सौ. शशी देवधर

सौ. शशी देवधर

आजच झी-५ वर 'सौ. शशी देवधर' हा चित्रपट बघितला. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे, त्यामुळे साहजिकच हा चित्रपट बघण्याकडे माझा कल वळला. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्माती शिल्पा शिरोडकर असून अमोल शेटगे हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

अविवाहित असलेला डॉ. अजिंक्य वर्तक (अजिंक्य देव) हा त्याचा फावला वेळ मित्रांबरोबर पार्ट्या आणि उशिरापर्यंत जागणं असा घालवत असतो. एके दिवशी रात्री तो मित्राकडे पार्टीसाठी निघाला असताना मुसळधार पावसात त्याच्या गाडीवर एक तरुणी येऊन धडकते. तो तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन अ‍ॅडमिट करतो. अपघाताची केस असल्यानं पोलिसही तिथे येऊन पोहोचतात. ती शुद्धीवर येईपर्यंत पोलीस त्याला तिथून जाऊ देत नाहीत. शुद्धीवर आल्यावर ती तरुणी अपघात घडण्यात आपलीच चूक असल्याचं सांगते आणि आपलं नाव सौ. शुभदा शशी देवधर (सई ताम्हणकर) असल्याचं सांगते. इथूनच चित्रपटाला खरी सुरुवात होते. ती आपला जो पत्ता सांगते, तो पत्ता तर सापडतो, पण तिथे वेगळीच व्यक्ती राहत असते. ती ज्या शशी देवधर या चित्रकाराची बायको असल्याचं सांगते, तो चित्रकार (तुषार दळवी) अस्तित्वात असतो, मात्र त्याची बायको वेगळीच कोणी असते आणि त्याचं वयही जास्त असतं. पोलिस वर्तमानपत्रात तिच्या नावासह आणि फोटोसह बातमी देतात, ती वाचून एक तरूण (अनिकेत केळकर) आणि त्याचे वडील (अविनाश खर्शिकर) हे पोलिस स्टेशनला पोहोचतात. त्या तरुणाजवळ सई ही आपलीच बायको असल्याचे पुरावे असतात. तो त्यांच्या लग्नाचा फोटो अल्बम दाखवतो आणि तिचं नाव नीलिमा असल्याचं सांगतो. सई मात्र त्या तरुणाला आणि त्याच्या वडिलांना अजिबात ओळखत नाही.

हा सगळा गुंता सोडवण्यासाठी डॉ. अजिंक्य वर्तक (मानसोपचारतज्ज्ञ) पोलिसांना मदतीचा हात पुढे करतो. तो सईवर उपचार सुरू करतो आणि तिची स्प्लिट पर्सनॅलिटी, तिचा झालेला अपघात या सगळ्यांची सांगड घालत तो एक एक मोठा गुंता सोडवतो. हा गुंता सुटल्यावर प्रेक्षकही हुश्श करतात.

सौ. शशी देवधर मध्ये डॉ. अजिंक्य वर्तकची भूमिका अजिंक्य देवनं खूप छान निभावली आहे. सई ताम्हणकर यात छान दिसते. विशेषतः तिच्या इरकल काठापदराच्या साड्या! तिनं अभिनय देखील चांगला केलाय, पण ती चिडली, वैतागली की ज्या प्रकारे किंचाळते ते बघून तिला त्रास होतोय हे कळण्याऐवजी आपल्याला हसायला जास्त येतं. तीच गत तुषार दळवीची दिग्दर्शकानं आणि मेकअपमननं केलीय. तुषार दळवी एक गुणी अभिनेता, मात्र या चित्रपटांत त्याला चित्रकार म्हणून रंगवताना १८५७ च्या काळातला चित्रकाराचा मेकअप केलाय. त्यामुळे तो चित्रकार कमी आणि अतिशय बावळट असा दिसतो. अविनाश खर्शीकर सासरा कमी आणि विनोदी पात्र जास्त वाटतो.

चित्रपटात कारण नसताना खूप पॉजेस घेतलेले आहेत. चित्रपट शेवटाकडे जाताना शशी देवधर म्हणजेच तुषार दळवी सईला सांगतो, आपल्या भूतकाळातले रंग फिकट झालेले असतात, त्यांना आठवण्यापेक्षा वर्तमानाचे रंग जास्त गहिरे आणि ब्राईट रंगवायचे. चित्रपटाचा शेवट सुखद दाखवला आहे. एकदा बघण्यासारखा चित्रपट!

दीपा देशमुख, पुणे 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.