साहिब, बीबी और गुलाम 

साहिब, बीबी और गुलाम 

बलराज साहनीनंतर गुरुदत्तनं मनावर मोहिनी घातली. त्याचा कागज के फुल आणि प्यासा बघितला. दोन्ही अनुभव सुन्न करणारे! त्यातला गुरुदत्त वेगळाच होता, जरा धीरगंभीर, संयमी आणिक काय काय.....त्यालाच डोळ्यासमोर ठेवून साहिब, बीबी और गुलाम बघायला सुरुवात केली...

१९ व्या शतकाच्या अखेरची कलकत्त्यामधली गोष्ट....कधी काळी शानदार, वैभवानं नटलेल्या जमीनदार चौधरीच्या हवेलीला कळा आलेली आणि तिची पडझड झालेली. तिला आता पूर्णच जमीनदोस्त करण्यासाठी अनेक मजूर कामाला लागलेले आणि ते सगळं दश्य त्यांच्यावर देखरेख करत असलेला ओव्हरसिअर बघतोय....त्या हवेलीच्या परिसरात फिरत असतानाच तो भूतकाळात हरवतो आणि तीच हवेली त्याला नव्या नवरीसारखी अतिशय सुरेख दिसायला लागते. त्या हवेलीत सगळीकडे धांदल सुरू असतानाच समोरून कामाच्या शोधात खेडेगावातून आलेला एक तरूण हातात कपड्यांचं बोचकं घेऊन तिथं प्रवेश करतो. तो भाबडा तरूण शहरातलं झगमगतं वातावरण आणि त्यातही हवेलीतली चहलपहल बघून चकित होतो. त्याच्याकडे पाहून मीही तितकीच चकित झाले. अरे, हा तर गुरुदत्त! पण पूर्वी बघितलेल्या दोन्ही चित्रपटांपेक्षा हा एकदम वेगळा! एकदम हटके! त्याच्या त्या भाबड्या रुपाच्या प्रेमात कोणीही पडावं असा!

गुरुदत्तचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकाला केवळ कथेचं दर्शन करवत नाही तर तो ती कथा अंतर्मुख होऊन वाचायला आणि अनुभवायला शिकवतो. मात्र कागज के फूल आणि प्यासाच्या अपयशानंतर गुरुदत्त इतका खचला की त्यानं आपण यापुढे दिग्दर्शन करायचं नाही असं ठरवलं आणि म्हणूनच साहिब बीबी और गुलामचं दिग्दर्शन त्यानं आपला जिवलग मित्र अब्रार अल्वी यांच्यावर सोपवलं. साहिब, बीबी और गुलाम हा चित्रपट १९६२ साली प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर हीट झाला. बिमल मित्रा यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता आणि याची पटकथा अब्रार अल्वी यांनी लिहिली होती. निर्माता अर्थातच गुरुदत्त आणि दिग्दर्शक म्हणून अब्रार अल्वी असले तरी लोक आजही हा चित्रपट गुरुदत्तचाच म्हणून ओळखतात हे विशेष!

खरं तर या चित्रपटातल्या फक्त गाण्यांचं दिग्दर्शन गुरुदत्तनं केलं होतं. या चित्रपटाला फिल्म फेअर ऍवार्डससाठी उत्कष्ट चित्रपटासाठी गुरुदत्तला, दिग्दर्शनासाठी अब्रार अल्वीला, उत्कष्ट सिनेमाटोग्राफीसाठी मूर्तीना आणि उत्कष्ट अभिनयासाठी मीनाकुमारीला गौरवलं गेलं. साहिब, बीबी और गुलाम या चित्रपटाला नॅशनल ऍवार्डही मिळालं तसंच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाला नावाजलं गेलं.

प. बंगालमधली तत्कालीन परिस्थिती, सरंजामशाहीची उतरती कळा, ब्रिटिशांच्या जुलूमशाहीला कंटाळून उभी राहिलेली छुपी स्वातंत्र्यसैनिकांची फळी, ब्राह्मो समाजासारख्या संस्था-संघटना, समाजजीवन, नात्यांची गुंफण या पार्श्‍वभूमीवर साहिब, बीबी और गुलाम हा चित्रपट आपल्याशी बोलतो. गुरुदत्तचं चित्रपटातलं खरं नाव अतुल्य चक्रवर्ती असलं तरी त्याला भूतनाथ याच नावानं सगळे ओळखत असतात. हवेलीत काम करत असलेल्या आपल्या बहिणीच्या नवर्‍याकडे भूतनाथ आश्रयाला आलेला असतो. त्याच्याच ओळखीमुळे ब्राह्मो समाजाचं काम करणार्‍या सुबिनय बाबू (नासिर हुसेन) यांच्या मोहिनी सिंदूर या कंपनीत तो कारकून म्हणून कामाला लागतो.

तिथे त्याची भेट सुबिनय बाबूची मुलगी जबा (वहिदा रेहमान) हिच्याशी होते. जबा ही धीट, अवखळ पण प्रेमळ अशी सुंदर तरुणी असते. तिच्या चिडवाचिडवीमुळे भूतनाथ तिच्यावर वैतागलेला असतो. मात्र मनातून मात्र त्याला ती आवडतही असते, पण तिनं तसं वागू नये असंही त्याला वाटत असतं. इकडे भूतनाथ ज्या हवेलीत नोकर म्हणूनच आपल्या मेव्हण्याबरोबर राहत असतो, तिथली शानशौकत आणि रोजच्या गोष्टी पाहून चकित होत असतो. हवेलीचे छोटेबाबू (रेहमान) हा रोज कोठ्यावर नाच बघायला जात असतो तर मधला जमीनदार (सप्रू) हा हवेलीतच नत्याची मैफील आयोजित करून आनंद लुटत असतो. याच हवेलीत तीन जमीनदारांच्या तीन स्त्रीयांची स्थिती दाखवली आहे. मोठी विधवा असल्यानं ती व्रतवैकल्यं पूर्ण करण्यात बुडालेली, तर मधली दागदागिने करण्यात गढलेली. गरीब घराण्यातून आलेली सगळ्यात छोटी बहू (मीना कुमारी) ही या दोघींपेक्षा वेगळी असते. घरात इतकी श्रीमंती असतानाही तिचं मन मात्र घरून मिळालेल्या संस्कारांभोवतीच घुटमळत असतं. 'आपला नवरा हाच आपलं सर्वस्व' मानणारी छोटी बहू त्याच्या रोजच्या बाहेर जाण्यानं दुःखी असते. त्याचं प्रेम लाभावं म्हणून काय करता येईल याचा ती रात्रंदिवस विचार करत असते. तिला जेव्हा भूतनाथ हा मोहिनी सिंदूर कंपनीत काम करतो असं हवेलीतल्या नोकराकडून कळतं, तेव्हा ती त्याला भेटायला बोलावते आणि मोहिनी सिंदूर वापरला तर जाहिरातीनुसार खरंच तो परिणाम प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो का याची चौकशी करायला सांगते. छोट्या बहुशी झालेल्या पहिल्या भेटीत भूतनाथ तिच्या पावलांकडे बघत असतो. तिच्या आवाजानं त्याची नजर जेव्हा तिच्याकडे जाते तेव्हा छोट्या बहूचं सात्विक सौंदर्य पाहून तो तिच्याकडे बघतच राहतो.

