शब्दांचे जादूगार सत्यजीत रे
बंगालनं भारताला अनेक दिग्गज दिले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंगालची भूमी म्हणजे कला, साहित्य, अध्यात्म आणि देशभक्ती यांची जणू खाणच आहे. बंगालनं वेळोवेळी वैचारिक नेतृत्वही केलं आहे. भारताला जागतिक पातळीवर अभिमानानं मान उंचावायला लावणार्या दोन घटना म्हणजे भारताला नोबेल पारितोषिक मिळवून देणारे रवींद्रनाथ टागोर आणि सन्मानपूर्वक ऑस्कर पुरस्कार मिळवणारे साहित्यिक आणि चित्रकर्मी सत्यजीत रे!
सत्यजीत रे यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी डी.लिट. आणि पुरस्कार देऊन गौरवलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं त्यांना डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांसह भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 1978 साली बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या संचालक समितीनं निवडलेल्या जगातल्या तीन दिग्दर्शकांत सत्यजीत रे यांचं नाव होतं. भारतात त्यांना 32 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 1985 साली त्यांना दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्यजीत रे यांना जितके पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले तितके पुरस्कार दुसर्या कुठल्याही भारतीय चित्रपटकर्त्याला मिळाले नसतील.
सत्यजीत रे चित्रपटांच्या पटकथाही लिहीत. खरं तर ते लिखाणाकडे कसे वळले, तर त्यांना लहानपणापासूनच रवींदनाथ टागोर यांचं साहित्य मोहिनी घालत असे, तर कधी हिंदी साहित्यातले मुन्शी प्रेमचंद यांचं लिखाण ओढ लावत असे. इतकंच नाही तर इब्सेनची नाटकं आणि स्वतःचे वडील सुकुमार यांनी लिहिलेल्या कथा देखील त्यांना खूप आवडत असत. अनेक बंगाली साहित्यिकांचं लिखाणही त्यांना आवडत असे. त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या साहित्यामध्ये काल्पनिक कथा, विज्ञानकथा, हेरकथा, ऐतिहासिक कथा यांचा समावेश आहे.
सत्यजीत रे यांचे कथासंग्रह 12 कथांना सामील करून प्रसिद्ध होत असत. आपली कथा रोमांचक करण्यासाठी ते त्यातल्या तपासात एखादं कोडं घालत असत. 1982 साली त्यांनी जखन छोटो छिलम ही आत्मकथा (जेव्हा मी लहान होतो) लिहिली. भारतीय चित्रपटांसंदर्भातही त्यांनी काही पुस्तकं लिहिली. मुल्ला नसिरुद्दीनच्या कथांचं संकलन त्यांनी बंगाली भाषेत करून त्या प्रसिद्ध केल्या.
सत्यजीत रे यांनी लिहिलेला ‘एबारो बारो’ हा कथासंग्रह अतिशय वाचनीय आहे. एबारो बारा म्हणजेच आणखी बारा असा अर्थ! सत्यजीत रे यांची ‘गणिताचे सर, गुलाबीबाबू आणि टिपू’ ही कथा वाचकाचं जितकं मनोरंजन करते, तितकीच ती डोक्याला ताणही देते. नऊ-दहा वर्षांच्या एका टिपू नावाच्या मुलाच्या भावविश्वात पुस्तकांनी प्रवेश केलेला असतो. टिपूला दिसतील ती पुस्तकं वाचायचा नाद लागतो आणि त्या त्यातूनच परिकथा वाचायची गोडी लागते. काल्पनिक जगातला थरार, त्यातली अदभुतरम्यता त्याला खूपच आवडायला लागते. त्याच्या शाळेत नव्यानं आलेले गुलाबीबाबू हे शिक्षक त्याच्याच वर्गावर गणित हा विषय शिकवायला येतात. त्यांना मात्र परिकथांचं वाचन माणसाच्या काहीही उपयोगाचं नाही असं वाटत असतं. त्यामुळे ते टिपूच्या परिकथा वाचणं बंद करून टाकतात. पण आपल्या आय्ाुष्यात वैचारिक, ललित, वास्तव आणि काल्पनिक सर्वच प्रकारचं साहित्य वाचणं किती महत्त्वाचं आहे हे ही कथा सांगते. काल्पनिक साहित्य आपली सर्जनशीलता तर वाढवतंच, पण आशाही सतत तेवत ठेवण्याचं काम करतं.
‘साधनबाबूंचा संशय’ ही सत्यजीत रे यांची कथा संशयावर आधारित असून ही गोष्ट कधी हलकीफुलकी वाटते, तर कधी गूढ वातावरण निर्माण करते. कधी तर या कथेतल्या वातावरणात आपण हेरगिरी करावं असंही वाचकाला वाटायला लागतं. तसंच माणसाच्या मनात शिरलेली संशयी वृत्ती त्या माणसाचं किती नुकसान करते हेही यात खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे.
‘गगन चौंधरींचा स्टुडिओ’ ही देखील सत्यजीत रे यांची गूढकथा असून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ती वाचकाच्या मनात थरार निर्माण करते. आपल्या कथेमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात सत्यजीत रे यांचा हात कोणी धरू शकत नसे.
कधी कधी एखादा माणूस बिनकामाचा आहे असं समजून आपण त्याच्याशी चांगलं वागत नाही. किंवा त्याला कस्पटासमान लेखतो. मात्र अशी एखादी व्यक्ती प्रत्यक्षात मात्र खूप वेगळी असते आणि आपण कुठलेली पूर्वग्रह केवळ त्या माणसाच्या बाह्यरुपावरून करू नयेत हेच सत्यजीत रे यांनी ‘कःपदार्थ’ या कथेत वाचकांना सांगितलं आहे.
सत्यजीत रे हे केवळ एक उत्तम साहित्यिकच नव्हते, तर ते पुस्तकांचं ले-आऊटही करत. मुखपृष्ठ असो वा आतली रेखाचित्रं त्यातही ते माहीर होतेच. कधी ते बंगालीमध्ये कथा, कादंबर्याही लिहीत तर कधी रहस्यकथाही लिहीत. त्यांच्या अनेक कथांचं इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषाांमधून भाषांतर झालं आहे आणि त्या लोकप्रिय झाल्या आहेत. संदेश नावाच्या मुलाच्या मासिकाचे ते संपादकही होते. मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांच्या मालिकेत फेलुदा (12 पुस्तकांचा संच) ही त्यांची मालिका खूपच गाजली. यातला गुप्तहेर फेलूदा आणि वैज्ञानिक प्रोफेसर शंकू या व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाल्या.
लहान मुलांसाठी आचार्यांच्या खुनाचं प्रकरण, अनुबिसचं रहस्य, बादशहाची अंगठी, चालत्या प्रेमाचं गूढ, दफनभूमीतील गूढ, देवतेचा शाप, गंगटोकमधील गडबड, इंडिगो आणि निवडक कथा, जय बाबा फेलूनाथ, कैलासातील कारस्थान, काठमांडूतील कर्दनकाळ, केदारनाथची किमया, मृत्यूघर, मुंबईचे डाकू, नंदनवनातील धोका, प्रोफेसर शंकू यांच्या साहसकथा, रॉबर्टसनचं माणिक, असं असतं शूटिंग अशा कितीतरी मोजता येणार नाहीत इतक्या दर्जेदार कथा आणि कथासंग्रह सत्यजीत रे यांनी मुलांसाठी लिहिले.
सत्यजीत रे किंवा शॉत्योजित राय यांचा जन्म 2 मे 1921 या दिवशी कलकत्याच्या एका प्रतिष्ठित बंगाली घराण्यात झाला. सत्यजीत रे यांचे वडील सुकुमार यांचा मृत्यू सत्यजीत रे अवघे तीन वर्षांचे असताना झाला. त्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सत्यजीत रे यांच्या आईनं त्यांचं पालनपोषण केलं. नंतर त्यांच्या मामांनी त्यांचं पालनपोषण केलं. वयाच्या 18 व्या वर्षी सत्यजीतनं पदवीनंतर पुढे शिकायचं नाही असं ठरवलं. पण आपल्या मुलानं इतक्या लहान वयातच नोकरीला जुंपून घ्यावं असं त्यांच्या आईला वाटत नव्हतं. त्यामुळे तिनं त्यांना शांतिनिकेतनमध्ये चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. चित्रकला हा सत्यजीत रे यांच्या आवडीचा विषय होता.
शांतिनिकेतनमधल्या 5 वर्षांच्या वास्तव्याचा सत्यजीत रे यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यानंतर कलकत्याला परतून ग्राफिक डिझायनर म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. या काळात अतिशय प्रसिद्ध असलेल्या मॅन इटर्स ऑफ कुमाऊ हे जिम कार्बेटचं पुस्तक आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं पुस्तक अशा पुस्तकांच्या मुखपृष्ठांचं डिझाईन केलं. सत्यजीत रे यांनी 1928 साली प्रसिद्ध झालेल्या विभूतिभूषण बंधोपाध्याय यांच्या पाथेर पांचाली या कादंबरीवर बालसंस्करण करण्यात मोठा सहभाग घेतला.
सत्यजीत रे यांची उंची सहा फूट साडेचार इंच इतकी होती. दिसायलाही ते देखणे होते. चित्रपटवेडातून सत्यजीत रे यांनीं कलकत्यात 1947 साली कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. 1952 साली ते लंडनला गेले. या काळात त्यांनी लंडन इथे भरपूर चित्रपट बघितले. ‘बायसिकल थीफ’ आणि ल्युसिनिया स्टोरी अॅन्ड अर्थ’ या चित्रपटांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.
1955 साली सत्यजीत रे यांच्या पथेर पांचाली या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावर धूम मचवली. त्यानंतर सत्यजीत रे यांनी अपराजितो, जलसा घर, अपूर संसार, देवी, तीन कन्या, अभियान, महानगर, चारुलता, नायक, शतरंज के खिलाडी, असे अनेक चित्रपट बनवले. प्रत्येक चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेला. 1961 साली सत्यजीत रे यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्यावर एक माहितीपट बनवला आणि या माहितीपटाला भारतात राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन तर गौरवलंच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पुरस्कार मिळाले. सत्यजीत रे यांच्या बहुतांश फिल्म बंगालच्या भूमीवर बनल्या आणि त्याचा गाभाही गरिबी, भूकबळी, क्रौर्य, अनिष्ट रूढी हाच होता. चित्रपट बनवताना कुठेही अवास्तव, अतिरंजकता त्यांना मान्य नव्हती. जगप्रसिद्ध संगीतकार बीथोवन त्यांना फार आवडत असे.
पन्नास वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत हा माणूस साहित्य, चित्रकला, पटकथालेखन, संपादन, छायाचित्रण, चित्रपटदिग्दर्शन आणि संगीतदिग्दर्शन या सगळ्या क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करत होता. 23 एप्रिल 1992 या दिवशी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सत्यजीत रे यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
दीपा देशमुख
Add new comment