बदला!

बदला!

8 मार्च 2019 या दिवशी गौरी खान आणि शाहरूख खान निर्मित बदला हा ओरिओल पाऊलो लिखित आणि दिग्दर्शित इनव्हिजिबल गेस्ट या स्पॅनिश चित्रपटावर आधारित रहस्यमय, थरारक चित्रपट प्रदर्शित झाला आणि बघू बघू म्हणता म्हणता अखेर काल 27 तारखेला रात्री तो बघता आला. आधी अमिताभचा बादल गुप्ता बघितला आणि नंतर मूळ स्पॅनिश चित्रपटही बघितला.

बदला चित्रपटात अमिताभ बच्चन आणि पिंकमधली तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तापसी पन्नू ही नयना नावानं अतिशय लहान वयात जगभरात एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा नवरा, तिची गोड मुलगी असं तिचं सुरेखसं कुटुंब आहे. तिचा एक प्रियकरही आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच नयना आणि तिचा प्रियकर एका हॉटेलमध्ये दाखवले असून त्या वेळी एक अकस्मात प्रसंग घडतो आणि नयनाच्या प्रियकराची हत्या होते. हॉटेलचा दरवाजा आतून लॉक असल्यामुळे आणि दुसरा कुठलाही मार्ग बाहेर जायला नसल्यानं नयनावर हत्येचा आरोप ठेवण्यात येतो. नयना अतिशय विख्यात उद्योजक असल्यानं प्रथम क्रमांकाचा वकील बादल गुप्ता तिच्या बाजूनं केस हाती घेतो. प्रत्येक तासाची घवघवीत रक्कम त्याच्यासाठी मोजली जात असते. आपल्याला या हत्येत कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवलं आहे असं नयनाचं मत असतं. बादल गुप्ता तिच्याकडे ठरलेल्या मिटिंगनुसार येऊन नेमकं काय घडलं याबद्दल जाणून घेत असताना आपल्यासमोर संपूर्ण चित्रपट उलगडत राहतो.

मूळ इनव्हिजिबल गेस्ट या चित्रपटातल्या पात्रांमध्ये किरकोळ फरक बदलामध्ये करण्यात आला आहे. मात्र त्यानं कथानकात फारसा काही फरक पडत नाही. अमिताभनं चित्रपटात अतिशय संयतपणे आपली भूमिका निभावली आहे. अमिताभ आखीर अमिताभ है असं पुन्हा पुन्हा मन म्हणत राहतं. इतकं स्वाभाविक, इतकं जिवंतपणे की जणू काही तो आणि ही भूमिका वेगळे नाहीतच असं जाणवत राहतं. काही वेळा आपल्या भूमिकेतल्या काही तरल शेड्स दाखवायला तापसी पन्नू किंचीत कमी पडलेली जाणवते.

चित्रपटात अमृता सिंग या अभिनेत्रीनं देखील खूप सुरेखपण आपली भूमिका वठवलीय. चित्रपटाचा दिग्दर्शक सुजॉय घोष यानं यापूर्वी कहानीसारखी यशस्वी फिल्म बनवली असून बदला चित्रपटालाही सर्वत्र यश मिळत आहे. या चित्रपटात फारशी ठिकाणं नाहीत, तरीही अमिताभ आणि तापसी यांच्या संवादातून चित्रपट आपली उत्कंठा अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरतो. ग्लासगो शहरात काही चित्रीकरण झालं असून युरोपची कुंद हवा, बर्फ असं वातावरण अनुभवता येतं. बदला हा चित्रपट प्रेक्षकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. जरूर बघावा असा ‘बदला’!

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.