डॉ. ज्ञानेश्वर मुळे
या माणसाला आज भारतात पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अब्दुललाट या गावातला एका गरीब घरातला हा मुलगा! शिक्षणाची गोडी लागते आणि हा माणूस पुढे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतो आणि देशाचा परराष्ट्र खात्याचा मुख्य सचिव म्हणून काम बघू लागतो. जपान पासून रशियापर्यंत अनेक देशांमध्ये तो काम करतो. तिथली संस्कृती, तिथली भाषा, तिथलं लोकजीवन तो काम करत असताना न्याहाळतो आणि त्यावरही प्रभुत्व मिळवतो. यातूनच त्यांचं नोकरशाहीचे रंग, रशिया यासारखी पुस्तकं आकाराला आली. त्यांचं माती, पंख आणि आकाश हे आत्मचरित्रपर पुस्तक तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अभ्यासक्रमाला लावलेलं आहे.
या माणसाला 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया' का म्हटलं जातं तर, अवघ्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत या माणसानं संपूर्ण भारतभर पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत केली. किचकट असलेली सुरुवातीची प्रक्रिया बघून लोक कंटाळून जात आणि नको तो पासपोर्ट म्हणत. मात्र अवघ्या चार कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर पासपोर्ट अवघ्या ८ दिवसांच्या आत घरपोच मिळण्याची किमया या माणसानं भारतात घडवून आणली. भारतात ठिकठिकाणी, विशेषतः जिल्हयाच्या ठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघण्यात आली. मोबाईल व्हॅनद्वारे गावोगाव फिरून तिथल्या लोकांना घरपोच पासपोर्ट मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी करण्यात आली.
या माणसाचं डोंगराएवढं काम, त्याच्यातला मानवतावाद आणि त्याचं साधं जगणं अनेकांना प्रेरणा देणारं आहे. त्यामुळे तुमचे आमचे सुपरहिरो मालिकेतलं पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक वाचायला हवं.
Add new comment