शब्दांचे जादूगार प्रेमचंद
हिरा आणि मोती नावाचे दोन बैल असतात. त्यांची आपसांत खूप मैत्री असते. ते शूर आणि स्वाभिमानी असतात. तसंच त्यांचं आपल्या झुरी नावाच्या मालकावर खूप प्रेम असतं आणि त्यांचा मालक देखील त्यांची खूप काळजी घेत असतो. एके दिवशी झुरीचा मेव्हणा गोई झुरीकडे येतो आणि आपल्या शेतात काम करण्यासाठी त्याचे दोन्ही बैल त्यानं द्यावेत अशी मागणी करतो. बायकोचा भाऊ असल्यामुळे झुरीला नाही म्हणता येत नाही. हिरा आणि मोती यांना तो गोईबरोबर पाठवतो. हिरा आणि मोती यांना आपल्या राहत्या घरातून गोईबरोबर पाठवणं आवडलेलं नसतं. आपल्या मालकानं आपल्याला विकलं असावं असंही त्यांना वाटतं. ते जेव्हा गोईकडे येतात, तेव्हा गोई त्यांच्याकडून खूप काम तर करून घेतोच, पण त्यांना पुरेसं खायलाही देत नाही. अशा वातावरणातून हिरा आणि मोती आपली सुटका करून तिथून पळ काढतात. ते पुन्हा आपल्या मालकाकडे परत येतात. झुरी त्यांना पाहून खूप आनंदित होतो. मात्र झुरीची बायको चिडते अिाण हिरा आणि मोती हे बैल कामचुकार असल्याचा आरोप त्यांच्यावर करते आणि गोई आल्यावर परत त्यांना त्याच्याबरोबर पाठवून देते. गोई त्यांना खूप मारहाण करत असतो आणि त्यांची उपासमारही करत असतो. अतिशय दयनीय अवस्थेत हिरा आणि मोती दिवस कंठत असतात. काही दिवसांनी हिरा आणि मोती तिथून पळ काढतात. ते वाट चुकतात, तिथेही संकट त्यांच्यासमोर उभंच असतं. पण संकटाशी दोन हात करून ते स्वातंत्र्याचा आनंद उपभोगतात. त्यांचा हा आनंदही क्षणभरच टिकतो. ते पुन्हा पकडले जातात आणि एका कोंडवाड्यात टाकले जातात. काही दिवसांनी एका लिलावात मरणासन्न अवस्थेतल्या हिरा आणि मोती यांना एकजण विकत घेतो.
नवा मालक मरणासन्न अवस्थेतल्या हिरा आणि मोती यांना घेऊन निघतो, तेव्हा दोघांमध्ये पावलं टाकण्याचीही ताकद राहिलेली नसते. मात्र रस्त्यात त्यांना आपल्या मालकाचं झुरीचं घर दिसतं आणि पूर्ण ताकद एकवटून ते झुरीच्या घराच्या दिशेनं पळ काढतात. झुरी त्यांना बघतो, तेव्हा त्यांची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. हिरा आणि मोती पूर्ण ताकदीनिशी नव्या मालकाला प्रतिकार करत त्याला पळवून लावतात. ते दृश्य बघायला सगळा गाव गोळा होतो. हिरा आणि मोती परतल्यामुळे झुरी त्यांना जवळ घेऊन आपला आनंद व्यक्त करतो आणि झुरीची बायको देखील आपली चूक कळल्यामुळे हिरा आणि मोती यांना आपलंसं करते.
‘दोन बैलांची कथा’ ही कथा प्रेमचंद यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लिहिली. बैलांचं प्रतीक वापरून पंचतंत्र कथांच्या शैलीत प्रेमचंद यांनी या कथेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागते असं सांगितलं आहे.
प्रेमचंद यांचं खरं नाव धनपतराय श्रीवास्तव असं होतं. त्यांचा जन्म 31 जुलै 1880 या दिवशी उत्तर प्रदेशातल्या वाराणसीजवळच्या लमही या गावात मुन्शी अजायबराय आणि आनंदी देवी या जोडप्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील पोस्ट ऑफीसमध्ये काम करत असत. वयाच्या सातव्या वर्षी प्रेमचंद यांच्या आईचा मृत्य्ाू झाला. तसंच प्रेमचंद केवळ 14 वर्षाचे असताना वडिलांचा देखील मृत्य्ाू झाला. त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. प्रेमचंद यांना संपूर्ण आय्ाुष्य गरिबीशी झगडत काढावं लागलं. लहानपणी शाळेत जाताना आपल्या गावाहून वाराणसीपर्यंत अनवाणी पायानं त्यांना चालत जावं लागायचं. प्रेमचंद यांना शिकून वकील बनायचं होतं, पण परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य नव्हतं. त्यांनी एका वकिलाच्या घरी शिकवणी घेण्याचं काम सुरू केलं. त्याबदल्यात त्यांना तिथं राहायला मिळालं. या शिकवणीचे प्रेमचंद यांना पाच रूपये मिळत. त्यातले तीन रूपये ते आपल्या घरी पाठवत आणि दोन रूपयांमध्ये स्वतःचा खर्च भागवत. लहानपणापासूनच प्रेमचंद यांना वाचनाची आवड होती. पुढे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एका शाळेत शिक्षकाची नौकरी त्यांना मिळाली. बीएची झाल्यानंतर त्यांना शिक्षण विभागात इन्स्पेक्टरचं पद मिळालं.
