बुंग...कितीदाही बघावी अशी हृदयस्पर्शी चित्रकथा
बुंग...कितीदाही बघावी अशी हृदयस्पर्शी चित्रकथा
मणिपूरच्या एका लहानशा गावात राहणाऱ्या बुंग नावाच्या अत्यंत निरागस मुलाची ही गोष्ट. बुंग आपल्या आईबरोबर राहतो. त्याला राजू (अंगोम सनमाटम ) नावाचा एक राजस्थानी मित्र आहे, ज्याच्या आजोबांपासूनच्या पिढ्या मणिपूरमध्येच वसलेल्या असतात. सतत भांडत असलेल्या या दोघा मित्रांमध्ये तितकंच प्रेम आहे.
बुंगचे वडील कित्येक दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे त्याची आईच खंबीरपणे त्याला वाढवत असते. बुंगचे काका-काकू गावच्या सरपंचाकडून बुंगचे वडील मरण पावल्याचं प्रमाणपत्र मिळवतात आणि काही धार्मिक विधींचं आयोजन करतात. आपल्या नवऱ्याची प्रतीक्षा करणारी बुंगची आई मात्र आपला नवरा मृत मानायला तयार नसते. तो कुठेतरी अडकला असून तो परत येईल यावर तिचा विश्वास असतो.
बुंग हा चित्रपट एका लहान मुलाच्या नजरेतून आहे. बुंगसाठी त्याचे वडील हिरो असतात. आपल्या आईला - मंदाकिनीला (बाला हिजम) काय गिफ्ट द्यायचं, तर त्यांना शोधून तिच्यासमोर आणणं हेच ते सगळ्यात मोठं गिफ्ट असं त्याला वाटत असतं. आपल्या आईला आनंदी बघण्यासाठी बुंग आणि त्याचा मित्र वडलांना शोधण्यासाठी म्यानमारच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचतात. या प्रवासात दोघं ॲम्ब्युलन्समधून एका आजोबांच्या मृतदेहाबरोबर फुलांमध्ये लपून कसे जातात, तसंच या दोन मित्रांची अनेकदा भांडणं कशी होतात, पण तरीही ती दोघं आपला शोध जारी कसा ठेवतात. या शोधात नेमकं काय घडतं? निरागस, खोडकर असलेला चिमुकला बुंग चित्रपटाच्या शेवटी अचानक एकदम मोठा कसा होतो? या प्रश्नांची उत्तरं बुंग चित्रपट बघताना मिळतात.
बुंग त्यांना शोधायला निघतो, तो त्याचा प्रवास म्हणजे जिद्द, निरागसता आणि परिपक्वतेचा प्रवास आहे. बुंग आणि त्याचा मित्र म्यानमारच्या सीमेकडे निघतात तेव्हा या दोघांच्या हातात एक नकाशा आणि थोडेसे पैसे इतकंच असतं. त्याच्या वडलांचा एकमेव फोटो तोही या प्रवासात हरवतो. आपल्या वडलांना मॅडोना आवडत असे इतकीच त्याच्याजवळ माहिती असते आणि काही आठवणी....
खरं तर या वयात कोणतीही गोष्ट अशक्य वाटत् नाही, अनोळखी रस्ते, घनदाट जंगल किंवा म्यानमारच्या सीमेची भीती हे सगळं खरं तर मोठ्यांसाठीही धाडसाचं काम, पण मुलांसाठी मात्र ते सहजसाधं होतं. या चित्रपटात बुंगची ब्रुसलीसारखी गलोल खेळण्याची स्टाईल खूपच खास आहे. ही स्टाईल त्याला कुठे घेऊन जाते आणि कोणता इमोशनल मास्टरस्ट्रोक आपल्याला देते हे बघण्यासारखं आहे.
खरं तर मणिपूर म्हटलं की काहीच काळापूर्वी तिथली स्फोटक परिस्थिती आणि तणाव आठवतो. मात्र या चित्रपटाने मणिपूरचं दैनंदिन सहजसाधं जगणं दाखवलं आहे. लोकसंगीताचा वापर अत्यंत प्रभावीपणे यात असून पेना सारख्या स्थानिक वाद्याचा आवाज कानात घुमत राहतो. काही प्रसंगात संगीत नाही, तर त्या त्या दृश्यांतली शांतता बोलण्याचं काम करते. यातलं नृत्य मला खूप आवडलं.
बुंगची दिग्दर्शक, लेखिका लक्ष्मीप्रिया देवी हिला ग्रामीण टच असलेला साधा मुलगा या चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेसाठी हवा होता. नि अनेक मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या, पण तिला हवा तसा निरागस भाव असलेला मुलगा सापडत नव्हता आणि त्याच वेळी गुगून किपगेन सापडला. त्याने अभिनय केलाय असं वाटतच नाही. जेव्हा फरहान अख्तरने या चित्रपटासाठीच्या काही रफ क्लिप्स बघितल्या, तेव्हाच त्याने हा चित्रपट आपण करायचा असं ठरवलं. एका मुलाखतीत त्याने सांगितलं, गुगून किपगेनच्या डोळ्यात अशी ताकद मला दिसली, की ती मोठमोठ्या स्टार्समध्येही दिसणार नाही. बुंग हा या चित्रपटाचा नायक असून तो जे काय करतो, ते सगळं पडद्यावर नसून खरंच असल्याचा अनुभव तो देतो. बुंग चित्रपट हसवतो, त्याच वेळी तो रडवतो आणि त्याच वेळी तो एक नितांत सुंदर अशी आशा मनात निर्माण करतो.
मणिपूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करणं सोपं नव्हतं. मणिपूरमध्ये जिथे बुंगचं घर दाखवलंय, तिथे जायला तर पक्के रस्तेही नव्हते. कॅमेरा, लाइट्स आणि इतर सामग्री नेण्यासाठी चक्क डोक्यावर घेऊन किंवा खेचरांवर वाहून न्यावे लागले. या चित्रपटाचं चित्रीकरण होईपर्यंत संपूर्ण टीमला तिथल्या छोट्या झोपड्यांमध्ये, तर कधी तंबू ठोकून राहावं लागीलं. मणिपूरमध्ये कधीही पाऊस पडतो, अशा वेळी चित्रीकरण करण्यासाठी पाऊस कधी थांबतो याची तासनतास वाट बघावी लागे. अर्थात याच पावसामुळे दृश्यं अधिक हिरवीगार झालेली दिसतात. लक्ष्मीप्रिया देवी हिने सेट न उभारता प्रत्यक्ष गाव, बाजारपेठा इथेच चित्रीकरण केलं. तिथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधून त्यांनाच सामील करून घेतलं. त्यामुळे या चित्रपटातली सगळी दृश्यं खरीखुरी वाटतात. म्यानमारच्या सीमेजवळ यातल्या काही भागांचं चित्रीकरण करणं हे देखील अत्यंत संवेदनशील काम होतं. लष्कर अणि स्थानिक प्रशासन यांच्या परवानग्या घेणं, हवामानाचा लहरीपणा, मणिपूरच्या खडतर वाटा या सगळ्यांची तमा न बाळगता बुंगच्या आख्ख्या टीमने हे आव्हान पेललं आणि त्याचंच फळ म्हणजे हा नितांत सुंदर असा चित्रपट बनला.
या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मणिपूरी भाषेतला चित्रपट असूनही बघताना कुठेही भाषेचा अडथळा येत नाही. तिथल्या स्थानिक लोकांना तर बुंग खरोखरंच आपल्या हरवलेल्या वडलांचा शोध घेतोय असं वाटलं. बुंग हा चित्रपट मणिपूरचा निसर्ग, तिथली माणसं, त्यांचं जगणं, त्यांची साधीशी घरं आणि त्यांची संस्कृती लक्ष्मीप्रिया देवी हिने अचूकपणे टीपली आहे. मणिपूरच्या संस्कृतीचं दर्शन या चित्रपटातून घडतं. तिथली जीवनशैली, परंपरा आणि लोकांचे स्वभाव यात बारकाईने अगदी सहजपणे मांडले गेले आहेत. निसर्गाच्या जवळ असलेला हा एक कष्टाळू समाज असून इथल्या लोकांची साधी पण सुबक घरं, आनंदी राहण्याची वृत्ती दिसत राहते. इथल्या संस्कृतीतलं स्त्रियांचं स्थान किती महत्वाचं आहे हेही बुंगच्या आईच्या वागण्यातून जाणवत राहतं. ती ज्या पद्धतीने आपल्या मुलाला सांभाळते, वेळप्रसंगी तिच्यातला कणखरपणा, निर्णय घेण्याचा खंबीरपणा बघायला मिळतो. इथलं ‘इमा मार्केट’ बघणं हाही मस्त अनुभव आहे. आईला ‘इमा’ हे संबोधन मला खूप भावलं.
फरहान अख्तर निर्माता असलेला मणिपुरी भाषेतला बुंग हा चित्रपट म्हणजे एक अतिशय हृदयस्पर्शी अशी चित्रकथा आहे. बाफ्टाचा पुरस्कार या चित्रपटाने जिंकला. तसंच टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट सादर झाला, तेव्हा प्रेक्षक आणि समीक्षक यांनी स्टँडिग ओव्हिएशन दिलं. मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं नामांकन मिळालं. कुठलीही तगडी स्टारकास्ट नसताना एका प्रादेशिक चित्रपटाने आपल्या सशक्त कथेने आणि दिग्दर्शनाने यश मिळवलं. जरूर बघायलाच हवा असा असा चित्रपट. पाथेर पांचाली या बंगाली चित्रपटाने जसं जागतिक स्तरावर नाव कमावलं, तसंच यश बुंग या मणिपूरी चित्रपटाने आज मिळवल्याचं समाधान वाटतंय. फरहान अख्तर आणि टीम, लक्ष्मीप्रिया देवी आणि सर्वच कलाकार यांचे खूप खूप आभार.
तर, बुंगला भेटण्यासाठी चित्रपटगृहात जायलाच हवं. नक्की बघा, अजिबात चुकवू नका - बुंग!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment