डॉ. आनंद नाडकर्णी  - ‘तुमचे आमचे सुपर हीरो’

डॉ. आनंद नाडकर्णी  - ‘तुमचे आमचे सुपर हीरो’

डॉ. आनंद नाडकर्णी - मनोविकार ते मनोविकास - ‘तुमचे आमचे सुपर हीरो’ या चरित्रमालेतला काही भाग .....
डॉ. आनंद नाडकर्णी हे मानसोपचारतज्ज्ञ! मनाच्या विकारांचे डॉक्टर! आणि आपल्याकडे मानसिक आजारांबद्दल तर प्रचंड प्रमाणात पूर्वग्रह आहेत. मनोविकाराने ग्रस्त झालेले लोक म्हणजे चक्क वेडे असा सर्वसाधारण समज पूर्वी होता आणि काही प्रमाणात आजही आहे. त्यातच मनोविकारांवर उपचार करणारे सायकिऍट्रिस्ट म्हणजे ‘वेड्याचे डॉक्टर’ हाही ग्रह तितकाच पक्का! शरीराचे जसे आजार असतात, तसेच मनाचेही असतात आणि योग्य उपचार मिळाला, की ते बरे होऊ शकतात हे लक्षातच घेतलं जात नाही. भारतासारख्या १२० कोटी लोकसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या देशात आज फक्त ६५०० मनोविकारतज्ज्ञ आहेत आणि तेही ठरावीक शहरांमध्येच प्रॅक्टिस करताना दिसतात. याचा परिणाम असा होतो, की येणारे पेशंट जास्त आणि त्या तुलनेत डॉक्टर्स कमी त्यामुळे अतितीव्र मानसिक विकारांच्या लक्षणांकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही. त्यातही उपचार खूप उशिरा सुरू केले जातात. त्या आधी इतर उपायांवर भर दिला जातो. त्यामुळे दुखणं वाढतच जातं. मनोविकारांबद्दलचं अज्ञान दूर करणं आणि उपचारांचा उपयोग काय आहे हे समजावून घेणं आणि सांगणं याकडे विशेष लक्ष दिलंच जात नाही.
मनाचे आजार झालेली माणसं मुळात ‘शहाणी’ असतात. हे गृहितक मनाशी धरून मनोविकारांबद्दल समाजात जाणीव निर्माण करणं, मनोविकारग्रस्तांवर उपचार करून त्यांना पुन्हा उभं करणं आणि आजच्या धकाधकीच्या काळातल्या तणावांना झेलण्यास माणसांना समर्थ बनवणं हे डॉ. आनंद नाडकर्णी यांचं ध्येय आहे. म्हणजेच खर्‍या अर्थाने ते ‘शहाण्यांचे सायकिऍट्रिस्ट’च आहेत. 
डॉ. आनंद नाडकर्णी यांची ठाणे येथे असलेली ‘आयपीएच (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ)’ ही संस्था महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या नकाशावर आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवून उभी आहे. ‘‘आपण ज्या मुक्कामावर निघालो, त्या रस्त्यावरचा गुलमोहोरची बघायला हवा’’ असं म्हणणार्‍या डॉ. आनंद नाडकर्णी या माणसामध्ये इतकं वेगवेगळं काम करताना ही अफाट ऊर्जा येते कुठून? त्यांना प्रेरित करणारी माणसं कुठली असतील? सदैव उत्साही असलेला हा माणूस चहूबाजूंनी आनंद कसा पसरवत जातो? या आनंदाची बीजं डॉ. आनंदमध्ये कशी रूजली गेली असतील? 
 डॉ. आनंद नाडकर्णी हे एक अत्यंत कुशल असे प्रशासक आहेत. आयपीएचचं आज २५० माणसांचं कुटुंब आहे. प्रत्येक विभागाकडचं सिस्टिम ओरिएंटेशन करणं, एकाच वेळी अनेक उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करणं डॉक्टर करत असतात. डॉक्टरांबरोबर त्यांचे अनेक सहकारी १५ ते २५ वर्षांपासून एकत्रित काम करत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तरुणांसाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी होणारा ‘वेध’ उपक्रमाचा परिवार या सगळ्यांबरोबर डॉक्टर मैत्रीच्या धाग्यात बंाधलेले आहेत. 
आयपीएच संस्था स्वतःच्या पायावर भक्कम उभी असली पाहिजे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी इंडस्ट्रियल क्षेत्रात भाषणं देणं, सीडी आणि डीव्हीडी माध्यमांतून अनेकांपर्यंत पोहोचणं यातून आयपीएचसाठी निधी उभारणी करणारे डॉक्टर हे एक कुशल फंड रेझरही आहेत. निधी उभारणीसाठी त्यांच्याकडे अनेक नावीन्यपूर्ण, कल्पक असे मार्ग असतात. अतिशय कडक असं आर्थिक नियोजन ते करत असतात. रुग्णांना सेवा कमी शुल्कात दिली पाहिजे, पण व्यवसायाच्या दृष्टीनं अपयशही यायला नको याचा ताळमेळ घालणं डॉक्टरांनाच जमू जाणे. त्यातच आयपीएचसाठी काम करणारे स्वयंसेवकही टिकून राह्यला हवेत. हे सगळं करण्यासाठी, या सगळ्यांना जोडून ठेवण्यासाठी एका उत्कृष्ट संघटकाची भूमिका ते बजावत असतात. आज आयपीएचची स्वतःच्या मालकीची ६५०० स्क्वे. फू. ची जागा आहे आणि विशेष म्हणजे त्यावर कर्ज नाही. आज भारतातल्या अग्रगण्य समजल्या जाणार्‍या कंपन्यांना प्रशिक्षण देणं, सल्ला देणं अशी अनेक कामं डॉक्टर करत असतात. आयएनडीओसीडी रेमेडिज च्या संचालक मंडळावर डॉक्टरांची स्वतंत्र संचालक म्हणून निवड झालेली आहे. डॉक्टरांना अनेक मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे.
डॉक्टरांनी आपल्या वडिलांमधला शिक्षक स्वतःमध्येही जागा ठेवला आहे. म्हणूनच आरईबीटी असो, औद्योगिक क्षेत्रांतलं प्रशिक्षण असो, पालकांना मार्गदर्शन असो वा शिक्षकांची कार्यशाळा असो ते या सगळ्यांत रंगून जातात. आजच्या वेगाच्या आणि स्पर्धेच्या या जगात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तरुण सायकिऍट्रिस्टची आवश्यकता आहे. त्यांना तयार करण्याचं काम डॉक्टर करत आहेत.  डॉक्टरांच्या वाणीतून नाट्यमयता आणि नर्मविनोदांची पखरण होत असते. अनेक संदर्भ त्यांच्याजवळ उपलब्ध असतात. मुख्य म्हणजे त्या त्या योग्य वेळी त्यांना ते सुचतात. 
डॉक्टरांचं काटेकोर व्यवस्थापन असतं म्हणूनच त्यांचा दिवसाचा प्रत्येक मिनिट मोलाचा असतो. या काटेकोरपणाची किंेमतही त्यांना मोजावी लागतेच. वेळेचं नियोजन करताना डॉक्टरांना कौटुंबिक कार्यक्रमांना कमी वेळ देता येतो. तसंच नाटकं, सिनेमे यांनाही आपल्या दैनंदिनीमधून वगळावं लागतं. पण या गोष्टीची त्यांना मुळीच खंत वाटत नाही. 
आजपासून पंचेचाळीस वर्षांपूर्वी ‘मानसिक आरोग्य’ या विषयाची व्याख्याही नीटपणे झाली नव्हती. मनोविकारांच्या लक्षणांवर उपचार करणारा तो मनोविकारतज्ज्ञ असंच समजलं जात असे. मानसिक विकार या विषयाभोवतालचं अज्ञान-अंधश्रद्धा यांचे आवरण खूपच गडद होतं. अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही शाखा निवडली.
पदव्युत्तर शिक्षणाच्या पहिल्या वर्षांतच संस्थात्मक कार्याचं स्वप्न डॉक्टरांनी पाहिलं. त्यातूनच आयपीएच या संस्थेची उभारणी झाली. समाज आणि मनोविकार यामधली दरी बुजवणारी ही संस्था ठरली. खरं तर अशा प्रकारची संस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात नव्हती. आयपीएच संस्थेचं ब्रिदवाक्यच आहे - सुदृढ मन सर्वांसाठी. मानसिक आरोग्याचे स्तर - विकार, विवशता आणि विकास या तिन्हींना एकत्रित करणारा प्रयोग म्हणजे सुदृढ मन सर्वांसाठी. खरं तर असा प्रयोग भारतात आयपीएच या संस्थेने सर्वप्रथम केला. डॉक्टर गाणी लिहितात, गातात या गीतांना चालीही तेच लावतात. तसंच ते नाटकं लिहितात. मनाच्या विविध शाखांवर पुस्तकं लिहितात. त्यांच्या व्याख्यानमालेच्या अिाण अनेक उपक्रमांच्या डीव्हीडीज तयार झाल्या आहेत. जेणेकरून दूरदूरवरच्या लोकांना त्याचा लाभ घेता येतो. गाणी, नाटक, पुस्तकं, डीव्हीडीज, चित्रपट, वक्तृत्व ही सगळी कौशल्यं डॉक्टरांकडे आहेत. या सगळ्या कौशल्यांना एकत्रित करून त्यांची आपल्या ध्येयाबरोबर सांगड घालून डॉक्टरांचा प्रवास चालू आहे.