त्यानंतर त्याच्या आणि तिच्या जेव्हा जेव्हा भेटी होतात, तेव्हा कुठलंही नाव नसलेल्या एका नात्यात तो तिच्याबरोबर बांधला जातो. छोट्या बहुलाही भूतनाथबद्दल एक वेगळाच विश्‍वास वाटत असतो. या भेटींमध्ये भूतनाथ जबाबरोबरची होणारी नोकझोक छोट्या बहूला सांगत राहतो. मोहिनी सिंदूर भूतनाथनं तिला आणून दिल्यावर छोटी बहू इतकी खुश होते की आता आपला नवरा आपल्याला वश होणार असंच तिला वाटायला लागतं. ती त्याची वाट बघत सजते, सवँरते. पण त्याचं (रेहमान)चं लक्ष तिच्या सौंदर्याकडे आणि नटलेल्या पेहरावाकडे अजिबात जात नाही. खर्‍या पुरुषानं कसं वागलं पाहिजे याबद्दलचं तत्वज्ञान तो तिच्यापुढे फेकतो आणि कोठ्यावर निघून जातो. इकडे मोहिनी सिंदूरचं काम करता करता आपसांतल्या नोकझोकीतूनच जबा आणि भूतनाथही नकळत एकमेकांकडे आकर्षिले जातात. गावाकडून आलेला साधाभोळा भूतनाथ आणि त्याची फिरकी घेणारी जबा यांचं नातं खूप वेगळ्या तर्‍हेनं फुलत जातं. आपण कोणालाच काहीच सांगणार नाही असा शब्द छोट्या बहुला दिलेला असतानाही भूतनाथ जबाला मात्र छोट्या बहूविषयी सतत बोलत राहतो. त्याच्या तोंडून छोट्या बहूचं होणारं कौतुक ऐकून जबा त्याच्यावर वैतागते. इकडे मोहिनी सिंदूरची जाहिरात फसवी आहे हे लक्षात येताच भूतनाथ दुखावला जातो आणि तो सुबिनय बाबूची नोकरी सोडतो. इकडे नवर्‍याचं सुख मिळवण्यासाठी आतुर असलेली छोटी बहू अखेर नवर्‍यालाच विचारते की तू माझ्याजवळ राहावास यासाठी मी काय करू? तो तिला आपल्याला रिझवण्यासाठी आपल्याबरोबर दारू प्यावी असा सल्ला देतो.

संस्कारांचा प्रचंड पगडा असलेली छोटी बहू नवर्‍याचं सुख मिळवण्यासाठी संस्काराची झूल फेकते आणि दारूचा कडवट प्याला ओठी लावते. ही गोष्ट जेव्हा भूतनाथला कळते, तेव्हा तो छोट्या बहूवर खूपच चिडतो आणि तिला अशा वाईट गोष्टीची सवय लागेल हेही सांगतो. पण छोट्या बहूला आता कशाचीच पर्वा नसते. आणि शेवटी व्हायचं तेच होतं. छोटी बहू पूर्णपणे दारूच्या विळख्यात अडकते. काही काळ तिचा नवरा तिच्याबरोबर रमतोही पण एैय्याशीत आयुष्य गेल्यानं तो पुन्हा कोठ्याची पायरी हवी तेव्हा चढत राहतोच. या सगळ्या गोंधळात एकीकडे भूतनाथचा मेव्हणा स्वातंत्र्य सैनिक असल्याचं भूतनाथला कळतं. ब्रिटिश शिपाई आणि त्या मेव्हण्याच्या चकमकीत भूतनाथही जखमी होतो. त्याच्या शुश्रुषेमध्ये जबा गुंतली जाते. मात्र त्या दोघांचं प्रेम अव्यक्त स्वरूपातच असतं.

दुसरीकडे छोटी बहूच्या नवर्‍याचं अनियमित येणं पाहून नर्तिका दुसर्‍या जमीनदारांबरोबत्याला खुश करण्यात मग्न असते. तिथे ते दृश्य पाहून छोटे बाबू संतापतो आणि दोन्ही गटात मारहाण होते आणि छोटे बाबूला पॅरेलिसीस होतो. याच दरम्यान सुबिनय बाबूचा मत्यू होतो, मात्र त्यांनी जाण्यापूर्वी जबाचं लग्न एका ब्राह्मोसमाजातल्या सुपवित्र नावाच्या तरुणाशी ठरवलेलं असतं. जबा त्याच्याशी लग्न करायला नकार देते. कारण वडिलांच्या जुन्या कागदपत्रात तिला तिच्या वडिलांनी लहानपणी एका गावाहून ती लहान असतानाच पळवून आणलेलं असतं. मात्र ती एक वर्षांची असतानाच तिचं लग्न अतुल्य चक्रवर्ती नावाच्या मुलाशी लावण्यात आलेलं असतं. आता जबा अतुल्यच्या शोधात असते. भूतनाथ हाच अतुल्य चक्रवर्ती आहे हे तिला ठाऊक नसतं. आपल्या जुन्या नोकराकरवी छोटी बहू भूतनाथला बोलावते आणि आपल्या पॅरेलिसिस झालेल्या नवर्‍याला बरं करण्यासाठी एका सिद्ध पुरुषाच्या आश्रमात जाऊन प्रयत्न करूया असं सांगते. तिच्या विनंतीला भूतनाथ कधीच नाही म्हणू शकत नसतो. ती दोघं रात्रीच्या वेळी निघतात, तेव्हा मधला जमीनदार (सप्रू) आणि त्याचे गुंड साथीदार हे दृश्य पाहतात आणि चिडून ते रस्त्यात गाठून भूतनाथला मारहाण करतात आणि छोटी बहू तर गायबच होते.

इथे चित्रपटाचा फ्लॅशबॅक संपतो आणि भूतनाथ भानावर येतो. त्याच वेळी काम करणारे मजूर ओरडतच येतात, काय झालंय हे बघण्यासाठी भूतनाथ तिथे पोहोचतो तेव्हा खोदकामात एका स्त्रीचं प्रेत मिळतं. आता केवळ हाडाचा सांगाडाच शिल्लक असतो. तिच्या हातातलं कडं पाहून भूतनाथला ती छोटी बहू आहे हे लक्षात येतं. त्याचे डोळे भरून येतात. तो आपल्या मनाला वर्तमानात परत आणत तिथून निघतो आणि बग्गीत बसतो. ज्यात त्याची वाट त्याची पत्नी झालेली जबा बघत असते. गाडीवान बग्गी हाकतो आणि चित्रपट इथंच संपतो.

कुठलाही चित्रपट बघताना तो कुठल्या काळातली गोष्ट सांगतोय हे पाहणं खूप आवश्यक ठरतं. तो काळ, ती परिस्थिती, ते वातावरण, तेव्हाचे रीतरिवाज, हे सगळं नजरेसमोर ठेवून त्या काळाचा एक हिस्सा बनून चित्रपट बघावा लागतो, तेव्हाच तो कळतो. आताचे निकष लावले तर त्याचं मूल्यमापनही करता येत नाही आणि त्यातलं सौंदर्यही न्याहाळता येत नाही. या चित्रपटात सरंजामशाहीचा पडता काळ दाखवत असतानाही जमीनदारांच्या अंगात असलेली मस्ती, एैय्याशी, स्त्रियांना उपभोगापुरतं बघण्याची वृत्ती हे सगळं नीट कळत जातं. एवढंच नाही तर किती गोरगरिबांना लुबाडून आणि त्याचं आयुष्य हिरावून घेऊन ही मंडळी ही जमीनदारी उपभोगताहेत हेही कळतं. सुरुवातीला जेव्हा अंगावर केवळ हाडंच उरलेली असा एक गरीब शेतकरी जेव्हा आपल्या जमिनीवरचा हक्क मागतो, तेव्हा त्याला ज्या कृरतेनं संपवलं जातं हे बघून अंगावर काटा येतो. त्या वैभवामागचं रक्तानं माखलेलं सत्य बघितलं की दुःखानं मन हलून जातं. तसच स्त्रीचं पतीच्या भोवती गुरफटलेलं आणि बांधलेलं आयुष्यही इथं बघायला मिळतं. आपला जोडीदार हाच आपलं सर्वस्व आणि परमेश्‍वर अशा संस्कारांनी जखडलेली स्त्रीही इथं बघायला मिळते. त्याचबरोबर तिच्या शारीरिक सुखाच्या आपल्या पतीकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त होत राहतात. तिची कुचंबणा कळते. तिची घुसमट दिसते. या चित्रपटातलं भूतनाथ आणि छोटी बहू यांचं कुठलंही नाव नसलेलं एक उदात्त नातं ही कळतं. भूतनाथ आणि जबा या समवयस्क तरूण जोडीमधलं आकर्षणही आपल्याला सुखावतं.

मीनाकुमारी त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती, तर अब्रार अल्वी यांचा दिग्दर्शक म्हणून साहिब, बीबी और गुलाम हा पहिलाच चित्रपट होता. त्यांच्या परिश्रमामुळे भूतनाथ आणि छोटी बहू यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग अतिशय अविस्मरणीय असा झाला आहे. या प्रसंगात भूतनाथ छोटी बहूच्या सौंदर्यानं मोहित होतो. केवळ भूतनाथच नाही तर प्रेक्षकही बघतच राहील याची काळजी अब्रार अल्वी यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी मीनाकुमारीची अनेक छायाचित्रं काढून ती कुठल्या अँगलनं जास्त चांगली दिसतील याचा अभ्यास केला होता. या चित्रपटानंतर मीनाकुमारीच्या आयुष्यातली ही सर्वश्रेष्ठ भूमिका असेल अशा शब्दांत तिची प्रशंसा होऊ लागली तेव्हा तिनं त्याचं सारं श्रेय अब्रार अल्वी यांना दिलं.

