सत्यकाम
......खूप लहानपणी केव्हातरी, कुठेतरी हा चित्रपट बघितला होता. फार काही कळण्याचं वय नव्हतं, पण तरीही तो खूप आवडला होता...... - सत्यकाम! हृषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेला १९६९ साली प्रदर्शित झालेला अतिशय उत्कृष्ट कथानक असलेला हा चित्रपट! या चित्रपटातली धर्मेंद्रची भूमिका त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतली अप्रतिम भूमिका! या चित्रपटात धर्मेंद्र, संजीवकुमार, शर्मिला टागोर, अशोक कुमार, डेव्हिड, असरानी, बेबी सारिका यांच्या भूमिका आहेत. नारायण सान्याल यांच्या ‘सत्यकाम’ नावाच्याच कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला होता.
१९६६ साली धर्मेद्र आणि शर्मिला टागोर यांच्या जोडगोळीचा 'अनुपमा' हा चित्रपट खूपच गाजला होता. त्यामुळे हीच जोडी पुन्हा सत्यकामसाठी निवडण्यात आली. 'आनंद', 'बावर्ची', 'चुपके चुपके', 'अभिमान', 'खुबसुरत' असे अनेक चित्रपट काढणार्या हृषिकेष मुखर्जींना मात्र 'सत्यकाम' हा त्यांचा आवडता चित्रपट वाटत असे. या चित्रपटानं राष्ट्रीय स्तरावरती अनेक पुरस्कार मिळवले. यातली गीतं कैफी आझमी यांनी लिहिली. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. संजीवकुमारसह सर्वांचाच अभिनय ‘वा’ असाच!
'सत्यकाम'चं कथानक इतकं अप्रतिम आहे की त्याला चांगल्या दिग्दर्शनाची, चांगल्या अभिनेत्यांची गरजच पडू नये. अर्थात चांगला दिग्दर्शक चांगल्या कथानकाला कसा न्याय देऊ शकतो यासाठी हा चित्रपट जरूर बघायलाच हवा. पडद्यावर सुरुवातीलाच महात्मा गांधींचं वाक्य बघायला मिळतं. गांधीजी म्हणत, 'सत्य आणि प्रेम या दोन गोष्टीच माझ्यासाठी परमेश्वरासमान आहेत'. आणि 'सत्यकाम' ही गोष्टही विवेक, निर्भयता, सत्य, प्रेम यांची गोष्ट!
असं म्हटलं गेलंय की उपनिषदातपण सत्यकामाचा उल्लेख आहे. गौतम ऋषीकडे सत्यकाम जातो आणि शिष्यत्व मागतो, तेव्हा ते त्याला त्याचं गोत्र विचारतात. तो म्हणतो, 'माझ्या आईचं नाव जबाला, तिनं अनेक जणांची सेवा केली आणि त्यातूनच माझा जन्म झाला. त्यामुळे मी नेमका कोणामुळे झालो हे ती सांगू शकणार नाही. पण ती म्हणाली तिचं नाव जबाला म्हणून मी जबाल सत्यकाम आणि हेच मी सांगावं.' गौतम ऋषी म्हणाले, 'धन्य ती सत्य कथन करणारी तुझी माता आणि तूही किती सहजतेनं सत्य कथन केलंस.' पुराणातली ही सत्याचा साक्षात्कार घडवणारी गोष्ट इथंच संपते......
नंतर गोष्ट सुरु होते ती एका संन्याशाची...परमेश्वराचा शोध घेत हा सत्यशरण आचार्य हिमालयात पोहोचतो. तिथं त्याला साक्षात्कार होतो की सत्याचा शोध हाच परमेश्वराकडे नेतो. परमेश्वर म्हणजेच निर्भयता, परमेश्वर म्हणजेच सत्य आणि परमेश्वर म्हणजेच प्रेम. सत्यशरण आचार्य सप्तपर्णी गावात येऊन गुरूकूल सुरु करतात. तिथं प्रत्येकाचं नाव सत्यपासूनच सुरू होतं. सत्यवचन, सत्यसंधान, सत्यआचरण असं.....स्वप्नातही कोणी सत्यापासून दूर जात असेल तर ते स्वतःला अपराधी मानतात इतका पगडा सत्याचा त्या गुरूकुलात असतो. यातलाच एक सत्यप्रेम!
सत्यकामची कथा सुरू होते तो काळ १९४६ सालचा.....भारताला स्वातंत्र्य मिळणार असल्याचं वातावरण सगळीकडे.....याच कॉलेजमध्ये जिवश्चकंठश्च मित्र असलेले सत्यप्रेम (धर्मेद्र) आणि नरेन (संजीव कुमार) यांची नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालत असे.
एकदा सत्यप्रेम आकाशाकडे बघत असताना नरेन त्याला विचारतो, तू काय बघतोस, तेव्हा तो सांगतो, की आकाशात हा जो तेजस्वी तारा आहे ना त्याला स्वाती तारा म्हणतात आणि मी त्या तार्याच्या प्रेमातच आहे. नरेन त्याला म्हणतो, तुझं लग्न झाल्यावर तुझ्या बायकोचं नाव स्वाती ठेवू. तेव्हा सत्यप्रेम म्हणतो आणि स्वाती तार्याच्या बाजूचा आणखी एक तेजस्वी तारा म्हणजे चित्रा. तेव्हा नरेनच्या बायकोचं नाव चित्रा ठेवायचं असं ठरतं.......अशी खूप काही स्वप्नं दोघांनी बघितलेली असतात.
सत्यप्रेमचा जन्म होताच त्याच्या आईचा मृत्यू होतो आणि वडील संन्याशी होऊन घरदार सोडून निघून जातात. सत्याशरण आचार्य त्याला वाढवतात. नरेनच्या आईनंही नरेनला लहानाचं मोठं केलेलं असतं.....
इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणारे तरूण आता स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण स्वतंत्र देशात श्वास घेणार, भ्रष्टाचार, पिळवणूक सगळ्यांपासून सुटका होणार म्हणून खूप खुशीत असतात. या तरुणांमध्ये असतात नरेन (संजीव कुमार), सत्यप्रिय (धर्मेद्र), पीटर (असरानी) वगैरे....निकाल लागतो आणि पास झाल्याच्या खुशीत सगळे पिकनिक साजरा करण्यासाठी हसतखेळत गाणी गात प्रवास करत असतानाच एक छोटं मूल गाडीसमोर येतं आणि त्याला वाचवताना गाडी दरीत गडगडत जाते. एक तरूण दगावतो बाकी सगळे बचावतात. हरभजन सिंगचे आई-वडील जेव्हा अपघाताची बातमी समजताच येतात, तेव्हा नरेन (संजीवकुमार) त्यांना खोटं बोलू शकत नाही. तो या जगात नसल्याचं कळताच, त्याची आई धाय मोकलून रडू लागते, तेव्हा हरभजनचे वडील म्हणतात, दुसर्या कुणाचा मुलगा नेण्यापेक्षा देवानं आपल्या हरभजनला नेलं, इतरांचे आई-वडील कदाचित पुत्रवियोगाचं दुःख सहन करू शकले नसते. हरभजन खूप चांगला होता म्हणूनच तो देवाकडे गेला, तू रडू नकोस. ....सत्यप्रेम (धर्मेंद) चे आजोबा सत्यशरण (अशोककुमार) तिथं येतात. ते सगळ्याच रुग्णांची प्रेमानं चौकशी करतात, सगळ्यांना फळं देतात. आपल्या नातवालाही भेटतात. ......त्यानंतर सगळे वेगवेगळ्या दिशांना जातात. मात्र सत्यप्रेम नियमित नरेनला पत्रं पाठवत असतो.
सत्यप्रेम आपल्या आजोबाकडे (अशोककुमार) गुरुकुलात येतो. मात्र त्याच वेळी त्याला नोकरीचा प्रस्ताव येतो आणि लगेचच रुजू होण्याचे आदेश. त्यामुळे आजोबांनी त्याच्यासाठी मुलगी बघितलेली असतानाही तो 'आधी काम' म्हणत मुंबईला पोहोचतो आणि नोकरीवर रुजू होतो. तिथून त्याला चटर्जी या सहकार्यासमवेत एका संस्थानावर पाठवण्यात येतं.
देशाला स्वातंत्र्य मिळालेलं असतं, पण राजे, संस्थानिक बिथरून गेलेले असतात. त्यांची संस्थानं खालसा केली जाणार असल्याचं कळताच त्यांचे धाबे दणाणलेले असतात. सत्यप्रेमसारख्या इंजिनियरचा उपयोग करून केवळ नकाशा काढण्याचं नाटक करायचं आणि त्यांनी आधीच तयार केलेल्या प्लॅनवर त्याची स्वाक्षरी घ्यायची आणि संस्थानाच्या मालकीच्या जमिनीच्या आतलं खनिजं ताब्यात घ्यायचं असा त्या संस्थानिकाचा डाव असतो. याची सुरुवातीला सत्यप्रेमला काहीच कल्पना नसते. मात्र कल्पना येताच तो स्पष्ट शब्दात नकार देतो. त्याला वाट्टेल तितक्या संपत्तीची ऑफर करण्यात येते, पण तो ती धुडकावून लावतो.
इथं त्याची भेट होते एका दारुड्या बापाशी - डेव्हिडशी! जो आपल्याच मुलीला (शर्मिला टागोर) रंजनाला संस्थानिकाची शय्यासोबत करायला प्रवृत्त करत असतो. रंजना खूप स्वाभीमानी असते. तिला मानानं लग्न हवं असतं, वेश्या म्हणून जगणं मुळीच मान्य नसतं. ती प्रत्येक वेळी कशीबशी त्या संस्थानिकाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत असते. सत्यप्रेम आल्यावर ती तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते. त्याच्या मनात स्त्रीविषयी असलेला सन्मान, प्रेम, त्याचा सच्चेपणा या सगळ्या गोष्टी तिला खूप भावतात. खरं तर सत्यप्रेमही तिच्या प्रेमात पडतो. पण तो मधूनच स्वतःला सावरत असतो. कारण त्याला माहीत असतं, आपल्या आजोबा कट्टर आहेत त्यांना हे सगळं चालणार नाही. पण तो आपल्या तरुण मनाला आवरूही शकत नाही आणि अशाच एका क्षणी दारूडा बाप रंजनाला शोधत सत्यप्रेमच्या ठिकाणापर्यंत पोहोचतो आणि तिला संस्थानिकाच्या तावडीत देण्यासाठी ओढत नेतो. त्या वेळी सत्यप्रेम त्याला अडवतो. असं करू नकोस सांगतो. तेव्हा तो म्हणतो, हिच्याशी कोणीही चांगल्या घरातला मुलगा लग्न करणार नाही. त्या पेक्षा संस्थानिकाची मर्जी राखली तर तो हिला सोन्याचांदीनं मढवून ठेवेन. सत्यप्रेम विरोध करतो तेव्हा रंजनाचा बाप म्हणतो, तू लग्न करतोस का हिच्याशी? तेव्हा सत्यप्रेमचं मन चटकन हो म्हणू शकत नाही कारण त्याचे आजोबा हे लग्न स्वीकारणारच नाहीत हे त्याला ठाऊक असतं. तो सांगतो, मी हिला घेऊन जाईन आणि चांगला मुलगा बघून हिचं लग्न लावून देईन. पण तोपर्यंत रंजना भानावर आलेली असते. तिच्या दृष्टीनं सत्यप्रेम आपला स्वीकार करू शकत नाही हेच शल्य खूप मोठं असतं. आता कुठल्याही दुःखाला सामोरं जाण्याची तिची तयारी असते. ती बापाबरोबर जाते आणि संस्थानिक संपूर्ण रात्र तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराचा उपभोग घेतो.
रंजनाला तिच्या बापानं नेल्यावर चटर्जी सत्यप्रेमला तू हे चांगलं केलं नाहीस असं सांगतो कारण त्यानं सत्यप्रेम आणि रंजनाचं बहरलेलं प्रेम बघितलेलं असतं. तो त्याला रंजनाचं आता काय होईल याची कल्पना देतो आणि भानावर येत सत्यप्रेम धावतच रंजनाच्या घरी पोहोचतो, पण तो पोहोचायला उशीर झालेला असतो. सत्यप्रेम आपला भ्याडपणा कबूल करतो. पण आता त्याच्याबरोबर यायला रंजना तयार नसते. तेव्हा सत्यप्रेम आपण तिच्याशी लग्न करायला तयार आहोत सांगतो.
सत्यप्रेम, रंजना आणि त्यांचा काबूल नावाचा मुलगा आजोबांकडे -सत्यशरण आचार्य यांच्याकडे सप्तपणी गावात येतात. आजोबांना आधी सगळं सत्य सत्यप्रेम सांगतो. रंजना आपली पत्नी असून आपण जरी काबूलचे वडील असलो तरी तो आपल्यापासून झालेला मुलगा नाही हेही तो त्यांना सांगतो आणि आजोबा त्याला तिथून हाकलून लावतात.
सत्यवचनी सत्यप्रेम आपल्या संसारात खुश असतो. इंजिनियर असल्यानं त्याला सहजपणे नोकर्या मिळत जातात. पण त्याच्या खरं बोलण्यानं प्रत्येक ठिकाणी त्याला आपल्या कामावर पाणी सोडावं लागतं. देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र देशाची जी स्वप्नं सत्यप्रेमनं बघितलेली असतात, इथं मात्र गरिबी, उपासमार, भ्रष्टाचार, सुखलोलूप वृत्ती हे सगळं बघायला मिळतं. असं सगळं असलं तरी तो सत्यापासून कधीच फारकत घेत नाही. अधूनमधून त्याची आणि नरेनची भेट होत असते. नरेनलाही सत्यप्रेमच्या लग्नाविषयी मुलाविषयी सगळं खरं खरं कळतं. आपल्या मित्राविषयी त्याचा आदर आणखीनच वाढतो. मात्र सत्यप्रेमनं वास्तवात यावं, काही गोष्टींशी तडजोड करावी असं तो सांगत राहतो. पण सत्यप्रेमला ते मान्यच नसतं.
सत्यप्रेमचा एका ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हणून नरेनचं असतो. तिथे दोघांमध्ये उडालेले खटके बघण्यासारखे आहेत. अखेर मात्र सत्यप्रेमला कॅन्सर विळखा घालतो. त्याला खोट्या बांधकामात स्वाक्षरी कर म्हणणारा कंत्राटदार त्याच्या मुलाला काबूलला आणि बायकोला रंजनाला आपल्या घरी नेतो. चटर्जी सत्यप्रेमला जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये दाखल करवतो आणि नरेनचा शोध घेऊन त्याला ही बातमी देतो. नरेनवर जणू काही वीजच कोसळते. तो धावतच सत्यप्रेमला भेटायला येतो. हॉस्प्टिलमध्ये येताच सत्यप्रेमची खालावलेली प्रकृती पाहून त्याला रडू कोसळतं. उलट हसतमुखानं सत्यप्रेम त्याच्याशी गप्पा मारतो आणि त्याला सांगतो माझ्या नंतर रंजना आणि काबुल यांचं काय याची चिंता मला लागलीय. तेव्हा नरेन म्हणतो मी आहे ना, मी काबूल आणि रंजनाची काळजी घेईन तू काळजी करू नकोस. नरेन बाहेर पडतो तेव्हा त्याची बायको त्याला आपण काबूल आणि रंजनाला घरात घेतलं तर आपली सासू या गोष्टीला कधीच तयार होणार नाही त्यापेक्षा आपण बाहेरूनच आर्थिक मदत करू असं सांगते. हे सगळं रंजनाच्या कानावर पडतं. ती हॉस्पिटलमध्ये येऊन सत्यप्रेमला अजून तरी जगाला ओळखायला शिक असं सांगते.
ती घरी येते, तेव्हा कंत्राटदार तिला स्वाक्षरीसाठीचे कागदपत्रं हातात ठेवतो आणि सत्यप्रेमची स्वाक्षरी घे असं सांगतो. ती स्वाक्षरी घेतली तर माझे पन्नास हजार मोकळे होतील आणि मी तुला त्यातले पंचवीस हजार देईन असं सांगतो. सत्यप्रेम गेल्यानंतर तिनं स्वाभीमानानं आपला छोटा लॉंड्रीचा व्यवसाय करून मुलासहित राहावं असं सुचवतो. मनानं आणि शरीरानं खचलेली रंजना काहीच बोलत नाही. ती हॉस्पिटलमध्ये येऊन सत्यप्रेमला कागद दाखवते आणि तुझ्यानंतर आमचं काय, तुझा काबूल खराखुरा मुलगा असता तर तू त्याच्यासाठी काय केलं असतं असं म्हणून तो कागद देते, तो त्या कागदावर स्वाक्षरी करतो. आपल्यासाठी त्यानं मरतानाही केलेली स्वाक्षरी पाहून रंजनाला त्याचं आपल्यावरचं प्रेम असह्य होतं, ती तो कागद फाडून टाकते. सत्यप्रेम दोन्ही हात फैलावून तिला आपल्या मिठीत घेतो.
इकडे सत्यप्रेमला रक्ताची उलटी झाल्यानं त्याचा अंतिमसमय जवळ आल्याचं लक्षात घेऊन नरेन त्याच्या आजोबाला सत्यशरण आचार्यला बोलावून घेतो. ते येतात. आपल्या नातवाची अवस्था पाहून गहिवरून जातात. सत्यप्रेम हे जग सोडून जातो. त्याचे अंतिम विधी काबूलच्या हाती न करता ते स्वतःच करतात. ते नरेनचा निरोप घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच नरेन त्यांना आपण रंजना आणि काबूल यांची काळजी घेऊ तसा आपण सत्यप्रेमला शब्द दिलाय असं सांगतो. त्याच वेळी तिथं श्राद्धविधी घालणारा ब्राह्मण येतो आणि म्हणतो, श्राद्धाला तर मुलगा लागेल, तुम्ही यांनाही घेऊन जाणार का, तेव्हा सत्यशरण आचार्य म्हणतात, अजून तो खूप लहान आहे मीच ते सगळं करीन. त्या वेळी छोटा काबूल निभिर्डपणे म्हणतो, 'आजोबा तुम्ही खोटं बोलताय, साफ खोटं. माझ्या आईनं सांगितलंय मला की मी माझ्या बाबुजींचा मुलगा नसल्यानं तुम्ही मला अग्नी देऊ दिला नाहीत आणि श्राद्धही करू देणार नाहीत.' नरेन त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. तोही काबूलच्या बोलण्यानं अवाक होतो.
काबूलच्या तोंडून निघालेलं सत्य ऐकून सत्यशरण आचार्य स्तिमित होतात. ते म्हणतात, 'तुझ्या आईनं हे सत्य तुला सांगितलं?' इतके दिवस आपण लोकप्रवादाला घाबरून सत्यापासून पळ काढत होतो आणि इथं मात्र हा मुलगा निर्भयपणे सत्य सांगत होता. मुख्य म्हणते जबाला प्रमाणेच त्याच्या आईनं ते सत्य त्याला दिलं होतं. आपण मात्र तिला नीच कुळातली म्हणून दूर केलं. अव्हेरलं. सत्य बोलण्याचा अहंकार नाही तर सत्य बोलण्याला साहस लागतं. रंजना मोठी आहे, महान आहे हे त्यांना कळतं. ते खजिल होतात आपली चूक त्यांच्या लक्षात येते. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी, मानवता, विश्वास यांचं नातं किती मोठं आहे हे त्यांना कळतं. आपला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग किती पोकळ होता हेही त्यांना कळतं.
शेवटी जेव्हा रंजना त्यांना निरोप देताना वाकून प्रणाम करते, तेव्हा ते म्हणतात, 'बेटा लवकर चल, आपल्याला निघायला हवं. आपल्या कुळातला एकचजण आहे, त्याला तुलाच वाढवायचंय, मोठं करायचंय, माझे किती दिवस शिल्लक राहिलेत आता?' त्यांचं प्रेम आणि त्यांच्यातला बदल बघून रंजना सदगदीत होऊन त्यांच्या कुशीत शिरते......ते ‘सत्यकाम’ म्हणत काबूलला आपल्या कडेवर घेतात आणि निघतात. नरेन त्यांना त्यांची विसरलेली काठी द्यायला जाणार तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की सत्यशरण आचार्य यांना त्यांचा खरा आधार मिळालाय आता काठीची गरजच राहिली नाही आणि चित्रपट संपतो.
जरूर बघा. तुमचे अश्रू तुम्ही रोखू शकणार नाही......मळभ दूर होईल कदाचित!
दीपा देशमुख
Add new comment