एक्स्पायरी डेट- व्यक्ती आणि ड्रामालय
२०१९ च्या नववर्षात बाणेर इथं 'ड्रामालय' नावाचं कलादालन सुरू झालंय आणि हे सुरू करणारा धाडसी तरूण आहे संजय मोरे ठाकूर! बालाजी सुतार यांच्या सध्या गाजत असलेल्या गावकथाचा दिग्दर्शक संजय मोरे ठाकूर! काल सायंकाळी अपूर्व आणि मी धनूच्या निमंत्रणानुसार 'ड्रामालय'ला पोहोचलो. सुदर्शन नाट्यगृहाची आठवण व्हावी असं छोटेखानी दालन! धनूनं स्वागत केलं, संजयशी 'ड्रामालय' तर्फे होणार्या उपक्रमाविषयी बोलणं झालं. आपली नोकरी सोडून पूर्णवेळ नाटक करू पाहणार्या एफटीआयआयच्या या तरुणाच्या धाडसाचं खरंच कौतुक वाटलं. संपूर्ण महिनाभर शनि-रवि अशा दोन दिवसांत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतले संगीत, साहित्य आणि नाटक यांच्यावर आधारित कार्यक्रम इथं संपन्न होणार असून जानेवारी महिन्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले आहेत. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत हे विशेष! मात्र जाताना ठेवलेल्या हेल्मेट किंवा परडीत आपण आपल्याला वाटलं तर आपण काही रक्कम टाकून या उपक्रमाला हातभार लावू शकतो. अर्थातच हे ऐच्छिक आहे, यासाठी कोणावरही सक्ती नाही!
काल व्यक्ती संस्थेतर्फे ‘एक्स्पायरी डेट’ या धनंजय सरदेशपांडे लिखित कथेचं अभिवाचन होतं. धनंजय सरदेशपांडे, अमेय महाजन, वैशाली गोस्वामी, तेजश्री शिलेदार आणि सुयश झुंजुरके यांनी या अभिवाचनात सहभाग घेतला होता. खरं तर अपूर्वच्या आग्रहामुळे दुपारी मुळशी पॅटर्न हा चित्रपट बघितला होता. चित्रपट खूप चांगला झाला असून यात ओम भूतकरनं आपली भूमिका अतिशय समर्थपणे पेलली आहे. गब्बर असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी शेतकर्यांच्या जबरदस्तीनं गिळंकृत केलेल्या शेतजमिनी, त्यातून त्यावर उभारलेल्या टोलेजंग इमारती, आलेला पैसा काहीच दिवसांत संपल्यामुळे शेतकर्यांच्या कुटुंबांचं देशोधडीला लागणं, शेतकरी तरुणांचं व्यसनं आणि गुन्हेगारी या मार्गावर चालणं, शहरांचं बकालीकरण असं सगळं बघून या सर्व गोष्टींनी मनाला अस्वस्थ केलं होतं. आणि त्या मनःस्थितीच एक्सपायरी डेट बघायला गेले होते. आजकाल सगळ्याच गोष्टींचे इव्हेंट साजरे होतायत. संवेदनशीलता हरवून जातेय आणि केवळ उपचारांना महत्व उरलं आहे. आपणही ते स्वीकारत पुढे चाललो आहोत. मुलांचं परेदशी वास्तव्य असो आणि त्यामुळे वृद्धाश्रम जवळ करायची वेळ येणार्या पालकांची मनःस्थिती असो, हे सगळं चित्र माणसामाणसामधला संवादही कृत्रिम करण्याकडे नेत आहे. मी तर फेसबुकवर काही महिन्यांपूर्वी एका अधिकार्यानं आपली आई गेली, त्या वेळी तिच्या मृतदेहाच्या शेजारी उभं राहून फोटो टाकला होता! अशी दृश्यं पाहून मन प्रतिक्रियाही देत नाही अशी स्थिती काही वेळा होते. त्याच पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान इतकं पुढे जाईल की माणसाला तपासणीनंतर आपल्या मृत्यूची तारीख कळू शकेल आणि ती तारीख कळली तर परदेशस्थ मुलांना येण्याचं नियोजन करणं सोपं होईल, मृत्यूची तारीख कळल्यामुळे मानसिक तयारी होईल आणि मग त्या मृत्यूचा इव्हेंट आपापल्या कुवतीनुसार लोक सांजराही करतील असं कथानक असलेलं हे अभिवाचन व्यक्तीतर्फे खूप ताकदीनं सादर करण्यात आलं.
धनू, वैशालीबरोबरच अमेय महाजन, तेजश्री आणि सुयश यांनी तर एकापेक्षा जास्त भूमिका मोठ्या खुबीनं सादर केल्या. ओठांवर हसू मात्र मनात खळबळ माजवत तासाभरात अभिवाचन संपलं. सर्व वयोगटातल्या रसिक श्रोत्यांची उपस्थिती छान होती. माझा कॉलेजमित्र महेश साखरे आणि त्याची मुलगी देखील आवर्जून आले होते. अभिवाचन संपल्यावर उपस्थितांनी निर्मितीपासून ते सादरीकरणापर्यंतचे अनेक प्रश्न कलाकारांना विचारले. व्यक्ती टीम आणि धनू यांना खूप खूप शुभेच्छा! आपल्या कोणालाही व्यक्ती संस्थेचे उपक्रम आपल्या घरी करायचे असतील तर जरूर करता येतील. याचं कारण हे कलाकार कुठलंही मानधन घेत नाही. आपल्या घरात १५ ते २५ लोक असले तरी त्यांना चालतं. फक्त चहा इतकीच अपेक्षा! ते स्वतः येतात आणि आपली कला सादर करतात! त्यामुळे आपण आपल्या सोसायटीत त्यांचे कार्यक्रम नक्कीच आयोजित करू शकता. बाणेरमध्ये ‘ड्रामालय’ च्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम सुरू केल्याबद्दल संजयचे मनापासून खूप खूप आभार!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment