१२ जगप्रसिद्ध 'तंत्रज्ञ जीनियस' - मनोगत - दीपा देशमुख

१२ जगप्रसिद्ध 'तंत्रज्ञ जीनियस' - मनोगत - दीपा देशमुख

 

दिवाळी साजरी करू या १२ जगप्रसिद्ध 'तंत्रज्ञ जीनियस' बरोबर !!! 'जीनियस' मालिका लिहायचं ठरवलं, तेव्हा मनोविकास प्रकाशनाने ही मालिका प्रकाशित करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. सुरुवातीला जगप्रसिद्ध १२ वैज्ञानिक 'जीनियस' आले. त्यानंतर १२ भारतीय 'जीनियस' !!!! वाचकांनी 'जीनियस' या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला. 'जीनियस'च्या या दोन टप्प्यानंतर आता ‘तंत्रज्ञ जीनियस’ हा या मालिकेतला तिसरा भाग आपल्या हाती देताना खूप आनंद होत आहे.

तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपलं सगळ्यांचं जगणं आमूलाग्र बदललं आहे, नव्हे तंत्रज्ञान आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. अशा वेळी आपल्या जीवनातला अंधार खर्‍या रीतीनं दूर करणारा एडिसन इथं भेटला. दिव्याचा शोध लावून त्यानं मानवजातीवर अगणित उपकारच केले.

एडिसनचे अथक प्रयत्न, अनेकदा आलेलं अपयश, तरीही चिकाटी न सोडता मिळालेलं यश बघून मन स्तिमित झालं. मात्र हीच वीज प्रत्यक्षात आणण्यासाठी, किफायतशीर करण्यासाठी आणि त्यातले धोके टाळून ती उपयुक्त करण्यासाठी ज्यानं आयुष्यभर प्रयत्न केले तो निकोला टेस्ला याचे आपण कधीच उतराई होऊ शकणार नाहीत. मात्र हा माणूस जगापासून, प्रसिद्धीपासून दूरच राहिला. खरं तर उपेक्षित राहिला म्हणावं लागेल. त्याचं योगदान एडिसनइतकंच किंबहुना अधिक होतं, त्यामुळे तोही या मालिकेत सामील झाला. पूर्वी दूरवरच्या लोकांना निरोप देण्यासाठी दवंडी पिटवत, कबुतरं पाठवत, खास निरोपेही धाडले जात. काही वेळा तर जगभर यासाठी अनेक गमतीदार प्रयोग केले गेले.

मात्र अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहम बेल नावाचा एक तंत्रज्ञ आला आणि त्यानं टेलिफोनचा शोध लावून माणसांचा एकमेकांशी थेट संवाद करवून दिला. माणसाचं जगणं सोपं झालं. आपण सगळ्यांनीच लहानपणी परीकथा वाचल्या आणि त्यात रमून गेलो. आपल्याला परीप्रमाणे पंख असते, तर आपणही उडत कुठेही गेलो असतो असं कितीदातरी वाटून गेलं. मात्र आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न राईट बंधूंनी विमानाचा शोध लावून पूर्ण केलं. यानंतर तंत्रज्ञ जीनियस लिहिताना रेडिओचा शोध लावणारा मार्कोनी भेटला. ‘रेडिओ’ या छोट्याशा डब्यासारख्या वस्तूमधून माणसं बोलायला लागली, गाणी गायला लागली, जगभरातल्या बातम्या द्यायला लागली. खरं तर मार्कोनीच्या आधी जगदीशचंद्र बोस या भारतीय शास्त्रज्ञालाच रेडिओच्या शोधाचं श्रेय मिळालं असतं, मात्र त्यांची स्वतःची पेटंट घेण्यामागची तत्वं आड आली आणि याचं श्रेय पुढे गुगलिएल्मो मार्कोनीला मिळालं. रेडिओनंतर आपल्या आयुष्यात दूरदर्शननं म्हणजेच टेलिव्हीजननं प्रवेश केला.

जॉन लागी बेअर्ड हाच जणू काही महाभारतातला संजयच्या भूमिकेतून टेलिव्हीजनच्या किंवा इडियट बॉक्सच्या रूपानं अवतरला आणि आपल्याला ‘ऑखो देखा हाल’ दाखवू/ऐकवू लागला. यानंतरच्या काळात आधुनिक कम्प्युटर सायन्सचा पितामह असं ज्याला म्हटलं गेलं, तो अ‍ॅलन मॅथिसन ट्युरिंग आला. तो एक गणितज्ञ (मॅथेमॅटिशियन), लॉजिशियन, तत्वज्ञ (फिलॉसॉफर), मॅथेमॅटिकल बायॉलॉजिस्ट तर होताच, पण कूटलेखन विश्लेषण (क्रिप्टेनालेसिस) याच्या आधारावर त्यानं एनिग्मा यंत्र आणि लॉरेज एस झेड ४०/४२ या कोडला ब्रेक केलं आणि संपूर्ण जगाला महायुद्धातल्या महाभयंकर विनाशापासून वाचवलं.

त्याच्याच पुढलं पाऊल स्टीव्ह जॉब्जनं उचललं आणि अ‍ॅपलची निर्मिती करून त्यानं संगणकाचं आधुनिक ज्ञान आपल्या पुढ्यात आणून ठेवलं. खरं तर तंत्रज्ञानाच्या विश्वातली ही सगळी जादुई क्रांतीच होती. बिल गेट्स आला आणि मायक्रोसॉफ्टची निर्मिती करून त्यानं संगणक वापरायला सोपा केला. 'दुनिया मेरी मुठ्ठीमे' प्रमाणे सगळं जग खरोखरंच आपल्या एका संगणकात मावलं होतं. जेफ बेझॉस या तरुणानं अ‍ॅमेझॉन ही कंपनी सुरू करून जगभरातली पुस्तकं असोत, सौदंर्यप्रसाधनं असोत, फर्निचर असो वा पोशाख असो कुठलीही वस्तू तुम्ही मागावी आणि अ‍ॅमेझॉननं ती तुम्हाला घरपोच द्यावी अशी सोय उपलब्ध करून दिली. आज अ‍ॅमेझॉन ही जगभरातली अग्रेसर कंपनी आहे.

तसंच जगभरातलं माहितीचं, ज्ञानाचं आयतं भांडार गुगलच्या लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन या दोन युवकांनी जगभरातल्या लोकांसाठी खुलं केलं. संवादासाठी टेलिफोन अधुरा वाटायला लागला, तेव्हा न मागता आपली झोळी भरली जावी तसं मार्क झुकरबर्ग या तरूणानं फेसबुकचं माध्यम उपलब्ध करून जगभरातल्या मंडळींना एकत्र आणलं एकमेकांचा मित्र बनवलं. अनेकांचं एकाकीपण या माध्यमामुळे दूर झालं.

या सगळ्याच तंत्रज्ञांनी मानवजातीच्या कल्याणासाठीच हे शोध लावले. मात्र या शोधांचा, या माध्यमांचा आपल्या हितासाठी वापर करायचा की आपणच आपलं अहित साधायचं याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हा अनर्थ घडवतो. त्यामुळे प्रत्येकानं या सगळ्या साधनांचा, माध्यमांचा सम्यकपणे विचार करून वापर करावा आणि आपलं जगणं सुखकर बनवावं. त्यासाठी जग जवळ आणणार्‍या या बाराही 'तंत्रज्ञ जीनियस'चे आपण कायमचे उतराई आहोत. या बारा 'तंत्रज्ञ जीनियस'चं आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, यश-अपयश, सगळं काही आपल्यासमोर आम्ही उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमीप्रमाणेच आपल्याला सोप्या, रंजक आणि तरीही अभ्यासपूर्ण तर्‍हेनं द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत... (तीन संच असलेल्या 'तंत्रज्ञ जीनियस' च्या माझ्या मनोगतातला काही भाग )

दीपा देशमुख, पुणे

deepadeshmukh7@gmail.com

१२ जगप्रसिद्ध 'तंत्रज्ञ जीनियस' - मनोगत - दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.