जगण्याला समृद्ध करणारं मैत्र, वाचन आणि चित्रपट! - कानून

जगण्याला समृद्ध करणारं मैत्र, वाचन आणि चित्रपट! - कानून

२०१९ नं मला खूप चांगले दोन मित्र दिले. प्रदीप चंपानेरकर आणि हेमंत पाटील! हेमंत पाटील हे आयआयटीचे निवृत्त प्रोफेसर! बुद्धिमान, दिलखुलास स्वभाव, संगीत, साहित्य, कला आणि क्रीडा अशा सगळ्याच गोष्टींमध्ये रस असलेले! त्यांच्याशी बोलताना वेळ कुठे जातो, पत्ताच लागत नाही आणि तरीही गप्पा सरलेल्या नसतात. हेमंत पाटील यांच्याविषयी लवकरच माझे अनुभव लिहीनच. 
रोहन प्रकाशन या नामांकित संस्थेचे संचालक प्रदीप चंपानेरकर यांची ओळख तशी ५-६ वर्षांपासूनची. पण मागच्या वर्षीपासून बोलणं जास्त होत गेलं. त्यांचं लिखाणही वाचण्यात येत गेलं. रोहन साहित्य मैफलमधलं त्यांचं संपादकीय म्हणण्यापेक्षा त्यांच्या ‘मन की बात’ (चांगल्या अर्थानं!) वाचायला खूप आवडायला लागलं. कारण या सगळ्याच लिखाणातून प्रदीप चंपानेरकरमधला एक आर्किटेक्ट, एक कलाकार, एक लेखक आणि एक सच्चा माणूस अनुभवायला मिळाला. कुठल्याही कामाशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलावंसं वाटतं, तेव्हा त्या निरपेक्षा नात्यातून आणि गप्पांमधून आपल्याला खूप काही भरभरून मिळतं हा माझा अनुभव!
दोन दिवसांपूर्वी मोबाईल वाजला, बघितलं तर प्रदीप चंपानेरकर! ते म्हणाले, ‘अगदी सहज फोन केलाय. तुमच्या कामात व्यत्यय तर आणला नाही ना?’ मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. वाचनाविषयी बोलताना त्यांच्या रोहन साहित्य मैफलच्या अंकातल्या एप्रिल महिन्याच्या संपादकीय विषयी बोलणं झालं. वाचन आपल्याला कसं घडवत जातं. सकस वाचन तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणतं, ते तुम्हाला समृद्ध कसं बनवतं याविषयी त्यांनी लिहिलं आहे. जरूर वाचा. मला कळवल्यास आणि हवी असल्यास  मी त्या लेखाची पीडीएफ नक्कीच शेअर करीन. तसंच रोहन साहित्य मैफलच्या अंकाचे वर्गणीदारही व्हा. सध्या लॉकडाऊनच्या काळात रोहन प्रकाशनानं ‘गपशप दिलसे’ नावाचा लाईव्ह उपक्रम सुरू केलाय. यात रोहनच्या मान्यवर लेखकांच्या वाचकांशी गप्पा रोहननं घडवून आणल्या आहेत. अतुल कहाते आणि प्रणव सखदेव या लेखकांचे कार्यक्रम मी ऐकू/बघू शकले. मजा आ गया असंच मी म्हणेन. लिखाणातल्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश तर पडलाच, पण लेखकांबरोबर प्रश्नोत्तरही झाली. या चांगल्या उपक्रमाबद्दल प्रदीप चंपानेरकर आणि रोहन टीमचं खूप खूप अभिनंदन!
