टेक केअर गूड नाईट
अॅमेझॉन प्राईमवर आत्ताच ‘टेक केअर गूड नाईट’ हा ७ ऑक्टोबर २०१८ या दिवशी प्रदर्शित झालेला चित्रपट बघितला. सायबर क्राईमचं प्रमाण कशा रीतीनं वाढतं आहे आणि त्याच्याविरुद्ध लढायचं असेल तर आपल्यालाही नवीन तंत्रज्ञानाशी दोस्ती करावी लागेल. ‘मी नवीन बदल स्वीकारणार नाही, मी आहे तसाच राहीन’ असं म्हणून चालणार नाही.
नवरा, बायको, त्यांची मुलगी आणि अमेरिकेत शिकायला गेलेला एक मुलगा असं चौकोनी कुटुंब! यातला कर्ता पुरुष म्हणजे सचिन खेडेकर नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारत नाही. त्याला साधी ई-मेल करायची तरी खूप मोठी समस्या वाटत असते. सरळ स्वेच्छा निवृत्ती पत्करून तो आपल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करायच्या ठरवतो. तो आणि त्याची बायको इरावती हर्षे दोघंही युरोपच्या टूरला पंधरा दिवसांसाठी जाऊन येतात. परत येताच क्षणी त्यांच्यावर एकामागोमाग एक आघात होत जातात. त्यांच्या बँकेच्या अकाउंटमधून पन्नास लाख रुपये ऑन लाईन ट्रॅन्झॅक्शनने काढले गेलेले असतात. मुलीचा अश्लील व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केलेला असतो. या व्हीडिओचे एकामागोमाग एक पार्ट्स अपलोड केले जाणार असतात....ही आणि अशी अनेक संकटांची मालिकाच एकापाठोपाठ एक सुरू होते. हादरलेला सचिन खेडेकर सायबर क्राईम विभागात तक्रार नोंदवतो. पोलीस तपास सुरू करतात.
आयुष्यातली सगळी पुंजीच गायब झाल्यामुळे हतबल झालेला सचिन खेडेकर इथं बघायला मिळतो. त्याचं चिडणं, त्याचं आक्रमक होणं, त्याचं नैराश्य, त्याचं इतरांना समजून घेणं हे सगळं वेगवेगळ्या प्रसंगातून दिसत राहतं. त्याला प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करणारी इरावती त्याला कोसळू देत नाही. याच वेळी या वेगाच्या प्रवासात कुटुंबाचं एकमेकांकडे झालेलं दुर्लक्ष, एकमेकांमधला तुटत जाणारा संवाद असं खूप काही लक्षात येतं. तरीही स्वतःला सावरून हे कुटुंब या संकटाला तोंड कसं देतं हे या चित्रपटात बघायला मिळतं. चित्रपटाचा शेवट मला आवडला. यात पर्ण या कुटुंबाची मुलगी निर्भिडपणे सत्याला सामोरं जायला वडिलांना उद्युक्त करते तेही अगदी सहजपणे मला तो प्रसंग खूपच आवडला.
या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, आणि महेश मांजेरकर यांच्या भूमिका आहेत. सगळ्यांचीच कामं छान झाली आहेत. खरं तर सगळ्यांचाच अभिनय खूप सहजसुंदर आहे. इरावती खूपच गोड आहे, मला ती नेहमीच आवडते. पर्ण पेठेनं मानसशास्त्रातलं शिक्षण घेतलं असून तिचं करियर मात्र अभिनयात घडताना दिसत आहे आणि त्याचं कौतुकही आहे. सचिन खेडेकर छानच, महेश मांजरेकरची भूमिका खूपच वेगळी आहे. आपण चित्रपटात एकतर भ्रष्ट पोलिस अधिकारी पाहतो किंवा फारच प्रामाणिक आणि दहा गुंडांना एकाच वेळी मारू शकणारा असा! मात्र महेश मांजेरकर हा पोलीस अधिकारी अगदी तुमच्या आमच्या घरातला वाटतो आणि तो दहा गुंडांनाही एका वेळी मारत नाही, तक्रार घेऊन येणार्यांशी असलेली त्याची सौहार्दपूर्ण वागणूक बघून मन सुखावतं. पोलिस स्टेशनची पायरी चढायची भीती महेश मांजरेकरमधल्या अधिकार्यानं कमी केली आहे हे मात्र खरं!
नवीन आव्हानाला तोंड देणारी नवी पिढी, त्याचबरोबर बुद्धिमत्ता असूनही नोकरी मिळत नसल्यामुळे गुन्हेगारीकडे वळणारी देखील तरुण पिढी, तरीही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत या सगळ्या नवीन आव्हानांना तोंड देत, सामोरं जात जगायचं आहे, नवीन तंत्रज्ञानाला न घाबरता ते आत्मसात करूया, त्याबद्दलची सावधगिरी बाळगूया आणि पुढे जाऊ या, असे विचार चित्रपट संपल्यावर मनात येतात. जरूर बघा, ‘गूड नाईट टेक केअर’!!!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment