पद्मश्री अरविंद गुप्ता
एके दिवशी मनोविकास प्रकाशनाबरोबर बैठक झाली. किशोरवयीन मुलांसाठी काही पुस्तकं यायला हवीत असं ठरलं. मग बोलता बोलता तुमचे आमचे सुपरहिरो असं शीर्षकही ठरलं. हे सुपरहिरो कुठल्या चित्रपटातले नसून आपल्यातलेच एक असतील आणि तरीही त्यांचं काम मात्र सामान्यांना अचंबित करणारं असेल. अशा व्यक्ती मग डोळ्यांपुढून सरकायला लागल्या. आणि बघता बघता ७ पुस्तकांनी आकार घेतला.
आयआयटी कानपूरमधून इंजिनिअर होऊन बाहेर पडलेले पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्यावर पहिलं पुस्तक लिहिलं. टेल्कोमध्ये त्यांनी सुरुवातीचे काही दिवस नोकरी केली, पण त्यांचं मन त्यात रमेना. त्यांनी अनिल सद्गगोपालन, लॉरी बेकर यांच्याबरोबर घालवलेले दिवस आणि ते अनुभव त्यांना आठवत होते. अखेर त्यांनी टेल्कोचा राजीनामा दिला. मुलांना विज्ञान हसतखेळत अगदी सहजपणे समजावं याचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यांनी टाकाऊ अशा वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी तयार करायला सुरुवात केली. ही खेळणी करता करताच मुलांना विज्ञानाचे नियम कळणार होते. बघता बघता शाळाशाळांमधून, महाविद्यालयांमधून, शिबिरांमधून शेकडो मुलं या खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान शिकली. अरविंद गुप्तांकडे येऊन अनेक शिक्षकांनी, विज्ञानाचं वेड जपणार्या कार्यकर्त्यांनी येऊन प्रशिक्षण घेतलं आणि ही मंडळी देखील गावोगाव फिरून विज्ञानाचा प्रसार करू लागली.
आपलं संपूर्ण आयुष्य विज्ञानाला वाहिलेला हा माणूस कसा आहे याचा अनुभव घ्यायला असेल तर त्यांना भेटायला हवं. अरविंद गुप्ता - अंगात खादीचा कुर्ता आणि पांढरा पायजमा इतक्या साध्या वेषात आपल्याला भेटतो. कुठलाही बडेजाव या माणसाच्या अंगात नाही. गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांचा प्रभाव त्यांच्या विचारांत आणि जगण्यात जाणवतो. जगभरातली असंख्य पुस्तकं वाचणारा हा वाचनवेडा आवडलेल्या पुस्तकाचा हिंदी, मराठी अशा भाषांमधून अनुवाद करतो आणि आपल्या अरविंदगुप्ताटॉईज डॉट कॉम नावाच्या वेबसाईटवर मोफत लोकांसाठी टाकतो. अरविंद गुप्ता या व्यक्तीला जो कोणी भेटतो, तो भरभरून ज्ञान घेऊन बाहेर पडतो हे तितकंच खरं!
Add new comment