मला थ्रीलर, रहस्य, गुन्हेगारी कथा किंवा शोज, केसेस, डिटेक्टिव्ह कथा असं सगळं वाचायला आणि बघायला खूप आवडतं असं सांगताच आमच्या गप्पांमधून अनेक विषय निघत गेले. मग त्यात आरुषी मर्डरपासून ते नानावटी केसपर्यंत अनेक विषय येत गेले. नानावटी केसनंतर त्यावर रोहन प्रकाशनानं पुस्तकही काढल्याचं समजताच मला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला. त्या पुस्तकाची ती दुर्मिळ प्रत मला मिळावी अशी विनंतीही मी प्रदीप चंपानेरकर यांना केली. नानावटींनी ज्या प्रेम आहुजाची हत्त्या केली, तो प्रेम आहुजा हत्येच्या वेळी फक्त टॉवेलवर होता. खून झाल्यानंतर तो कोसळला तरी त्याच्या अंगावरचा टॉवेल मात्र तसाच होता. या गोष्टीचा फायदा घेत त्या काळी मुंबईतले फूटपाथवरचे टॉवेल विक्रेते म्हणत, ‘प्रेम आहुजाचा टॉवेल घ्या. जीव गेला तरी टॉवेलची गाठ सुटणार नाही’ (कोण कशाची जाहिरात कशी करेल याचा नेम नाही!) पण एकूणच नानावटी केस खूपच रोचक होती हे मात्र खरं! बोलता बोलता चंपानेरकर यांनी मला अशोक कुमारची भूमिका असलेला ‘कानून’ हा चित्रपट बघा असं सुचवलं आणि मी तो काल रात्री  बघितला!
१९६० साली प्रदर्शित झालेल्या बी. आर. चोप्रा दिग्दर्शित  ‘कानून’ या चित्रपटाच्या सुरुवातीलाच अभिनेता जीवन हा एक खून करतो आणि त्याला पकडलं जातं. न्यायालयात त्याला उभं केलं जातं त्या वेळी तो आपला गुन्हा कबूल तर करतो, पण आपल्याला या गुन्ह्याची शिक्षा होऊ शकत नाही असं सांगतो. न्यायाधीश असलेल्या अशोककुमारला आश्चर्य वाटतं, त्या वेळी जीवन सांगतो की जो खून मी केलाय त्या खूनाची शिक्षा मी आधीच भोगली आहे. आता परत त्याच गुन्ह्याची शिक्षा तुम्ही मला करूच शकत नाही. इथून या चित्रपटाला सुरुवात होते. 
चित्रपटात न्यायालयात न्याय हा साक्षींवर अवलंबून असतो. आणि साक्ष देणारा कधी कधी भावनेच्या भरात किंवा अन्य कारणांमुळे खरं बोलत नाही. अशा वेळी न्याय देखील वेगळा असू शकतो. यात जर निरपराधी व्यक्तीला दोषी ठरवलं गेलं, तर त्याची तुरुंगात भरडली गेलेली वर्षं आणि ते दिवस कोणीही परत देऊ शकत नाही.  तसंच मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी का नाही याबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत. एखाद्याचं आयुष्य हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही हाही मुद्दा अधोरेखित होतो. असे अनेक महत्वाचे मुद्दे या चित्रपटात येत राहतात. एकीकडे प्रेम, दुसरीकडे हत्त्या, एकीकडे निरपराधावर चाललेली केस, तर दुसरीकडे त्याचं निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी लढणारा वकील, एकीकडे नजरेसमोर न आलेलं वास्तव, तर दुसरीकडे जे समोर आलंय त्यालाच सत्य समजणारी मानसिकता असं बरंच काही या चित्रपटात घडत राहतं. 'कानून' हा चित्रपट प्रत्येक क्षणी आपली उत्कंठा वाढवत राहतो. 
अशोककुमार, राजेंद्रकुमार, नंदा, शशीकला, इफ्तेखार, नाना पळशीकर, ओमप्रकाश, जीवन आणि महेमूद यांच्या या चित्रपटांत भूमिका आहेत. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या काळात चित्रपटांत चक्क १०-१० गाणी असायची, त्या काळात या चित्रपटात एकही गाणं नव्हतं हे विशेष. तरीही या चित्रपटाला सलील चौधरी या विख्यात संगीतकाराचं संगीत लाभलंय. त्या वेळी ‘कानून’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं. तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील बी. आर. चोप्रांना मिळाला. नाना पळशीकर (चोराची भूमिका) यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला. मला हा चित्रपट आवडला. तुम्ही बघितला नसाल तर जरूर बघा!
थँक यू प्रदीप चंपानेरकर!
दीपा देशमुख, पुणे. 
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.