प्रभाव पाडणारी पुस्तकं - स्पर्श ज्ञान दिवाळी २०१९

प्रभाव पाडणारी पुस्तकं - स्पर्श ज्ञान दिवाळी २०१९

कळायला लागलं तसा पुस्तकांन आयुष्यात प्रवेश केला, मी पकडलेलं त्यांचं बोट त्यांनी कधी सोडलं नाही हे विशेष! प्रवास कसाही असो, चढ असो वा उतार....ही पुस्तकं मूकपणे सोबत करतच राहिली. लिहिणं-वाचणं येण्याआधी गोष्टींच्या रुपातून त्यांनी माझ्याशी मैत्री केली. माझा औंदुबर नावाचा एक मावसभाऊ होता. मूळात औंदुंबरच धिप्पाड शरीरयष्टीचा, सावळ्या वर्णाचा, उंचापुरा आणि चित्रपटातल्या अमरिशपुरीसारखा वगैरे दिसायला होता. तो कधीही कुठेही स्थिर राहिला नाही. काही कालावधी त्यानं आमच्या घरी काढला. आम्ही सगळीच भावंडं त्या वेळी लहान होतो. रात्रीची जेवणं झाली की औदुंबर आम्हाला गोष्टी सांगायचा. या गोष्टी बरेचदा भूताच्या असायच्या. तो गोष्टी इतक्या रंगवून सांगायचा की ते भूत त्यानं बघितलंच असावं इतका विश्‍वास त्याच्यावर बसायचा. गोष्टीतल्या वातावरणाप्रमाणे त्याचे चेहर्‍यावरचे हावभाव आणि आवाजातले चढउतार बदलत राहायचे. मग रात्रीच्या काळोखात एकटं असण्याची भीतीच वाटायची कारण अचानक औदुंबरच्या गोष्टीतलं भूत प्रत्यक्षात अवतरलं तर असं वाटायचं. 
त्या वेळी छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं मिळायची. राजा-राणी, परी, ठकसेन वगैरे....त्यानंतर हळूच चांदोबा आयुष्यात आला. मग किशोर, अमृत, किलबिल, फास्टर फेणे......या सगळ्या पुस्तकांनी पर्‍यांचं राज्य दाखवलं. उडत्या गालिच्यावर बसून आकाशात सैर करवली, तर राक्षसाच्या तावडीतून राजकन्येला कसं सोडवायचं याचेही धडे दिले. या पुस्तकांनी कधी आजीच्या मायाभरल्या स्पर्शाची आठवण दिली, तर कधी मनातल्या द्विधा अवस्थेला निर्णायक स्थितीपर्यंतही पोहोचवलं. ही पुस्तकं कधी मित्र बनली, कधी मार्गदर्शक आणि कधी सल्लागार झाली कळलंच नाही. वयाच्या त्या त्या टप्प्यांमध्ये त्या त्या लेखकांनी, त्या त्या कवींनी साथ दिली. 'मामाची रंगीत गाडी' असो की 'सदैव सैनिका पुढेच जायचे' असो पुस्तकातली गाणी मनात कितिक वेळ रेंगाळत राहू लागली. 'अनामविरा कुठे जाहला तुझा जिवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात'.....या कवितेनं डोळे भरून आले होते. वसंत बापटांच्या कवितांनी तर मनाच्या तळाशी प्रवेश केला होता....मग अनेक पुस्तकं येत राहिली. दहावीच्या परीक्षेच्या वेळी आदल्या दिवशी रात्रभर जागून वाचलेली 'मर्मभेद' कादंबरी आजही विसरता आली नाही.....भयकथा, गूढकथा, साहसकथा, रहस्यकथा, प्रेमकथा, जगभराची सैर करवणारी पुस्तकं आयुष्यात मित्र म्हणून येत गेली. यातून जगभरातली माणसं वाचता आली, त्यांची सुखदुःख, त्यांचं कार्य, त्यांचं झपाटलेपण अनुभवता आलं. आचार्य अत्रे यांचं कऱ्हेचे पाणी हे पाच खंड असलेलं आत्मचरित्र खूप आवडलं. वाचलेल्या या पुस्तकांमधून अनेक कलाकार भेटले, अनेक वैज्ञानिक भेटले आणि अनेक तत्वज्ञही भेटले. तुकाराम आणि कबीर यांनी तर 'इतरांच्या मनापर्यंत पोहोचणारी भाषा बोला' असं म्हटलं. खरंच, पुस्तकांनी समृद्ध जीवन कसं असावं याची दिशा दाखवली. 

