Njan Prakashan
लस घेतल्यापासून थोडं फिवरिश, अंग दुखणं आणि लस घेतलेला हात ठणकणं....सुरू आहे ...मग लक्ष वेगळीकडे वळवण्यासाठी अपूर्वने मला मल्याळम चित्रपट आवडतात, म्हणून लावलेला Njan Prakashan किंवा आय प्रकाशन आत्ताच नेटफ्लिक्सवर बघितला. हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. ४० दिवसांत जगभरात ५२ कोटी रूपयांचा बिझिनेस या चित्रपटानं केला आणि सगळीकडेच या चित्रपटाला प्रशंसलं गेलं.
चित्रपट सुरू झाला आणि महेशिंते प्रथिकारममधला नायक, कुम्बलिंगी नाईट्समधला मानसिक विकारानं ग्रासलेला नायिकेचा जिजा समोर आले...हा नायक लैच भारी आहे.
प्रकाशन हा अत्यंत आळशी, परिश्रमापेक्षा शॉर्टकट वर विश्वास असणारा, थापा मारणारा, खोटं बोलणारा (मी खूप पुस्तकं वाचतो, अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत असं म्हणणारा, वाक्यावाक्यात तत्वज्ञान पाजळणारा....) असा तरुण...मित्राचं चांगल्या सुंदर मुलीशी लग्न ठरतंय बघताच असूयेनं त्याचंच लग्न मोडण्याचे प्रयत्न करणारा,....नर्सिंगचं काम म्हणजे हलकं, कमी पैसे मिळणारं असं त्याला वाटत असतं. आपलं प्रकाशन हे नाव जुनाट वाटल्यानं तो पी. आर. आकाश असं नाव गॅझेटमध्ये छापून आणतो आणि त्याच नावानं आपल्याला हाक मारावी असा ज्यालात्याला आग्रह धरत असतो. परदेशी जाण्याची स्वप्नं तो रंगवत असतो. मात्र हे परदेशी जाणं देखील दुसऱ्याच्या जिवावर झालं पाहिजे या विचाराचा तो असतो...सलोमी नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम असतं आणि ती नर्स म्हणून जर्मनीला जाणार असं कळताच तो तिच्याशी जास्त जवळीक वाढवतो. तिच्या घरच्यांशी देखील प्रेमाचं नाटक करतो. जर्मनीला जाण्यासाठी सलोमीला व्हिसा मिळताच तिच्याशी लग्न करायचं आणि तिच्याबरोबर जर्मनीला जायचं असा प्लॅन तो आखतो. काही कारणांनी सलोमीला व्हिसासाठी ३ लाखांची गरज पडते आणि ३ लाख उभे करण्यासाठी प्रकाशन आपली मोटारसायकल विकतो, ज्या गोपालजीकडे तो राहत असतो, त्याला त्याच्या बायकोचा सोन्याचा हार विकायला लावतो. तो हार विकून पैसे मिळवतो आणि ३ लाख रूपये सलोमीला देतो. गोपालजी हा केरळमधल्या अनेक तरुणांना भातशेती, कारखाने अशा अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देत असतो. प्रकाशनचे वडील शिक्षक असतात आणि कधी काळी गोपालजी त्यांचा विद्यार्थी असतो. नेमका त्याचाच उपयोग करून प्रकाशन गोपालजीला इमोशनल ब्लॅकमेल करत असतो.
जर्मनीला जाण्याआधी प्रकाशन आणि सलोमी चर्चमध्ये जाऊन लग्न करणार असतात आणि त्याच वेळी चर्चमध्ये वाट बघत असलेल्या प्रकाशनला कळतं की सलोमीचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तो धावतच हॉस्पिटलमध्ये जातो. सलोमी वडलांना अशा अवस्थेत सोडून जर्मनीला जायला नकार देते. पण प्रकाशन तिला जायला सांगतो आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, तू जा, मी तुझ्या कुटुंबाची काळजी घेईन असं सांगतो.
तिच्या माघारी तो तिच्या कुटुंबाची काळजी घेतो आणि एके दिवशी त्याला कळतं की सलोमीनं तिकडेच एका जर्मन तरुणाशी लग्न केलं आहे. तिचं कुटुंबही त्याला न सांगता घर सोडून निघून जातं. सलोमी आणि तिच्या घरच्यांनी आपला वापर केला, आपल्याला फसवलं ही गोष्ट प्रकाशनच्या लक्षात येते.
गोपालजीने बायकोचा हार चोरल्यामुळे त्याला खूप मानहानी सहन करावी लागलेली असते. प्रकाशनला आपण नीट ओळखू शकलो नाहीत याचं त्याला वाईट वाटतं आणि तो प्रकाशनला हाराचे पैसे वसूल करण्यासाठी माझ्याकडे आता काम कर असं कठोरपणे सांगतो. नाईलाज झालेला प्रकाशन गोपालजी सांगेल ते म्हणजे भाताच्या शेतीत भाताची रोपं लावणं, कारखान्यात अवजड माल उचलणं अशी सगळी कामं करायला लागतो. एके दिवशी गोपालजी त्याला एका श्रीमंत घरात त्याला नर्सिंगचं काम करायचं आहे असं सांगतो. त्या घरातली टीना नावाची एक किशोरवयीन मुलगी ट्यूमरने आजारी असते आणि ती खूप खोडकर असल्याने तिच्याकडे कोणीच टिकू शकलेलं नसतं. पहिल्याच दिवशी टीना त्याच्या अंगावर पिसाळलेला कुत्रा सोडते आणि कसाबसा जीव वाचवून पळालेला प्रकाशन घरी पोहोचतो. पण तिथे गोपालजी पोहोचतो आणि पुन्हा त्याला त्या घरी नेऊन सोडतो. त्याचा थापा मारण्याचा स्वभाव, त्याचा आळशीपणा, त्याचं जर्मनीचं स्वप्न, त्याचं दुरावलेलं प्रेम, त्यानं धारण केलेलं पी. आर. आकाश हे नाव, या सगळ्याचं काय होतं हे बघायला आय प्रकाशन हा मल्याळम चित्रपट बघायलाच हवा.
फहाद फासिल या अभिनेत्यानं प्रकाशन याने के पी.आर. आकाश ची भूमिका अतिशय अप्रतिम अशी साकारली आहे. यातली सलोमी, श्रुती, टीना या नायिका इतक्या सहजसुंदर दिसतात, की आपल्याच आसपास आहेत असं वाटतं. याचं कारण यांचा कमीत कमी केलेला सौम्य मेकअप. चित्रपटातले संवाद आणि अभिनय इतका सहज आहे की आपल्या चेहऱ्यावरचं हासू अबाधित राखण्यास दिग्दर्शक सत्थ्यान अथिनकाडनं यश मिळवलं आहे. हसता हसता आपल्या डोळ्यात कधी आसवं येतात हेही कळत नाही. या चित्रपटाचं कथानक श्रीनिवासन याचं आहे. हा चित्रपट केरळमध्ये चित्रीत झाल्यामुळे डोळ्यांना केरळमधला निसर्ग तृप्त करून सोडतो. सगळीकडे हिरवंगार....यातले अनेक प्रसंग अंतर्मुख करून सोडतात. सुरुवातीला टीना प्रकाशनला घरातून पळवण्यासाठी करत असलेल्या युक्त्याप्रयुक्त्या आणि नंतर त्यांच्यातलं बाँडिंग...जर्मनीचं डोक्यातून वेड न गेलेला प्रकाशन आणि त्या वेळी टीनाला प्रश्न विचारतो, जगातला कुठला प्रदेश तुला आवडतो, तेव्हा स्वित्झर्लंड, जर्मनी किंवा आणखी कुठल्या देशाचं नाव कानावर पडेल या अपेक्षेनं बघणाऱ्या प्रकाशनच्या कानावर टीनानं उच्चारलेला ‘केरळ’ हा शब्द पडतो. केरळमधला निसर्ग, पाणी, डोंगर हे स्वर्गापेक्षाही सुंदर असल्याचं टीना त्याला सांगते....प्रकाशनमधलं ट्रान्स्फॉर्मेशन होण्यासाठी असे अनेक प्रसंग आपल्याला या चित्रपटात दिसतात. कुठेही उपदेश नाही, तत्वज्ञान नाही तर रोजच्या जगण्यातले प्रसंग जगणं कसं असतं हे सांगतात, स्वप्नापेक्षाही श्रमातलं सौंदर्य, वास्तवातलं जग कसं आहे हे दाखवत राहतात. यातला आणखी एक प्रसंग....टीनाला घेऊन बोटीमध्ये असलेल्या प्रकाशनला आपली लग्न झालेली प्रेयसी सलोमी तिच्या जर्मन नवऱ्याबरोबर दिसते. तेव्हा तो तिच्याजवळ जातो, तिच्या नवऱ्याबरोबर हात मिळवून हॅलो म्हणतो. दुसऱ्या दिवशी ओशाळलेली सलोमी त्याला भेटते आणि त्याचे ३ लाख रूपये त्याला परत करू बघते. त्या वेळी प्रकाशन ते पैसे परत घेत नाही, तिला शुभेच्छा देत तिचा निरोप घेतो. सलोमीनं फसवलेलं असूनही तो तिच्याशी वाईट का वागत नाही, प्रकाशनचा मूळ स्वभाव कळूनही गोपालजी त्याला मदत का करतो, टीनाशी दोस्ती करताना त्याचा घातक ठरलेला थापा मारण्याचा स्वभावच कसा उपयोगी पडतो, त्याच्यातले बदल कशामुळे घडतात हे सगळं इतक्या सुरेखरीतीने या चित्रपटातून उलगडतं की कधी चेहऱ्यावर हासू तर कधी अश्रू घेऊनच आपण त्यात रममाण होतो.
मल्याळम चित्रपट कधी कधी लांबट वाटतात, पण तरीही ते पुढे सरकवावेसे वाटत नाहीत. आपण ते बघत राहतो. कारण त्या वेळी त्यातली फोटोग्राफी, अभिनय, संगीत सगळं काही आपल्याला खिळवून ठेवतं. या चित्रपटातही सलोमी आणि प्रकाशन समुद्रावर उभारलेल्या लाकडी बांबूवर उभा असलेला प्रसंग, टीना आणि प्रकाशन समुद्राच्या वाळूतून फेसाळलेल्या लाटांमधून धावतानाचा प्रसंग....आपण स्वर्गीय अनुभव घेत असल्याचा फील देतात.
जरूर बघा, Njan Prakashan किंवा आय प्रकाशन, तुम्हालाही फहाद फासिल खूप आवडेल.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment