अनुराधा
‘अनुराधा’ हा चित्रपट मी अनेकदा बघितलाय. काल परत एकदा बघितला. १९६० साली हृषिकेष मुखर्जींनी दिग्दर्शित आणि प्रदर्शित केलेला आणि पंडित रवीशंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अनुराधा’ या चित्रपटाचं बलराज सहानी आणि लीला नायडू यांनी अक्षरशः सोनं केलंय.
आपल्या मूल्यांना प्राधान्य देणारा एक डॉक्टर आणि संगीत हेच जगणं मानणारी अतिशय संवेदनशील गायिका असलेली तरुणी यांच्यातल्या हळुवार प्रेमाची कहाणी यात आहे. बलराज सहानी आणि लीला नायडू यांचं प्रेम इतकं तरलपणे फुलत जातं, की बघणारा त्या प्रेमाचा साक्षीच नव्हे, तर त्याचा हिस्सा होऊन जातो. अनुराधा (लीला नायडू) आपल्या वडिलांचा विरोध आणि संगीत या सगळ्यांना सोडून डॉ. निर्मल चौधरी या तरुणाचा हात जन्मभरासाठी पकडते. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन आलेल्या आणि अनुराधावर आणि तिच्या संगीतावर मनापासून प्रेम करणार्या तरुणाबरोबर अनुराधाच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलेलं असतं. पण त्या तरुणाला अनुराधा ठामपणे आपला नकार सांगते. तोही तिच्या सुखासाठी तिच्या आयुष्यातून दूर होतो. त्यानंतर निर्मल हा एका छोट्याशा गावात रुग्णसेवा करायला लागतो. अनुराधा आपलं संगीत आणि घरातली श्रीमंती विसरून निर्मलच्या साध्यासुध्या घरात आपला संसार करायला लागते. त्या दोघांना अतिशय गोड, चुणचुणीत मुलगी होते. संसार फुलतो, पण अनुराधा कोमेजायला लागते. निर्मलचं रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत जाणारा वेळ आणि उरलाच तर तोही घरी आल्यावर रीसर्च करण्यात जाताना बघून अनुराधा मनातल्या मनात कुढायला लागते.
स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून गावातल्या लोकांवर उपचार करणारा निर्मल गावातल्या सर्वांनाच देवासारखाच असतो. संसारात प्रत्येक नवरा-बायकोच्या जे होईल, तेच निर्मल आणि अनुराधा यांच्या संसारातही घडतं. अनुराधाबरोबर वेळ देण्यासाठी अनेकदा निर्मल वचनं देतो, पण ती तो निभावू शकत नाही. कारण रुग्णतपासणीत तो इतका गर्क होत असतो, की त्याला आपण सकाळी अनुराधाला काय कबूल केलं होतं, हेही तो विसरून जात असतो. काही कारणांनी एक अपघात होऊन पूर्वी अनुराधासाठी तिच्या वडिलांनी निवडलेला तोच तरुण-दीपक पुन्हा अनुराधासमोर येतो आणि तिचं घुसमटलेलं आय्ाुष्य बघतो. केवळ चूल आणि मूल इतकंच आयुष्य जगणार्या अनुराधाला तो जागं करतो आणि त्यातून बाहेर पड, संगीताची साथ पकड असं सांगतो. निर्मलचं तिच्याकडे होत जाणारं दुर्लक्ष आणि दीपकचं बोलणं यातून तिचं मन एकीकडे नवरा आणि दुसरीकडे संगीत या रस्सीखेचीत दोलायमान होतं. अखेर अनुराधा आपल्या वडिलांकडे शहरात कायमचं परतण्याचा निर्णय घेते आणि तो निर्णय ती निर्मलला सांगते. निर्मलनं आपल्या आयुष्यात अनुराधाला इतकं गृहीत धरलेलं असतं की त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. तो पचवणं त्याच्यासाठी अशक्य असतं. पण तो आपल्या तोंडावाटे त्याबद्दल चकार शब्दही काढत नाही. आपण तिच्याकडे लक्ष दिलं नाही याची जाणीवही त्याला टोचत राहते.
दुसर्या दिवशी सकाळी अनुराधा दीपकबरोबर परत जाणार असते. पण त्याही रात्री निर्मल तिच्याबरोबर राहून तिला वेळ देऊ शकत नाही. कारण गावातल्या एकाची बायको खूप गंभीर अवस्थेत असते आणि ते कळताच निर्मल धावतच त्या घरी जातो. तो पोहोचतो, पण त्याआधीच तिचा मृत्यू झालेला असतो. तो तरुण आपल्या बायकोच्या मृत्युनं ओक्साबोक्सी रडायला लागतो. निर्मलचे पाय पकडून एकदाच तिला वाचवा, मी तिच्याकडे नीट लक्ष देईन म्हणून विनवणी करायला लागतो. पण निर्मल असहाय असतो. त्या वेळी बलराज सहानीची आगतिकता आणि त्याच वेळी आपल्याही आयुष्यातून आपल्या प्रिय पत्नीचं जाणं आता अटळ असल्याची वेदना त्याचा चेहरा सांगत राहते . त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू खूप काही बोलून जातात. थकलेल्या अवस्थेत तो घरी येतो. अनुराधा झोपलेली नसतेच, पण त्याची चाहूल लागताच ती गाढ झोपल्याचं नाटक करते. निर्मल तिच्या उशाशी एकच क्षण बसतो. उद्यापासून ती या घरात त्याला दिसणार नसते. हळुवारपणे तो तिच्या केसातून हात फिरवतो, पण त्याला ते दुःख इतकं असह्य होतं की तो तिथून कसंबसं आपलं रडू आवरत त्याच्या स्टडीरूमध्ये येऊन केव्हातरी खुर्चीतच झोपी जातो.
पहाटे त्याला हॉर्नच्या आवाजानं जाग येते. दीपक अनुराधाला घ्यायला आलेला असतो. आपल्याला जाग कशी आली नाही या विचारानं निर्मल धावतच जिन्यावरून खाली येतो, अनुराधाला शेवटचं बघूही शकलो नाहीत या विचारानं तो घाबराघुबरा होतो. तो खाली येऊन बघतो, तर त्याच्या साध्याशा घरातली झाडझूड नेहमीप्रमाणे अनुराधा करताना त्याला दिसते. तिला तिचं सुख नेमकं कशात आहे हे उमगलेलं असतं, ती त्याला सोडून कुठेही जात नाही.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट अतिशय तरलतेनं आपल्या मनापर्यंत पोहोचतो. यातली प्रत्येक नाती अतिशय ताकदीनं आपल्यासमोर उभी राहतात, की जणूकाही ती आपल्याच आसपास असावीत. आजोबा आणि नात, डॉक्टर आणि रुग्ण, नवरा आणि बायको, प्रियकर आणि प्रेयसी ही सगळी नाती इतकी अलवारपणे उमलतात की त्या व्यक्तिरेखा जिवंत होत जातात. बलराज सहानीचा आदर्शवाद त्याच्या दिसण्यातून, हालचालीतून, डोळ्यातून आतपर्यंत भिनला गेल्याचं कळतं. लीला नायडूचं सात्विक सौदर्ंय आणि सहजसुंदर अभिनय तिच्या प्रेमात कायमचं पाडतो.
शैलेंद्र यांची गीतं आणि पं. रवीशंकर यांचं संगीत हे प्रत्येक प्रसंगाचा एक भागच बनून जातं. लता मंगेशकर, महेंद्र कपूर आणि मन्नाडे यांनी आपल्या आवाजानं अंतःकरणाला भिडणारे त्या त्या गाण्यांतले भाव सादर केलेत. हाये रे वो दिन क्यू ना आये, कैसे दिन बिते कैसी बिती रतिया पिया जाने ना, बहोत दिन हुये, जाने कैसे सपनोंमे खो गयी अखियॉं आणि सॉंवरे, सॉंवरे काहे मोसे करो ही गाणी म्हणजे कितीदाही ऐकावीत आणि ऐकतच राहावीत अशी आहेत! सचिन भौमिक यानं या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. प्रसिद्ध फे्रंच साहित्यिक गुस्तॉव फ्लोबर याच्या ‘मादाम बोव्हरी’ या कादंबरीवरून प्रेरित होऊन त्यानं हे कथानक लिहिलं असं म्हटलं जातं. पण मादाम बोव्हरी आणि अनुराधा या दोन्हींच्या कथानकामध्ये खूप वेगळेपण आहे. भारतीय वातावरणाशी एकरूप होईल असे अनेक बदल सचिन भौतिक यानं ही पटकथा लिहिताना केलेत. त्यामुळे हा चित्रपट इतर कुठल्या कलाकृतीवरून बेतलेला मुळीच वाटत नाही आणि त्याचा अस्सलपणा प्रत्येक प्रसंगात दिसायला लागतो. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार मिळाले होते. प्रत्येकानं हा चित्रपट बघायलाच हवा.
दीपा
Add new comment