गजेंद्र अहिरेंचा आगामी चित्रपट - पिंपळ!!!
चित्रपटासाठी राष्ट्रीय पारितोषिकांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळवणार्या गजेंद्र अहिरे यांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीत कोणाला ठाऊक नाही असा कोणी माणूस शोधून सापडणार नाही. नॉट ओन्ली मिसेस राऊत, शेवरी, अनुमती आणि अशा ४० हून अधिक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन, पटकथालेखन, संवादलेखन, गीतरचना या सगळ्याच क्षेत्रात लीलया वावर करणार्या गजेंद्र अहिरेंचे चित्रपटही सर्वसामान्य चौकटीला छेद देणारे आणि हटके असतात.
हे सगळं सांगायचं कारण असं की या भल्या माणसाशी माझी प्रत्यक्ष ओळख कालपर्यंत नव्हती. माझा मित्र कल्याण तावरे यानं ‘कुठलीही कारणं न सांगता आज संध्याकाळ रिकामी ठेव’ आणि ‘आपण काही निवडक मित्रमंडळी गजेंद्रचा येणारा चित्रपट बघायला जाणार आहोत’ असं सांगितलं. मी नकार देण्याचा प्रश्न उदभवतच नव्हता. तसंच या निमित्तानं या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची ओळखही होणार होती आणि नाटक/चित्रपट/संगीत हे तर जिव्हाळ्याचे विषय - कालचा दिवस धावपळीचा असूनही मी ठरलेल्या वेळात कल्याणला भेटले आणि किरण, उषा, पद्मश्री शीतल महाजन, वंदना, अश्विनी असे गजेंद्रच्या स्टुडिओवर जाऊन पोहोचलो.
कल्याणनं ओळख करून दिली. तिथे चित्रपटसृष्टीतले निवडक मान्यवरही उपस्थित होते. संगीतकार नरेंद्र भिडे, कट्यारचे फडतरे हेही भेटले. नरेंद्र भिडे मला लेखिका म्हणून ओळखतात हे त्यांनी सांगितल्यावर खूप छान वाटलं. ११ तारखेला संज्योत देशपांडेच्या मानसशास्त्रावरच्या मनोविकास निर्मित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आहे आणि आपण जायचं आहे असं ठरवत असतानाच तीही तिथे अचानक भेटली. संज्योतला भेटून आणि गप्पा मारून खूप छान वाटलं.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी गजेंद्रनं सुरुवातीलाच सांगितलं, की याचं अनेक बाबतीत फिनिशिंग व्हायचं आहे. चित्रपट सुरू झाला. माझा अतिशय आवडता अभिनेता दिलीप प्रभावळकर पडद्यावर बघून मी एकदम निश्चिंत झाले. आता चित्रपट कसाही असू दे. असं मनाशी म्हटलं. पण ......‘पिंपळ’ हा गजेंद्रचा चित्रपट खूपच अप्रतिम असा निघाला. त्यात काही फिनिशिंग राहिलंय असंही जाणवलं नाही इतकं समरस त्यात होऊन गेले. चित्रपटाचं कथानक सांगत नाही कारण चित्रपट यायचा आहे. मात्र या चित्रपटाची कथा तीन वर्षांपूर्वी म्हणजे गजेंद्रचा मुलगा १७ वर्षांचा असताना त्यानं लिहिलीय हे विशेष! १७ वर्षांच्या मुलाची वैचारिक खोली या पटकथेतून जाणवली. या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर, प्रिया बापट आणि किशोर कदम आहेत. पण सबकुछ दिलीप प्रभावळकर! अतिशय अप्रतिम, सहजसुंदर अभिनय! त्यांचा एकलेपणा, मनातलं काहूर, घालमेल, भूतकाळातल्या आठवणी, कधी कधी रुसून बसणारं त्यांच्यातलं लहान मूल......मी तर थक्क होऊन गेले. चित्रपट संपूच नये असं वाटत होतं.
या चित्रपटाची फोटोग्राफी देखील तितकीच सुंदर आहे. गजेंद्रच्या कविता मध्ये मध्ये श्रावणसरींसारख्या येतात आणि मनाला सुखद गारवा देतात. या चित्रपटातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक पात्र आपल्याशी संवाद साधतात. खळाळता समुद्र त्याच्या मनातला कोलाहल व्यक्त करतो, प्रिया बापटची अश्रू लपवण्याची धडपड आपलीही अवस्था वेगळी नाही हे सांगते. किशोर कदमची म्हटलं तर छोटीशी भूमिका पण तोही आपली खास छाप पाडून जातो.
चित्रपट संपल्यानंतर बोलूच नये अशी अवस्था प्रत्येकाची झाली होती. पण कल्याणनं मला काही बोल असं सुचवलं आणि मी बोलत गेले....मला गजेंद्रच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटातला हा सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट - ‘पिंपळ’!
सर्जनाची प्रक्रिया कधीच थांबत नाही. ऋतू येतील, जातील, जन्म आणि मृत्यू यांचं चक्र अव्याहतपणे सुरू राहील. नात्यांचे बंध सुटतील, घट्ट होतील. मात्र मेघ बरसत राहतील, माती सृजनाचे हुंकार देतच राहील.
गजेंद्र अहिरे आणि टीम यांचे मनःपूर्वक आभार आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील होणार्या या चित्रपटाला उदंड यश लाभो (लाभेलच या खात्रीसह) ही शुभेच्छा!
-दीपा, ९ फेबुवारी २०१७.
Add new comment