अच्युत गोडबोले
संगणक, विज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तंत्रज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, गणित, चित्रपट अशा अनेक क्षेत्रात लीलया मुसाफिरी करणारी व्यक्ती म्हणजे अच्युत गोडबोले! या व्यक्तीचा आयआयटी बॉम्बेपासूनचा प्रवास शहाद्याच्या आदिवासींच्या कार्याला स्पर्श करत आयटी क्षेत्राकडे कसा वळतो आणि कुठल्यातरी एका क्षणी मोठ्या पगाराकडे आणि सुखसुविधांकडे पाठ फिरवून हा माणूस पुढलं आयुष्य लिखाणाकडे कसा वळतो याची गोष्ट या मालिकेतलं हे पुस्तक सांगतं. संगीतात जसा संपूर्ण थाटातल्या रागात कुठलाही स्वर वर्ज्य नसावा, तसा या माणसाला कुठलाही विषय वर्ज्य नाही. आधी तो विषय स्वतः शिकायचा, समजून घ्यायचा आणि मग समोरच्याला तितक्याच सोप्या भाषेत पुस्तकातून समजावून सांगायचा असा हा माणसानं घेतलेला ध्यास! खरं तर हा माणूस केमिकल इंजिनिअर, पण आयटी क्षेत्रात गेल्यावर संगणकाशी ओळख करून घ्यावी लागली. आपला विषय नसतानाही त्यातली तज्ज्ञता मिळवावी लागली. त्यातूनच जगभरात पोहोचलेली संगणकावरची ७०० ते ८०० पानांची पुस्तकं उदयाला आली. एकीकडे आयटी क्षेत्रात सीईओ पदाला पोहोचलेला हा व्यस्त माणूस दुसरीकडे रेडिओवरून, दूरदर्शनवरून लोकांना संगणकांचे पाठही देत होता.
किमयागार लिहून लोकांमध्ये विज्ञान आणि वैज्ञानिकांची माहिती पोहोचवून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम या माणसानं हाती घेतलं. अर्थशास्त्रापासून दूर पळणार्या माणसाला त्यानं अर्थात लिहून या विषयाची गोडी लावली. गणितासारखा रूक्ष वाटणारा विषय किती रंजक आणि सोपा असू शकतो याची जाणीव करून दिली, तर साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रातही सफर करून त्यावरची नादवेध, झर्पूझा, लाईमलाईट ही पुस्तकं वाचकांसमोर आणली. मानसशास्त्रात उडी मारून मनात आणि मनकल्लोळ ही पुस्तकं वाचकांसमोर आणत मनाचा, मेंदूचा आणि मनोविकारांचा प्रवास त्यानं उलगडला. शिवाय जीनियस, कॅनव्हास, सिंफनी, संवाद, बखर संगणकाची, गुलाम, अनर्थ ही पुस्तकंही वाचकांना नव्या विषयाचा आस्वाद देऊन गेली.
Add new comment