ॲस्पिरन्टस्

ॲस्पिरन्टस्

स्पर्धा परीक्षा आणि स्पर्धा परिक्षार्थी यांच्यावर आधारित ॲस्पिरन्टस् ही मालिका 7 एप्रिल 2021 पासून यू ट्यूब वर सुरू झाली असून आत्तापर्यंत या मालिकेचे 3 भाग प्रदर्शित झाले आहेत. टीव्‍हीएफ (द व्हायरल फीवर) चॅनेलने ॲस्पिरन्टस्ची निर्मिती केली असून या आधी त्यांनी कोटा फॅक्टरीसारखी मालिका प्रदर्शित करून शिक्षणक्षेत्रातल्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं. ॲस्पिरन्टस् म्हणजे महत्वाकांक्षी - स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे लाखो तरुण आपण यूपीएसी परीक्षेत यश मिळवून आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात. त्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रवेश घेऊन जीवतोड अभ्यास करतात. पुण्यामध्ये तर नवी पेठ, टिळक रोड या भागात गेलं की सर्वत्र यूपीएससीची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी भेटतात. एखादी खोली भाड्याने घेऊन त्यात चार-चार विद्यार्थी राहतात. वडापाव खाऊन, मोठमोठी पुस्तकं हातात घेऊन फकत आपल्याला यश कसं मिळेल याचाच 24 तास विचार करत असतात. ॲस्पिरन्टस् चे तिन्ही भाग खूपच अप्रतिम असे आहेत. यात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा सुरेख मेळ साधला आहे. अभिलाश, गुरी आणि एसके (श्वेतकेतू) हे तीन मित्र असतात आणि तिघंही यूपीएससीची तयारी करत असतात. गुरी आणि एसके खूप कॉन्फिडन्ट दाखवले आहेत आणि अभिलाश हा प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचार करणारा, सतत अस्वस्थ असणारा तरुण दाखवला आहे. भारतानं आजवर काय प्रगती केलीय, आनंदी देशात त्याचा नंबर कसा मागे आहे पासून त्यानं कुठलेली शोध कसे लावले नाहीत, साध्या टूथ ब्रशचं उत्पादनही त्याचं स्वत:चं नाही असे विचार तो बोलून दाखवत असतो. आपला घरमालक चोवीस तास टीव्‍ही लावतो म्हणून आपला अभ्यास होत नाही अशा विचारानं तो वैतागलेला असतो. आपण ऑप्शनल विषय कुठला घ्यावा याचाही त्याचा निर्णय होत नसतो. एके दिवशी अभिलाशच्या आयुष्यात धैर्या नावाची मुलगी येते आणि प्रेम माणसांत किती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते हे बघायला मिळतं. धैर्या देखील यूपीएससीची तयारी करत असते. ती अभिलाशमधला नकारात्मक भाव दूर करण्यास मदत करते. तिच्या प्रेमात अभिलाश खूप बदलतो. मालकाशी भांडणारा अभिलाश मालकाशी फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जेव्‍हा बोलायला लागतो, तेव्‍हा त्यांचे संबंध सुधारतात. माणुसकीचं एक नातं तयार होतं. रस्त्यात पडलेल्या खड्डयामुळे अनेकांचे रोज अपघात होत असतात. लोक पीडब्लूडीच्या नावानं खडे फोडत तसाच मार्ग काढत पुढे जात असतात. पण अभिलाश पीडब्लूडीशी संपर्क साधून पाठपुरावा करतो आणि तो खड्डा बुजवायला प्रवृत्त करतो. अभिलाशला आता आयएएस का व्‍हायचंय, सतत कोणाला तरी आरोपी करण्याऐवजी आपण बदल कसे घडवू शकतो याची जाणीव होते. कृती किती महत्वाचं आहे ते त्याला कळतं. पहिल्याच दिवशी ॲकॅडमीतल्या एका शिक्षकाचा नकारात्मक सूर ऐकून हा शिक्षक आपल्याला काय प्रेरणा देणार या विचारानं सुरुवातीला अभिलाश आपली फी परत घेऊन इन्स्टिट्यूट सोडायची ठरवतो. पण त्याच दिवशी एक आयएएस अधिकारी ॲकॅडमीत संवाद साधायला येते आणि तिच्या बोलण्यानं तो प्रेरित होतो. अनेक लहानसहान प्रसंगानी त्याच्यातला नकारात्मक सूर गळून पडतो. तो फी परत मागण्यासाठी जात नाही. घरमालकाच्या टीव्‍हीची अडचण लक्षात घेऊन धैर्या आणि अभिलाष दोघंही ग्रंथालयात एकत्र भेटत राहतात आणि मिळून अभ्यास करतात. एकदा अभिलाशचा चष्मा धैर्याकडून तुटतो आणि ती त्याला नवीन चष्मा घेऊन देते. त्या चष्म्याच्या केसवर त्या दुकानाचं नाव खोडून धैर्या असं टाकते. ती धैर्याकडून अभिलाशला भेट असते. हे सगळं घडतं भूतकाळात... वर्तमानकाळात यातला एसके हा ॲकॅडमीमध्ये शिकवत असतो, गुरी बिझिनेसमन असतो, तर अभिलाष हा आयएएस अधिकारी बनलेला असतो. अभिलाश, गुरी आणि एसके यांच्यात दुरावा निर्माण झालेला असतो. आपसातला तो दुरावा दूर करण्यासाठी एसके प्रयत्न करतो. गुरीचं लग्न ठरलेलं असतं. तो अभिलाशला व्हाटसअप करून कळवतो आणि अभिलाश, गुरी आणि एसके एकत्र भेटतात. त्या वेळी अभिलाश आपण तुझ्या लग्नाला अवश्य येणार असं गुरीला सांगत त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव विचारतो. गुरीला खूप ऑक्वर्ड वाटत असतं. कारण भूतकाळातलं अभिलाश आणि धैर्या यांचं प्रेम सगळ्यांना माहीत असतं आणि त्याच धैर्याशी गुरीचं लग्न होणार असतं. गुरी अखेर सांगतो आणि अभिलाश अरे, तू कशाला वाईट वाटून घेतोस, या गोष्टीला सहा-सात वर्षं झाली आणि मी त्या या गोष्टी विसरलो असं म्हणत गुरीचं अभिनंदन करतो. मात्र त्याच वेळी हॉटेलमध्ये अभिलाष ऑर्डर देताना गुरी आणि एसके अभिलाशला बघतात. अभिलाश आपल्या चष्म्याच्या केसमधून चष्मा काढतो, ती केस धैर्यानंच दिलेली असते आणि अजूनही तो धैर्याला विसरू शकलेला नाही हे त्या दोघांच्या लक्षात येतं. ॲस्पिरन्टस् मधलं वातावरण यूपीएससी चं एक वेगळं जग उभं करतं. त्यांचा ताण, भीती, अस्वस्थता, सगळं काही पणाला लावल्यामुळे होणारी घालमेल खूप चांगल्या तऱ्हेने उभं केलं आहे. लाखों तरुणांचे प्रयत्न आणि परिश्रम, उपलब्ध असणाऱ्या जागा, निवडक विद्यार्थ्यांची निवड यांचं वास्तव यात दाखवलं आहे. परिक्षार्थी असताना आणि नंतर आयुष्यात स्थिर होत असताना झालेला बदल देखील अतिशय सुरेख टिपला आहे. यातल्या प्रत्येक भागातले संवाद आणि प्रसंग अंतर्मुख करतात. Amazon Prime वरची अशीच पंचायत ही जितेंद्र कुमार याच्या अभिनयाने सशक्त झालेली मालिका मला खूपच आवडली होती. त्यात ग्रामीण भागातल वास्तव, युवकांची तिथे जाण्यासाठी असलेली अनास्था, तिथलं राजकारण, अज्ञान यांचं दर्शन हुबेहूब घडवलं होतं. ॲस्पिरन्टस् च्या पुढल्या भागांमध्ये काय घडणार याची आता मलाही उत्कंठा वाटते आहे. तोपर्यंत तिन्ही भाग जरूर बघा. (टीव्‍हीएफ आपल्या भाडीपा सारखं लोकप्रिय चॅनेल असून टीव्‍हीएफ चे आतापर्यंत 85 लाख sabscriber आहेत. त्यांची संख्या 90 वर गेली की ते पुढला भाग प्रदर्शित करतील.) दीपा देशमुख, पुणे. adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.