क्रांतिज्योति विद्यालय : मराठी माध्यम
क्रांतिज्योति विद्यालय : मराठी माध्यम
अखेर काल पुण्यातल्या वसंत टॉकीजमध्ये सायंकाळी ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बघितला. बघायचा होताच, अनेक आठवणींसाठी. त्या आठवणींना उजाळा तर मिळालाच, शिवाय चित्रपट बघून समाधानही मिळालं.
हेमंत ढोमे याने या चित्रपटाचं लेखन केलंय आणि दिग्दर्शनही केलंय. आज मराठी शाळा एकापाठोपाठ एक बंद होत असताना त्या बंद पडू नयेत म्हणून लेखकाची तळमळ यातून जाणवते. शिक्षकाचं समर्पण, निष्ठा, याबरोबरच शहरापासून ते खेड्यापर्यंत शिक्षण क्षेत्राचं बदलत जाणारं चित्र.... विषय गंभीर असला, तरी या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की कुठेही तो कंटाळवाणा होऊ दिलेला नाही. चित्रपटातली पात्रं, त्यांच्यातलं नातं, त्यांच्यातला संवाद आणि त्यातून घडणारे विनोद यामुळे कथानक गती घेत राहतं. चित्रपटातलं रत्नाकर मतकरी लिखित ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे गाणं म्हणजे ‘अहाहा’ असं म्हणत थिएटरमध्येच आपणही थिरकायला हवं असं वाटणारं. माझ्याबरोबर सगळी तरुणाई होती. त्यामुळे शेजारी बसलेला दीपक हा तर गाणं सुरू होताच, ‘दीपाताई, चला आपण पण नाचूया’ असं म्हणत खुर्चीवरून उठू बघत होता. त्याला जबरदस्तीने बसायला लावलं.
चित्रपटातली सचिन खेडेकरची भूमिका आणि त्याचे डॉयलॉग विचार करायला लावणारे होते. कामं सगळ्यांचीच चांगली झाली असली, तरी अमेय वाघने आपली छाप या चित्रपटावर सोडलीय. त्याचे आणि त्याच्या मुलाचे प्रसंग खूपच चांगले टीपले आहेत. माझा आणि माझ्या मुलाचा लाडका पुष्कराज चिरपुटकर थोडा वेगळ्या रुपात बघायला मिळाला. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो कुठल्याही भूमिकेत शोभून दिसतो आणि त्याच्या अभिनयात सहजता जाणवते. खूप दिवसांनी अनंत जोग यांना खलनायकाच्या भूमिकेत बघायला मिळालं. क्षिती जोगचं अधिकारी असणं भावलं, तर सिद्धार्थ चांदेकरही खूप फ्रेश वाटला. प्राजक्ता कोळी, कादंबरी कदम, निर्मिती सावंत आणि चिन्मयी सुर्वे यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिलाय. धनू/धनंजय सरदेशपांडे याची शाळेच्या प्युनची भूमिका इतकी खरीखुरी वाटली की क्या कहने.
खरं सांगायचं झालं, तर आपणही मराठी शाळेत शिकलो याचा अभिमानच वाटला. हा चित्रपट बघताना प्रत्येकजण आपापल्या शाळेत पुन्हा एकदा जाऊन येईल, जशी मीही एक सैर करून आले. मला आठवल्या, आमच्या शारदा मंदिरच्या पीटीच्या शिस्तशीर भागवत बाई, विज्ञान शिकवणाऱ्या करंदीकर बाई, रसाळ बाई, दाते बाई...खरं कितीजणींची नावं घ्यावीत? मधली सुट्टी, मैत्रिणींबरोबर डबा वाटून खाणं आणि कधी रुसवाफुगवाही निभावणं, शाळेबरोबरची गोव्याची सहल, सहलीमध्ये बाईंनी घेतलेली काळजी, शाळा सुटली की जिन्यावरून धडधड आवाज करत पायऱ्या उतरणं, स्नेहसंमेलनात नाचता येत नसतानाही भाग घेणं, शाळेच्या भित्तिपत्रकाचं संपादक होऊन ते चांगलं कसं होईल यासाठी धडपड करणं....खरोखरंच, शाळेने आपल्याला काय दिलं याचा विचार करताना आज आपण जिथे आहोत त्यात शाळेचं आणि तेही मराठी शाळेचं योगदान किती आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
हेमंत ढोमे तुमच्याबद्दल खरोखरंच अभिमान दाटून आला. आता थांबायचं नाय नंतर क्रांतिज्योति विद्यालय हा चित्रपट समाधान देऊन गेला. असे विषय हाताळले पाहिजेत. मला ठाऊक आहे, जे चित्रपटात दाखवलं अगदी तसंच, (शिक्षणमंत्र्याने शाळेत येणं वगैरे.) म्हणजे सगळं छान छान, सुखद असं वास्तवात असं घडताना दिसत नाही. मात्र असं जरी आजचं चित्र असलं, तरी हेमंत ढोमेने बघितली, तशी स्वप्नं बघायलाच हवीत, ती स्वप्नं दुसऱ्यांनाही दाखवायला हवीत आणि स्वप्नं बघितली की ती साकारण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं हे मात्र नक्की.
क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम टीम जिंदाबाद, मराठी शाळा जिंदाबाद.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment