धनंजय

धनंजय

धनंजय (बंगाली चित्रपट), प्रद्युम्न खून, आरुषी हत्याकांड आणि .....धनंजय (बंगाली चित्रपट), प्रद्युम्न खून, आरुषी हत्याकांड आणि ..... गेले काही दिवस सातआठ वर्षांचा प्रद्युम्न या रेयॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणार्‍या मुलाचा शाळेच्या स्वच्छतागृहात झालेला मृत्यू मनाला अस्वस्थ करतो आहे. सीबीआयनं केस हातात घेऊनही मृत्यूचं गूढ आणखी उलगडलेलं नाही. मन सगळ्या शक्यतांना उलटसुलट पडताळून बघत राहतं. अशाच पद्धतीनं आरुषी हत्याकांडानंही अस्वस्थता आली होती. खरंच कोणी मारलं असेल तिला? बातम्यांचा पाठपुरावा करण्यात कितीतरी महिने मन गुंतलं होतं. मध्यंतरीच्या काळात मनोविकास प्रकाशनाचं मुक्ता मनोहर या माझ्या मैत्रिणीनं लिहिलेलं ‘नग्नसत्य’ हे बलात्काराच्या वास्तवाचा वेध घेणारं पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकात बलात्काराच्या केसेस आणि त्यामागची गुन्हेगारी मानसिकता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता.

हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला बंगाली चित्रपट ‘धनंजय’ आज बघितला. चित्रपटाविषयी बोलण्याआधी कलकत्यामध्ये घडलेल्या हेतल पारेख बलात्कार आणि खून खटल्याविषयी जाणून घेऊ या. ५ मार्च १९९० या दिवशी हेतल पारेख ही १४ वर्षांच्या शाळेत जाणार्‍या मुलीचा आपल्या राहत्या घरात सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या दरम्यान खून झाला. बलात्कार, खून आणि चोरी असा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला होता. कलम ३०२ नुसार आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपी धनंजय चटर्जी हा आनंद अपार्टमेंट या सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. तो हेतलची अनेकदा छेडही काढत असे आणि त्यामुळे तशी तक्रार हेतलच्या वडलांनी केल्यामुळे धनंजयची बदली दुसर्‍या अपार्टमेंटमध्ये करण्यात आली होती. ज्या दिवशी ही दुर्देवी घटना घडली, त्या दिवशी हेतल शाळेतून दुपारी घरी आल्यानंतर तिनं जेवण केलं आणि तिची आई मंदिरात देवदर्शनासाठी गेली. याच दरम्यान धनंजयला हेतलच्या घरी जाऊन एजन्सीला फोन करण्यासंबंधी सांगण्यात आलं. त्याला जाताना आणि परत जिन्यातून येताना इमारतीच्या रखलवालदारानं बघितलं होतं. त्याच दिवशी धनंजय आपल्या गावाकडे निघून गेला. हेतलची आई मंदिरातून परतली. तिला बघून रखलवालदारानं धनंजय फोन करायला तुमच्या घरी गेला होता असं सहजपणे सांगितलं आणि स्वतः केलेल्या कामाचे काही पैसेही मागितले. हेतलची आई त्याचं म्हणणं ऐकून वर गेली आणि तिनं बेल वाजवल्यानंतरही आपली मुलगी दरवाजा उघडत नाही, पाहून तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. शेजारी गोळा झाले. सगळ्यांनी मिळून दार तोडलं. आत प्रवेश करताच हेतलच्या आईला जखमी अवस्थेत पडलेली हेतल दिसली. धनंजय कुठे आहे असं ओरडत तिनं घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये त्याला शोधलं आणि नंतर आपल्या मुलीला कपड्यांमध्ये लपेटून तिला उचलून लिफ्टमध्ये शिरली. पण बधिरावस्थेत ती तिथेच बसून राहिली. डॉक्टर आले, त्यांनी तिला तपासलं आणि ती जिवंत नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी धनंजयला त्याच्या गावी जाऊन त्याला शोधून आणलं. प्रसारमाध्यमांनी, कलकत्यातल्या नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवला आणि धनंजयला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

धनंजय शेवटपर्यंत आपण निर्दोष असल्याचं सांगत राहिला. त्यानं राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही केला, पण तो फेटाळण्यात आला. त्याच्या पत्नीनं आपला नवरा धनंजय निर्दोष असल्याचं सांगितलं, पण त्या वेळी अशा बलात्कारी नवर्‍याला पाठीशी घालतेय म्हणून तिच्यावरही प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आली. या केसचा निकाल लागल्यानंतर १४ वर्षांनी म्हणजे १४ ऑगस्ट २०१४ या दिवशी म्हणजेच धनंजयच्या वाढदिवसाच्या दिवशी अलिपूरच्या कोलकता जेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास त्याला फाशी देण्यात आली. वरवर बघता एका चौदा वर्षाच्या निरागस मुलीवर जबरदस्ती करून तिला इजा पोहोचवून तिचा खून करणारा व्यक्ती हा माणूस म्हणायचा लायकीचाही वाटत नाही. भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे असं तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या मुलीनंही वक्तव्य केलं होतं.

प्रसारमाध्यमांनी या घटनेला वारेमाप प्रसिद्धी देण्यात मागेपुढे बघितलं नाही. काही ठरावीक संस्थांनी चौदा वर्षांनी धनंजयला फाशी न देता मानवीय दृष्टिकोनातून बघावं असंही मत मांडलं .......आणि एके दिवशी हे सगळं वादळ शांत झालं. आज या घटनेवर आधारित ‘धनंजय’ हा चित्रपट बघितला आणि हा घटनाक्रम आठवत गेला. चित्रपटाचं कथानक मात्र वेगळंच वास्तव समोर आणत होतं. या चित्रपटात दोन्ही प्रसंग ‘तलवार’ या बोस्की गुलझार दिग्दर्शित चित्रपटाइतकेच सशक्त दाखवले आहेत. kafkaa च्या ट्रायल या कादंबरीचे उल्लेख यात आहेत. पहिल्या प्रसंगात धनंजय घराची बेल वाजवतो, हेतलला एकटीला पाहून तिच्यावर बलात्कार करून निघून जातो.....तर दुसर्‍या प्रसंगात हेतल शाळेतून घरी येते आणि ती कपडे बदलत असताना तिच्या आईला तिचा संशय येतो आणि ती कोणाबरोबर कुकर्म करून आलीये असं म्हणत तिला मारहाण करते आणि त्या मारहाणीत हेतलचा मृत्यू होतो. आपली मुलगी आपल्या हातून मरण पावलीये ही गोष्ट कळताच हेतलची आई घाबरते आणि ती नवर्‍याला फोन करून घडलेला वृत्तांत सांगते आणि मंदिरात निघून जाते. आल्यावर ठरल्याप्रमाणे धनंजयचं नाव घेऊन त्याला यात अडकवलं जातं.

धनंजयला फाशी दिली तरी त्याची बायको सुन्न अवस्थेत आयुष्य कंठत असते. तिला त्या अवस्थेत पाहून एक वकील तरूणी तिची केस पुन्हा रिओपन करते आणि तिला या केसमधल्या अनेक कमकुवत साखळ्या सापडू लागतात. पोस्टमार्टेम रिर्पोर्टमध्ये हेतलच्या शरीरावर २१ जखमा झालेल्या असून त्या तिच्या कमरेच्या वरच्या भागावर आढळून आल्या. तिच्यावर बलात्कार झालेला नसून तिच्या संमतीनं काही तासांपूर्वी तिचा कोणाशीतरी शरीरसंबंध आला होता असंही त्या रिर्पोटमध्ये नमूद केलेलं असतं. धनंजयचं वीर्य किंवा काहीही पुरावे सापडत नाहीत. चित्रपटाचा शेवट धनंजयची बाजू मांडत संपतो. यात कुठलाही निकाल दाखवून शेवट केलेला नाही.

या चित्रपटातला अर्निबन भट्टाचार्य याचा अभिनय लाजबाब! ११ ऑगस्ट २०१७ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘धनंजय’ हा बंगाली चित्रपट जरूर बघा. वरवरच्या घटनांमागे आपल्याला न कळणारं दाहक सत्य असू शकतं आणि ते आपल्यासमोर कधीच उकललं जाणार नाही हे कळल्यावर खरोखरंच मन बेचैन होतं. मग प्रद्युम्न असो, आरूषी असो वा हेतल असो ......अशा गूढ मृत्युमुळे जर धनंजयसारखा एखादा निरपराध जीव केवळ तो गरीब आहे म्हणून फाशी जात असेल तर खूप अस्वस्थता येते. तसंच आपल्याकडे खोट्या प्रतिष्ठेचा बाऊ करून आरूषी असो, वा हेतल असो, यांचे पालकच जर आपल्या मुलींना मारून समाजात सहानुभूती मिळवून वर उजळमाथ्यानं वावरत असतील तर याला काय म्हणायचं? 

दीपा देशमुख 
२ ऑक्टोबर २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.