शब्दांचे जादूगार साहिर लुधियानवी

शब्दांचे जादूगार साहिर लुधियानवी

धाडधाड करत जाणार्‍या रेल्वेच्या आवाजानं 13 वर्षांचा एक किशोरवयीन मुलगा घाबरून आपल्या आईला बिलगला आणि रडत आपल्या आईला म्हणाला, ‘अम्मी, मला रेल्वेची आणि या आवाजाची खूप भीती वाटते; आपण परत आपल्या घरी जाऊया.’ त्या मुलाच्या आईला काय करावं क्षणभर सुचेनासं झालं. तिनं त्याला तसंच जवळ घट्ट पकडून धरलं. त्याच वेळी तिला रोज मारणारा, तिला घाणेरड्या शिव्या देणारा तिचा नवरा आठवत होता. मुलाच्या अम्मीला हे माहीत होतं, की तिच्या नवर्‍याला ना तिच्याबद्दल प्रेम होतं, ना त्यांच्या मुलाबद्दल. स्वाभिमानी असलेल्या त्या अम्मीनं आपल्या मुलाला कसंबसं समजवलं आणि आपण आता त्या घरी कधीही परत जाणार नसल्याचं सांगितलं. या मुलाला आपलं घर, आपलं गाव खूपच आवडायचं. नुसतं घरच नाही तर ते गावही सोडून जायचं या कल्पनेनं तो खूप कासावीस झाला. पण त्याच्या अम्मीचा निर्णय झाला होता. आपल्या अम्मीला जास्तच बिलगत तो म्हणाला, ‘अम्मी, तू म्हणशील तसंच आपण करू. पण तू मला कधी सोडून जाऊ नकोस.’ अम्मीनं त्याला कधीच सोडून जाणार नाही असं वचन दिलं आणि मुलाच्या डोळ्यातले अश्रू थांबले. आपल्या आईवर निस्सीम प्रेम करणार्‍या या मुलाचं नाव होतं ः साहिर लुधियानवी!

शायरीच्या दुनियेतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत शहेनशहा म्हणून राज्य करणारा साहिर लिुधयानवी याचं नाव अख्ख्या भारतात कोणाला ठाऊक नाही असा माणूस सापडणं विरळा! अप्रतिम गजला, गीतं, शायरी असे अनेक प्रकार आपल्या लेखणीने सजवलेल्या साहिरनं - त्याची गीतं अजरामर केली. तीन दशकं हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा साहिर लुधियानवी हा शब्दांचा जादूगार होता. त्यानं लिहिलेला प्रत्येक शब्द समोरच्याच्या अंतःकरणाला भिडत असे. म्हणूनच आजही त्याच्या शायरीचे लाखो दिवाने आहेत. 1971 साली भारत सरकारनं साहिरला पद्मश्री देऊन गौरवलं.

साहिर लुधियानवीचा जन्म एका मुस्लिम गुज्जर कुटुंबात 8 मार्च 1921 या दिवशी पंजाबमधल्या लुधियाना शहरात फजल मोहम्मद आणि सरदार बेगम या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचं खरं नाव अब्दुल हायी असं होतं. त्याचे वडील जहारगीरदार असल्यानं त्यांची आर्थिक स्थिती खूपच चांगली होती. अब्दुल हायी लहान असताना एका मौलवीनं त्याच्या अम्मीला तुझा मुलगा खूप हुशार असून तो एक खरा प्रामाणिक माणूस बनेल असं सांगितलं. अब्दुल हायीच्या अम्मीला मौलवीच्या तोंडून हे शब्द ऐकताच खूप आनंद झाला. पण आपल्या नवर्‍याच्या सततच्या जाचाला कंटाळून त्याच्या अम्मीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. 

अब्दुल हायीचं शालेय शिक्षण लुधियानाच्या खालसा हायस्कूलमध्ये झालं, तर कॉलेजचं शिक्षण लुधियानाच्याच चंदर धवन शासकीय महाविद्यालयात झालं. इथेच त्याच्या शायरीचा पाया रचला गेला. आज या कॉलेजच्या ऑडिटोरियमला त्याचं नाव दिलं गेलंय. लहानपणापासूनच त्याला पुस्तकं वाचण्याची खूप आवडत होती. अब्दुलची स्मरणशक्ती खूपच तल्लख होती. एखादं पुस्तक वाचलं की संपूर्ण पुस्तक आणि त्यातला मजकूर त्याला जसाच्या तसा लक्षात राहत असे. जेव्हा तो स्वतः शायरी लिहायला लागला, तेव्हा आपल्या खालसा हायस्कूलच्या फैयाज हिरयानवी या शिक्षकांना तो आपला गुरू मानत असे. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर अब्दुल हायीला अनेक छोटीमोठी कामं करून आपला उदरनिर्वाह भागवावा लागला. वयाच्या 24 व्या वर्षी त्याचा ‘तल्खिया’ हा संग्रह बाजारात आला होता. या संग्रहानं अमाप प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर अब्दुल हायी आणि त्याची अम्मी काही काळ लाहोर शहरात राहिले. 

15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण एक दुःखद घटना अशी घडली की भारताचे दोन तुकडे झाले आणि पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला. अनेकांनी पाकिस्तानात राहणं पसंत केलं, तर अनेकांनी पाकिस्तानातून भारतात येऊन राहायचा निर्णय घेतला. त्या वेळी धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतात राहणं अब्दुल हायीनं पसंत केलं आणि भारतात आल्यावर प्रोग्रेसिव्ह रायटर्स अ‍ॅसोसिएशनमध्ये तो सामील झाला. त्याची विचारसरणी डावी बनली होती. भारतात परत आल्यावर आपल्या आवडत्या गावाचं नाव आठवून अब्दुल हायीनं साहिर लुधियानवी असं नाव धारण केलं. हेच नाव पुढे उर्दू आणि हिंदी शायरी यांच्या विश्वात अजरामर झालं. 