खरंच पुस्तकांनी आयुष्याबरोबर असलेलं नातंच बदलून टाकलं. हिंदीमधले प्रसिद्ध कथाकार निर्मल वर्मा म्हणतात, तसं 'मी पुस्तक वाचण्याच्या आधी जो होतो, तो नंतर राहत नाही.' खरंच आपलं जगच बदलवून टाकतात ही पुस्तकं! जेव्हा मनाची द्विधा अवस्था होते, तेव्हा आपल्यातल्या विचारांचं संक्रमण, बदल याची चाहूल लागलेली असते. झाडाची जुनी, वाळलेली पानं गळून पडावीत तशा कित्येक विचारांची पानगळ ही पुस्तकं आपल्यात करवून आणतात. आणि मग नवी पालवी फुटलेल्या मनाला ती नव्या विचारांचे रस्तेही दाखवतात. 

सफदर हाश्मी यांनी म्हटलं आहेच, 
किताबे कुछ कहना चाहती है,
तुम्हारे साथ रहना चाहती है,

इंग्लंडची प्रसिद्ध लेखिका व्हर्जिनिया वुल्फ हिनं आपल्या एका पुस्तकात पुस्तकांविषयीच लिहून ठेवलंय, ते खरंच खूपच रंजक आहे. एकदा पुस्तकप्रेमी सेंट पीटर यांच्याजवळ गेले तेव्हा पीटर यांनी विचारलं की ‘या लोकांनी काय काय कामं केली आहेत? त्यावरून यांना स्वर्गात पाठवायचं की नाही हे ठरवता येईल.’ तेव्हा पीटरला सांगितलं गेलं की, ‘ही सगळी मंडळी पुस्तकांची भक्त आहेत.’ तेव्हा ते त्वरेनं उत्तरले, ‘अरे, मग यांना काहीच प्रश्‍न विचारू नका. कारण स्वर्गात जे काही प्राप्त झालं असतं ते सगळंच यांनी पुस्तकांतून आधीच मिळवलं आहे. या मंडळींना स्वर्गाचीही आवश्यकता नाही.’ मुक्तीचा क्षण या पुस्तकांनी त्या लोकांना बहाल केला.  खरंच, पुस्तकांविषयी यापेक्षा आणखी सुंदर भाष्य काय असू शकतं? 

प्रख्यात कवी गुलजार यांनी म्हटलंय,
किताबें झॉंकती है बंद आलमारी के शिशो से
बडी हसरत से तकती है

हे खरंय, कम्प्युटर आला आणि हातात जिवंत होऊन बोलणारी ती छापील पुस्तकं आता मूक होतील अशी खंत गुलजार यांच्या कवितेतून जुनी पिढी व्यक्त करते आहे. छापील पुस्तकांचं वाचन कम्प्युटरच्या आगमनानंतर कमी झालंय की काय अशीही भीती कवीला वाटते आणि पुस्तकांच्या माध्यमातून परस्परांत निर्माण होणारं प्रेम, संवाद, जवळीक आता कशी होणार असा काळजीनं भरलेला प्रश्‍न तो विचारतो.
माझी मैत्रीण नीलिमा पालवणकर हिनं पुस्तकांवर अतिशय सुंदर कविता केलीये. ती म्हणते,
पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्यात

जग हजारो रंगांनी चितारलं गेलंय. त्या प्रत्येक रंगांच्या परत अनेक तरल छटा आणि त्या सगळ्या रंगांना घेऊन पुस्तकं आपल्या मनात प्रवेश करतात. कित्येक रंगांना तर आपण बघितलेलंही नसतं. पुस्तकांची शक्ती दृश्य माध्यमापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे असंच मला नेहमी वाटतं. कारण एखादा चित्रपट आपण बघतो तेव्हा ते कथानक काय सांगू पाहतं ते दिग्दर्शक आपल्याला त्याच्या नजरेतून बघायला लावतो. पण पुस्तकं वाचकागणिक एक वेगळंच दृश्य तयार करतात. कथा तीच असते, पण वाचणारा त्याच्या नजरेतून वेगळे रंग भरतो. या संदर्भात लॅटिन अमेरिकन नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक गैब्रियल आर्सिया माक्रवेज यांचा एक किस्सा खूपच बोलका आहे. हे लेखक महोदय त्यांच्याकडे कोणी चित्रपट निर्माता आला की आपल्या पुस्तकांवर चित्रपट बनवायला मनाई करत. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक ‘हंड्रेड ईयर्स ऑफ सॉलिट्यूड’ या पुस्तकावर आधारित चित्रपट काढण्यासाठी हॉलिवूडवाल्यांनी त्यांना करोडो डॉलर्सचा प्रस्ताव दिला.  पण तरीही महाशय आपल्या मतावर, आपल्या नकारावर ठामच होते. कोणा एकाने त्यांना विचारलं, की तुम्ही तुमच्या पुस्तकांवर चित्रपट बनवण्यास नकार का देता? उत्तरादाखल ते म्हणाले, माझ्या लाखो वाचकांच्या मनात माझ्या पुस्तकातल्या पात्रांच्या प्रतिमा त्यांनी वाचून बनवल्या आहेत. त्या त्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. आणि जर चित्रपट बनवला तर या प्रतिमांचं बहुवैविध्य नष्ट होईल, त्यांची कल्पनाशक्ती थांबेल तिचाही एकप्रकारे तो अंतच होईल आणि नेमकं तेच मला नकोय. पुस्तकं ही अशी असतात.

पुस्तकं वाचकाला एक कल्पक कलाकार, एक संवेदनशील माणूस आणि एक समृद्ध व्यक्ती बनवतात. पुस्तकं आम्हाला  काय देत नाहीत? आमच्याशी काय बोलत नाहीत? सगळं काही - भरभरून. असं म्हणतात, माणसाची श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या, त्यानं वाचलेल्या पुस्तकांवरून कळते! 
मला आवडलेल्या पुस्तकांमध्ये शेषप्रश्न, राहिले दूर घर माझे आणि रॉ ही पुस्तकं आहेत.

शेषप्रश्न
बंगाली साहित्यातलं आपला वेगळा ठसा उमटवणारं एक नाव म्हणजे शरदचंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी! त्यांच्या परिणिता, देवदास, चरित्रहीन, श्रीकांत, पथेरदाबी या आणि इतर अनेक कादंबर्‍या खूपच गाजल्या. यातल्या अनेक कादंबर्‍यांवर चित्रपटही निघाले आणि ते देखील खूपच लोकप्रिय झाले. शरदचंद्रांवर रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा खूप मोठा प्रभाव होता. 
शरदचंद्रांच्या लिखाणात स्त्री-पुरूष यांच्यातलं नातं, परस्परांमधले संबंध अशा विषयांना हाताळलेलं दिसतं. त्यांची नायिका संपूर्ण कादंबरीमध्ये अशा रीतीनं वावरते की ती वाचकाच्या मनाचा कधी ताबा घेते कळतही नाही. त्यांच्या बहुतांशी कादंबर्‍यातली नायिका ही पतिव्रता, निष्ठा, सहिष्णुता, आपल्या कुटुंबाची मानमर्यादा जपताना तिनं केलेला असामान्य त्याग अशा गुणांनी युक्त अशीच बघायला मिळते. 
याच शरदचंद्राची ‘शेषप्रश्न’ ही कादंबरी मात्र त्यांच्या इतर सर्वच कादंबर्‍यांपेक्षा सर्वस्वी वेगळी आहे. १९३१ साली लिहिलेली ही कादंबरी त्यातल्या विषयामुळे आजही तितकीच ताजी वाटते. माझ्या मनावर ‘शेषप्रश्न’ या कादंबरीनं जी मोहिनी घातली ती आजपर्यंत कायम आहे. ‘शेषप्रश्न’ ही कादंबरी काय आहे, ती वाचकाला का आवडते याविषयी विचार करताना जाणवलं की मनाला खोलवर विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे. यातलं प्रत्येक पात्र वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. ‘शेषप्रश्न’ ही कादंबरी स्वातंत्र्यपूर्व काळात आग्रा या शहरात घडते. कुठल्यातरी कारणांमुळे आग्रा शहरात येऊन स्थायिक झालेली काही बंगाली कुटुंबं या कादंबरीत वाचकाला भेटतात. 

‘शेषप्रश्न’ मध्ये जातिव्यवस्थेचं प्रबळ प्रस्थ, स्त्री-पुरूष संबंध, आनंदाच्या, नीतिमत्तेच्या व्याख्या, आग्र्यासारख्या ऐतिहासिक वास्तूचं मोल आणि त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन, असे अनेक विषय येतात. यातल्या प्रत्येक पात्राला आपली काही मतं आहेत. या कादंबरीत आशुतोष मुखर्जी नावाचे सधन प्रतिष्ठित विधुर असलेले गृहस्थ आपल्या एकुलत्या एक मनोरमा नावाच्या मुलीबरोबर आग्रा शहरात येऊन राहतात. सधन आणि सुसंस्कृत अशा आशूबाबूंच्या बंगल्यात गायन, वाद-चर्चा अशा कार्यंक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमांना अनेक बंगाली कुटुंबाना आमंत्रित केलं जात असतं. आशुतोष मुखर्जी यांची मुलगी मनोरमा आणि आशुतोष मुखर्जी यांच्यातलं बाप-लेकीचं मोकळीक जपणारं आणि हळूहळू बदलत गेलेलं नातंही इथे बघायला मिळतं. 

यात आशुतोष म्हणजेच आशूबाबू, त्यांची मुलगी मनोरमा, त्यांचा प्राध्यापक असलेला मित्र अविनाश, हरेन, अक्षय, अविनाशची मेव्हणी नीलिमा, मनोरमेचा भावी नवरा अजित, गायक शिवनाथ आणि त्याच्याबरोबर बायकोसारखं राहणारी कमल (शिवानी), आपल्याला भेटतात. यांची प्रत्येकाची काही ठाम मतं आणि विचारधारा आहे. काहीजण कर्मठ विचारांना चिटकलेले आहेत, तर काही नव्या, पुरोगामी विचारांची कास धरून त्याप्रमाणे चालणारे आहेत. ‘शेषप्रश्न’मध्ये मनोरमा ही जरी सुरूवातीला नायिका वाटली, तरी खरी नायिका कमल असल्याचं लक्षात येतं. कमल ही परिस्थितीशी टक्कर देत झुंजणारी, बंडखोर, लढाऊ वृत्तीची आहे. जात-धर्म, देशभक्ती याबद्दलचा तिचा व्यापक दृष्टिकोन या कादंबरीतून मनाची पकड घेतो.

‘शेषप्रश्न’मध्ये कमल बरोबरच लक्षात राहण्याजोगी व्यक्तिरेखा आशूबाबूंची आहे! आशूबाबू परदेशात राहून आलेले असले तरी त्यांची वृत्ती सनातनी आहे, पण त्याचबरोबर समोरच्याचे विचार ऐकून घेण्याचीही आहे. या कादंबरीत कमलची मतं आपल्यालाही विचार करण्यास भाग पाडतात. कमल ही मनस्वी, तरीही ठाम आणि वर्तमानाला बरोबर घेऊन जगणारी स्वतंत्र व्यक्तिमत्वाची एक स्त्री आहे. माणसं कशी असायला हवीत, यापेक्षा माणसं जशी आहेत तशी त्यांना स्वीकारणारी ती आहे. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता, न कोलमडता पुढे जाणारी ती आहे. कुठल्याही नात्यातलं वास्तव ती सहजपणे स्वीकारते. निसर्गाचं चक्र तिला भावतं आणि म्हणूनच झाडाचं वाळलेलं गळून पडलेल्या पानानंतरचं नवं उगवलेलं पान तिला जास्त आवडतं. नात्यातला गोडवा संपल्यानंतर तरीही ते नातं टिकवून ठेवण्याचा अट्टाहास करत त्या नात्याला फरफटत नेत निभावणं तिला मान्य नाही. प्रेमामध्ये एकनिष्ठ राहणं याविषयी तिची मतं खूप स्पष्ट आहेत. 

