अनुभव

अनुभव

मुझे जाँ ना कहो मेरी जाँ मेरी जाँ, मेरी जाँ
जाँ ना कहो अन्जान मुझे जान कहाँ रहती है सदा
अन्जाने क्या जाने, जान के जाए कौन भला
सूखे सावन बरस गये कितनी बार इन आँखों से
दो बुँदे ना बरसे, इन भीगी पलकों से
होंठ झुके जब होंठोंपर साँस उलझी हो साँसों में
दो जुड़वा होंठों की, बात कहो आँखों से

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुभव’ या संजीवकुमार आणि तनुजा यांच्या भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटातलं हे गाणं मला इतकं आवडतं, इतकं आवडतं की ऐकल्यानंतर अनेक दिवस त्या गाण्यातून बाहेरच येता येत नाही. गीता दत्तचा मधाळ आवाज वेडं करतो, धुंद करतो, आस लावतो......केवळ या गाण्यासाठीच आज पुन्हा एकदा ‘अनुभव’ बघितला. निर्मिती, पटकथा, दिग्दर्शक सबकुछ बासू भट्टाचार्य यांच्या या चित्रपटानं राष्ट्रीय चित्रपटांचा सर्वश्रेष्ठ पुरस्कारही त्या वेळी मिळवला. हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. यातली अतिशय सुंदर गाणी गुलजारनं लिहिली तर कनू रॉय यांचं खूपच अनोखं संगीत यातल्या गाण्यांना लाभलं. ही गाणी मन्नाडे (फिर कोई फूल खिला) आणि मुझे जाँ न कहो मेरी जान (गीता दत्त) यांनी गायिली म्हणजे चार चॉंदच लागले की!

‘अनुभव’ची गोष्ट खूप साधी, सरळ, संथ अशी! लग्नाला सहा वर्षं झालेलं सुखवस्तू जोडपं.....त्यातही नवरा कामात अतिशय व्यस्त... घरात सगळंच काही....नोकरचाकर.....अमर (संजीवकुमार) रात्रंदिवस काम करणारा.....नोकरचाकरांमुळे म्हणायच्या आतच गोष्टी समोर हजर होत असतात.....मग हे एकसुरी आयुष्य कंटाळवाणं आणि यंत्रवत वाटायला लागतं....यातली नेमकी उणीव मीता (तनुजा) हिला जाणवायला लागते. या सुखसोयी, ही नोकरमंडळी यामुळे आपण या घरात त्यातलीच एक वस्तू बनून राहिलो आहोत आणि यात आपण जर कुठे नसलो तरी अमरच्या आयुष्यात विशेष काही फरक पडणार नाही हे तिच्या एके दिवशी लक्षात येतं. ती घरातल्या सगळ्या नोकरांना पैसे देऊन कायमची सुट्टी देते. मात्र हरी (ए. के. हंगल) नावाचा वृद्ध नोकर हा जात नाही. त्याचं या घराशी, अमरशी एक प्रकारचं नातं तयार झालेलं असतं. थोडी त्रेधातिरपीट उडते, पण हरीच्या मदतीनं मीता आपला संसार नीटपणे करायला लागते. अमरच्या आसपास आता तिचा वावर सुरू होतो आणि त्यालाही ती जाणीव करून देते की एक बायको एखाद्या माणसाच्या आयुष्यात काय काय असते. सतत कामात असलेल्या अमरला आजारपणात विशेषतः आपल्या बायकोतली मैत्रीण, प्रिया, नर्स आणि एक आई दिसते...तिची इतकी सगळी रुपं बघून तो भारावतो. आजारपणात आपण एक मूल होतो, तेव्हा या सगळ्या भूमिकेतून जाणारी स्त्रीची जागा किती महत्वाची असते हे त्याला समजतं. तिच्यातले माहीत नसलेले अनेक पैलू त्याला कळत जातात.

या चित्रपटात नवरा-बायकोमधलं नातं इतकं अलवारपणे उलगडलं आहे की आपणही या नात्याचा एक हिस्सा होऊन जातो. या चित्रपटात थोंडंसं वळण जे येतं ते दिनेश ठाकूर याच्या रुपानं! हा मीताच्या भूतकाळातला प्रियकर! त्याच्या घरातल्या वावरानं ती थोडी अस्वस्थ होते, पण जेव्हा अमरलाही त्या दोघांचा भूतकाळ कळतो तो काही काळ बिथरतो. मीता अमरला खूप सहजपणे बोलून जाते - स्त्रीच्या आयुष्यातले प्रत्येक निर्णय दुसरंच कसं कोणी घेतं, तिला काय हवंय हे कधीच तिला करू दिलं जात नाही आणि अनेकदा तिलाही ते उमगत नाही. ती खूप सहजपणे आपल्या भूतकाळातल्या प्रेमाची कबुली त्याच्याजवळ देते. जे आपल्याला आपल्या नवर्‍यानं ६ वर्षांत दिलं नाही ते त्या प्रियकराकडून काही क्षणांत मिळालं होतं याचाही उच्चार करते. सुरुवातीला हे पचवणं पुरुष म्हणून अमरला खूपच कठीण जातं. त्याची स्वतःशी चिडचिड होते. तो भूतकाळ त्याचं वर्तमान बिघडवू पाहतो. पण एक क्षण त्याच्या कानात येऊन सांगतो, की तू वर्तमानात जगूच इच्छित नाहीयेस. तूच हा भूतकाळ वर्तमानात आणू पाहतो आहेस. प्रत्यक्षात चित्रं जसं होतं तसंच आताही आहे. आणि मग तो वर्तमानातून भूतकाळाला अतिशय खिलाडूपणे हद्दपार करतो आणि आपलं आयुष्य पूर्ववत सुरू करतो.

सध्याच्या मसालेदार चित्रपटांच्या गर्दीत हा चित्रपट म्हणजे छान आसट गरम वाफेचा भात, त्यावर साधं वरण आणि घरी केलेलं तुप असावं असा आहे. या मेन्यूला कोणी नावं ठेवू शकेल असं मला तरी नाही वाटतं. एका सुखासमाधानाच्या तृप्तीचा आनंद, एक तरंग तुमच्याही मनावर उमटेल. जरूर बघा आणि कळवा!

दीपा देशमुख

१२ एप्रिल २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.