तंत्रज्ञ जीनियस
'जीनियस' या प्रकल्पात ७२ जग बदलवणाऱ्या जगप्रसिद्ध लोकांचं कार्य आणि त्यांचं आयुष्य याविषयी लिहायचं (पीपल हू चेंज द वर्ल्ड) असं आम्ही तीन वर्षांपूर्वी ठरवलं आणि त्यानुसार प्रत्येक वर्षी १२ व्यक्ती 'जीनियस'च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतील असं आम्ही नियोजन केलं. त्यानुसार सुरुवातीला गॅलिलिओ पासून रिचर्ड फाईनमनपर्यंत १२ वैज्ञानिक आपल्या भेटीला आले. कोणाला स्टीफन हॉकिंगनं प्रभावित केलं, तर कोणाला गॅलिलिओची झालेली परवड बेचैन करून गेली. काही विद्यार्थ्यांनी रिचर्ड फाईनमनसारखं आम्हाला व्हायचंय असं कळवलं, तर काहींना मेरी क्युरीनं 'निराश होऊ नका काम करत राहा'चा संदेश दिला. जेन्नर, कॉख, पाश्चर आणि फ्लेमिंग यांच्या संशोधनानं तर लाखो करोडो लोकांचं आयुष्य वाचलं. कोपर्निकस असो की केप्लर असो, न्यूटन असो की आईन्स्टाईन यांच्या विज्ञानातल्या योगदानानं मनावर ठसलेल्या चुकीच्या समजुतींना हादरवून सोडलं आणि नव्या वास्तवाच्या जाणिवेनं डोळ्यासमोर लख्ख उजेड पडला. विदेशी 'जीनियस' असोत, वा भारतीय 'जीनियस', दोन्हींना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातूनच आम्हाला ऊर्जा मिळाली आणि तिसर्या टप्प्यातले तंत्रज्ञ 'जीनियस' साकारता आले. लवकरच म्हणजे दिवाळीच्या आधी आपल्या भेटीला १२ तंत्रज्ञ 'जीनियस' येत आहेत.
या तंत्रज्ञांनी आपल्या आयुष्यात मोठी क्रांती केली. आपल्या खडतर जगण्यातले श्रम हलके करण्याचं काम या तंत्रज्ञांनी केलं आणि आपलं जगणं सुखकर, सुकर केलं. यात आज आपण एडिसन आणि टेस्ला या दोघांचा परिचय करून घेऊ या. दिव्याची अनेक रुपं डोळ्यासमोर आली, की या दिव्यानं मनुष्याचं जगणं किती व्यापलंय हेही कळून चुकतं. हा दिवा आयुष्यात नसता तर ........कल्पनाही करवत नाही. माणसाच्या आदिम काळाच्या प्रवासाचा इतिहास बघितला तर त्याच्या प्रगतीमध्ये दिव्याची उपयुक्तता किती प्रचंड प्रमाणात आहे हे लक्षात येतं. सुरुवातीच्या काळात माणसाला विजेच्या कडकडाटात प्रकाश दिसला, नंतर दगडावर दगड आपटून निर्माण झालेल्या ठिणग्या त्यानं बघितल्या. पण त्यानंतर चरबीमध्ये पेटवलेला दिवा, तेलातला दिवा अशा विविध प्रकारांनी दिवा माणसाच्या आयुष्यात येत गेला. विजेच्या दिव्याचा शोध खर्या अर्थानं लागायला अनेक शतकं जावी लागली आणि मग अमेरिकेत जन्माला आलेल्या थॉमस अल्वा एडिसन या मुलानं एक बटन दाबलं की लख्ख प्रकाशानं घर उजळून जावं अशी किमया करून दाखवली. रशियन क्रांती घडवणारा लेनिन म्हणायचा, ‘क्रांती म्हणजे वीज’ इतकं विजेचं महत्त्व लेनिनला पटलं होतं. ‘प्रतिभा एक टक्का काम करते, तर त्याचे परिश्रम ९९ टक्वे काम करतात, तेव्हा ते कार्य यशस्वी होतं’ असं म्हणणारा एडिसन हा एक ग्रेट अमेरिकन संशोधक आणि उद्योजक होता. विजेच्या दिव्याचा शोध लावण्याचं श्रेय एडिसनला दिलं जातं. मात्र केवळ दिव्याचाच नाही तर छायाचित्र, साउंड रेकॉर्डर, कॅमेर्यातली गतीमान चित्रं, वीजेवर चालणार्या गाडीसाठीची बॅटरी, ग्रामोफोन आणि असे अनेक शोध त्यानं लावले. आज १०९३ शोधांची पेटंट्स त्याच्या नावानं आहेत; इतकं प्रचंड काम त्यानं करून ठेवलं आहे. एडिसनचं नाव घेताक्षणी टेस्ला या संशोधकाचं नाव ओठांवर येतं.
खरं तर ज्यानं माणसाचं आयुष्य प्रकाशानं उजळून टाकलं असा संशोधक म्हणजे निकोला टेस्ला! आज घराघरात जी वीज पोहोचली आहे ती एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंटच्या माध्यमातून पोहोचली आहे आणि या सिस्टिमचा शोधकर्ता होता निकोला टेस्ला! जगविख्यात संशोधक एडिसन याच्यापेक्षा निकोला टेस्ला कुठेही कमी नव्हता. काही लोक मानवाच्या कल्याणासाठी अद्वितीय असं काम करून जातात, पण जिवंतपणी त्यांना त्याचं श्रेय तर मिळतच नाही. लीझ माईट्नर ही अशाच एका शास्त्रज्ञांपैकी एक होती. मात्र कशाचीही खंत न करता ती आपल्या मार्गावरून चालत राहिली. तीच गोष्ट निकोला टेस्ला या संशोधक तंत्रज्ञाबद्दल आपल्याला म्हणता येईल. प्रसिद्धीपासून दूर असणं आणि व्यवहारकुशल नसणं या दोन गोष्टींमुळे त्याच्या जिवंतपणी त्याला आपल्या अलौकिक कार्याचं श्रेय मिळालं नाही. आज विजेचा दिवा म्हटलं की थॉमस अल्वा एडिसन हेच नाव डोळ्यासमोर येतं,
रेडिओ म्हटलं की मार्कोनी आठवतो. पण या शोधांसाठी ज्यानं अविरत प्रयत्न केले आणि तरीही तो उपेक्षित राहिला असा शास्त्रज्ञ किंवा असा तंत्रज्ञ म्हणजे निकोला टेस्ला! ‘खरा शास्त्रज्ञ तोच, जो निसर्गातल्या शक्तीचा उपयोग मनुष्यांच्या गरजांसाठी करतो’ असं म्हणणारा निकोला टेस्ला हा संशोधक आयुष्यभर आपल्या संशोधनात गढून गेला होता. मानवाच्या कल्याणासाठी विज्ञान कसं उपयोगी पडेल याचा ध्यास त्यानं घेतला होता. तो एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर होता आणि त्यानं एसी इंडक्शन मोटरचा (अल्टरनेटिंग करंट इंडक्शन मोटार) शोध लावला. त्याच्या शोधामुळे जगभर वीज एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सुलभपणे नेणं शक्य झालं. त्यानं अनेक शोध लावले असले तरी त्यांची पेटंट्स घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे त्याच्या अनेक शोधांचं श्रेय मात्र दुसर्यांना मिळालं. काही लोकांचं महत्व त्यांच्या मृत्यूनंतर जगाला कळतं, निकोला टेस्ला हा त्यातलाच एक होता. आयुष्यभर संघर्ष आणि उपेक्षा वाट्याला येऊनही त्यानं आपलं काम थांबवलं नाही. ‘मला माझ्या आयडिया त्यांनी चोरल्या याचं दुःख नाही, मला चिंता याची वाटते की त्यांच्याजवळ त्यांच्या स्वतःच्या आयडिया नव्हत्या’ असं म्हणणार्या टेस्लाकडे मात्र आजही जग एक गूढ सायंटिस्ट म्हणूनच बघतं! एडिसन आणि टेस्ला या दोघांना लवकरच भेटू या तंत्रज्ञ जीनियसमध्ये!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment