हाफ तिकीट

हाफ तिकीट

झोपडपट्टीतली दोन भावंडं, एकाचं वय आठ वर्षं आणि दुसर्‍याचं पाच ते सहा.....वडिलांना कुठल्याशा कारणानं तुरुंगवासात जावं लागलंय आणि या मुलांची आई दिवसभर शिलाईकाम करून पैसे कमवतेय आणि नवर्‍याला सोडवण्यासाठी वकिलाच्या दारी खेटे घालतेय. घरात सासू मुलांकडे लक्ष देतेय....मुलांची शाळा सुटलेली....दिवसभर मुलं रेल्वेट्रॅकवरून कोळसा गोळा करून विकत राहतात आणि मिळालेले तुटपुंजे पैसे आईला आणून देत राहतात....कोळशाच्या दुकानातली स्त्री त्यांना बदल्यात केक देत असते...या मुलांच्या आयुष्यात आता शाळा नाही, शिक्षण नाही, वाट्याला उपेक्षा, तरीही ही चिमुकली मुलं निरागसता जपत वाटचाल करणारी....त्यांना रेल्वेट्रॅकवर भेटणारा टुटीफ्रुटी (भाऊ कदम) असो वा बागेच्या कुंपणापलीकडे उभा असलेला एका धनिकाचा त्यांच्याच वयाचा मुलगा असो....त्यांच्या आयुष्यात अनेक छोट्यामोठ्या प्रसंगातून त्यांना आनंदही लुटता येतोय. एकदा त्यांना एका पिझ्झाच्या दुकानाचं उद्घाटन होताना बघायला मिळतं. तिथं अंकुश चौधरी हा अभिनेता आलेला असतो. शानदार समारंभ होतो आणि या मुलांना पिझ्झा ही एक नवी गोष्ट कळते. दोघांनाही आपल्यालाही पिझ्झा खायचा हा एकच ध्यास लागतो. एका डिलिव्हरी बॉयला रस्ता सांगताना ते त्याच्याजवळचा पिझ्झा बघून त्याचा वास नाकातच नव्हे तर मनातही साठवून घेतात आणि काहीही झालं तरी आपण पिझ्झा खायचाच असं ठरवतात. त्यासाठी त्यांना टुटीफ्रुटी रेल्वे ट्रॅकवरून साठवलेला कोळसा दाखवतो आणि घेऊन जायची परवानगी देतो. तसं केल्यानं त्यांना जास्त पैसे लवकर मिळणार असतात आणि २९९ रुपयांचा पिझ्झा खरेदी करता येणार असतो. एके दिवशी त्यांची आज्जी त्यांचं हे पिझ्झा वेड बघून चित्रातल्या भाज्या आणि पिझ्झा बेस बघून मुलांना पैसे देते आणि हव्या त्या भाज्या आणायला सांगते. मुलं पिझ्झा मिळणार म्हणून सुखावतात. आज्जी भाकरी तव्यावर टाकते आणि त्या बेसवर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची चित्रांतल्याप्रमाणे सजवून मुलांना देते. दोघंहीजण आधी वास घेतात, पण त्यांना त्या डिलिव्हरी बॉयच्या डब्यातल्या पिझ्झ्यासारखा तो वास येत नाही. ते तोंड वेंगाडतात. आज्जी समजावून सांगायचा प्रयत्न करते, पण आपल्याला आज्जीनं फसवलं म्हणून ते आज्जीचा भाकरीचा पिझ्झा न खाता निघून जातात. अखेर पिझ्झापुरते पैसे दोघंही जमवतात आणि पिझ्झा शॉपमध्ये जातात. पण त्यांचे कपडे पाहून रखवालदार अपमान करून त्यांना तिथून हाकलून लावतो. आपल्याकडे पैसे असूनही का हाकलून लावलं हे दोघांनाही कळत नाही. ते टुटीफ्रुटीकडे जातात, तेव्हा टुटीफ्रुटी त्यांना 'या जगात कपड्यांवरून माणसाची पारख होत असते' असं सांगतो. आता मुलांसमोर नवीन टारगेट असतं.

नव्या कपड्यांसाठी त्यांना पैसे जमवायचे असतात. कुठे खरकटी भांडी घास, कुठे पॅप्म्लेट वाट अशी अनेक कामं करत अखेर दोघंजण कपड्यांसाठी देखील पैसे जमवतात. त्यांच्या कुंपणापलीकडल्या श्रीमंत मित्राकडून त्यांना एमजी रोडवरच्या सेंट्रल मॉलमध्ये कपडे विकत मिळतात असं कळतं. तसंच त्या मित्रानं डब्यात त्यांच्यासाठी पिझ्झाही आणलेला असतो. पण दोघंही तो पिझ्झा खात नाहीत. उष्टा पिझ्झा खायचा नाही आपण आपल्या पैशानं तो विकत घेऊन खाऊ असं ठरवून ते निघतात. सेंट्रल मॉलपर्यंत पोहोचतात. तिथं गेल्यावर तो मॉल दुरूनच बघून त्यांचे डोळे दिपतात. इथंही आपल्याला आपल्याला अवतारामुळे आत जाऊ देणार नाहीत हे त्यांना उमगतं. त्याच वेळी निराश होऊन ते एका पाणीपुरीवाल्याजवळ बसून विचार करायला लागतात. तेवढ्यात एक मनुष्य आपल्या दोन मुलांसह मॉलमधून खरेदी करून बाहेर पडतो. त्या वेळी ती दोन मुलं पाणीपुरी खाण्याचा हट्ट करतात. पाणीपुरीवाल्याच्या मागे असलेला नाला बघून तो मनुष्य मुलांना ही पाणीपुरी 'हायजेनिक' नाही असं सांगतो. मुलं हट्टच धरतात, तेव्हा तो मुलांना 'मी तुम्हाला चार हजाराचे कपडे घेऊन नाही का दिले' असं म्हणतो. त्या वेळी 'आम्हाला कपडे नको होते, आम्हाला पाणीपुरी हवी आहे' असा मुलं हट्ट धरतात. पण त्यांचे वडील त्यांचं ऐकत नाहीत. पण त्याच वेळी त्यांना आपला मोबाईल मॉलमध्ये राहिल्याचं लक्षात येतं. मुलांना तिथंच थांबवून ते धावतच आत जातात. आपले 'नायक मुलं' त्या मुलांना पाणीपुरी खायचीय का विचारतात आणि त्यांना पाणीपुरी खाऊ घालतात. आपल्या जवळच्या पैशांमध्ये ते त्या मुलांकडून त्यांचे नवे कपडे खरेदी करतात आणि त्यांना पाणीपुरीही खाऊ घालतात. आता आपल्याला चांगले कपडे घातल्यामुळे कोणीही अडवणार नाही ही खात्री त्यांना पटलेली असते.

ते पिझ्झाच्या दुकानात ऐटीत जातात, पण तरीही तो रखवालदार त्यांना अडवतो. त्याचा आरडाओरडा ऐकून मॅनेजर बाहेर येतो. मुलं त्याला आपल्याजवळ पैसे असल्याचं सांगतात. पण मुलांचं काहीही ऐकून न घेता मॅनेजर मोठ्याला थोबाडीत मारतो. त्याचा अपमान करतो. डोळ्यातले अश्रू पुसत अपमानित झालेला मुलगा उठतो. आपल्या लहान भावाला घेऊन तो निघतो. या वेळी वस्तीतली मुलं त्यांचा हा अपमान बघतात, त्यांना चिडवतात. त्यातला एकतर त्याच्या मोबाईलमध्ये या प्रसंगांचं चित्रीकरणही करतो. मुलं हताश होऊन घरी परतात, तर त्यांची आजी गेलेली असते. आईची अवस्था बधिर झालेली असते. मुलांना बघून तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. तिच्याकडे आपल्या सासूच्या अंत्यविधीसाठी देखील पैसे नसतात. त्या वेळी आपले पिझ्झाचे जमवलेले पैसे लाकडं आणायला मोठा मुलगा देऊन टाकतो. त्या काही क्षणांमध्ये मुलांचं बालपण लोपतं. वास्तवाचे चटके त्यांना शहाणं करतात.

गोष्ट इतक्यावर संपत नाही आणि मी पुढली गोष्ट सांगणारही नाही. पण यात व्हायरल झालेला मुलांच्या त्या प्रसंगाचा व्हिडिओ आणि त्यानंतर घडलेलं मोठं नाट्य बघायला मिळतं. आपलीच पोळी भाजणारी माणसं भेटतात. यातले राजकारणी, प्रसारमाध्यमं सगळं काही उबग आणणारं.........मनाला एकीकडे आपल्या विनोदानं आपल्याला ही दृश्यं हसवतात आणि त्याच वेळी आपल्याला लाज वाटावी अशी मनाला टोचणीही देत राहतात. चित्रपट संपला. नेहमीप्रमाणे माझ्या डोळ्यांमधून अश्रूंचा पूर वाहत होता.......मी आताशा त्यांना अडवत नाही...एकप्रकारचा सुन्नपणा आला होता.......कधी, कशी ही परिस्थिती बदलेल ठाऊक नाही, या मुलांमधले कितीतरी आईन्स्टाईन, न्यूटन शिक्षणाविना असे भरकटत राहणार, आपली स्वप्नं कोमेजताना बघणार आणि आपलं बालपणही डोळ्यांदेखत करपलेलं बघणार या प्रश्नांची उत्तरं मन शोधत राहिलं.

चित्रपटानंतरची दिग्दर्शक म्हणून समीत कक्कड वगैरे नामावली डोळ्यांना धूसर दिसत होती आणि तेवढ्यात लेखक म्हणून नाव दिसलं आणि मी पुन्हा पुन्हा ते नाव बघत राहिले. आमच्या शिल्पकारचा, आमच्या सूर्यकांत सराफ सरांचा ज्ञानेश झोटिंग Dnyanesh Zoting..........केवढा मोठा झाला हा पोरगा.....लिखाणातलं वास्तव काळजाला भेदून जाणारं...........आपल्या डोळ्यांदेखत आपली गुणी मुलं खर्‍या अर्थानं अशी मोठी होताना, प्रगल्भ होताना बघणं याचा आनंद काही औरच असतो. एका बाजूला डोळ्यातले अश्रू आणि त्याच वेळी ज्ञानेशच्या कौतुकाचं हासू माझ्या चेहर्‍यावर पसरलं होतं आणि अपूर्व माझ्याकडे एकटक बघत होता! हा चित्रपट जरूर जरूर बघा!!!! यातली गाणी खूप चांगली आहेत....दिग्दर्शन उत्तम... सगळ्यांचाच ग्रेट ग्रेट अभिनय .....

प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहणारी आपल्या स्वप्नांना सत्यात आणू पाहणारी ही मुलं तुम्हालाही नक्कीच आवडतील!!!

दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.