प्रेमचंद यांनी एकूण 300 च्या वर कथा लिहिल्या आणि डझनावर कादंबर्यांचं लिखाण केलं आहे. त्यांनी अनेक नाटकं लिहिली. मुलांसाठी देखील कथा लिहिल्या.त्यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक आणि प्रेमकथा देखील खूप लोकप्रिय आहेत. लिओ टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’ आणि ‘अॅना कॅरेनिना’ या जगप्रसिद्ध कादंबर्यांचा अनुवाद प्रेमचंद यांनी केला. हिंदी आणि उर्दू भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. प्रेमचंद लिहायला बसत, तेव्हा तहान-भूक यांचा त्यांना पत्ताच लागत नसे. त्यांना हुक्का प्यायला खूप आवडायचं. त्यांच्या अनेक कथांमध्ये हुक्का पिणारी पात्रं वाचकाला भेटतात.
1936 साली प्रकाशित झालेली प्रेमचंद यांची त्यांच्या आय्ाुष्यातली ‘गोदान’ ही कादंबरी सर्वोत्कृष्ट मानली जाते. जगातल्या सर्वोत्कृष्ट 9 कादंबर्यांमध्ये तिचा नम्बर लागतो. गरीब शेतकर्याचे प्रश्न या कादंबरीतून आपल्याला कळतात. आपल्याकडे एक गाय असावी असं त्या गरीब शेतकर्याचं स्वप्न असतं. कर्ज काढून तो गाय विकत घेतो. त्यानंतर मात्र ते कर्ज फेडण्यात तो त्यातच कसा खोलवर बुडत जातो आणि त्याची वाताहत कशी होते याची ही गोष्ट! आपल्या मर्यादेपेक्षाही जास्त कष्ट उपसल्यानं अखेर त्याचा शेवटी अंत होतो.
प्रेमचंदच्या आधीचे जे लेखक होते ते काल्पनिक, पौराणिक, धार्मिक आणि राजा-राणीच्या कथा लिहीत. प्रेमचंद यांनी हे चित्रच बदलवून टाकलं. त्यांनी स्वतः गरिबी अनुभवली होती. तसंच स्त्रियांचे प्रश्न काय असतात हे जवळून बघितलं होतं आणि जे ज्यांनी अनुभवलं, जे बघितलं तेच वास्तव आणि तेच जग त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलं. प्रेमचंद यांच्या लिखाणात कष्टकरी वर्ग तर येतोच, पण निसर्ग, पशुपक्षी यांनाही त्यांनी स्थान दिलं आहे. प्रेमचंद यांनी प्रथमच सत्याला साहित्यात स्थान दिलं. माणसाचं जगणं आणि भोवतालची परिस्थिती यांना त्यांनी कागदावर उतरवलं. सांप्रदायिकता, भ्रष्टाचार, जमीनदारी, कर्जबाजारीपण आणि गरिबी या विषयांवर त्यांनी संपूर्ण आय्ाुष्यभर लिखाण केलं. सर्वसामान्यांच्या समस्या, त्यांचं समाजातलं तिरस्कृत असणं, त्यांना घृणास्पद वागणूक मिळणं हे सगळं त्यांनी आपल्या साहित्यामधून लोकांसमोर आणलं. सहज साध्या भाषेचा उपयोग करून त्यांनी पुरोगामी विचारांना समाजमनात उतरवलं. भारतीय समाजातल्या कुप्रथांवर त्यांनी कडाडून हल्लाबोल केला होता.
8 ऑक्टोबर 1936 या दिवशी जलोदर या विकारानं प्रेमचंद यांचा मृत्य्ाू झाला. प्रेमचंद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टपालखात्यानं 31 जुलै 1980 या दिवशी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोस्टाचं तिकीट काढलं. प्रेमचंद यांच्या कथांवर सत्यजीत रे या विख्यात दिग्दर्शकानं ‘शतरंज के खिलाडी’ आणि ‘सद्गती’ हे दोन चित्रपट बनवले. 1977 साली मृणाल सेन यांनी प्रेमचंद यांच्या ‘कफन’ कथेवर ‘ओका ऊरी’ नावाचा एक तेलुगू चित्रपट बनवला, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1963 साली ‘गोदान’ आणि 1966 साली ‘गबन’ या कादंबर्यांवर देखील चित्रपट निघाले. 1980 मध्ये त्यांच्याच कादंबरीवर दूरदर्शनची ‘निर्मला’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. प्र्रेमचंद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच गुलजार यांनी ‘तहरीर’ ही मालिका निर्माण केली होती हे विशेष! प्रेमचंद यांनी 1910 साली लिहिलेली ‘सव्वा शेर गेहू’ ही कथा आजही 110 वर्षांनी शेतकर्यासाठी तशीच लागू पडते. आजही शेतकर्याची स्थिती तशीच दयनीय आणि विदारक आहे.
एक संवेदनशील लेखक, सजग नागरिक, कुशल वक्ता, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रेमचंद यांचं हिंदी भाषेच्या विकासातलं योगदान अनमोल आहे. लोक त्यांना प्रेमानं नबावराय असंही म्हणत. त्यांना ‘आधुनिक हिंदी कथेचे पितामह’ आणि ‘उपन्यास सम्राट‘ असं संबोधलं जातं. मुन्शी प्रेमचंद यांचं नाव हिंदी साहित्यात धु्रव तार्यासारखं अढळ होतं, आहे आणि राहील हे मात्र खरं!
दीपा देशमुख
Add new comment