हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा - एक थरार !!!

हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा - एक थरार !!!

एक वादळ, एक बेभान व्यक्तिमत्व, एक प्रेरणा, एक बंडखोरी....असं काही म्हटलं की समोर येतो मिलिटरीचा युनिफॉर्म चढवलेला, ओठात चिरूट शिलगवलेला, बेदरकार चेहर्‍याचा तो - हो तोच तो 'चे गव्हेरा'! लॅटिन अमेरिकेतल्या जवळपास सगळ्या राष्ट्रांमधल्या युवांचा हीरो असलेला 'चे गव्हेरा'! क्युबातल्या, ग्वाटेमालातल्या, निकराग्वातल्या, बोलेव्हियातल्या लाखो लोकांचा हा नेता - अल्पावधीत आख्ख्या जगाचा लाडका नेता बनला. त्यांचे शर्ट्स, त्यांचे टीशर्ट्स, त्यांचे कॉफी मग्ज, त्यांचे ग्लासेस, त्यांच्या खोल्यांच्या भिंतीवरची पोस्टर्स या सगळ्यांवर 'चे गव्हेरा'ची छबी झळकत असायची. हा 'चे' तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला. का, कशामुळे? आपल्या मोटरसायकलवरून भटकंती करत असताना लहान लहान लॅटिन अमेरिकन देशांतल्या गरिबीशी झुंजणार्‍या, भुकेशी लढणार्‍या जनतेचा अमेरिका कसा अमानवी पद्धतीनं छळ करतेय हे चे नं खूप जवळून बघितलं. तो खूप अस्वस्थ झाला आणि याच दरम्यान त्याची भेट झाली ती फिडेल कॅस्ट्रो या अनोख्या व्यक्तिमत्वाशी! दोघांनी मिळून भांडवलशाहीची झूल मिरवणार्‍या आणि इतरांची पिळवणूक करणार्‍या क्रूर अमेरिकेला धडा शिकवायचं ठरवलं. क्युबामधलं अमेरिकेचं वाढलेलं वर्चस्व नष्ट करून सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या हाती सत्ता द्यायची असं चे नं ठरवलं. क्युबामधल्या लोकांनी चे ला पाठिंबा दिला. गनिमी पद्धतीनं चे चा संघर्ष सुरू झाला. कालांतरानं क्युबाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी चे नं स्वतःला झोकून दिलं. त्यानंतर तो निघाला तो इतर आफ्रिकन देशांमध्ये, जिथे क्रांतीची मशाल पेटवण्याची आवश्यकता होती. वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी चे चा मृत्यू झाला. १९९७ साली बोलेव्हियानं चे च्या अस्थी क्युबाला सोपवल्या. पण त्यानंतर मात्र जिथे कुठे बंड झालं, क्रांतीची भाषा बोलली जाऊ लागली, तिथे तिथे अदृश्यपणे चे आपल्या बरोबर असल्याचा विश्‍वास लोकांना वाटू लागला. चे ची अदृश्य साथ आपल्याला आहे याची आशा मनात ठेवून लोक अन्यायाविरुद्ध लढण्याचं धैर्य अंगी घेऊन बाहेर पडू लागले, न्यायासाठी रस्त्यावर उतरू लागले. चे गव्हेराच्या मृत्यूनंतरही चे लोकांच्या मनात जिवंतच राहिला.

'चे' आजही आहे! उद्याही असणार आहे! हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे माझे मित्र हरी नरके यांनी सुदर्शनमध्ये होणार्‍या ‘चे गव्हेरा’ च्या नाटकाची पोस्ट टाकली. त्यांनी मला मागच्या वेळी बोलावून मला त्यांच्याकडे जायला जमलं नव्हतं, पण आज कामं आटोपून आपण जायचं असं मी ठरवलं आणि अपार उत्सुकतेनं सुदर्शनला पोहोचले. तरुणाईची प्रचंड गर्दी होती. सुदर्शनचा हॉल काहीच क्षणात भरला.

स्टेजवरची प्रकाश योजना मनाला लुभावणारी होती. पाश्‍चात्त्य संगीताची धुन वाजत होती आणि समोर एक तरुणी लॅपटॉपवर काम करण्यात मग्न होती, तर तिच्यापेक्षा लहान असलेली दुसरी तरुणी लोळत आरामात कुठलंसं पुस्तक वाचत होती............हळूहळू संवाद सुरू झाले..... संवाद इंग्रजीतून चाललेले होते...क्वचित हिंदीमधून एखादंदुसरं वाक्य कानावर पडत होतं.... भाषेचा अडसर अर्थातच वाटत नव्हता.....अचानक दृश्य बदललं आणि पोलीस स्टेशनमधल्या कारागृहात चक्क 'चे' दिसला.....पोलिसांच्या मारानं रक्तबंबाळ झालेला.... एक तरुणी (दोघींमधली मोठी) त्याला बोलतं करायचा प्रयत्न करतेय....त्याचे स्पॅनिश भाषेतले संवाद, त्याचा देह जरी रक्तबंबाळ झालेला असला तरी त्याचा आवाजात मात्र करारीपणा.....'मोडेन पण वाकणार नाही'चा बाणा.....तरुणाईला वाटणारं चे चं आकर्षण, पण त्याच वेळी वाढती भांडवलशाही आणि वाढता चंगळवाद.....किती दिखाऊ जगणं शिकवतोय याचं चित्रण.......अन्यायाविरोधात खरी क्रांती, खरं लढणं यापेक्षा त्यावर पेपर लिहून प्रसिद्धी मिळवणं आणि यातच आपण काही केल्याचं सार्थक वाटून घेणारीही माणसं.......आपलं जगणं वेगळं आणि आपली दिखाऊ कृती वेगळी........अमेरिकेची नक्कल करणारी गर्दी....व्यवस्थेतल्या यंत्रणेचा दुरुपयोग........पोलिस अधिकार्‍याची लाचारी आणि भ्रष्ट प्रतिमा..........सत्याला भिडण्याची ताकद नसलेली माध्यमं.....सगळं काही वरवरचं..........आणि या सगळ्यांमध्येही तसाच दीपस्तंभासारखा उभा असलेला.....सगळ्या जगासाठी लढू पाहणारा........जगाला शांतीची, सुखाची, समतेची स्वप्नं दाखवणारा चे गव्हेरा..........हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा! क्रिशीव क्रिएशन्स, पुणे निर्मित ‘ हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा’ हे नाटक कधी सुरू झालं आणि कधी संपलं कळलंच नाही.

अप्रतिम, अस्सल, अंतर्मुख करणारा, संवेदना बधिर करणारा एक जिवंत अनुभव! यात चे ची भूमिका करणारा गिरीश परदेशी हा तरुण प्रेमात पडावा असा! त्याच्या अभिनयानं प्रेक्षक चकित झाले. प्रत्यक्ष चे गव्हेरा त्यानं हुबेहूब उभाच केला नाही तर तो प्रेक्षकांमध्येही जाऊन लोकांशी बोलला. गिरीश बरोबरच गीता गुहा, अमित झा आणि प्रमिती नरके यांनीही आपापल्या भूमिका अतिशय चोखपणे निभावल्या. गिरीश परदेशी, गीता गुहा, अमित झा, लेखक आणि दिग्दर्शक शुभदीप राहा ही सगळी तरुण मंडळी एनएसडी या दिल्लीतल्या नामांकित संस्थेत शिकून तयार होऊन आलेली! त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा भिडवून उभी राहणारी पुण्यातली प्रमिती ही ललित कला ऍकादमीची गोल्ड मेडॅलिस्ट, तीही कुठेच कमी पडली नाही. प्रकाश योजना आणि संगीत अमेय सुर्वे या तरुणानं दिलं होतं, तर नेपथ्य आणि वेशभुषा निश्‍चयतल इंगोले यानं केलं होतं. बॅकस्टेजची जबाबदारी सौरभ मदने आणि प्रसाद चौबळ यांनी समर्थपणे सांभाळली होती. हे नाटक बघणं म्हणजे एक थरार अनुभवणं आहे; एनएसडीमधल्या शिक्षणामधली ताकद कळणं आहे; प्रकाश योजना कशी असावी याचं एक आदर्श उदाहरण आहे. हे नाटक नाटक नसून वास्तववादाचा जिवंत अनुभव आहे. प्रत्येकानं हा अनुभव घ्यायलाच पाहिजे. थँक्स क्रिशीव क्रिएशन्स, पुणे टीम, 'चे' चं स्थान मनात पुन्हा पक्कं केल्याबद्दल!

थँक्स हरी नरके, आत्मीयतेनं आणि आग्रहानं निमंत्रण दिल्याबद्दल!

दीपा देशमुख, पुणे.

हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा - एक थरार !!!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.