उर्दू शायरीबरोबरच साहिर लुधियानवी यानं हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली आणि त्याच्या गाण्यांनी एकच धूम मचवली. बहुतांशी गीतकार आपल्या लिखाणात परमेश्वराची आळवणी, सौंदर्य, मद्य अशा शब्दांचा वापर करत अशा वेळी साहिरनं मात्र समाजाची नैतिकता, र्‍हास होणारी मूल्यं, प्रेमाच्या जागी उपभोगवादी गोष्टींनी घेतलेली जागा, समाजाची असंवेदनशीलता, य्ाुद्ध, राजनिती अशा गोष्टींवर लिहिणं जास्त गरजेचं मानलं. साहिरनं त्या वेळचा प्रसिद्ध रेडिओ स्टेशन सिलोनवरही क्रांती केली होती. रेडिओ सिलोनवर गाणं लावण्याआधी गायक आणि संगीतकार यांचं नाव निवेदक घेत असे. पण साहिरच्या आगमनानंतर गीतकाराचं नावही सन्मानपूर्वक घेतलं जायला लागलं. तेव्हापासून म्य्ाुझिक कंपन्या रेकॉर्ड्स काढताना गीतकारांनाही रॉयल्टीचे हक्क द्यायला लागल्या. साहिरचं मानधन तर इतर गीतकारांपेक्षा खूपच जास्त असायचं. माझ्या लेखणीत ताकद आहे, त्यामुळे संगीतकार कोणीही असो किंवा गायक कोणीही असो माझं गीत अजरामर होणारच असा दृढ विश्वास साहिरचा आपल्या लेखणीवर होता. 

1958 साली ‘औरत ने जनम दिया मर्दोको मर्दो ने उसे बाजार दिया’ या स्त्रियांच्या पिळवणुकीबद्दल भाष्य करणार्‍या गाण्यासाठी साहिरला सर्वश्रेष्ठ गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार देण्यात आला. पाच ते सहा कडवी असलेली ही एक दीर्घ कविता असूनही या चित्रपटाच्या निर्मात्यानं ती जशीच्या तशी चित्रपटात ठेवली. कारण साहिरच्या शब्दांमध्ये तशीच ताकद होती. या गीतामधून साहिरनं खूप परखडपणे आपलं म्हणणं मांडलं होतं आणि असे विचार मांडायला खूप धाडसाची गरज असते, जे साहिरमध्ये होतं. साहिरनं गीतलेखन केलेल्या ‘प्यासा’ या चित्रपटानं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर धूम मचवली. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी हा चित्रपट बघितला, तेव्हा त्यातली गाणी ऐकताना त्यांना आपले अश्रू रोखता आले नव्हते.

 
साहिरच्या लिखाणात एक जादू होती. साहिरच्या लिखा
णात एक प्रकारची स्पष्टता होती. त्याचं लिखाण तरुणाईसाठी होतं. ते लिखाण चिरतरुण होतं. त्यामुळेच ते लिखाणा तरुणाईशी जवळीक साधणारं होतं किंवा आहे. साहिर हा एकमेव कवी असा होता की त्याची शायरी, त्याचं चित्रपट गीतांचं लिखाण आणि माणूस म्हणून तो स्वतः या गोष्टी वेगळ्या नव्हत्याच. 

साहिर या शब्दाचा अर्थ ‘जादू’ असा होतो आणि सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना त्यांच्या जवळचे लोक आजही ‘जादू’ याच नावानं हाक मारतात. जावेद अख्तर यांच्या बेरोजगार असण्याच्या काळात साहिरनं त्यांना 200 रूपयांची मदत केली होती. जेव्हा कधी दोघांची भेट व्हायची, तेव्हा जावेद अख्तर साहिरला म्हणत, ‘मी तुमचे 200 रूपये आता परत देऊ शकतो, पण मी देणार नाही.’ हा गंमतीचा सिलसिला 25 ऑक्टोबर 1980 ला कायमचा बंद झाला कारण हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 59 व्या वर्षी साहिरचा मुंबई शहरात मृत्यू झाला. जुहूजवळच्या कब्रस्थानात साहिरचा अंतिम विधी पार पाडून जावेद अख्तर इतर लोकांबरोबर बाहेर येत असताना एक माणूस जावेद अख्तर यांच्या मागून धावत आला आणि म्हणाला, ‘कब्रस्थानवाला दफनानेके पैसे माँग रहा है’. जावेद अख्तर यांनी विचारलं, ‘किती?’ तो माणूस उत्तरला, ‘दोनशे रुपये!’ जावेद अख्तर यांनी दफनविधीचे 200 रुपये दिले, हिशोब चुकता झाला होता. पण त्याच वेळी या विचित्र योगायोगानं जावेद अख्तर सुन्न झाले होते!

‘मै पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है‘ असं म्हणणार्‍या साहिरच्या आधी आणि नंतर अनेक शायर आले आणि यापुढेही येतील, पण साहिरची जागा मात्र आजपर्यंत कोणी घेऊ शकलं नाही आणि पुढेही कोणी घेऊ शकणार नाही हे मात्र खरं!

दीपा देशमुख 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.