डॉक्टरांनी मनाचं आरोग्य राखण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले. ज्या वेळी रुग्णाला मानसिक विकाराशी सामना करावा लागत होता, त्या वेळी कुटुंबाकडूनही त्याला पुरेसा आधार मिळत नसे. मग इतर लोकांची गोष्ट तर दूरच. अशा वेळी डॉक्टरांनी मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या कुटुंबीयांचे आधारगट तयार केले. त्याचबरोबर रुग्णांचेही गट तयार केले. त्रिदल आणि द्विज पुरस्कार या उपक्रमातून अशा स्वतःशी आणि समाजाशी झगडणार्‍या रुग्णांना समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. आजही ३० टक्वे आर्थिक स्थिती बेताचीच असणार्‍यांना डॉक्टर १० ते ५० रुपये नाममात्र शुल्कामध्ये सल्ला देण्यात मदत करतात. 
२४ तास व्यस्त असणारे डॉक्टर आजही साधी राहणी पसंत करतात. १९९३ पासून डॉक्टरांनी खादी वापरायला सुरुवात केली. डॉक्टर खादी का वापरायला लागले याची गोष्ट ः डॉक्टरांचे वडील १९९० साली गेले आणि एक दिवस डॉक्टरांना रस्त्यात त्यांच्या वडिलांचा विद्यार्थी असलेला एक मित्र भेटला. नेहमी टापटीप राहणारा हा मित्र अचानक खादीच्या कपड्यात पाहून डॉक्टरांनी त्याला विचारलं, ‘‘अरे, अचानक खादीचे कपडे कसे काय?’’ त्या वेळी तो गंभीरपणे म्हणाला, ‘‘आनंद, सर गेले आणि मी ठरवलं की सरांची आठवण म्हणून आपण आजपासून खादी वापरायला सुरुवात करायची.’’ मित्राशी इकडचं तिकडचं बोलून डॉक्टर निघाले, पण त्यांच्या मनात आलं, अरे जे आपल्या मित्राला सुचलं आपल्याला ते का सुचू नये? त्यानंतर विचार आला, की ठीक आहे. तेव्हा नाही सुचलं, पण आत्ता तर सुचलंय ना आणि मग त्या दिवसापासून डॉक्टरांनी खादीचे कपडे वापरायला सुरुवात केली. आज डॉ. आनंद नाडकर्णी यांचा वर्षभराचं कामाचं वेळापत्रक तयार असतं. दिवसाचंच नाही, तर तासातासांचं गणित त्यावर मांडलेलं असतं. २१ व्या शतकातल्या एका महानगरामध्ये राहणार्‍या डॉक्टराचं आय्ाुष्य मात्र अतिशय साधेपणानं जगताना त्यांच्या या व्यस्त वेळापत्रकात मोठमोठ्या पार्ट्यांत सहभागी होणं वगैरे गोष्टींना पूर्णपणे फाटा दिलेला असतो. उच्चभ्रू डॉक्टरांचे वेगवेगळे गट/क्लब्ज स्थापन झाले आहेत, त्या कुठल्याही गटात डॉक्टर सामील नसतात. ते कुठल्याही वैद्यकीय संस्थेचे पदाधिकारी नाहीत. जो वेळ शिल्लक असतो, तो ते आपल्या कुटुंबाबरोबर व्यतित करतात. त्यांच्या या जीवनशैलीत त्यांची अर्धांगिनी सविता साथ देत असतेच.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना तीन गोष्टींचं चांगलंच व्यसन आहे. एक म्हणजे पुस्तकं. त्यांच्या वैयक्तिक वाचनालयात सुमारे ४५०० पुस्तकं आहेत. त्यापैकी १००० पुस्तकं घरी ठेवून बाकी त्यांनी आयपीएच संस्थेला दिली आहेत. घरी असलेल्या पुस्तकांमध्ये इतिहास, तत्त्वज्ञान अिाण कवितेंची पुस्तकं आहेत. ही पुस्तकं त्यांना त्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि कामासाठी वेळोवेळी साथ देतात.
खादी वापरणारे डॉक्टर आजही तितकंच साधं जीवन जगतात. ठाण्यात ७५० स्क्वे. फू. चा छोटासा फ्लॅट त्यांच्या मालकीचा आहे आणि २००स्क्वे. फू. चा एक गाळा. बस बाकी कुठलीही संपत्ती त्यांनी जमा केलेली नाही. ना सोननाणं ना कुठले शेअर्स. त्यांचं स्वतःचं वाहन नाही. आयपीएच संस्थेचं वाहन काम करताना वापरतात आणि चुकून कधी वैयक्तिक कामासाठी संस्थेचं वाहन वापरावं लागलं, तर त्याची आर्थिक जबाबदारी ते स्वतः उचलतात. डॉक्टर रुग्णसेवा, भाषणं, प्रशिक्षणं आणि लेखन यातून जो पैसा मिळवतात, त्यावरही पहिला हक्क आयपीएच संस्थेचाच असं ते मानतात. ज्या वेळी डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करायचे, त्या वेळीही ते रुग्णाकडून भरमसाठ फीस न उकळता केवळ ५० ते १०० रुपये आकारायचे. कन्सल्टिंग अधिक प्रवास खर्च रुग्णाला देणारा डॉक्टर म्हणून त्यांचे मित्र त्यांना चिडवत असत. २०१३ पासून डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टिस बंद केली. 
खरं तर आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर डॉ. आनंद नाडकर्णी यांचं नाव पोहोचलं आहे. त्या प्रसिद्धीचा आणि लोकप्रियतेचा फायदा घेऊन आजकाल वैद्यकीय क्षेत्रात ज्याला ‘कट प्रॅक्टिस’ म्हणतात ती डॉक्टर सहजपणे करू शकले आणि प्रचंड पैसा कमावू शकले असते. औषध कंपन्यांच्या प्रलोभनांना डॉक्टर बळी पडत नाहीत. कारण केवळ पैसे कमावणं हे डॉक्टरांचं आयुष्याचं ध्येयचं नाही मुळी. आज आयपीएच संस्थेला कुठलंही विदेशी पाठबळ नाही, सरकारी मदत नाही. देणगीदारांच्या देणग्या आणि निधी उभारणी यातून संस्थेचं काम चालू आहे. आयपीएच या संस्थेवर देणगीदारांचा इतका विश्‍वास आहे की हयातीत आणि काहींनी हयातीनंतर आपला पैसा आयपीएचच्या कामाला लागावा असा मनोदय व्यक्त केला आहे. 
डॉक्टरांनी केवळ बंदिस्त केबिनमध्ये पेशंटला तपासलं नसून कुठेही, जिथे ते आहेत, त्या ठिकाणी त्यांनी पेशंट्सला कधीच नाकारलं नाही. आज मात्र आयपीएचमधल्या त्यांच्या सहकार्‍यांनी हट्टानं त्यांच्यासाठी स्वतंत्र ऑफीस बनवलं आहे आणि तिथे बसून डॉक्टर आपलं काम करतात. आपल्या प्रसन्न वृत्तीचं सारं श्रेय डॉक्टर आपल्या आयपीएच संस्थेच्या सहकार्‍यांना देतात. 
हे सगळं करत असतानाच डॉ. आनंद नाडकर्णी यांना त्यांचा पोलिओग्रस्त पाय त्रास देतोच. त्याचबरोबर पायांच्या विविध व्याधींबरोबर गेली दोन दशकं ते झगडत आहेत. पायांना सूज येणं, जखमा होणं, तीव्र वेदना होणं या सगळ्यांना तोंड देत त्यांचं काम, प्रवास आणि लेखन अव्याहतपणे चालूच आहे. अध्यात्म आणि इतिहास एकीकडे तर क्वीन ते सिंगमसारखं लेटेस्ट बॉलिवूड दुसरीकडे. प्रशिक्षणात, व्याख्यानात या सगळ्यांचे संदर्भ तितक्याच ताकदीनं ते देत असतात. ‘ए मॅन एव्हर बिझी बट नेव्हर इन हरी’ असंच त्यांचं वर्णन करावं लागेल.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ५०० हून अधिक थोरामोठ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मुलाखत घेताना ती अधिकाधिक रंगतदार करणं, समोरच्याला खुलवत अधिक माहितीचा ाोत श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं ते लीलया करतात. त्यांच्या या दिलखुलास स्वभावामुळेच त्यांचा लोकसंग्रहही प्रचंड मोठा आहे. गेली ३० वर्षं डॉक्टर संस्थात्मक आणि सर्जनशील काम करत असतानाही दिवसाला सरासरी ६० ते ७० रुग्णांची तपासणी करत आणि आज सरासरी ३० ते ४० रुग्ण तपासतात. डॉक्टरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपले मित्र, स्नेही अिाण पेशंट्स या सगळ्यांची माहिती लक्षात असते. कोणत्याही कागदाशिवाय हजारो रुग्णांचा अनेक वर्षांचा इतिहास डोक्यात ठेवून तो धडाधडा वाचणारा हा डॉक्टर आहे. आपण जे करतोय त्या कामाविषयी, त्या माणसांविषयी निष्ठा असली, तन्मयता असली की स्मृती आपोआप काम करते असं डॉक्टरांना वाटतं. 
डॉक्टर सदैव प्रसन्न आणि हसतमुख असतात. ‘अनेक समूहांना जवळ करण्यातून मनोविकासाचा रस्ता खोदला जातो’ असं ते म्हणतात. म्हणूनच तरुण, पालक, शिक्षक, शिक्षणसंस्था, औद्योगिक क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, पोलीस, खेळाडू अिाण कमांडोज या सार्‍यांसाठी आयपीएच संस्थेची दारं सदैव उघडी आहेत. मुंबईच्या सोमैय्या कॉलेजमध्ये ‘वास्तवाशी जुळवताना’ नावाचा अभ्यासक्रम खास तरुणांसाठी सुरू होत आहे. हा प्रयोगही भारतात होणारा पहिलाच प्रयोग असेल. 
आपल्या ध्येयाकडे जाणार्‍या प्रत्येक वाटेला डॉक्टर अतिशय खुबीनं बहारदार बनवतात. म्हणूनच तर ते आरोग्याच्या चळवळीत वेगवेगळ्या गटांशी सातत्यानं संवाद साधत असतात. कधी ते पालकशाळा घेऊन पालकांशी बोलत असतात, तर कधी ताणतणावाशी कसे दोन हात करून त्यांना परतवलं पाहिजे हे सांगत असतात. कधी डॉक्टर जिज्ञासा उपक्रमाद्वारे एखाद्या झोपडपट्टीत किशोरवयीन मुलामुलींशी संवाद करायला पोहोचलेले असतात, तर कधी एखाद्या अलिशान कॉर्पोरेट कंपनीच्या अधिकार्‍यांना प्रशिक्षित करत असतात. कधी डॉक्टर शिक्षकांनाही प्रबोधन करत असतात, तर कधी ते कॉलेजमधल्या तरुण-तरुणींमध्ये त्यांच्यातलाच एक होऊन नातेसंबंधांवर भाष्य करत असतात. कधी डॉक्टर मुक्तांगणमधल्या व्यसनग्रस्त रुग्णाच्या पाठीवर थाप मारून त्याला दिलासा देत असतात, तर कधी स्किझोफ्रेनियाशी झगडणार्‍या रुग्णांसमोर रोल-प्ले करत असतात. कधी डॉक्टर डायबेटिक मुलांना गाणी शिकवत असतात, तर कधी कामगार, कष्टकरी स्त्रियांची शिबिरं घेऊन ढोलकी वाजवत असतात. एवढं सगळं करूनही डॉक्टर पुन्हा त्याच खळाळत्या उत्साहानं पुन्हा नवे उपक्रम राबवण्यासाठी सज्ज असतात. या सगळ्या उपक्रमांत त्यांच्यातला डॉक्टर सदैव जागा असतो.
डॉ. आनंद नाडकर्णी म्हणजे एक लेखक, एक कवी, एक अकाउंटंट, एक ऍडमिनिस्ट्रेटर, एक व्यवस्थापक, एक प्रशिक्षक, एक गायक, एक वक्ता, एक संवादक, एक शिक्षक, एक कौन्सिलर...डॉक्टरांकडे पाहून ‘सर्वसमावेशक’ या शब्दाचा व्यापक अर्थ कळायला लागतो. आरोग्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन पडताळून बघत वाटचाल करणार्‍या डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या कार्यकर्तृत्वाचा दरवळ असाच सार्‍या आसमंतात पसरतो आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उभारलेली ‘आयपीएच संस्था’ म्हणजे एक अखंडपणे चालणारी प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. इथे मिळते सेवा, इथं होतं प्रबोधन, इथेच घेता येतं प्रशिक्षण आणि इथेच होतं संशोधनही!
दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.