आरपार

आरपार

आरपार
ललित प्रभाकर हा माझा अत्यंत आवडता अभिनेता असल्यामुळे त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘आरपार’ हा चित्रपट बघणं आवश्यकच होतं. तसं आजचे अनेक अभिनेते, त्यात चैतन्य सरदेशपांडे, पुष्कराज चिरपुटकर, सिद्धार्थ मेनन, गिरीश परदेसी, वैभव तत्ववादी मला आवडतात. ललितचे  यापूर्वी चि. व चिसौंका, झोंबिवली, स्माईल प्लीज, आनंदी गोपाळ, हम्पी, असे काही चित्रपट मी बघितले होते. पण हा चित्रपट काही वेगळाच आहे. एक सुखद अनुभव देणारा. आजच्या तरुणाईची गोष्ट सांगणारा आहे. प्रेमात कोण काय सल्ला देत यापेक्षा मन काय कौल देत हे सांगणारा...प्रेमाचा खरा अर्थ प्रेमाचा प्रवासच सांगू शकतो याचा अनुभव देणारा. 
अमर आणि प्राची दोघांची भेट आणि त्यांचं प्रेम बहराला येतं. इथून पुढे त्यांच्या प्रेमकथेचा प्रवास सुरू होतो. ललित प्रभाकर एकदम आपला मराठीतला शाहरूख खान वाटायला लागतो. तरीही तो त्याची नक्‍कल केल्यासारखा वाटत नाही. त्याची डॉयलॉग डिलिव्‍हरी कुठेही कृत्रिम वाटत नाही. हृता दुर्गुळे हिने त्याला उत्तम साथ दिली आहे. अगदी तोडीस तोड जोडी.
यात प्रेमाबरोबरच वेगवेगळे विषय येत राहतात. तरुणांमधली परिणामांची चिंता न करण्याची बेपर्वा वृत्ती, त्याचबरोबर त्यांच्यातली अफाट ऊर्जा आणि परिपक्वतेच्या अभावामुळे हिंसेकडे वळण्याचा अपघात होण्याचा धोका, प्रबळ मालकीहक्‍काची भावना, योनिशूचितेचं बिंबवलं गेलेलं महत्व आणि त्यातून मनाची झालेली उलघाल, यातून अनेक शेड्स प्रेक्षकांना जाणवत राहतात. मुख्य म्हणजे दिग्दर्शक गौरव याला जे सांगायचंय, दाखवायचं ते प्रेक्षकांपर्यंत व्‍यवस्थित पोहोचलंय.
चित्रपट कुठेही कंटाळवाणा नाही, चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतसं त्याच्यातल्या गांभीर्याबरोबरच खुसखुशीतपणाही अबाधित ठेवण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं आहे. खरं तर शेवटची श्रेयनामावली आली तरी खुर्चीतून उठावंसं वाटत नाही. कारण ‘अरे जमलं, जमलं, 36 गूण’ अनुभवण्याचा आनंद घ्यायचा असतो.
ललित प्रभाकर, हृता दुर्गुळेसह माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, सुनिल सुकथनकर, या सर्वच कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. माधव अभ्यंकरांचा अभिनय त्यांच्या डोळ्यांमधून दिसतो. चित्रपटातले बापलेक खरोखरंचे बापलेक असावेत असं वाटायला लागतं. माझा लाडका पुष्कराज चिरपुटकर या एकाच प्रसंगात ओझरता दिसतो, पण त्याला बघून मी जाम खुश झाले. तसाच यशोधन गोखले हाही अगदी क्षणभर येतो, पण तोही आपल्या भूमिकेत सहजपणे सामावला आहे. प्राचीची मावशी, अमरची बहीण, त्याचे मित्र, अमरची होणारी बायको आणि विशेष म्हणजे शमीन हा तरूणही भाव खाऊन जातो.
एकूणच ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असं असतानाही ‘आर या पार’ची  खुमखुमी असलेल्या सगळ्यांनाच ‘आरपार’ हा चित्रपट आवडेल. ओठांवर हलकं हसू आणि ताजतवानं होण्यासाठी जरूर बघा.
दीपा देशमुख.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.