‘अर्थशास्त्र’ आणि कौटिल्य

‘अर्थशास्त्र’ आणि कौटिल्य

‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतला आर्थिक इतिहासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. यात 15 प्रकरणं असून 6 हजार श्लोक आहेत. तसंच 149 अध्यायांमधून हा ग्रंथ त्या त्या गोष्टींविषयी मांडणी करतो. हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनीती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. हा ग्रंथ कौटिल्यानं लिहिला असून विष्णुगुप्त, आर्य चाणक्य अशा नावांनी तो ओळखला जातो. तक्षशिला विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचा गाढा अभ्यासक आणि अध्यापक असलेला कौटिल्य हा एक उत्तम निरीक्षक होता. त्याचे नैतिक अर्थशास्त्रावरचे विचार आजही ग्राह्य मानले जातात. आजही काही विद्यापीठांत कौटिल्याची तत्वं व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात शिकवली जातात.

कोटिल्यानं म्हणजेच आर्य चाणक्यानं तीन महत्वाचे ग्रंथ लिहिले. अर्थशास्त्र, नीतिशास्त्र अणि चाणक्य-नीति. जगभरातल्या विद्वानांनी या ग्रंथाचा अभ्यास केला. अर्थशास्त्रातला अर्थ हा शब्द लोकांचं कल्याण किंवा योगक्षेम या अर्थानं येतो. राजानं राज्य कसं करावं याबाबत या ग्रंथात लिहिलं आहे. चाणक्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात एकूण 15 प्रकरणं असून पहिल्या पाच प्रकरणांमध्ये राजा, मंत्री आणि वेगवेगळे अधिकारी यांना प्रशिक्षित करण्याविषयी लिहिलं आहे. कायदा आणि शासन, राज्याचं व्यवस्थापन याबद्दलची माहिती आहे. तसंच अधिकार्‍यांची शिस्त, त्यांची कर्तव्यं, कायदे आणि अर्थशास्त्राबद्दलची सखोल चर्चा याविषयी लिहिलं आहे. तसंच राष्ट्राची आचारसंहिता काय असावी याबद्दल चाणक्यानं आपली मतं मांडली. सहाव्या प्रकारणात आदर्श राजा कसा असावा आणि त्याच्यातले 7 गुण कसे असावेत याबद्दल सांगितलं, तर सातव्या प्रकरणामध्ये राज्याचं परराष्ट्रधोरण काय असलं पाहिजे याविषयी सखोल विवेचन केलं. आठव्या प्रकरणामध्ये वेगवेगळी व्यसनं आणि प्रकृतीमध्ये कुठल्या 7 गोष्टींनी अपाय होऊ शकतो याची कारणं त्यानं सांगितली. नवव्या प्रकरणामध्ये युद्धाची तयारी कशी करावी, सैन्य कसं असलं पाहिजे याविषयी, तर दहाव्या प्रकरणात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय घडू शकतं याविषयी चाणक्यानं लिहिलं. अकराव्या प्रकरणात राज्याचं संघटन आणि सर्व प्रकारच्या लोकांवर आपला अंकूश कसा ठेवला पाहिजे, राज्यातले उद्योग कसे असले पाहिजेत याबद्दल त्यानं लिहिलं. बाराव्या प्रकरणामध्ये आपला शत्रू बलाढ्य असेल तर त्याला कसं नामोहरम केलं पाहिजे आणि तेराव्या प्रकरणामध्ये शत्रूचं राज्य कसं काबीज करायचं याबद्दल अनेक बारकावे लिहिले. चौदाव्या प्रकरणामध्ये शत्रूला पराजीत करण्यासाठीचे उपाय सांगितले, तर पंधराव्या प्रकरणामध्ये 32 प्रकारची तंत्रं  वेगवेगळ्या लोकांशी वागताना कशी अंमलात आणायची त्याबद्दल सांगितलं.

अर्थशास्त्र या ग्रंथात चाणक्यानं अर्थशास्त्राची नैतिकता मांडली आणि राजाची कर्तव्यं यावर भर दिला. राजाने नेहमी अर्थकारणाच्या व्यवस्थापनात सक्रिय असायला हवं असं त्यानं म्हटलं. अर्थ (पैसा) याचं मूळ कृतीत आहे आणि या कृतीचा अभाव दारिद्रय आणतो. अर्थपूर्ण कृतीच्या अभावात वर्तमानातला आणि भविष्यातला विकास नष्ट होतो. अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी विशिष्ट पोषक वातावरण आवश्यक असतं. यासाठी योग्य असे कायदेकानून आणि त्याची कर्तव्यदक्ष अंमलबजावणी गरजेची आहे आणि ती अंमलबजावणी तत्परतेनं नीट व्हावी असं चाणक्यानं लिहिलं. ती अंमलबजावणी न झाल्यास चाणक्यानं त्यावर शिक्षाही सुचवल्या. राज्यकारभाराची अचूक माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांच्या हेरांचा उल्लेख त्याने आपल्या अर्थशास्त्रात केला होता. चाणक्यानं खाजगी व्यापाराबद्दल अनुकूल मत मांडली असली, तरी काही महत्त्वाचे उद्योग मात्र राजाच्या मालकीचे असले पाहिजेत आणि त्यावर राजाचंच नियंत्रण असलं पाहिजे असं सांगितलं. राजाचा खजिना नेहमी भरलेला असायला हवा आणि त्यातून सैन्याचं पालनपोषण आणि त्यांचा खर्च करता यायला हवा असं त्यानं म्हटलं.

व्यापाराच्या बाबतीत प्रोत्साहन देणार्‍या अनेक गोष्टी चाणक्यानं सुचवल्या. परदेशातून येणार्‍या मालावर जकातमाफी असावी, सवलती असाव्यात म्हणजे आपसातला व्यापार वाढू शकेल असं त्याला वाटत असे. पण त्याचबरेाबर आपला माल परदेशात पाठवताना मालाचं उत्पादन मूल्य, विक्रीची किंमत, मालावरील जकातकर, पहारेकर्‍यांचा पगार विक्रीसाठी पाठवताना आपल्या मालाचं उत्पादनमूल्य, विक्रीची किंमत मालावरील जकात कर, वाहनखर्च, मजुरी या सगळ्यांचा विचार करुन नफा किती होईल याचाही विचार त्यानं केला होता. अचूक वजनं, वजनांची नियमित तपासणी या गोष्टींनाही तितकंच महत्व त्यानं दिलेलं दिसून येतं. व्यापार करताना भेसळ करणार्‍यांसाठी त्याने खूप मोठा दंडही सुचवला. धातूचं उत्पादनातलं महत्त्व चाणक्यानं जाणलं होतं. त्यामुळे सोन्याचांदीचे प्रकार, वजन करताना सोनं मारणं, कमी कसाचं सोनं मिसळणं या गोष्टींबद्दलही चाणक्यानं बारकाईनं निरीक्षण केलं होतं. तसंच मिठामध्ये भेसळ करणार्‍यासाठी त्यानं खूप मोठा दंड सुचवला.

‘माणूस हा जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ असतो’ असं सांगतानाच चाणक्यानं शिक्षण हे माणसासाठी किती महत्वाचं आहे हे पदोपदी सांगितलं. चाणक्यानं लिहिलेल्या ग्रंथात शिस्त, अधिकार्‍यांची कर्तव्य, कायदा, उद्योग, राष्ट्राची आचारसंहिता, कार्यालयीन हिशोब आणि कामकाम, व्यापार, जकात आणि उत्पादनशुल्क, मालमत्ता, ठेवी, कर्जवसुली, परराष्ट्रधोरण आणि अर्थशास्त्राविषयी चर्चा केली. कामगारांचे हक्क, सरंक्षण, मजुरी आणि कामाचं स्वरुप याविषयी त्यानं विस्तारानं लिहून ठेवलं. त्यानं संबंधित अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणासाठी कठोर दंड केला जावा असं म्हटलं.

स्वदेशी मालावर 5%आणि परदेशी मालावर 10% नफा चाणक्यानं सुचवला. शेतमालाचं उत्पादन आणि पैसे देण्याची क्षमता यावर किती प्राप्तीकर वसूल केला जावा याविषयी त्यानं सांगितलं.  चाणक्यानं माणसाच्या दैनंदिन गरजांचाही खूप बारकाईनं विचार करुन सूचना लिहिल्या. उदाहरण द्यायचं झाल्यास धान्य जमिनीलगत न ठेवता थोडं उंचीवर ठेवावं. किंवा एका माणसाची आवश्यक गरज किती असते तर पावशेर तांदूळ, त्याच्या चौथा भाग डाळ, डाळीच्या सोळावा भाग मीठ आणि डाळीच्या चौथा भाग तेल किंवा तूप. स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही तो आहाराचं प्रमाण किंवा वाटणी त्यानं सारखीच मानली.  आणि मुलांसाठी हा आहार 1/3 सांगितली. सर्व अनाथ. वृद्ध आणि निराधार व्यक्तींची जबाबदारी राजाने उचलली पाहिजे असं चाणक्यानं म्हटलं होतं.

चाणक्याच्या मते आपल्या राज्याशेजारची राज्यं शत्रूराज्यं मानावीत. तसंच शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या नात्यानं शत्रूराष्ट्रांच्या शत्रूंशी मैत्री करावी. मित्रराष्ट्रांमध्ये व्यापाराला प्रोत्साहन द्यावं. परदेशातून येणार्‍या मालाला जकातमाफीसारख्या सवलती दिल्या म्हणजे व्यापार वाढू शकतो असं त्याला वाटत असे. परदेशात माल विकण्यासाठी पाठवताना आपल्या मालाचं उत्पादनमूल्य, विक्रीची किंमत, मालावरची जकात, पहारेकर्‍याचा खर्च, वाहनखर्च, मजुरी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यानंतर नफा किती मिळेल हे बघितलं पाहिजे असं चाणक्यानं म्हटलं होतं.

करांबद्दल चाणक्यानं आपली भूमिका परखडपणे मांडली. सरकारला जमिनीवरचा कर, दंड या गोष्टी 60 प्रकारांमधून मिळत असल्याचं चाणक्यानं म्हटलं. तसंच वेळेवर हिशोब आले नाहीत तर रकमेच्या 10 पट दंड, वेतन घेऊन काम केलं नाही तर वेतनाच्या 5 पट दंड आणि एकच गुन्हा पुरत केला तर शिक्षा दुप्पट किंवा तिप्पट अशा प्रकारच्या शिक्षाही चाणक्यानं सुचवल्या. तसंच पूर, युद्ध, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आल्या तर सरकारनं आधीच साठवणूक करून ठेवली तर या आपत्तीशी सामना करता येतो असंही त्यानं सांगितलं.

चाणक्यानं त्याच्या अर्थशास्त्राच्या ग्रंथात कर कसे लादावेत आणि गोळा कसे करावेत, कर्जाच्या विविध योजना, त्या योजना कशा राबवल्या गेल्या पाहिजेत, कर्ज केव्हा, कसं आणि किती दिलं यावर व्याजाची आकारणी किती असावी या बाबतीत त्यानं खूप सविस्तर लिहिलं. त्याने व्याजाचे सहा प्रकार सांगितले. व्याज वर्षाच्या अखेरीस असावं आणि ते दामदुपटीहून जास्त असता कामा नसे, मुदतीच्या अगोदर किंवा चक्रवाढ दरानं जर आकारलं गेलं तर मागणीच्या चौपट दंड आकारला जावा, तसंच आजारी किंवा अज्ञानी मनुष्यावर कर्जाचा भार पडता कामा नये असंही त्यात अर्थशास्त्र या ग्रंथात लिहिलं. ठेवी ठेवतानाही व्याजदराचे जे नियम होते तेच इथेही त्यानं लागू केले. जर सावकारानं एखादी ठेव परस्पर विकली तर ठेवीच्या किंमतीच्या चौपट रक्कम ठेवीदाराला दिली पाहिजे. मात्र याचा 20% भाग हा कर म्हणून आकारला जावा असंही त्यात त्याने लिहून ठेवलं.

‘कर गोळा करताना सरकारची भूमिका ही मध प्राशन करणार्‍या मधमाशीसारखी असावी. मधमाशी फुलातला आवश्यक तेवढाच मध घेते की ज्यामुळे मधमाशी आणि फूल दोघंही आनंदाने तर राहातातच पण त्यांच्या अस्तित्वाला बाधा येत नाही’, असं चाणक्याचं म्हणणं होतं. अर्थव्यवस्थेत किती माणसं काम करतात, जो जास्त काम करेल त्याला जास्त पैसे मिळाले पाहिजेत, तसंच अनेकांनी एखादं काम एकत्र मिळून केलं तर त्यांच्यात पैशाची वाटणी कशा प्रकारे झाली पाहिजे याचंही अर्थशास्त्र या ग्रंथात विवेचन आहे. मात्र काही कामं खालच्या वर्णातल्या लोकांनी करावीत असंही तो म्हणत असे. उद्यान आणि करमणूक यासाठी बांधलेली सभागृहं ही करवसुलीच्या प्रक्रियेत अडथळा आणतात असं त्याला वाटे.

आपल्या मंत्र्यांची राजनिष्ठा तपासण्यासाठी चाणक्यानं भयोपधा, अर्थापधा, धर्मोपधा आणि कामोपधा अशा चार चाचण्या सांगितल्या. यातली भयोपधा ही विचित्रच चाचणी होती. एका वृद्ध संन्याशिनीनं मंत्र्याला सांगायचं की राणी तुझ्यासाठी कामपीठेनं आतुर झाली आहे आणि तू तिची इच्छा पूर्ण केली तर तुझं महत्त्व तर वाढेल पण आर्थिक लाभही होईल. असा प्रस्ताव वारंवार समोर आला तरी जो मंत्री तो प्रस्ताव नाकारेल तो मंत्री खरा राजनिष्ठ समजावा असं चाणक्यानं म्हटलं. किंवा एखादा मंत्री जास्त शक्तिशाली होतोय असं जाणवलं तर त्याच्या मुलाला त्यानं आपल्या वडिलांना ठार करावं असं सांगिायचं आणि तसं केलं तर त्या मुलाला वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावायची अशा विचित्र आणि कपटी गोष्टीही चाणक्यानं सांगितल्या होत्या. राज्याच्या सुरळीत कामासाठी चाणक्यानं नेमलेल्या वेगवेगळ्या अधिकार्‍यांची नावं खूपच गंमतशीर होती. सन्निधाता, समाहर्ता, अक्षपटल, अध्यक्ष, खाणींचा अध्यक्ष, कोष्ठागाराध्यक्ष, कुटाध्यक्ष, पौतवाध्यक्ष, सीताध्यक्ष, सुराध्यक्ष, पण्याध्यक्ष, सूत्राध्यक्ष, मुद्राध्यक्ष आणि सूत्राध्यक्ष वगैरे.

संकटकाळासाठी द्रव्यं राखून ठेवावं, खूप संपत्ती मिळवण्याची इच्छा करणं याला व्यसन म्हणत नाहीत, केवळ वयानं किंवा आकारानं व्यक्ती मोठी असली तरी ती गुणवान असेलच असं नाही, चांगलं वागणं काय असतं हे ठाऊक असतानाही लोक वाईट वागतात अशा प्रकारची आजच्या जगण्यात उपयोगी पडतील अशी अनेक सूत्रं चाणक्यानं त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात सांगून ठेवली.

चाणक्याचा काळ साधारणपणे ख्रिस्तपूर्व 350 ते 283 असा मानला जातो. तमिळनाडूतला शोलियार आणि केरळमधला नायर समाज हे दोघंही चाणक्याला आपापल्या जातींतला सगळ्यात मोठा विद्वान समजतात. अशीही एक (दंत)कथा चाणक्याच्या बाबतीत सांगितली जाते, त्याला जन्मतःच सगळे दात आलेले होते म्हणे. ज्याला जन्मतःच सगळे दात येत, तो पुढे राजा बनणार अशी त्या काळच्या लोकांची समजूत होती. मात्र चाणक्य हा क्षत्रिय नव्हता आणि राजा हा क्षत्रिय असला पाहिजे असा त्या काळचा नियम होता. त्यामुळे मग चाणक्याचे सगळे दात काढून टाकले होते असं सांगितलं जातं. असं जरी असलं तरी पुढे त्यानंच चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं आणि राज्य मात्र स्वतःच केलं.

चाणक्य हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान मंत्री होता. चंद्रगुप्ताच्या राज्यापूर्वी नंद घराण्याची सत्ता होती. ती सत्ता उलथून चंद्रगुप्ताला राज्यावर बसवण्यात चाणक्याचा मुख्य हात होता. चाणक्याच्या आयुष्याबद्दल अनेक (दंत)कथा प्रचलित आहे. चाणक्य हा पाटलीपुत्र नगरातल्या चणक या शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीच्या विरोधात बोलल्यामुळे चणकला तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. चणकच्या मृत्यू नंतरही नंद राजवटीतल्या लोकांनी चणकच्या कुटुंबीयांचं जगणं असह्य करून सोडलं. त्यामुळे चाणक्याला पाटलीपुत्र सोडून तक्षशिला इथं जावं लागलं. तक्षशिला विद्यापीठात त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथेच राजनीती आणि अर्थशाा हे विषय शिकवायला सुरुवात केली. चाणक्य इतकं सुरेख शिकवत असे की त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्याचे मंत्री तयार झाले. त्या काळात कुठलीही राजवट असली तरी चाणक्याचं नाव खूप आदरपूर्वक घेतले जात असे.

दुसर्‍या एका कथेप्रमाणे चाणक्य मगध साम्राज्यात विंध्याचलाच्या परिसरात आपलं गुरूकुल चालवत असल्याची माहितीही मिळते. त्याची ख्याती सर्वत्र पसरल्यामुळे दूरदूरहून विद्यार्थी त्याच्याकडे शिकायला येत. मगधावर त्या काळी नंद राजाची सत्ता होती. नंद हा अतिशय जुलमी आणि कपटी राजा होता. त्याचा मुख्यमंत्री व्हिक्टर याच्या आई-वडिलांना आणि इतर नातेवाईकांना नंदराजानं काही कारणास्तव तुरुंगात डांबून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना ठार मारलं होतं. विक्टरला नंद राजाचा सूड घ्यायचा होता. एके दिवशी नगरातून फिरत असताना भर उन्हात विक्टरला एक अत्यंत कुरूप मनुष्य जमिनीतल्या हरळीच्या मुळ्या उपटून काढताना दिसला. विक्टरनं त्याला तो काय करतोय असं विचारल्यावर त्या माणसानं ‘मी माझ्या पायाला जखमा करणार्‍या या हरळीचा निःपात करायचं ठरवलं आहे असं सांगितलं. हाच मनुष्य नंद राजाचा सूड घेण्यासाठी योग्य आहे असं विक्टरला वाटलं आणि त्यानं त्या मनुष्याला आपल्याबरोबर आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी यावं अशी विनंती केली. या मनुष्याचं नाव होतं चाणक्य!

योग्य वेळी विक्टरनं नंदराजापुढे उभं केलं. त्या वेळी त्याचं कुरूप रूप बघून नंद राजा कडाडला, ‘अरे हा ब्राह्मण आहे की चांडाळ? याला माझ्यापासून दूर करा.’ त्याच्या या शब्दांनी चाणक्य खूपच अपमानित झाला आणि त्यानं या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि  नंदराजाचा नाश केल्यावरच ही गाठ बांधायची प्रतिज्ञा केली.

त्यानंतर चाणक्यानं नंदराजाच्या मर्जीतल्या चंद्रगुप्ताशी मैत्री करून राजाविरुद्ध फितुरी करायला दरबारातल्या लोकांना प्रवृत्त केलं. चंद्रगुप्ताच्या प्रेयसीला नंदराजानं जबरदस्तीनं आपल्या जनानखान्यात डांबल्यामुळे चंद्रगुप्ताचा नंदराजावर आणखीनच राग होता. मग चाणक्यानं चंद्रगुप्ताला सैनिकी शिक्षण, व्यूहरचना, राजनीती अशा अनेक गोष्टीचं प्रशिक्षण दिलं आणि संधी मिळताच पाटलीपुत्र नगरावर हल्ला करून नंदराजाचा पराभव केला. त्यानंतर चंद्रगुप्त मगध देशाचा राजा बनला आणि चाणक्य प्रधानमंत्री!

चाणक्य चंद्रगुप्ताला जेवणातून अतिशय कमी मात्रेत रोज विष देत असे. भविष्यात कोणी जर चंद्रगुप्तावर विषप्रयोग केला तर त्याचा परिणाम होऊ नये असा चाणक्याचा हेतू होता. एके दिवशी चंद्रगुप्ताच्या राणीनं चुकून चंद्रगुप्ताचं विष घातलेलं अन्न खाल्ल्यामुळे तिचा त्यात मृत्यू झाला. मात्र तिच्या पोटातलं बाळ मात्र पोट कापून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. त्याचं नाव बिंदूसार ठेवण्यात आलं. (याच बिंदूसाराचा मुलगा म्हणजे सम्राट अशोक!)

चंद्रगुप्ताच्या मृत्यू नंतर बिंदुसाराच्या दरबारातला सुबंधू नावाच्या एका मंत्र्यानं बिंदुसाराला तुझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत चाणक्य असल्याचं सांगितलं. चाणक्यालाही आपला मृत्य्ाू जवळ आल्याची कल्पना आली. त्यानं शेणाच्या गोवर्‍यांच्या ढिगार्‍यावर बसून अन्नपाणी वर्ज केलं. मात्र तोपर्यंत बिंदुसाराला सत्य कळल्यामुळे त्यानं सुबंधूला चाणक्याची माफी मागायला लावली. पण असूयेनं पेटलेल्या सुबंधूनं कट रचून त्या गोवर्‍यांच्या ढिगाखाली आग लावली. त्या आगीत चाणक्य जळून मेला. ‘शत्रूला अजिबात मागमूस न लागू देता त्याला ठार करावं’ हे चाणक्याचं प्रसिद्ध तत्त्वज्ञान नेमकं त्याच्याच बाबतीत खरं ठरलं!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.