आशुतोषबाबूंची आणि अविनाश या दोघांचीही पत्नी हयात नाही...या दोघांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न न करता आपल्या पत्नीवरचं प्रेम दर्शवण्यासाठी घरभर तिच्या तसबिरी लावलेल्या.....त्यांच्या बोलण्यातूनही त्या प्रेमाच्या एकनिष्ठतेचे संदर्भ येत राहतात. अशा वेळी कमल मात्र तिची याबाबतीतली बंडखोर मतं मांडते. ‘पत्नी होती, तेव्हा तिच्यावर असणारं प्रेम होतं. मात्र ती गेल्यानंतर तिला देण्यासारखं किंवा तिच्याकडून काही मिळण्याचा संभव नाही. थोडक्यात, तिला आता सुखी करता येत नाही आणि दुःखही देता येत नाही. ती आता नाही. आता आहे ती एकदा प्रेम केल्याच्या घटनेची आठवण. ती आठवण सारखी मनात घोळवत ठेवायची आणि वर्तमानकाळापेक्षा भूतकाळच चिरस्थायी म्हणून आयुष्य कंठायचं’ या वृत्तीला कमल दुबळेपणा म्हणते, आदर्श मानत नाही. 

आयुष्यातल्या घडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती लग्न एक गोष्ट मानते. त्यापलीकडे ती लग्नाला विशेष महत्व देत नाही. तसंच या देशातल्या विधवांना भावनेच्या सक्तीखाली जबरदस्तीनं वैधव्यात राहायला भाग पाडलं जात आहे असं ती म्हणते. ‘नव्याचा स्वीकार न करणारे, भूतकाळात जगू बघणारे लोक तिला शरीरानंच नव्हे, तर मनानंही म्हातारे झाल्यासारखे वाटतात. त्या साचलेपणाचा, आहे तिथं थांबण्यात ते आनंद घेतात आणि त्यातच आयुष्याचं सार्थक मानतात. त्यांच्या जगण्याचं विजयवाद्य नाही, तर आनंदाच्या विसर्जनाचं शोकगीत आहे आणि ते त्यांना कळतही नाही’ असंही कमल म्हणते. 

स्वतंत्र बुद्धीने विचार करणारी कमल जाती-धर्माबद्दल बोलतानाही माणुसकीला जास्त महत्वाचं मानते. स्त्री-पुरुष असं वेगळा भेद न करता ती व्यक्ती म्हणून प्रत्येकाकडे बघताना दिसते आणि त्यामुळे समोरची व्यक्ती पुरूष आहे, म्हणून स्त्री संकोचामुळे बोलू शकत नाही अशी अवस्था तिची होताना चुकूनही दिसत नाही. 

‘शेषप्रश्न’ ही शरदचंद्र लिखित आणि मामा वरेरकर अनुवादित कादंबरी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. लिखाणातून लेखकही उलगडत जातो, तसाच या कादंबरीतून शरदचंद्रातला विचारी, प्रगल्भ माणूसही कळत जातो. शेषप्रश्न ही कादंबरी मानवी नातेसंबंधाविषयीचा, त्यातल्या बदलणार्‍या परिस्थितीबद्दलचा आणि आयुष्यातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर शोधणार्‍यांना तत्वज्ञानाचा एक मार्गही दाखवते. आणि म्हणूनच १९३१ साली लिहिलेली ‘शेषप्रश्न’ आजही तितकीच महत्वाची कादंबरी म्हणून आपलं स्थान अबाधित राखणारी आहे.

राहिले दूर घर माझे....
'राहिले दूर घर माझे’...हे शफाअत खान लिखित पुस्तक एका दमात पुस्तक वाचून काढलं. 'शोभायात्रा' हे नाटक बघितल्यानंतर मी शफाअत खान यांची जबरदस्त चाहती झाले. पुण्यात अनेक वर्षांपूर्वी बालगंर्धवला बघितलेल्या शोभायात्रा या नाटकानं माझ्या मनावर खूप दिवस कब्जा केला होता. त्यातला नंदू माधवचा बापट ऊर्फ गांधी, सयाजी शिंदेनं वठवलेली नेताजी सुभाषचंद्र बोसांची भूमिका सगळंच अप्रतिम होतं. 

भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण फाळणीची न बरी होणारी जखम उरी देउन. भारत-पाकिस्तान असे तुकडे झाल्यानं इकडचे लाखो लोक तिकडे आणि तिकडचे लाखो लोक इकडे ....यात अनन्वित अत्याचार, अविश्वास, धर्मांधता यांची वर्णनं वाचताना आजही अंगाचा थरकाप उठतो. या नाटकातही असंच काहीसं घडलेलं दाखवलं आहे. भारतात सगळं काही भरभरून असलेलं कासीमचं कुटुंब फाळणीनंतर कफल्लक होतं आणि पाकिस्तानात जाउन पोहोचतं. तिकडे त्यांना एक हवेली दिली जाते. त्या हवेलीतली एकमेव वृद्धा जिवंत असते आणि ती हिंदू स्त्री आपली हवेली सोडायला तयार नसते. या एकाच घटनेनं कासिमच्या कुटुंबाची बदलती मानसिकता, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचा दृष्टिकोन, हिंदू असो वा मुसलमान...त्या त्या धर्मात काय  सांगितलंय यांचा मौलवीनं केलेला खुलासा...अखेर मानवता हाच खरा धर्म हे सांगताना धर्मांधता आणि माणुसकी यांच्यातला संघर्ष खूप चांगल्या पध्दतीनं यात रंगवला आहे. 

शफाअत खानच्या मनात निर्माण झालेलं वादळ, त्यांच्या मामाच्या  कुटुंबाबरोबरच्या आठवणी, फाळणी आणि त्या निमित्तानं मनावर उमटलेले असंख्य ओरखडे आणि त्यातूनच मनात जिवंत झालेली पात्रं त्यांना अस्वस्थ करत राहिली आणि अखेर त्यांच्या लेखणीतून ती साकारली. खरोखरंच शफाअत खान हा एक साहित्यिक म्हणून, एक नाटककार म्हणून आणि त्यापेक्षाही एक माणूस म्हणून खरोखरंच ग्रेट आहे. निखील वागळे यांनी तर प्रत्येक हिंदूनं आणि प्रत्येक मुसलमानानं हे नाटक वाचायलाच हवं असं म्हटलंय. 

आज आपापल्या धर्माला महत्त्व देत माणसामाणसामधलं अंतर वाढत चाललंय. भीती, दहशत, अविश्वास यांचं वातावरण जगण्यातला निर्भेळ आनंद नष्ट करताहेत. अशा वेळी शफाअत खानसारखी माणसं आशेचा एक दीप घेउन समोर येतात. त्यांचं लिखाण केवळ पुस्तकात बंदिस्त न ठेवता आपण ते आचरणात आणायला हवंय. 

रॉ
भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा
‘रॉ’ म्हणजे 'रिसर्च अँड अ‍ॅनेलेसिस विंग'! ‘रॉ’ म्हणजे भारताची गुप्तचर संस्था! इतकंच ‘रॉ’ बद्दल ठाऊक होतं. आणखी काही किरकोळ माहिती असलीच तर ती चित्रपटांतून दाखवलेली! काही दिवसांपूर्वी पाहिलेला आलिया भटचा 'राझी' हा चित्रपट त्यातलाच!

चित्रपटापेक्षाही प्रत्यक्षात वास्तवाचा थरार खूपच वेगळा आहे. आपल्यासमोर आलेलं ते सत्य आणि न आलेलं काय? असे प्रश्न या पुस्तकानं उभे केले. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांमध्ये खरंच आपल्या देशात काही घडलं नाही का? पाकिस्तानबाबत आपले निर्णय, आंतरराष्ट्रीय धोरण, संरक्षणव्यवस्था, लष्करीसाहित्याची खरेदी, भारत-पाकिस्तान फाळणी, पंजाब आणि काश्मीरमधला दहशतवाद अशा अनेक प्रश्नांबाबत निरनिराळ्या प्रकारचे लेख वाचून मनात संभ्रमावस्था तयार होते. अशा वेळी आपला देश, आपल्या देशानं या ७० वर्षांत काय काय केलं ही बाजूही भक्कमपणे आपल्याला ठाऊक असणं गरजेचं असतं. रॉ सारख्या संस्था आपल्या देशाविषयीचा अभिमान, कार्य याबद्दल आपल्याला सजग करतात. पण आपल्याला त्याबद्दल फारशी माहितीच नसते. त्यामुळेच 'रॉ' या संस्थेची निर्मिती, तिचा इतिहास, तिचं काम, तिच्या कामातली जोखीम हे सगळं सगळं रवि आमले यांच्या ‘रॉ’ या पुस्तकातून वाचकांच्या समोर यायला मदत झाली आहे. 

