एडिसन - तंत्रज्ञ जिनियस

एडिसन - तंत्रज्ञ जिनियस

थॉमस अल्वा एडिसनचं नाव विजेच्या दिव्याच्या शोधामुळे अजरामर झालं. एडिसनचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ या दिवशी अमेरिकेतल्या ओहायो राज्यातल्या मिलान या गावी झाला. त्याच्या आईचं नाव नॅन्सी एलियट तर वडिलांचं नाव सॅम्युएल होतं. वडील हॉटेलचा व्यवसाय करत, तर आई शिक्षिका होती. एडिसन केवळ ३ महिनेच शाळेत गेला. याचं कारण म्हणजे त्याच्या वर्गातल्या शिक्षकांनी 'एडिसन अतिशय बुद्दू असून तो शिकूच शकणार नाही' असं सांगितलं. खरं कारण असं होतं की एडिसन त्याला वाटणार्‍या कुतुहलापोटी अनेक प्रश्‍न विचारत असे. त्याचं टोपणनाव ‘व्हाय’ असंच पडलं होतं. ए फॉर ऍपल हे तर ठीक आहे, पण काही सफरचंद लाल आणि काही हिरवी का असतात? डोंगरावरून पाणी वाहत खालीच का येतं? बर्फ हिवाळ्यातच का पडतो? असे अनेक प्रश्‍न तो विचारी आणि मग त्याच्या प्रश्‍नाचं समाधानकारक उत्तर देता न आल्यानं शिक्षकही चिडत.

असं म्हणतात, एके दिवशी एडिसन गृहपाठ न करता शाळेत गेला. त्याच्या शिक्षकांनी त्याची शाळेतून चक्क हकालपट्टी केली. त्याचं कारण त्याच्या शिक्षकाला विचारताच ते म्हणाले, 'हा मुलगा बुद्धीनं मंद असल्यामुळे शिकू शकणार नाही.' पण एडिसनच्या आईचा आपल्या मुलावर नितांत विश्‍वास असल्यामुळे ती त्या शिक्षकाला म्हणाली, 'एक दिवस असा येईल थॉमस अल्वा एडिसन कोण आहे हे सगळ्या जगाला कळेल.’ एडिसनची शाळा जरी सुटली, तरी त्याच्या आईनं त्याला घरीच उच्च दर्जाचे संस्कार आणि विज्ञानाचं शिक्षण दिलं. याचाच परिणाम म्हणजे पुढे एडिसननं आपल्या आईची भविष्यवाणी खरी करून दाखवली आणि तब्बल १०९३ शोधांची पेटंट्स त्याच्या नावावर लागली! त्यानं इतके शोध लावले की त्याच्या शोधांची यादी करावी म्हटलं तर ती करणं अशक्य व्हावं. विजेचा दिवा असो वा फिल्म असो, फोनोग्राफ असो वा ग्रॅहमच्या फोनमधल्या सुधारणा या शोधांबरोबरच एडिसन यानं विजेवर चालणार्‍या मतमोजणीच्या मशीनचाही शोध लावला.

लहानपणी एडिसन कोंबड्यांच्या मागे धावत असे, कोंबडी हातात सापडली की तो तिची पिसं उपटून काढण्याचा प्रयत्न करत असे; कारण ही पिसं चिकटवून बसवलेली आहेत असं त्याला वाटे. अंड्यावर बसल्यामुळे नंतर त्यातून कोंबडीची पिल्लं जन्माला येतात हे एकदा एडिसनला कळालं. मग काय, एडिसननं कोंबडीची बरीच अंडी गोळा केली आणि त्यावर तो बसला. एडिसन अंड्यांवर बसल्यामुळे ती फुटली आणि त्याचे सगळे कपडेही खराब झाले. त्याच्या या प्रतापावर जराही न वैतागता एडिसनच्या आईनं त्याला ही अंडी कोंबडीच कशी हळुवारपणे उबवू शकते आणि त्यातून पिल्लांना तीन आठवड्यांनतर जन्माला घालू शकते हे समजावून सांगितलं. एडिसनला प्रयोगांसाठी त्याच्या आईनं आपल्या घराच्या पोटमाळ्याची जागा दिली. प्रयोग करण्यासाठी एडिसनला अनेक प्रकारची रसायनं लागत. ती मिळवण्यासाठी तो वर्तमानपत्रं विकून पैसे कमवत असे.

घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे एडिसन रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रांबरोबरच फळं विकण्याचंही काम करत असे. त्याच्या कष्टाळू आणि मेहनती स्वभावामुळे रेल्वेच्या अधिकार्‍यांना त्याचं खूपच कौतुक वाटे. त्यांनी रेल्वेचा एक रिकामा पडून असलेला डबा एडिसनच्या प्रयोगशाळेसाठी म्हणून उपलब्ध करून दिला होता. या डब्याच्या एका कोपर्‍यात एडिसननं आपल्याला हव्या त्या वस्तू जमा करून स्वतःची प्रयोगशाळा थाटली होती. शाळा तर केव्हाच सुटली होती. पण विज्ञानाची गोडी असल्यामुळे तो वेळ मिळाला की विज्ञानाची पुस्तकं वाचत असे. पुस्तकातून मिळालेली माहिती आणि स्वतःच्या कल्पना यांची सांगड घालून तो वेगवेगळे प्रयोग करून बघत असे. एडिसन बरेचदा सॅम विन्चेस्टर नावाच्या माणसाच्या धान्याच्या गिरणीत जात असे. सॅमलाही हवेत उडू शकेल असं उपकरण शोधून काढायचा असा नाद लागला होता. ते पाहून एडिसननंही आपणही असाच प्रयोग करायला हवा असा ध्यास घेतला. त्यानं लगेचच प्रयोगासाठी अनेक रसायनं एकत्र केली. एखाद्या माणसाला पकडायचं आणि त्याला ही रसायनं खाऊ घालायची, मग तो हवेपेक्षा हलका होऊन हवेत उडू लागेल अशी एडिसनची भन्नाट धारणा होती. त्यानं प्रयोगासाठी आपल्या वडलांकडे काम करणार्‍या मायकेल ओट्स नावाच्या एका माणसाला या प्रयोगासाठी तयार केलं आणि ही रसायनं खायला भाग पाडलं. आपला प्रयोग आता यशस्वी होणार अिाण मायकेल हवेत उंच उंच गिरक्या घेत उडू लागणार असं एडिसनला वाटलं. पण झालं भलतंच. रसायनं पोटात जाताच मायकेल कासावीस झाला, त्याला तातडीनं डॉक्टरांकडे न्यावं लागलं. डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मायकेलचा जीव वाचला. असा जीवघेणा प्रयोग केल्याबद्दल एडिसनच्या वडलांनी-सॅम्युएलनं त्याला चांगलंच झोडपून काढलं. पण एवढा मार खाऊनही एडिसननं आपली प्रयोगशील वृत्ती नष्ट होऊ दिली नाही.

१८६२ साली एडिसननं एका छोट्या मुलाला रेल्वेच्या रुळावर खेळत असताना बघितलं. तिकडून रेल्वे येताना बघून एडिसननं त्या मुलाला रुळावरून उचलून बाजूला करून त्याचा जीव वाचवला. हा मुलगा तिथला रेल्वेमास्तर मॅकेंझी यांचा मुलगा होता. आपल्या मुलाचा जीव वाचवल्यामुळे त्यांनी एडिसनला आगगाडीच्या तारायंत्राचं प्रशिक्षण दिलं आणि त्याला रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचं काम दिलं. एकीकडे एडिसनचे त्याच्या प्रयोगशाळेतले प्रयोग दिवसभर चालत. त्यामुळे त्याला रात्री खूप झोप येई. मग त्यानं काय करावं? तर त्यानं तारयंत्रालाच एक घड्याळ बसवलं आणि ते घड्याळच तासातासाला संदेश पाठवण्याचं काम करू लागेल अशा पद्धतीनं तयार केलं. त्यानंतर १८६९ साली एडिसन टेलिग्राफ इंजिनियर झाला. त्यानंतर काहीच काळात युद्ध सुरू झालं. वर्तमानपत्राचा खप वाढायला लागला. यामुळे त्या काळात एडिसननं चक्क एक छापखानाच विकत घेतला आणि ‘ग्रँड ट्रंक हेराल्ड’ नावाचं युद्धाच्या बातम्या देणारं वर्तमानपत्र काढलं. एडिसनने काढलेल्या सर्वच्या सर्व प्रती हातोहात संपू लागल्या. त्याच्या हातात चांगला पैसा खेळायला लागला.

काहीच दिवसांत क्लेमेन्स या गावी एडिसनला तार मास्तर म्हणून नोकरी मिळाली. आपल्या वाचनात अडथळा येतो या कारणानं त्याला नोकरी गमावण्याची पाळी आली. एडिसन कुठेच स्थिरावू शकला नाही. १८६९ साली तो न्यूयॉर्क इथे गेला आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी संदेश पाठवण्याच्या त्याच्या योजनेचा अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजला खूपच उपयोग झाला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला तिथेच नोकरी मिळाली आणि त्या योजनेचं पेटंटही मिळालं. त्याला स्टॉक एक्स्चेंजनं त्याबद्दल चक्क चाळीस हजार डॉलर्स दिले! आता रातोरात गरीब एडिसन श्रीमंत झाला. एडिसननं मिळालेल्या पैशांतून जागा विकत घेतली आणि एक प्रयोगशाळा उभारली.

ग्रॅहम बेलनं लावलेल्या टेलिफोनच्या शोधावर त्यानं आणखी खोलवर संशोधन केलं आणि फोनमधून आवाज सुस्पष्ट कसा ऐकू येईल यासाठी संशोधन करायला सुरुवात केली. यातूनच फोनोग्राफचा शोध लागला, तो पुढे ग्रामोफोन म्हणून ओळखला गेला. एडिसन केवळ शोध लावून गप्प बसत नसे तर एक शोध संपला की लगेचंच तो दुसर्‍या शोधाच्या तयारीत मग्न होत असे. एडिसननं लावलेले जवळपास सगळेच शोध हे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आवश्यक आणि उपयोगी पडणारे असे होते. विजेचा दिवा, मोशन पिक्चर कॅमेरा, मोटारीसाठी विद्युतघट असे अनेक. याशिवाय टेलिकम्युनिकेशनमधलं त्याचं योगदान फार मोलाचं आहे.

एडिसनच्या आधी किमान ५० वर्षांपासून विजेवर चालणारे बल्ब्ज तयार करण्याच्या प्रयत्नात अनेक मंडळी होती! मग सगळीकडे फक्त एडिसनचंच नाव विजेच्या दिव्यांच्या संशोधनाच्या बाबतीत का घेतलं जातं? एडिसनचं वेगळेपण म्हणजे इतर लोकांचे दिवे बहुतेक वेळा फक्त ठरावीक वातावरणात आणि प्रयोगशाळेत व्यवस्थित चालायचे. एडिसननं दिव्याला प्रयोगशाळेच्या बाहेर काढलं आणि घराघरांमध्ये, दुकानांमध्ये, कारखान्यांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि रस्त्यांवर नेलं आणि चालवून दाखवलं.

एडिसनचं वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत कष्टाळू होता. दररोज अठरा-अठरा, वीस-वीस तास तो काम करत असे. तो केवळ ४ ते ५ तास झोपत असे. झोपेचा आवश्यकतेपेक्षा जास्त डोस म्हणजे वेळेचा अपव्यय असं त्याला वाटे. एकदा तर एडिसननं अमेरिकेच्या चक्क एका राष्ट्राध्यक्षाला 'कमी झोप घेत जा', असा सल्ला दिला होता! एडिसनला पैसा आणि संपत्ती यांचं आकर्षण मुळीच नव्हतं. एडिसन हा आहाराच्या बाबतीत अत्यंत संयमी होता. अतिखाण्यामुळे अनेक विकार उद्भवतात असं त्याचं मत होतं. मात्र एकाच तर्‍हेचा आहार रोजरोज खायला त्याला आवडत नसे. एडिसन नेहमी घरचंच जेवण पसंत करत असे. एडिसनला संगीताची अत्यंत आवडत होती. त्याची विनोदबुद्धी अत्यंत तरल अशी होती. सगळ्यात जास्त शोध लावणार्‍या एडिसनला मात्र डिस्लेस्किया होता.

एडिसनचं एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याच्याकडे व्यवहार कौशल्य अत्यंत उत्तम तर्‍हेचं होतं. त्याने लावलेल्या प्रत्येक शोधाचं पेटंट त्याने घेतलं. ‘जी गोष्ट विकली जाणार नाही, ती मी कधीच बनवणार नाही’ असं तो म्हणत असे आणि खरोखरंच त्यानं लावलेल्या शोधातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी पुढे सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या. एडिसन एकेका शोधासाठी हजारो वेळा प्रयोग करत असे. एकदा अपयशाने नाउमेद झालेल्या वैज्ञानिकाला एडिसन म्हणाला, 'अरे प्रयोग यशस्वी झाला नाही तर त्यात बिघडलं कुठे? या प्रयोगातून इतक्या हजार पद्धती उपयोगी नाहीत हे तर कळलं ना आणि त्यामुळे आपलं ज्ञान वाढतंच आणि हे ज्ञान आपल्या भावी यशाचा एक टप्पा असतो.' प्रयोगशीलता जपणार्‍या परिश्रमाला अतिशय महत्त्व देणार्‍या जागतिक किर्तीच्या थोर अमेरिकन शास्त्रज्ञाचा - एडिसनचा १८ ऑक्टोबर, १९३१ या दिवशी वयाच्या ८४ व्या वर्षी मृत्यू झाला.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.