Gandhi Talks

Gandhi Talks

डोळे जेंव्‍हा बोलू लागतात...
‘पुष्पक’ या 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या कमलहसनच्या मूकचित्रपटानंतर 38 वर्षांनंतर ‘गांधी टॉक्स’ हा किशोर बेलेकर दिग्दर्शित चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आजच्या काळातला एक सायलेंट डार्क कॉमेडी या प्रकारात मोडतो. खरं तर दिग्दर्शकाने मूक चित्रपट बनवून एक धाडसच केलं आहे. 
विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी असे साउंथ फिल्म इंडस्ट्रीमधले दोन आवडते दिग्गज अभिनेते यात असून यात झरिना वहाबसह महेश मांजरेकर, उषा नाडकर्णी, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ जाधव असे मराठी कलाकारही यात आहेत. ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाच्या  नावातल्या गांधी या शब्दावरून चित्रपटाबद्दलची पुसटशी कल्पना येतेच. माणूस हा त्याच्या बोलण्यातून नव्‍हे, तर कृतीमधून कळतो हेच सूत्र या चित्रपटातून बघायला मिळतं.
या चित्रपटाचं प्रभावीपण, ताकद हीच आहे की यातली दृश्यं, पात्रांचा अभिनय आणि संगीत, प्रेक्षकांशी संवाद साधतात. याच गोष्टी भाषेचं काम करतात. आणि म्हणूनच या चित्रपटात विजय सेतुपती असो की अरविंद स्वामी दोघांचे डोळे ज्या ताकदीने भाष्य करतात, संवाद साधतात त्याला तोड नाही. विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी यांचा जबरदस्त अभिनय बघणं हा अत्यंत विलक्षण अनुभव आहे. दोघांच्या व्‍यक्‍तिरेखा भिन्न असल्या तरी त्यांच्याआतलं माणूसपण कसं एक आहे हे अनेक प्रसंगातून कळत राहतं. 
अरविंद स्वामी आणि विजय सेतुपती यांचे डोळे, देहबोली हेच या चित्रपटाचे संवाद आहेत. विजय सेतुपतीने महादेव याची भूमिका साकारली आहे. त्याची आजारी आई, त्याची बेरोजगारी, त्याची गरिबी यांच्याशी त्याचा झगडा सुरू आहे. विजय सेतुपतीमधला कॉमन मॅन (यात आर के लक्ष्मण यांच्या प्रतीकांचा वापर मोठ्या खुबीने केला आहे.), त्याचा नैसर्गिक अभिनय, त्याचा बसमधल्या प्रसंगातला मिश्किलपणा, त्याचा सच्चेपणा जबरदस्त आहे. कधी त्याची आगतिकता बघून आपणही कळवळतो, तर कधी त्याच्यातला चिवटपणा बघून आसपास जगणाऱ्या अशा करोडो गरिबीशी झगडणाऱ्या लोकांचं तो प्रतीक बनतो.
अरविंद स्वामी हा श्रीमंत वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा बोसेमन नावाचा एक श्रीमंत उद्योगपती असून एका विमान अपघातात आपल्या कुटुंबाला गमावतो, त्याचबरोबर उद्योगातही दिवाळखोर ठरतो. त्याचा चित्रपटातला वावर प्रेक्षकांना त्याच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीत खिळवून ठेवतो. यात तो रुबाबदार तर दिसतोच, शिवाय त्याचं हलकसं पुसटसं हास्य, त्याचा राग, त्याची प्रत्येक कृती त्या पात्राची ग्रे शेड दाखवते. विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी दोन तास तुम्हाला त्यांच्याशिवाय इतर कुठलाच विचार करू देत नाहीत हे मात्र खरं. 
महादेवचं चाळीतलं आयुष्य आणि बोसेमनचं अलिशान जगणं यातून मुंबईसारख्या महानगरातलं दोन माणसांमधली दरी किंवा दोघांच्या परिस्थितीतलं भयाण वास्तव दाखवतं. या दोघांवरून आठवलं, विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी या दोघांचा एकत्रित असलेला ‘चेक्का चिवंता वानम’ हा मणिरत्नमचा तेलुगू भाषेतला चित्रपट 2018 साली येऊन गेला होता. यात अरविंद स्वामी एका गँगस्टरचा मुलगा, तर विजय सेतुपती एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. या दोघांची यातली अभिनयाची जुगलबंदी बघण्यासारखी होती. या चित्रपटात जबरदस्त संवाद होते, तर गांधी टॉकसमधलं आव्‍हान म्हणजे यात एकही संवाद नाही. चेक्का चिवंता वानम हा क्राईमपट होता, तर गांधी टॉक्स ही सायलेंट डार्क् कॉमेडी आहे. 
‘गांधी टॉक्स’ मध्ये ए. आर. रहमानचं संगीत म्हणजे या चित्रपटाचे संवादच आहेत. ते प्रत्येक दृश्याला बोलतं करतं, तसंच ते अंतर्मुखही करतं, तर कधी बिटविन द लाईन्स वाचायला भाग पाडतं, कधी ते गती घेतं. आनंद, अस्वस्थता, चीड, संताप, आगतिकता, मनातली खळबळ, उद्विग्नता सारं काही व्‍यक्‍त करण्याचं काम रहमानचं संगीत करतं. चित्रपटात भारतीय संगीत आहे, जॅझ आहे, संगीताला आपण वैश्विक आहे असं जेव्‍हा म्हणतो, तेव्‍हा हा चित्रपट ते परत एकदा सिद्ध करतो. यातली सगळीच गाणी चांगली असली, तरी ‘ही सोनेरी तेजाची चमचमती किरणे‘ हे राहुल देशपांडेने गायलेलं गाणं मला खूप आवडलं.
गांधी म्हणजेच चांगुलपणा, गांधी म्हणजेच माणुसकी, गांधी म्हणजेच मानवता. तुमची सदसद्विवेकबुद्धी जागी असेल, तर ती तुम्हाला या मूल्यांपासून दूर नेऊ शकत नाही. पण आजच्या या भ्रष्ट व्‍यवस्थेत गांधीचा फोटो नावापुरता नोटेवर आहे. गांधींची प्रतिमा असलेल्या या नोटा भ्रष्टाचारात कशी भूमिका बजावतात, भ्रष्टाचाराने सर्वसामान्यांचं जगणं किती कठीण झालं आहे याचं चित्र या चित्रपटातून दिसतं. पैसा की नैतिक मूल्यं असा संघर्ष यात बघायला मिळतो. गांधी टॉक्स, म्हणजे पैसा बोलतो. खरं तर गांधीजींनी सत्य आणि अहिंसा ही दोन मूल्यं माणसाला दिली. पण आजच्या मटेरिलिॲलिस्टिक जगात पैशामागे धावताना आपण माणुसकी विसरतो आहोत, स्वार्थ, पैशाचा मोह कोणत्या पातळीपर्यंत माणसाला घेऊन जातोय हे दाखवतो. आजचं जग प्रसारमाध्यमांनी वापरलेली भाषा बघतं, शिकतं आणि तसं वागत आहे. यातूनच गांधींजीच्या तीन माकडांच्या तत्वज्ञानाविषयी हा चित्रपट बोलतो. तुम्ही काय बघायला नको, काय पाहायला नको आणि काय बोलायला नको हे तो सांगतो. आजच्या कलकलाटाच्या जगात माणसाचा आतला आवाज हरवत चालला आहे. त्याचं म्हणणं प्रत्येकाने ऐकायला हवंय.
या चित्रपटात भाषा नसल्यामुळे हा जागतिक दर्जाचा चित्रपट बनला आहे. जगभरातला कुठलाही माणूस तो समजून घेऊ शकतो. असं असलं, तरी रविवार असूनही संपूर्ण थिएटरमध्ये फक्‍त 25 प्रेक्षक होते. असो. प्रत्येकाने हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायलाच हवा आणि विजय सेतुपती आणि अरविंद स्वामीचे बोलणारे डोळे काय सांगतात ते ऐकायचा अनुभव घ्यायला हवा.
दीपा देशमुख
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.