होणार आणि मायकेल हवेत उंच उंच गिरक्या घेत उडू लागणार. पण कसचं काय, झालं भलतंच. रसायनं पोटात जाताच मायकेल कासावीस झाला, त्याला तातडीनं डॉक्टरांकडे न्यावं लागलं. डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मायकेलचा जीव वाचला. असा जिवघेणा प्रयोग केल्याबद्दल एडिसनच्या वडलांनी- त्याला चांगलंच झोडपून काढलं.

एवढा मार खाऊनही एडिसननं आपली प्रयोगशील वृत्ती नष्ट होऊ दिली नाही. एकदा एडिसन शेतात खेळत होता. त्याला आग कशी पसरते हे अनुभवण्याची आणि पाहण्याची तीव्र इच्छा झाली. लगेचच त्यानं काडी पेटवून गवताच्या गंजीवर टाकली. मग काय, लगेचच आग झपाट्यानं पसरली आणि गवत आणि झोपडी दोन्हीही आगीत क्षणार्धात भस्मसात झाले. 

एकदा तर गंमतच झाली. १८६२ साली एडिसनने एका छोट्या मुलाला रेल्वेच्या रुळावर खेळत असताना बघितलं. तो मुलगा एकटाच स्वतःच्या खेळण्यात इतका गर्क होता, की रेल्वेच्या फाटकातून सामानानं खचाखच भरलेला, भरधाव वेगानं येणारा ट्रकही त्याला दिसला नाही. एडिसननं स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धावत जाऊन त्या मुलाला रुळावरून उचलून बाजूला केलं आणि त्याचा जीव वाचवला. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिथले रेल्वेमास्तर मॅकेंझी यांचा मुलगा होता. आपल्या मुलाचा जीव वाचवला याचं त्रण कसं चुकतं करावं हेच मॅकेंझी यांना कळेनासं झालं. त्यामुळे त्यांनी एडिसनला आगगाडीच्या तारायंत्राचं प्रशिक्षण दिलं आणि त्याला रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचं काम दिलं. एकीकडे एडिसनचे त्याच्या प्रयोगशाळेतले प्रयोग दिवसभर चालत. त्यामुळे त्याला रात्री खूप झोप येई. मग त्यानं काय करावं? तर त्यानं तारयंत्रालाच एक घड्याळ बसवलं आणि ते घड्याळच तासातासाला संदेश पाठवण्याचं काम करू लागेल अशा पद्धतीनं तयार केलं. त्यानंतर १८६९ साली एडिसन टेलिग्राफ इंजिनियर झाला. 

त्यानंतर काहीच काळात युद्ध सुरू झालं. वर्तमानपत्राचा खप वाढू लागला. यामुळे त्या काळात एडिसननं चक्क एक छापखानाच विकत घेतला आणि ‘ग्रँड ट्रंक हेराल्ड’ नावाचं युद्धाच्या बातम्या देणारं वर्तमानपत्र काढलं. एडिसनने काढलेल्या सर्वच्या सर्व प्रती हातोहात संपू लागल्या. त्याच्या हातात चांगला पैसा खेळू लागला. मात्र त्या मिळालेल्या पैशातून तो प्रयोगांसाठीचं साहित्य विकत घेई. एकदा एक गंमतच झाली, एडिसन रेल्वेच्या डब्यात प्रयोग करत असताना एक मोठा स्फोट झाला. ते बघून रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी एडिसनवर जाम वैतागले आणि त्यांनी डब्यातली प्रयोगशाळा बंद करावी अशी सूचना केली. त्यानंतर एका (दंत)कथेप्रमाणे त्यातल्या एका रेल्वे अधिकार्‍याला एडिसनच्या या कारनाम्याच्या इतका राग आला की त्यानं चिडून जाऊन एडिसनच्या कानाखाली इतक्या जोरात वाजवली, की एडिसन कायमचा बहिरा झाला! 

काहीच दिवसांत क्लेमेन्स या गावी एडिसनला तार मास्तर म्हणून नोकरी मिळाली. पण गाडी सुटल्यावर तारेने संदेश पोहोचवण्याचं काम त्याला अतिशय कटकटीचं वाटे. त्यात जाणारा वेळ त्याला अडथळ्यासारखा वाटे. आपल्या वाचनात अडथळा येतो या कारणानं त्याला नोकरी गमावण्याची पाळी आली. त्याच्या याच स्वभावामुळे त्यानं अनेक ठिकाणी नोकर्‍या केल्या, पण कुठेच एडिसन स्थिरावू शकला नाही. अखेर कंटाळून १८६९ साली तो न्यूयॉर्क येथे गेला आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी संदेश पाठवण्याच्या त्याच्या योजनेचा अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजला फारच उपयोग झाला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला तिथेच नोकरीही मिळाली आणि त्या योजनेचं पेटंट त्याला मिळालं. त्याला स्टॉक एक्स्चेंजनं त्याला त्याबद्दल चक्क चाळीस हजार डॉलर्स दिले! रातोरात गरीब एडिसन श्रीमंत झाला. मग काय, एडिसनमहाशयांनी लगेचंच मिळालेल्या पैशांतून जागा विकत घेतली आणि तिथे त्याला हवी तशी प्रयोगशाळा उभारली. ग्रॅहम बेलनं लावलेल्या टेलिफोनच्या शोधावर त्यानं आणखी खोलवर संशोधन केलं आणि फोनमधून सुस्पष्ट आवाज कसा येईल यासाठी संशोधन करायला सुरुवात केली. यातूनच फोनोग्राफचा शोध लागला, जो पुढे ग्रामोफोन म्हणून ओळखला गेला. एडिसन केवळ शोध लावून गप्प बसत नसे तर एक शोध संपला की लगेचंच तो दुसर्‍या शोधाच्या तयारीत मग्न होत असे. आश्‍चर्याची गोष्ट अशी की एडिसननं लहान-मोठे असे जवळजवळ १२०० शोध लावले. यापैकी बहुतांशी शोधांची पेटंट्स मिळवल्यामुळे कोट्यवधी डॉलर्स मिळाले. त्या काळी सर्वात जास्त शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांमध्ये त्याचा पहिलाच नम्बर होता. एडिसननं लावलेल्या शोधांचं वैशिष्ट्यं असं की त्याने लावलेले जवळपास सगळेच शोध हे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आवश्यक आणि उपयोगी पडणारे असे होते. उदाहरण द्यायचं झाल्यास विजेचा दिवा, मोशन पिक्चर कॅमेरा, मोटारीसाठी विद्युतघट असे अनेक. याशिवाय टेलिकम्युनिकेशनमधलं त्याचं योगदान फार मोलाचं आहे.
 
हिराम मॅक्सिम, जोसेफ स्वॅन, थॉमस एडिसन, आणि आणखी किमान डझनभर संशोधकांनी विजेवर चालणार्‍या दिव्याची (बल्ब) निर्मिती केली. पण आपण या सगळ्यांपैकी फक्त एडिसनचं नाव ऐकलेलं असतं. गंमत म्हणजे एका काचेच्या बंद गोळ्यात उजेड निर्माण करायची युक्ती एडिसननं प्रथम शोधली नव्हतीच. तसंच लोकांना नेहमी वाटतं की एडिसननं विजेच्या दिव्यामध्ये कार्बन हा वायू वापरण्याची किमया केल्यामुळे त्याचं संशोधन इतरांपेक्षा वेगळं होतं. पण हेसुद्धा खरं नाहीये! एडिसनच्या आधी किमान ५० वर्षांपासून विजेवर चालणारे बल्ब्ज तयार करण्याच्या प्रयत्नात असलेली मंडळी त्यांच्या दिव्यांमध्ये कार्बन वापरत होती! मग सगळीकडे फक्त एडिसनचंच नाव विजेच्या दिव्यांच्या संशोधनाच्या बाबतीत का घेतलं जातं? काही जणांना वाटतं की यामागचं कारण म्हणजे एडिसनला या संशोधनासाठीचं पेटंट मिळालं म्हणून. पण तेही खरं नाहीच! कारण तशी पेटंट्सही अनेक जणांना मिळाली. एडिसनचं वेगळेपण म्हणजे इतर लोकांचे दिवे बहुतेक वेळा फक्त ठरावीक वातावरणात आणि प्रयोगशाळेत व्यवस्थित चालायचे. एडिसननं दिव्याला प्रयोगशाळेच्या बाहेर काढलं, आणि घराघरांमध्ये, दुकानांमध्ये, कारखाने आणि कार्यालयांमध्ये, आणि रस्त्यांवर नेलं आणि चालवून दाखवलं. इतिहासात म्हणूनच फक्त त्याचं नाव विजेच्या दिव्याच्या संदर्भात घेतलं जातं!

१८७० च्या दशकात इंग्लंड, फ्रान्स, आणि अमेरिकेत किमान चार जण विजेच्या दिव्याच्या संशोधनावर काम करत होते. त्यांचं संशोधन योग्य मार्गावर सुरु होतं. जोसेफ स्वॅननं अनेक ब्रिटिश घरं आपल्या दिव्यानं उजळवून दाखवली होती. हिराम मॅक्सिम या एडिसनच्या कट्टर अमेरिकन प्रतिस्पर्ध्यानं सलग २४ तास चालू शकेल अशा दिव्याचं पेटंट मिळावं म्हणून अर्जसुद्धा दाखल केला होता. पण एडिसननं फक्त उजेड देणारा दिवा बनवायचा प्रयत्न न करता तो दिवा एकूणच शहरातल्या विजेच्या इतर उपकरणांचा, वीजपुरवठ्याचा, तारा आणि फ्यूज यांचा विचार करुन बनवायचा प्रयत्न केला होता. म्हणजेच त्याचा दिवा नुसता एक वेगळं किंवा स्वतंत्रपणे चालणारं उपकरण म्हणून नव्हे तर सगळ्या ‘सिस्टीम‘ चा एक भाग म्हणून चालला पाहिजे याची त्यानं सुरुवातीपासून काळजी घेतली होती. अर्थातच एडिसनच्या या दूरदृष्टीबरोबरच त्याच्याकडे असलेला अफाट पैसा, मोठ्या लोकांशी असणारे त्याचे घनिष्ठ संबंध, आणि त्याचं एकूणच सामाजिक तसंच राजकीय वजन या गोष्टीही इतर संशोधकांच्या तुलनेत महत्त्वाच्या ठरल्या. त्यामुळे एडिसनला त्याच्या न्यू जर्सीच्या प्रयोगशाळेत वीजपुरवठा करणार्‍या यंत्रणेपासून ती वीज प्रत्यक्ष त्याच्या दिव्यांना पुरवून त्यातून उजेड नीट मिळतो का नाही, त्यात काही धोके तर नाहीत ना, अशा सगळ्या गोष्टींवर प्रयोग करणं शक्य झालं. तसंच त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्यावर एडिसननं चक्क एक वीजनिर्मिती आणि तिचा पुरवठा करणारी यंत्रणा आपल्या प्रयोगशाळेतच बसवून घेतली, आणि अख्ख्या न्यूयॉर्क शहराला त्याच्या दिव्यांच्या झगझगीत प्रकाशानं उजळून दाखवलं, आणि इतर कुणालाही पुसता येणार नाही अशा झगमगीत अक्षरांमध्ये आपलं नाव कोरून टाकलं!

एडिसननं विजेच्या दिव्यासाठीचं संशोधन सुरु केलं तेव्हा ती नवलाईची गोष्ट मुळीच नव्हती. किंबहुना दोन प्रकारचे विजेचे दिवे तेव्हा वापरले जायचे. त्यातल्या पहिल्या प्रकारात कार्बनच्या दोन दांड्या एकमेकांजवळ आणून त्यांच्यातून वीजप्रवाह सोडला की प्रचंड उजेड दिसायचा. अशा प्रकारचा उजेड आपण रात्रीच्या अंधारात काही चित्रपटगृहांच्या बाहेर आकाशाच्या दिशेनं फिरत असलेल्या दिव्यांमधून किंवा वेल्डर लोक कारखान्यांमध्ये काम करत असतानाच्या यंत्रणेमधून येताना बघतो. हा उजेड अतिशय तीव्र असल्यामुळे आपण त्याच्याकडे थेट बघितलं तर आपल्याला तात्पुरतं अंधत्वसुद्धा येऊ शकतं! साहजिकच या प्रकारचा उजेड घराघरांमध्ये नेणं अशक्यच होतं.
 
दिव्यांचा दुसरा प्रकार म्हणजे काही ठरावीक पदाथार्ंमधून वीज सोडून त्यांना खूप गरम केलं की त्यातून प्रकाश दिसायला लागतो. पण यातला धोका म्हणजे उष्णतेमुळे तो पदार्थच जळून खाक व्हायची दाट शक्यता असते! १८२३ सालापासून अनेक संशोधकांनी अशा प्रकारचे दिवे बनवायच्या प्रयत्नांमध्ये ते अतिउष्णतेमुळे चक्क जाळून टाकले होते! मग प्लॅटिनम खूप जास्त तपमानात वितळतो पण जळत नाही म्हणून काही जणांनी तो वापरायचा प्रयत्न केला, पण तो वितळून जायचा. 
अशा प्रकारच्या दिव्याचं जळणं थांबवायचं असेल तर त्यातलं तपमान नियंत्रित करण्यासाठी कसलं तरी स्विच बसवलं पाहिजे हे एडिसनच्या लक्षात आलं. त्याला आपल्या संशोधनाविषयी बढाया मारायलाही खूप आवडत असल्यामुळे आपण हा प्रश्‍न काही आठवड्यांमध्येच सोडवू अशा वल्गना करुन त्यानं २० ऑक्टोबर १८७८ या दिवशी आपण तसं करुन दाखवलं आहे असं वार्ताहरांना सांगूनसुद्धा टाकलं! त्यामुळे शेअरबाजारात एकच खळबळ उडाली. वायूच्या साहाय्यानं वीजनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचे शेअर्स जाम घसरले आणि एडिसनला विजेचे दिवे बनवण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी गुंतवणूकदार घाईघाईनं औत्सुक्य दाखवायला लागले! 

सुरुवातीला एक तर दिव्यांमध्ये खूप प्रमाणात वीज जाऊन एडिसननं वापरलेली प्लॅटिनमची तार वितळून जायची, किंवा मग दिव्यातलं तपमान कमी करण्यासाठी त्या दिव्यात जाणारं विजेचं प्रमाण कमी करावं यासाठी वापरलेल्या स्विचेसनी आपलं काम सुरु केलं की दिव्यांमधला उजेड कमी-जास्त व्हायचा. मुळातच वीज कमी प्रमाणात पुरवली की दिवा मंद व्हायचा! काही करुन हा प्रश्‍न सुटेना! शेवटी जवळच्याच प्रिंन्स्टनमधून भौतिकशास्त्रात प्राविण्य मिळवलेल्या फ्रान्सिस अपटन नावाच्या माणसाला एडिसननं या कामावर नेमलं. 

१८७९ सालच्या सुरुवातीला अपटनच्या टीमला अखेर या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाची गोष्ट उमगली. प्लॅटिनम लवकर तापायचा नाही. म्हणजे त्यातून खूप जास्त प्रमाणात वीजप्रवाह सोडला तरी तो वितळायचा नाही, आणि कमी वीज सोडली तर त्यातून उजेड बाहेर पडायचाच नाही! हे दिवा जळून न जाता उजेड द्यायच्या दृष्टीनं चांगलं असलं तरी घरोघरी असे दिवे बसवले तर त्यांना प्रकाशमान करण्यासाठी प्रचंड प्रमाणात विजेची गरज भासणार होती! अशा दिव्यांमध्ये विजेला विरोध करणार्‍या धातूची गरज होती. म्हणजे थोडीच वीज अशा धातूला पुरवली तरी तो त्या विजेला अडवून तिच्याशी धक्काबुक्की करुन गरम आणि म्हणूनच प्रकाशमान होणार होता! आणि त्याला त्यासाठी गरज असलेली ताकद वीजपुरवठा करणारी यंत्रणा जास्त व्होल्टेज पुरवून करणार होती. म्हणजे आता गरज होती ती असा धातू शोधून तो जळणार किंवा वितळणार नाही याची व्यवस्था करण्याची. त्यासाठी एडिसननं आता दिव्यात वापरल्या जाणार्‍या प्लॅटिनमच्या धातूच्या तारेची जाडी तसंच लांबी कमी-जास्त करुन बघितली. तसंच त्यानं दिव्यातून सगळी हवा शोषून घेतल्यानं काही फरक पडतोय का याचाही अभ्यास केला. पण १८७९ साली तरी हे सगळे प्रयत्न फसले आणि एडिसनचा दिवा काही तासांच्या वर चालेना!

शेवटी एडिसनबरोबर काम करणार्‍या लोकांनी प्लॅटिनमच्या जागी कार्बन वापरुन बघायचं ठरवलं. १८७९ सालच्या जुलै महिन्याच्या ‘सायंटिफिक अमेरिकन‘ या प्रसिद्ध विज्ञानविषयक मासिकात जोसेफ स्वॅन नावाच्या ब्रिटिश संशोधकानं कार्बन वापरुन तयार केलेल्या विजेच्या दिव्याविषयीची माहिती प्रसिद्ध झाली होती. ती एडिसननं वाचून त्यात सुधारणा करायचा प्रयत्न केला. पण स्वॅनच्या समर्थकांनी मात्र एडिसनचा हा दावा फेटाळून त्यानं स्वॅनची युक्ती चोरल्याचा आरोप केला. हा भाग सोडला तरी विजेच्या दिव्यासाठीचा कार्बन हा सगळ्यात चांगला पदार्थ आहे असं एडिसनच्या लक्षात आलं. विजेला अगदी हव्या त्या प्रमाणात कार्बन विरोध करतं हे त्यांना उमगलं होतं. कार्बनपासून बनलेली लांब, पातळ तार वीज पुरवल्यावरही न वितळता किंवा जळता तब्बल १३.५ तास सलग काम करु शकते हे एडिसनच्या साहाय्यकांच्या लक्षात आलं. १८७९ साली एडिसननं दिव्यातून म्हणजे काचेच्या गोळ्यातून सगळी हवा शोषून घेऊन त्यात कार्बनची पातळ तार सोडून तिला वीज पुरवून तापवायचं आणि मग ती प्रकाश देईल अशा प्रकारचं चित्र असलेल्या पेटंटसाठीचा अर्ज केला. १८८० साली एडिसन आपल्या संशोधनाविषयी सगळीकडे बोलायला लागला, आणि अनेक ठिकाणांहून अनेक लोक त्याचं उपकरण बघायला यायला लागले. 
१८८०  सालच्या नववर्षदिनी ‘नेचर‘ मासिकात एडिसनचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या स्वॅननं ‘नेचर‘ मासिकात एक पत्र लिहून एडिसन आता जे शोधल्याचा दावा करतोय ते आपण १५ वर्षांपूर्वीच करुन दाखवलं असल्याचं सांगितलं. स्वॅननं इंग्लंडमध्ये आपली कंपनी उभी करून सर विल्यम थॉम्प्सन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या घरी त्यानं १५० दिवे बसवून ते उजळून टाकलं. तसंच मानाच्या ‘रॉयल सोसायटी‘तही त्यानं विजेवर चालणारे दिवे बसवून प्रसिद्धी कमावली. हे सगळं ऐकताच आपल्या पेटंट्सचा दुरुपयोग केल्याच्या आरोपांवरुन उलट एडिसननंच स्वॅनविरुद्ध ब्रिटिश न्यायालयात धाव घेतली. पण स्वॅन सहजासहजी हार मानणार्‍यांपैकी नव्हता. शेवटी एडिसनलाच त्याच्यापुढे नमतं घेऊन ‘एडिसन-स्वॅन युनायटेड‘ नावाची संयुक्तरित्या चालणारी कंपनी काढावी लागली. 

एडिसन एक ग्रेट वैज्ञानिक आणि संशोधक तर होताच आणि त्याच्या कार्याचा फार मोठा परिणाम अमेरिकन इतिहासावर झाला. पण एडिसन हा खूपच गमतीदार आणि विक्षिप्त माणूस होता. तो आपल्या संशोधनकार्यात मदतनीस म्हणून स्मार्ट, खुले विचार असलेल्या तरुण वैज्ञानिकांचा शोध घेत असे. त्याच्याकडे उमेदवारीसाठी काहीजण येत, तेव्हा तो त्यांची मुलाखत घेत असे. ही मुलाखत रात्री जेवणाच्या टेबलावर होई. तो उमेदवार स्वतःविषयी, कामाविषयी भरभरून बोलत असे. पण तो उमेदवार योग्य आहे की नाही याचा निर्णय जेवण येईपर्यंत होत नसे. जेवण टेबलवर येताच समोर बसलेला उमेदवार काय करतोय इकडे एडिसन डोळ्यात तेल घालून लक्ष देई. म्हणजे यात दोन प्रकार घडत. एकतर समोरची व्यक्ती जेवण येताच त्या पदार्थांची चव न पाहता त्यावर मीठ टाकून जेवणाला सुरुवात करत असे किंवा दुसरा प्रकार म्हणजे जेवण टेबलवर येताच समोरची व्यक्ती आधी तो पदार्थ चाखून त्यानंतर मीठ टाकून घेत असे. अर्थातच यातल्या दुसर्‍या प्रकारची व्यक्ती एडिसन निवडत असे. जी माणसं कोणतीही गोष्ट माहीत होण्याआधीच गृहीत धरून कृती करतात ते प्रश्‍न सोडवू शकत नाहीत आणि त्यावरचे कल्पक उपायही शोधू शकत नाहीत यावर एडिसनचा ठाम विश्‍वास होता.

एडिसनचं वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत कष्टाळू होता. दररोज अठरा-अठरा, वीस-वीस तास तो काम करत असे. तो केवळ ४ ते ५ तास झोपत असे. झोपेचा आवश्यकतेपेक्षा जास्त डोस म्हणजे वेळेचा अपव्यय असं त्याला वाटे. एकदा तर एडिसननं अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षाला कमी झोप घेत जा, असा सल्ला दिला होता. निराश मनोवृत्तीचे लोक एडिसनला मुळीच आवडत नसत. निसर्गातली रहस्य शोधून काढून त्यांचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी करणं यासारखा दुसरा आनंद नाही असं तो म्हणत असे. एडिसनला पैसा, संपत्तीचं आकर्षण अजिबात नव्हतं. एडिसन हा आहाराच्या बाबतीत अत्यंत संयमी होता. त्याचा आहार अत्यंत माफक होता. अतिखाण्यामुळे अनेक विकार उद्भवतात असं त्याचं मत होतं. आहारात अनेकविध अन्नपदार्थ पाहिजेत असं त्याचं मत होतं. एडिसन नेहमी घरचंच जेवण पसंत करत असे. बहिरेपण असूनही एडिसनला संगीताची अत्यंत आवडत होती. त्याची विनोदबुद्धी अत्यंत तरल अशी होती. सगळ्यात जास्त शोध लावणार्‍या एडिसन या शााज्ञाला मात्र डिस्लेस्किया होता. शाळेत शिक्षकांनी आणि समाजानी एडिसनला अव्हेरलं तरी त्याच्या आईला मात्र त्याच्याबद्दल अतीव विश्‍वास होता. त्याच्यामधल्या सुप्त गुणांची तिला जाणीव होती. आईनं दिलेलं प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळेच एडिसन आयुष्यात इतकं अफाट आणि अमूल्य काम करू शकला. 

अपयशाने लोक खचतात किंवा हातातलं काम अर्धवट सोडून देतात. एडिसन एकेका शोधासाठी हजारो वेळा प्रयोग करत असे. तो कधीही कंटाळत नसे. एकदा अपयशाने नाउमेद झालेला वैज्ञानिकाने आपली खंत व्यक्त करताच एडिसन त्याला म्हणाला, ‘‘छे, अरे प्रयोग अयशस्वी झाला नाही तर त्यात बिघडलं कुठे? या प्रयोगातून इतक्या हजार गोष्टी उपयोगी नाहीत हे तर कळलं ना आणि त्यामुळे आपलं ज्ञान वाढतंच आणि हे ज्ञान आपल्या भावी यशाचा एक टप्पा असतो.’’ त्याची एक उक्ती जगप्रसिद्ध आहे. तो म्हणायचा, ‘‘केवळ योगायोगानं असं मी कोणतचं कार्य केलं नाही किंवा ते योगायोगानं केलं गेलं नाही. माझे सर्व शोध श्रमातून निर्माण झाले आहेत.’’ असा हा प्रयोगशीलता जपणारा परिश्रमाला अतिशय महत्त्व देणारा जागतिक किर्तीचा थोर अमेरिकन शास्त्रज्ञ एडिसन याचं १८ ऑक्टोबर, १९३१ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.