या चित्रपटाला एस डी बर्मन यांनीच संगीत द्याव अशी गुरुदत्तची इच्छा होती पण प्रकृती बरी नसल्याने हेमंतकुमारवर संगीताची जवाबदारी सोपवली गेली आणि सगळीच गाणी खूपच लोकप्रिय झाली. यातलं साहिल की तरफ कश्ती ले चल हे एकमेव गाणं हेमंतकुमारच्या आवाजातलं होतं, पण ते या चित्रपटात समाविष्ट करण्यात आलं नाही. नंतर याच गाण्याची चाल वापरून १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनुपमामधलं ‘या दिल की सुनो, दुनियावालो’ हे गाणं हेमंतकुमारनं तयार केलं आणि ते खूपच गाजलं. या चित्रपटातली गुरुदत्तनं दिग्दर्शित केलेली सगळीच गाणी खूपच श्रवणीय आहेत. साकिया आज मुझे निंद नही आयेगी, मेरी जान ओ मेरी जान, पिया ऐसो जियामे समाही गयो रे, न जाओ सैंया छुडाके बैंया कसम तुम्हारी मै रो पडुंगी, कोई दूर से आवाज दे चले आओ, मेरी बात रही मेरे मनमे, भँवरा बडा नादान ही गाणी शकिल बदायुनी यांनी लिहिली. आशा भोसले आणि गीता दत्त यांनी ती गायली. या चित्रपटातलं साकिया आज मुझे निंद नही आयेगी हे नत्य गुरुदत्तनं कमालीचं बसवलं होतं. ....... कोरसमध्ये नत्य करणार्‍या एकाही नर्तिकेचा चेहरा प्रकाशात दिसत नाही. केवळ मुख्य नर्तिकेच्या चेहर्‍यावर प्रकाश योजना केंद्रित केली गेली होती. या चित्रपटात गावाकडून आलेला साधाभोळा भूतनाथ आणि त्याची फिरकी घेणारी जबा यांचं नातं खूप वेगळ्या तर्‍हेनं फुलत जातं. एके दिवशी तो कामावर येण्याआधी ती त्याच्या कामाच्या जागेवर बसून तिथल्याच कागदावर ‘भँवरा बडा नादान हाय...’ ही कविता उतरवते. तिथे भूतनाथ पोहोचल्याचं तिच्या गावीही नसतं. भूतनाथ मात्र आताही आपलीच चेष्टा सुरू आहे असं समजून तिच्यावर आणखीनच वैतागतो. हे गाणं ऐकणं आणि बघणं हा खूप सुखद अनुभव आहे. भूतनाथच्या चेहर्‍यावर भाव अणि त्याचबरोबर वहिदाची स्वतःच्या मनाशी चाललेलं लडिवाळ हितगुज आपल्याही चेहर्‍यावर सुगंधी शिडकावा उडवून जातं. मात्र प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच ताटातुटीची वेळ त्यांच्यावर येते, तेव्हा जबाच्या मनातलं वादळ ‘मेरी बात रही मेरे मनमे, कुछ कह न सकी उलझन मे’ या गाण्यातून व्यक्त होतं. तिच्या मनातली तडफड, वेदना गाण्याच्या आर्त स्वरातून तर व्यक्त होतेच, पण जबाच्या चेहर्‍यावरही ती वेदना येऊन विराजते. छोटी बहूच्या तोंडी असलेली गाणी तर क्या कहने. मोहिनी सिंदूर भूतनाथकडून मिळाल्यावर छोटी बहू इतकी खुश होते की त्याचा परिणाम आता दिसायला लागणार आणि आपला नवरा आपल्याला मिळणार अशा मनःस्थितीत ती स्वतः सजते. त्या वेळी तिच्या मनातल्या भावना ‘पिया ऐसो जिया मे समाही गयो रे के मै तनमन की सुधबुध गवॉं बैठी, हर आहट पे समझी वो आ ही गयो रे, झट घुंघट मे मुखडा छुपा बैठी..’ हे गाणं इतकं सुंदर टिपलं गेलं आहे की मीनाकुमारीचं सजणं, तिचं सुंदर दिसणं याबरोबरच तिच्या चेहर्‍यावरचे मिलनासाठी आतुर, उत्सुक असलेले डोळे, तिचा चेहरा एवढंच काय पण तिच्या सगळ्या हालचाली उत्कटपणे बोलत राहतात. तसंच हळूहळू मदिरेमध्ये बुडालेली छोटी बहू आपला जोडीदार दूर जाऊ नये यासाठी जेव्हा ‘न जाओ सैंया छुडा के बैंया, कसम तुम्हारी मै रो पडुँगी’ असं म्हणते, तेव्हा तिच्या स्वरातून तिची वेदनाही बाहेर पडते. तिचे प्रयत्न, तिची धडपड आपल्याला बेचैन करते.

आपल्या ३९ वर्षांच्या कारकिर्दीत गुरुदत्तनं एकूण ८ चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी पाच चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. गुरुदत्तचं मूळ नाव वसंतकुमार शिवशंकर पदुकोन. एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला. कलकत्त्यात जन्म झालेल्या गुरुदत्तवर बंगाली संस्कतीचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळेच त्यानं आपलं नाव देखील बंगाली नावांशी साधर्म्य असणारं गुरुदत्त हे निवडलं. त्याला नत्य आणि संगीत यांची प्रचंड आवड होती. पं. रवीशंकर यांच्या उदयशंकर या भावाकडे अल्मोडा इथं जाऊन त्यानं त्याची तालीमही घेतली होती. त्यानंतर सुरुवातीला गुरुदत्त पुण्यात प्रभात स्टुडिओमध्ये नत्यदिग्दर्शक म्हणूनच कामासाठी दाखल झाला. त्याची ओळख देवआनंद आणि रेहमान यांच्याशी झाली. त्यानंतर तो मराठीतले प्रसिद साहित्यिक आणि दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. पुण्यात असताना देहूच्या डोंगरावर गुरुदत्तनं मनसोक्त भटकंती केली, तसंच पहाटे पहाटे पर्वती चढायला आणि मग एका ठिकाणी ध्यानस्थ बसून राह्यलाही त्याला पुण्यात असताना प्रचंड आवडायचं. नंतर मात्र पुण्याहून मुंबईला पोहोचलेल्या गुरुदत्तला १९५१ साली नवकेतनचा बाजी चित्रपट करायला मिळाला. बाजीनंतर जाल, मिस्टर अँड मिसेस ५५, प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम आणि चौहदवी का चॉंद! गुरुदत्त या माणसाचं वाचन अफाटच होतं. त्यातही बंगाली साहित्याचा तर त्यानं फडशा पाडला होता. स्वतःची भली मोठी वैयक्तिक लायब्ररीच त्यानं तयार केली होती. त्यात रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र चटजी, प्रेमचंद, बर्नार्ड शॉ, शेक्सपिअर अशांची पुस्तकं दिमाखात जागा पटकावून होती.

गुरूदत्त जिवंत असताना त्याच्या कामाची आणि त्याच्यातल्या असामान्य प्रतिभेची कदर लोकांनी केली नाही, मात्र आज मात्र एक महान निर्माता आणि संवेदनशील दिर्ग्शक/अभिनेता म्हणून आख्खं जग त्याला ओळखतं. १० आक्टोबर १९६४ या दिवशी गुरूदत्त नावाचं एक वादळ वयाच्या ३९ व्या वर्षी विसावलं. मृत्यूपूर्वी गुरुदत्तनं लिहून ठेवलं होतं.

My work is understood less and less as time passes. Indeed posthumous acclaim has been the tragic fate of many creators of classics.

कैफी आझमीनं गुरुदत्तच्या आठवणीदाखल म्हटलं होतं,

रहने को सदा दरमें आता नही कोई तुम जैसे गये ऐसे भी जाता नही कोई

इतकंच खरंय, गुरूदत्तसारखा कलावंत पुन्हा होणे नाही! 

दीपा देशमुख. 
[email protected]

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.