आउटहाऊस
आउटहाऊस
दोन लेख लिहून संपले आणि ते मेल केल्यावर एक प्रकारचा बधीरपणा आला. मग हॉलमध्ये शांतपणे बसून टीव्ही ऑन केला. प्राईमवर चित्रपटांची नावं दिसायला लागली. त्यात साउथचा ‘थ्री बीएचके’ दिसला, मग राजकुमार रावचा ‘मालिक’ दिसला. दोन दोन मिनिटं ओझरती नजर टाकून ते चित्रपट बंद केले, आणि मला एकदम स्क्रीनवर ‘आउटहाऊस’ हा चित्रपट दिसला. कोणाचा आहे, कसा आहे, काहीही न बघता मी रिमोटने क्लिक केलं आणि बघायला सुरुवात केली.
‘आउटहाऊस’ बघता बघता मी इतकी खुश झाले, इतकी खुश झाले की मन प्रफुल्लित तर झालंच झालं, पण आता हा चित्रपट मी कमीत कमी दहा वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा बघू शकेन. म्हणजे बघेनच.
यात आहे शर्मिला टागोर. या बाईची एक कमालच आहे. तिचं जसजसं वय वाढत चाललं आहे, तसतसा तिच्यातला ग्रेस देखील वाढतो आहे. तिने राखलेला बांधा, तिचं साधेपण, तिच्या दिसण्यातली एक नजाकत आणि तिच्या अभिनयातला सहजपणा...या बाईला खरंच तोड नाही. तिच्या जोडीला आहेत आपले द ग्रेट डॉ. मोहन आगाशे. एक व्रात्य, खोडकर, विक्षिप्त वागणारा बिलंदर म्हातारा.
‘आउटहाऊस’ ची निर्मिती या बिलंदर म्हाताऱ्याचीच आहे. कथा, पटकथा, संवाद, सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांचे. दिग्दर्शन आणि गाणी सुनिल सुकथनकर यांची. चित्रपटाचं कथानक इतकं मस्त आहे की स्टोरी सांगायचा मोह आवरत नाहीये. पण सांगत नाही. कारण या चित्रपटाचा अनुभव ज्याचा त्याने घ्यायला हवा.
चित्रपटात काय आहे? डॉ. मोहन आगाशेंनी रंगवलाय पुण्यात एकटा राहणारा, पुणेकरांचे करामती गुण असलेला एक म्हातारा. मुलगा मुंबईला त्याच्याकडे राहायला बोलावून बोलावून थकला, पण हा हट्टी म्हातारा जायला नकार देतोय. शर्मिला टागोर यानेकी आदिमा राय फाटक ही देखील एक आज्जी असून आपलं जीवन अतिशय सकारात्मक पद्धतीने समजून उमजून जगणारी एक चित्रकथा चितारणारी आर्टिस्ट/चित्रकार आहे. चित्रपटातली आदिमा म्हणजे शर्मिला टागोर आणि नाना मोडक म्हणजे मोहन आगाशे हे दोघंही एकटे असले, तरी त्यांना त्यांचा स्वतंत्रपणा जपत आनंदात जगायचंय. आदिमाच्या जीवनात तिचा सहा-सात वर्षांचा नातू आणि त्याचा कुत्रा पाब्लो येतात आणि तिच्या जगण्यात काय बदल होतो ते या ‘आउटहाऊस’ चित्रपटात दाखवलं आहे. तसंच मोहन आगाशेमधला नाना मोडक याच्या एकट्या जगण्यात शुगर नावाच्या कुत्र्याचा प्रवेश होतो आणि त्याच्यातला जेम्स बाँड कसा जागा होतो हे सगळं बघणं खूपच सुखद आहे. आपण लहानपणी चित्रकथा/कॉमिक्स वाचायचो तशीच ‘आउटहाऊस’ची ही गोष्ट टीपलेली आहे. बघताना खूप मज्जा येते. यातलं आजी आणि नातू यांच्यातलं नातं मला इतकं भावलं की अशी आजी प्रत्येक घरात असायला हवी. शर्मिला टागोरमधली आजी नातवाबरोबर त्याच्याच वयाची होते आणि त्याची असिस्टंट बनून त्याच्या आदेशाचं पालन करते, ते बघताना काय वाटलं हे शब्दांत सांगणं केवळ अशक्य.
हा चित्रपट म्हणजे खरोखरच इतका अप्रतिम आहे, की छोटंसं कथानक रोजच्या जगण्यातल्या इतक्या सुंदर बाजूंना स्पर्श करतं आणि जगणं प्रकाशमय करतं. वय कितीही वाढलं, तरी त्या माणसातलं दडलेलं एक लहान मूल इथे सापडतं. यात डिटेक्टिव्ह, त्याची असिस्टंट आणि जेम्स बाँड मजा आणतात. मला तर सत्यजीत रे यांच्या मुलांसाठीच्या कथा हा चित्रपट बघताना आठवल्या.
या चित्रपटाचं शीर्षक ‘आउटहाऊस’ अनेक गोष्टींचं प्रतीक म्हणून वापरलं आहे. नको असलेली अडगळ ठेवण्याचं ठिकाण, आठवणींचे पेटारे ठेवण्याची जागा, तरीही त्याची असणारी आवश्यकता. असं बरंच काही सांगणारं ते प्रत्येकाच्या मनातलं स्वतंत्र ठिकाण असतं.
यात आपली सिनियर सोनाली कुलकर्णी, नीरज काबी, प्रदीप जोशी, सिम्बा कुत्रा, सुनिल अभ्यंकर आणि जिहान यांच्या भूमिका आहेत. सुनिल सुकथनकर यांचं दिग्दर्शन कमाल आहे! जरूर जरूर बघा, अमेझॉन प्राईमवर ‘आउटहाऊस’ (मनाला प्रकाशमय करणारं एक लाईटहाऊस!)
दीपा देशमुख
Add new comment