लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019
आपल्या मनात एखादी गोष्ट यावी आणि क्षणार्धात ती समोर येऊन हजर व्हावी....तसंच! आजच्या युगात माणसाला गूगल ही आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेली अनमोल अशी भेट आहे. गूगल नसेल तर आज जगण्याची कल्पनाही करता येत नाही. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसावं आणि कुठलीही इच्छा व्यक्त करावी की काही क्षणात इच्छापूर्ती होते म्हणतात, तसंच गूगलवरही काही सेकंदात घडतं. कुठल्याही अनोळखी शहरात गेल्यावर तिथे ठरलेल्या पत्त्यावर जाताना मोबाईलमध्ये गूगलमॅपला जाण्याचं ठिकाण सांगितलं की गूगल मॅप अगदी त्या माणसाच्या घराची बेल वाजवण्यापर्यंत आपल्याला न चूकता घेऊन जातो. कुठल्याही व्यक्तीची, शहराची, वस्तूची, नाट्यगृहाची, सिनेमागृहाची, मॉलची आणि हॉटेलची माहिती मिळवायची असेल तर गूगलमध्ये टाका, क्षणात माहितीचं भांडार समोर! कुठलाही व्हिडीओ असो, चित्रपट असो, माहितीपट असो वा बातम्या असोत, गूगलला विचारलं की तो व्हिडीओ, तो चित्रपट, ती बातमी काही सेकंदात समोर हजर! कोणाला पत्र लिहायचंय, महत्त्वाची कागदपत्रं पाठवायची आहेत तर गूगलचं जी-मेल आहेच सेवेला! बरं तर बरं, गूगलला हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी, सिंधी, गुजराती, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, नेपाळी, उडिया आणि तमीळ या सगळ्या भाषा कळतात आणि या भाषांमधून आपल्यालाही सेवा गूगल उपलब्ध करून देतं. कुठल्याही देशाची, तिथल्या हवामानाची, तिथल्या वैशिष्ट्यांची, तिथल्या वेळेची आणि लोकजीवनाची माहिती गूगल देतं. इतकंच नाही तर किती रुपयांचे किती डॉलर्स किंवा किती पौंडाचे किती डॉलर्स अशी सगळी किचकट गणितं गूगलच सोडवून आपल्याला देतं. एखादा शब्द अडला, तर त्याचे उच्चार कुठल्या देशात कसे आणि काय असावेत याचीही माहिती गूगल एका क्षणात देतं. आपल्या हव्या त्या ठिकाणाची लोकसंख्या, बेरोजगार, यांचीही आकडेवारी गूगल उपलब्ध करून देतं. गूगल आपल्याला विनोंदांची पखरण करून हसवतं, तर कधी आपल्याला आदर्शवत वाटणार्या लोकांच्या जंयतीची आठवण ठेवून त्यांच्या स्मृति जागवणारी माहितीही शेअर करतं. गूगलनं आपल्या वापरकर्त्यांसाठी जी-मेल, गूगल अलर्ट, गूगल चॅट, गूगल कॅलेंडर, गूगल बुक्स, गूगल क्रोम, गूगल न्यूज, गूगल डिक्शनरी, गूगल पिकासा, गूगल मॅप, गूगल मिनी, यु-ट्यूब अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
गूगल म्हणजे काय? यामागचे खरे सूत्रधार कोण? त्यांनी गूगलची किमया साकारली कशी? गूगलचे निर्माते म्हणजे अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विश्वविद्यालयात कम्प्युटर सायन्स विषयात डॉक्टरेट करणारे लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन हे दोघं युवक! एकाच वयाचे असलेले हे दोन युवा उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि सुसंस्कारित घरातून आलेले, मात्र दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी! लॅरी अबोल, भिडस्त, गंभीर स्वभावाचा, तर सर्गी बडबड्या, लोकांमध्ये मिसळणारा, व्यवहारकुशल, उत्तम नेतृत्वगुण असलेला आणि सामाजिक कार्यात रस असलेला उत्साही युवक! लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांची ओळख झाली आणि दोघं एकमेकांचे जिवलग मित्र बनले.
लॅरी पेज याचा जन्म 26 मार्च 1973 या दिवशी अमेरिकेतल्या एका ज्यू कुटुंबात कार्ल व्हिक्टर पेज आणि ग्लोरियो या दांपत्याच्या पोटी झाला. लॅरीचं लहानपण सुखात गेलं. आई-वडील दोघंही कम्प्युटरतज्ज्ञ असल्यानं लॅरी पेजच्या घरातच कम्प्युटर होता. त्यामुळे कम्प्युटरसंबंधी कुठलंही लिखाण असो, मासिकं असोत, त्याला सगळं काही आपोआपच वाचायला मिळत असे. पुढे मिशिगन युनिव्हर्सिटीमधून लॅरी पेजनं कम्प्युटर सायन्स या विषयातली इंजिनिअरिंगमधली पदवी मिळवली. नंतरच् उच्च शिक्षणासाठी - मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी लॅरीनं स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. 11 नोव्हेंबर 1885 साली स्थापन झालेलं अमेरिकेतलं स्टॅनफर्ड हे जगातलं मानाचं समजलं जाणारं एक नामांकित विद्यापीठ असून या विद्यापीठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शिकलेले विद्यार्थी पुढे उद्योजक व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातात. या काळात निकोला टेस्ला या संशोधकाचं चरित्र वाचून तर लॅरी पेज खूपच भारावून गेला होता.
सर्गी ब्रिनचा जन्म 21 ऑगस्ट 1973 या दिवशी रशियाची राजधानी मॉस्को इथे मायकेल ब्र्रिन आणि युजेनिया या दांपत्याच्या पोटी झाला. मायकेल ब्रिन हे मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचे प्रोफेसर, तर आई गणितज्ञ आणि सिव्हिल इंजिनिअर! ज्यू असल्यानं अनेक गोष्टींमध्ये या कुटुंबाला उपेक्षा सहन करावी लागली होती. त्यामुळे जिथं भेदभाव नाही, जिथं आपल्या मुलाचं भविष्य घडवता येईल या हेतूनं त्यांनी अमेरिकेला जायचं ठरवलं.
सर्गी ब्रिन खूप बुद्धिमान असल्यानं वयाच्या 19 व्या वर्षी स्टॅनफर्डमध्ये डॉक्टरेट करण्यासाठी त्यानं प्रवेश घेतला. लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी स्टॅनफर्डमध्ये असताना सर्च इंजिनच्या संशोधनात खूप वेळ व्यतीत केला आणि त्यातूनच हाच विषय आपल्या डॉक्टरेटसाठी घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. त्यांनी शोधून काढलेल्या सर्च इंजिनला त्यांनी व्हॉटबॉक्स असं नाव द्यायचं ठरवलं. मात्र त्यांच्या एका मित्रानं गुगॉल असा शब्द सुचवला. सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांचं काम खूप मोठं आहे हे दाखवण्यासाठी हा शब्द त्यानं सुचवला होता. या शब्दाचा अर्थ एका आकड्यापुढे 100 शून्यं म्हणजेच प्रचंड मोठी संख्या असा होता. दोघांनाही हे नाव आवडलं. पण हे नाव दुसर्या एका कंपनीनं आधीच घेतल्याचं कळालं. पण तरीही गंमत अशी झाली की या दोघांनी गूगॉलचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं, त्यामुळे त्याचा उच्चार गूगल होत होता आणि त्यांना हे नाव मिळालं. त्यांनी गूगल कंपनीची नोंदणी केली. त्यांच्या या कामासाठी अनेकांनी त्यांना आर्थिक मदत केली. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांना अॅमॅझॉन कंपनीचा सर्वेसर्वा जेफ बेझॉससह अनेकांनी आर्थिक मदत केली.
गूगल सर्च इंजिन परिपूर्ण अचूक करताना अनेक अडथळ्यांना पार करत, 24-24 तास काम करत ब्रिन आणि पेज पुढे जात राहिले. एखादी अडचण आली की लॅरी पेजला टेस्ला समोर दिसायचा आणि मग त्याला समोर आदर्श ठेवून निराशा झटकून लॅरी पेज कामाला लागायचा. गूगलचा व्याप वाढत चालला त्याबरोबरच ब्रिन आणि पेज यांचा नावलौकिकही वाढत होता. 2005 साली जावेद करीम, स्टीव्ह चेन आणि चॅड हर्ली या तीन तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेली यू-ट्यूब कंपनी विकत घेतली. आज यू-ट्यूब म्हटलं की कुठलंही गाणं, कुठलाही व्हिडिओ आपण बघू शकतो, टाकू शकतो आणि ऐकू शकतो. आज गूगलच्या यू-ट्यूबवरून जगभरातून प्रचंड संख्येनं व्हिडिओज अपलोड होत असतात. गूगल आणि फेसबुक यांच्या खालोखाल यू-ट्यूब ही लोकप्रियतेच्या बाबतीत जगातली तिसर्या क्रमांकावर असलेली वेबसाईट आहे.
लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी अनेक चांगल्या ग्रंथांचं डिजिटलायझेशन करायचं ठरवलं. लॅरी पेज लहान असताना मिशिगन विद्यापीठातल्या 70 लाख ग्रंथ असलेल्या ग्रंथालयात जायचा. हे सगळे दुर्मिळ ग्रंथ कायमस्वरूपी जतन करायला हवेत याच भावनेतून मिशिगन विद्यापीठाशी संपर्क साधून लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी 2010 साली दीड कोटी पुस्तकं स्कॅन करून आपल्या वेबसाईटवर टाकली. अजूनही हे काम अविरतपणे चालू आहे. अनेकांनी या उपक्रमाची तुलना गटेनबर्गच्या छपाई यंत्राच्या शोधाबरोबर केली जाते.
आज जगातलं सगळ्यात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून गूगल ओळखलं जातं. गूगलचे संस्थापक आणि जिवलग मित्र असलेले लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांची नावं आज श्रीमंतांच्या यादीत असली तरी दोघंही अतिशय साधं जीवन जगतात. ऐषोरामात राहणं आणि चैन करणं त्यांना फारसं आवडत नाही. गूगलसाठी जगातली सगळ्यात मोठी दुसरी बाजारपेठ म्हणजे भारत असून सध्या गूगलच्या सीईओपदी असण्याचा मान भारतीय असलेला सुंदर पिचाई याला मिळाला आहे. लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन हे दोन युवक एकत्र येतात काय आणि आपल्यातलं कुतूहल, जिज्ञासा, चिकाटी, कल्पकता आणि हुशारी यांच्या जोरावर जगाला एक नवं तंत्रज्ञान निर्माण करून जवळ आणतात काय, हे सगळं एखाद्या चमत्काराइतकंच अदभुत आणि आश्चर्यकारी आहे हे मात्र खरं!
Add new comment