जुळी भावंडं !!!
आम्ही दोघं खरं तर जुळी भावंडं, सिनेमातल्या डबलरोलसारखी! अमिताभ बच्चन, शाहरूख खान, हेमा मालिनी किती किती जुळ्या बहिणी अणि भाऊ सिनेमामधून पाहिले असतील, नसतील. आम्ही पण तश्शीच! पण छे, सिनेमात जशी ती एकदम डिट्टो एकसारखी दाखवतात, तशी आम्ही मुळीच नाहीत. म्हणजे मी एक मिनिट आधी जन्मले म्हणून मी मोठी! आणि तो एक मिनिट उशिरा जन्मला म्हणून तो लहान! आम्ही दोघं दिसायलाही मुळीच सारखे नाहीत. तो गोरापान! आईसारखा! मी बाबांसारखी सावळी, मजबूत! या दिसण्यावरून येता-जाता जो येईल तो सनीला पाहिलं की म्हणतो, 'किती सुंदर आहे हा, अगदी आईचं रूप घेऊन आलाय. आणि हिच्या जन्माच्या नेमक्या वेळी हिच्या आईनं कोणाची आठवण केली होती कोणास ठाऊक म्हणून पोरीनं काळं रूप घेतलं. आता लग्नाच्या वेळी वांधेच होणार!'
रंगांमधला फरक मला खूपच लवकर समजायला लागला. इतका की मला काय चांगलं दिसणार नाही याची सगळे नातेवाईक मिळून यादीच करत बसत आणि सनीला मात्र काय, त्याला काहीही घातलं तरी ते गोडच दिसणार ना! असाच सूर सगळ्यांचा असायचा. लहान असताना त्यालाच सगळे घेत. मला कोणीतरी कडेवर घ्यावं म्हणून मग मी भोकाड पसरायची, तर आई धपाटे घालत म्हणायची, 'आधीच रूप असं घेऊन जन्मलीस, जरा पोरीसारखं नीट वाग की. एवढं आकांडतांडव केल्यावर कोण तुला घ्यायला धजावेल.' नंतर नंतर तर मला सवयच लागली, की ‘नाही घेत ना नक्काच घेऊ. माझं काही अडलं नाही तुमच्यावाचून! गेलात उडत!’
आम्ही मोठे होऊ लागलो, चालू लागलो, बोबडी बडबड करू लागलो. मला अकालीच पोक्तपणा आला होता की काय कोणास ठाऊक! पण मी स्पष्ट उच्चार करत बोलायला शिकले. पण सनी मात्र सुरूवातीला बोबडंच बोलत असे. आता माझ्या स्पष्ट बोलण्याचं कौतुक व्हायला काय हरकत होती बरं? पण नाही तिथेही सनीलाच मार्क्स जास्त! मला ‘बरं आज्जीबाई’ म्हणून कौतुकाऐवजी दुर्लक्ष आणि सनीशी बोलताना मात्र ही सगळी मोठी मंडळी त्याच्यासारखंच बोबडं बोलून त्याच्याशी गप्पा मारत. मग सहन न होऊन जर मी माझा निषेध मोठ्या आवाजात नोंदवला तर चुकलं कुठे? त्यावर येता जाता धपाटे!
आता आमची शाळेत जायची वयं झाली होती. घराच्या जवळच शाळा होती. पण आईनं हट्ट धरला की मुलांना त्या दूरच्या बसमधून जायच्या शाळेत टाकायचं. पिवळ्या रंगाची ती बस, पिवळ्या रंगाचे ते युनिफॉर्मस आणि इंग्रजी माध्यमातली ती शाळा! फी की काय ती पण जब्बर होती अशी चर्चा मी आई-बाबांची ऐकली. दोघांची चांगलीच जुंपली. जवळ जवळ ८ दिवस आमच्या शाळेवरून वाद झाला. ‘फीस परवडणार नाही’ असं बाबांचं म्हणणं. मग ‘पोरं जन्माला घातलीच कशाला?' असं आईचं म्हणणं. त्यावर ‘एकच जन्माला पोर आलं असतं तर प्रश्न सहज सुटला असता’ असं बाबांचं उत्तर! सनी आणि मी दोघंही टकाटक दोघांकडे बघत राहायचो. दुसरं आम्ही करणार तरी काय? शेवटी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ आली आणि आई आणि बाबा एक दिवस सनीला घेऊन कुठेतरी गेले. परत आले तेव्हा त्याला पिवळ्या रंगाचा तो युनिफॉर्म, टाय सगळं काही घेऊनच आहे. ते तिघंही खूपच खुशीत होते. कदाचित एकाएकावर पैसे खर्च करणार असतील म्हणून त्याला आधा सगळं काही त्याच्यासाठी आणलं असावं. पण दुसर्या दिवशी घरासमोर ती पिवळी बस येऊन थांबली आणि एकटाच सनी ऐटीत मला वेडावून जाऊ लागला, तेव्हा मी जमिनीवर लोळण घेत माझा तीव्र निषेध नोंदवला. तेवढ्या वेळात सनी त्या बसमध्ये गुडूप होऊन गेलाही असता, हे लक्षात येताच मी जमिनीवरून फ्रॉक झटकत उठले आणि बसच्या दाराच्या दिशेनं धाव घेतली. तेव्हा ड्रायव्हर आणि कंडक्टरने जोरात गाडी सुरू केली. सनी माझ्याकडे खिडकीतून बघत दिसेनासा झाला.
मला त्याच वेळी अपमान काय असतो हे लक्षात आलं. माझीच आई, माझचे बाबा पण सनीच्या शाळेत त्यांनी मला टाकलं नव्हतं. खरंतर मी एक मिनिटांनी मोठी होते ना, मग पहिला अधिकार माझाच होता की! मी त्याच शाळेत जायचं म्हणून हट्ट धरून बसले, जेवले नाहीच. आईनं समजूत घालायचा प्रयत्न केला, पण मी मुळीच बधले नाही. खरं तर मी हट्टी नव्हते, पण तेव्हापासून हट्टी हे लेबल माझ्यावर कायमचं चिकटलं गेलं. मला मारून धोपटून तयार केलं आणि जवळच्या शाळेत माझी रवानगी करण्यात आली. शाळा जवळच असल्यामुळे मला चालतच जावं लागलं. मधल्या सुट्टीत घरी यायची सूचना करण्यात आली. ना डबा, ना वॉटरबॅग! मला तर शिकूच नये असं वाटायला लागलं. पण हळूहळू मी त्या शाळेत रमले. घराच्या बाजूलाच झोपडपट्टी होती. तिथलीही काही मुलं शाळेत येत. त्यांना खूप शिव्या येत. म्हणजे त्या शब्दांना शिव्या म्हणतात हेच मला मुळी माहीत नव्हतं. मला त्या ऐकताना खूप मजा वाटायची. एक दिवस घरी जेवायला बसल्यावर आईनं सनीला आधी पोळी वाढली तेव्हा मी राग येऊन म्हटलं, 'अगं, सटवे आधी मला वाढ की पोळी!' झालं, आई आणि बाबांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. एक क्षण आईला काही सुचलंच नाही आणि दुसर्या क्षणी मात्र तिने हातातलं उलथनं गॅसवर गरम केलं आणि सरळ मला चटकाच दिला. मी जोरात किंचाळले, तशी ती म्हणाली, 'शिव्या देतेस? आईला? याच्यासाठी जन्माला घातलं का तुला? अग कसला सूड घेतेस? सनीच्या शाळेत घातलं नाही त्याचा?'
खरं तर असा मी कुठलाच विचार केला नव्हता, मी नवीन शब्द शिकले त्याचा फक्त वाक्यात उपयोग करून बघत होते. इतकंच. राहिला प्रश्न शाळेचा. मी कुठे आता त्यावर चकार शब्द बोलत होते? पण तेव्हापासून सनी आणि माझ्यात खूपच बदल होत गेले. तो सतत इंग्रजीतून काय काय प्रश्न आई-बाबांना विचारायचा आणि तेही त्याच्याकडे थोडं जास्तच लक्ष द्यायचे. मला एकदम तो न्यूनगंड म्हणतात की काय तसा वाटायला लागला. मग ती तिघं एकत्र असली, की मी त्यांच्यात जाणंच सोडून दिलं. पण त्यातून चांगला अर्थ काढण्यापेक्षा आई ओरडून म्हणायची, 'बघा बघा, हिला शिव्याच बर्या वाटतात ना, चांगलं कानावर पडलं तर पाप लागेल हिला.' माझ्या मराठी शाळेत मी अभ्यास करू लागले, शिव्याही शिकू लागले आणि मजाही करू लागले. एवढंच काय, पण खेळातही भाग घेऊ लागले. त्या बाजूच्या झोपडपट्टीतल्या माझ्या नव्या मित्रमैत्रिणींकडेही जाऊ लागले. ते मात्र चोरूनच हं. कारण मी तिकडे जाते म्हटल्यावर वाईट वळण लागलं असं काहीतरी ही लोकं बडबडतील अशी भीती मला वाटत होती आणि एक दिवस ते खरं झालंच.
आमच्या कामवाल्या मावशी त्याच झोपडपट्टीत राहायच्या. त्यांनी सुमी आणि गोप्याकडे मला पाहिलं आणि आईजवळ कागाळी केली. आईनं बाबांना सांगितलं आणि दोघांनी मिळून मला चांगलच फैलावर घेतलं. त्यानंतर माझ्यावर थोडी कडक नजर ठेवण्यात आली. हळूहळू अभ्यास, गृहपाठ आणि घरातली कामंही मी शिकले. आईला स्वयंपाकात मदत करू लागले. खरं तर स्वयंपाक करणं मला अजिबात आवडत नसे. पण नाही शिकले तर लग्नानंतर माहेरचा उद्धार होईल अशा उपदेशांमुळे मी एकदाची तो शिकले. त्यात सनीला बर्यापैकी सूट होती. कारण एकतर त्याची शाळा लांब, परत इंग्रजीचा खूप सारा अभ्यास, कसले कसले प्रोजेक्ट्स! तो स्वयंपाकघराकडे फिरकायचा देखील नाही. त्याने देखील हे शिकावं असं मला मनापासून वाटायचं. पण या गोष्टीबद्दल ना आई बोले, ना बाबा!
बघता बघता आम्ही दोघंही दहावी पास झालो. मी ६०% मार्क्स मिळवून आणि सनी ९२% घेऊन! अर्थातच, सनीचं जास्त कौतुक झालं. पोरंग मेहनती निघालं अशा कॉमेट्स आल्या. शाळेपासूनच फरक झाल्यामुळे अर्थातच कॉलेजही आमची वेगवेगळीच होती. तो सायन्सला! मी हट्ट धरला तरी मला कोणत्याही सायन्स कॉलेजला प्रवेश मिळणार नव्हता आणि रूप नाही, बुद्धी नाही मग कशाच्या जोरावर एवढ्या उड्या आणि हट्टीपणा असा सूरही सर्वत्र उमटू लागला. मी कोणताही त्रागा न करता कला शाखेत प्रवेश घेऊन टाकला.
Add new comment