लिपस्टिक अंडर माय बुरखा
स्वातंत्र्य कशाला म्हनंतेत रं भौ?
कोकणा सेन आणि रत्ना पाठक शाह यांच्यामुळे हा चित्रपट आज बघितला. इशय चांगला, पण मांडता पण यायला हवा की! पिंक, पार्च्ड आणि आता हा तिसरा लिपस्टिक अंडर माय बुरखा! या तिन्हीचा विचार करता, सगळ्यात रद्दी, बंडल, भंगार म्हणावा असा हा चित्रपट! कोणी याला ब्लॅक कॉमेडी म्हणू देत, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ऍवार्ड्स मिळू देत....राजा नागडा आहे असं कसं म्हणायचं म्हणून ‘वा, किती चांगला चित्रपट’ म्हणून प्रशंसा करायची हे जमणार नाही ब्वा!
आधीच्या दोन्ही चित्रपटांप्रमाणेच यातही चार स्त्रियांची गोष्ट दाखवली आहे. यांची लिपस्टिकची स्वप्नं म्हणजे या घुसमटीच्या आयुष्यातून स्वातंत्र्य मिळवण्याची स्वप्नं. एक कॉलेज युवती, दुसरी नोकरी करणारी, तिसरी नवर्यासमोर आवाज न करू शकणारी पण बाहेर उत्कृष्ट सेल्समनचा किताब मिळवणारी, चौथी वृद्धत्वाकडे वाटचाल करणारी .....या सगळ्यांना स्वातंत्र्य हवंय. विशेषतः सेक्सचं! तसं त्या आपापल्या मार्गानं ते वसूलही करत राहतात. पण तरीही दिवसा सीता व्हायचं आणि रात्री गीता व्हायचं हे सगळं कठीण हाय ना राव? बिचार्यांना कंटाळा येतो याचा. या चित्रपटात सेक्सबरोबरच त्यांची भावनिक गरजही त्यांना सतावतेय असं म्हटलंय. पण ते चित्रपटात कुठेच औषधालाही दिसत नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा शरीरावर तुटून पडणं एवढंच दिसतं. यामागे कुठली प्रतिकात्मक भावनिक गरज असेल तर ते जाणकारालाच कळो ब्वा!
पिंक चित्रपटामध्ये डॉयलॉग्ज आणि अमिताभने म्हटलेली कविता ग्रेट होती. पण इथं तर सगळाच आनंदी आनंद आहे. काही चित्रपट प्रशंसा करून करून, ऍवार्ड देऊन देऊन चालवले जातात तसाच हा चालेल...रिव्ह्यूजनी पानं भरतील.....काहीही झालं तरी आपण मात्र या पुढे असे स्त्रियांची घुसमटवाले चित्रपट बघणार नाय ब्वा!
दीपा देशमुख (हा चित्रपट बघून फिलिंग लैच पारंपरिक!)
२८ जुलै २०१७.
Add new comment