'रॉ’ या पुस्तकाचे लेखक रवि आमले हे लोकसत्तेमध्ये वरिष्ठ संपादक म्हणून कार्यरत होतेच, शिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा यांसारख्या अनेक प्रथितयश वृत्तपत्रं, साप्ताहिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. 

मला ‘रॉ’ हे पुस्तक खूप आवडलं, याचं कारण म्हणजे एखादी गुप्तचर संस्था कशी उदयाला येते, आपल्याकडे तिची बीजं कुठे सापडतात हे या निमित्तानं ठाऊक झालं. अगदी ऋग्वेद काळापासून वरूण हा कसा आद्य गुप्तचर प्रमुख मानला गेला, अर्थववेद, तैतरिय संहिता, महाभारत, कौटिल्याचा काळ या सगळ्या वेळी गुप्तचर संस्था कशा काम करत याविषयीचा इतिहास या पुस्तकातून वाचायला मिळतो. आज आपण हम्पी हे पर्यटनस्थळ म्हणून आपण या स्थळाला भेट देतो आणि ते साम्राज्य बघून अवाक होतो. मात्र इथल्या कृष्णदेवराय राजाच्या (हरिहर आणि बुक्क यांच्या नंतरचा राजा) 'अमुक्तमाल्यद' या तेलुगू भाषेतल्या ग्रंथातही गुप्तचर संस्थेच्या कामाविषयी लिहिलं आहे. राजाला अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू या दोन्हींची माहिती असणं कसं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही संस्था कशी सक्षमपणे काम करणारी असावी लागते याचे दाखले दिलेले आहेत. पुढे चालून शिवाजी महाराजांच्या काळात बहिरजी जाधव नाईक यांच्या हेर असण्याबद्दलचे काही पुरावे मिळतात. या हेरांना जासूद असं म्हटलं गेलं आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतावर केलेलं आक्रमण आणि त्यांच्या राज्यात त्यांनी नेमलेले विविध हेर यांचाही उल्लेख या पुस्तकात येतो. ब्रिटिश काळात ठगी अँन्ड डेकॉईटी डिपार्टमेंट हा विभाग हेरगिरीचं काम करत असे. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत पाकिस्तान वेगळे झाले. स्वतंत्र भारतात इंटेलिजन्स ब्युरो अस्तित्वात आलं. या आयबीचे पहिले प्रमुख संचालक होते - टी. जे. संजिवी पिल्लै आणि त्यानंतरचे बी. एन. मलिक! यानंतरच्या १७ वर्षांच्या काळात आयबी ही यंत्रणा खूप शक्तिशाली बनली. पण त्याच काळात चीननं भारतावर आक्रमण केलं आणि याची कल्पना आयबीला आली नव्हती. यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आणि नव्यानं गुप्तचर यंत्रणेत बदल करण्याची गरज भासू लागली. यातूनच 'रॉ' चा जन्म झाला आणि याचे संचालक बनले रामनाथ काव!

'रॉ' च्या निर्मितीमागची कथा देखील खूप थरारक आहे. नैतिक-अनैतिक असं या कामात काहीही नसतं. 'एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर' असं आपण म्हणतो त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं हित बघणं जास्त महत्वाचं आणि त्यासाठी मग वाट्टेल ते डावपेच खेळावे लागले तरी हरकत नाही. रामनाथ काव यांची काम करण्याची पद्धत, त्यांची बुद्धिमत्ता काही प्रसंगातून समोर येते आणि एकूणच 'रॉ' मधल्या कामात किती मोठ्या प्रकारची जोखीम आहे हे लक्षात येतं. 

'रॉ’ या पुस्तकातून आपल्या मनातल्या अनेक पूर्वग्रहांना सुरूंग लावण्याचं काम लेखकानं केलं आहे. पाकिस्तानच्या फाळणीकडे सर्वसामान्य माणूस कसा बघतो, पंचावन्न कोटीचं प्रकरण काय, महात्मा गांधींची हत्या आणि नथूरामचा दृष्टिकोन यांचे अर्थ आपण कसे लावतो या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची आपली दृष्टी हे पुस्तक वाचल्यानं बदलते. यात बांगलादेशाची निर्मिती, सिक्किमचा विजय, खलिस्तान, काश्मीर, श्रीलंका, नेपाळ यांच्या कामगिरीबाबतचे अनेक नवे पैलू आपल्यासमोर उलगडले जातात. यातलं गांभीर्य, बारीकसारीक तपशील, राजकारण, समोर आलेलं चित्र आणि पडद्यामागचं सत्य हे इतकं विलक्षण नाट्य आहे की विश्वास ठेवावा की न ठेवावा अशा गोष्टी समोर येत राहतात. 

गुप्तचर संस्थेचं काम हे कधी न संपणारं असून फक्त युद्धकाळातच नव्हे, तर शांततेच्या काळातही ते अव्याहतपणे कसं चालू असतं आणि त्याची त्या वेळी सुरू असण्याची आवश्यकता का असते हे लेखक आपल्याला सांगतो. कोणत्याही राष्ट्राच्या जीवनातला शांतताकाळ हा भविष्यातल्या संघर्षाच्या तयारीचा काळ असतो आणि या संघर्षातलं सगळ्यात महत्वाचं शस्त्र असतं ते माहितीचं! ही माहिती आपल्याकडे आधीच असणं आवश्यक असतं. चिनी युद्धनीतीज्ञ सन त्सू यानं इसवीसन पूर्व सहाव्या शतकात या माहितीचं महत्व लिहून ठेवलंय. सन त्सू यानं म्हणून ठेवलंय, 'आपण कोण आहोत आणि आपला शत्रू कोण आहे याची ओळख तुम्हाला असेल, तर १०० लढाया झाल्या तरी त्याच्या परिणामांची चिंता करण्याचं कारण नाही. पण तुम्ही स्वतःला नीट ओळखलं नसेल, ना शत्रूला नीट जाणलं असेल तर मात्र प्रत्येक युद्धात तुमचा पराजय हा ठरलेलाच समजा.’ आपल्या शत्रूंचीच नव्हे तर आपल्या मित्रांचीही बलस्थानांची आणि कमजोरीची माहिती त्यांच्या नकळत मिळवणं हे हेरांचं काम!

'रॉ’ च्या निर्मितीपासून ते आजपर्यंतचा 'रॉ'चा इतिहास आणि काम याचा एक धावता आढावा लेखक रवि आमले यांनी या पुस्तकात घेतला आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. मात्र यंत्रापेक्षाही, अत्याधुनिक तंत्रापेक्षाही मानवी हेरांचं, बुद्धिमत्तेचं महत्व किती मोठं आहे आणि त्याला पर्याय नाही हे सांगून त्यांनी या पुस्तकाचा शेवट केला आहे. 

'रॉ’ हे पुस्तक वाचल्यानंतर एकूणच या थरारनाट्यातून मला बाहेर येताच येईना. मग मी रवि आमलेंचे इतरही लेखन शोधून काढण्याचा सपाटा लावला. त्यांचे इतरही लेख वाचले. नेताजींच्या मृत्युविषयी भाष्य करणारा लेख अनेक गुंत्यांची जाणीव करणारा वाटला. वास्तवाचं भान देणारं त्यांचं लेखन मला अतिशय भावलं, अंतर्मुख करून गेलं!

आपण मनोरंजनपर, वैचारिक, गूढ-रहस्यमयी, ललित, कथा-कादंबर्‍या, कविता अशा अनेक प्रकारातली पुस्तकं वाचतो. यातून वेगवेगळ्या रितीनं समृद्धही होतो. मात्र ‘रॉ’ हे पुस्तक या सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं आहे आणि या पुस्तकाच्या वाचनानं मेंदूला एक वेगळं खाद्य तर मिळणार आहेच, पण त्याचबरोबर आपल्या आसपास घडणार्‍या घडामोडींकडे बघण्याची वेगळी नजरही लाभणार आहे. ‘रॉ’ हे पुस्तक प्रत्येक भारतीय नागरिकानं जरूर जरूर आणि जरूर वाचलंच पाहिजे. 

दीपा देशमुख, पुणे. 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.