अनिल अवचट - माझ्यातला मी

अनिल अवचट - माझ्यातला मी

पांढरेशुभ्र भुरभुरणारे डोईवरचे दाट केस, तशाच शुभ्र दाढीमिशा आणि तसंच शुभ्र दातांचं निर्मळ हास्य...या माणसाला बघितलं की ओळख करून द्यायची गरजच राहत नाही.सिर्फ नाम काफी है प्रमाणे...खरंच, अनिल अवचट हे नाव उच्चारलं की आख्खा माणूस उोळ्यासमोर येउन उभा राहतो. विशेष म्हणजे एकाच वेळी तो अनेक भूमिका करत असतो. तो एकीकडे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं काम बघतो, तर त्याच वेळी दुसरीकडे तो शेकडो, हजारो व्यक्तींचं एकाच वेळी पालकत्व निभाव असतो. तो शिक्षणानं डॉक्टर, मनानं लेखक आणि वृत्तीनं पत्रकार आहे. कलेचा आविष्कार त्याच्या बोटांमधून करणारा तो एक निसर्गवेडा चित्रकार आहे. तसंच ओरिगामीत बुडालेला एक निर्व्याज मनाचा मुलगाही आहे. सुरांशी खेळणारा एक स्वरवेडा आहे आणि बांधीलकी जपणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. असं हे न संपणारं बाबाचं म्हणजेच अनिल अवचट या माणसाचं व्यक्तिमत्त्व! पण या सगळ्यापेक्षाही त्याची खरी ओळख म्हणजे तो एक मनस्वीपणे जगणारा एक कलंदर आहे!

      अनिल अवचट - त्याच्यातला पत्रकार आणि त्याच्यातला माणूस सतत कशाचा तरी शोध घेत असतो. प्रसिद्धीची हाव नसलेला हा एक  लेखक आहे - त्याच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे तो ठरवून काहीच लिहीत नाही. त्याला आतून जे वाटतं, तेच तो लिहितो. तो एक कवी आहे - मनातलं गाणं हळुवारपणे समोरच्याचं करून टाकतो. तो एक चित्रकार आहे - मनात उमटलेली चित्रं, मनात अलगद उतरलेले रंग तो अलगद कागदावर उतरवतो. तो एक गायक आहे - मनातले शब्द ओठांवर आणतो. तो एक संगीतकार आहे - बासरीच्या सुरांनी मनातल्या भावनांना वाट करून देतो. तो एक शिल्पकार आहे - अस्फुट आणि अव्यक्त रचनांना वास्तवात साकार करतो. तो एक कलावंत आहे - ओरिगामीच्या कलेनं आबालवृद्धांना स्तिमित करून सोडतो. तो माणुसकी जपणारा एक माणूस आहे - म्हटलं तर तुमच्याआमच्यासारखा, पण तरीही आभाळाएवढा उंच! समुद्रासारखा विशाल!

       एकाच माणसांत हे सगळे गुण बघून थक्क व्हायला होतं. त्याला भेटणं म्हणजे त्याच्या पोतडीतून एकापाठोपाठ एक अनेक गोष्टी निघत राहतात. त्याला आग्रह करावा लागत नाही, तो बासरीवर एखादा राग आळवतो, कधी गाणं गातो, तर कधी ओरिगामीचा डायनासोर करून आपल्या हातात ठेवतो. कधी त्याला आपलं खळखळून वाहणारं हसणं आवडतं, मग ते त्याच्या कॅमेर्‍यात बंदिस्त करायला तो सरसावतो. कधी त्याची भुरकट काळ्या किंवा पिवळसर रंगाच्या कव्हरमधली डायरी त्याच्या हातात येते आणि मग त्याच्या कविता पावसाळी वातावरणात आणखीनच खमंगपणा आणतात. कधी त्याला समोरच्याकडूनही काही शिकायचं असतं. मग तो आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखं बसतो आणि ऐकत राहतो. त्याच्यातले अनेक ‘मी’ अनुभवू या, त्याच्याच शब्दांत :

पत्रकार...

माझ्यातला पत्रकार सदोदित जागा असतो. समाजातल्या अनेक विसंगती मला खटकत राहतात.  दु:खितांचे, शोषितांचे प्रश्न आपले वाटत राहतात आणि मग त्यांच्या समस्यांचा तळाशी जाउन शोध घेत ते लोकांसमोर मांडावे वाटतात. त्यासाठी लिखाणासारखं दुसरं सशक्त प्रभावी माध्यम नाही असं मला वाटतं. माझं रिपोर्ताज शैलीतलं लिखाण लोकांनाही भावलं. खरं तर या शैलीला रिपोर्ताज म्हणतात आणि याची सुरुवात फ्रान्समध्ये पहिल्यांदा झाली हे मला मुळीच माहीत नव्हतं. मी मला जे जाणवलं, जे मी बघितलं ते स्वाभाविकपणे लिहीत गेलो. माझ्या लिखाणातून त्या वेळी सामान्य माणसांचे प्रश्न येत होते. विशेषतः मुस्लीम महिलांचे प्रश्न त्यात होते. स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी वाचा फोडणार्‍या एका अधिवेशनात मी त्या वेळी सहभागी झालो होतो. तिथे आलेल्या स्त्रियांचे प्रश्न पाहून माझं मन हेलावलं. ते सगळं लोकांसमोर आलं.

त्या स्त्रियांपैकी कोणाला अन्नावाचून वंचित ठेवलं जात होतं आणि भूक सहन न होऊन घरातून भाकरी चोरून खाल्ली तर जास्त खाते या आरोपाखाली तलाक दिला जात होता. कोणा एकाने मुस्लीम विधवा स्त्रीशी लग्न करायचं ठरवल्यावर मोठा गदारोळ होऊन आठच दिवसांत त्या स्त्रीचं लग्न दुसरीकडे लावून देण्यात आलं. एकीचं लग्न झालं आणि वयात आलेल्या त्या मुलीच्या चेहर्‍यावर तारुण्यपिटिका (पिंपल्स) आल्याचं पाहताच ही रक्तपिती आहे असं म्हणून तिला तलाक दिला गेला आणि दुसर्‍या मुलीबरोबर लग्नही करून टाकलं. डॉक्टरांनी जेव्हा रक्तपिती नसून पिंपल्स आहेत असं लिहून दिलं, तेव्हा नवर्‍यानं परत घरात घेतलं आणि दुसर्‍या बायकोला तलाक दिला. त्या मुलीची काहीही चूक नसताना तिच्या आय्ाुष्याची मात्र फरफट झाली. एका स्त्रीचा नवरा तर शासकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असलेला आणि आठ मुलांचा पिता असलेला! पण काहीच वर्षांनंतर त्याचं त्याच्या विद्यार्थिनीबरोबर प्रेम जमलं आणि त्यानं बायकोला माहेरी पाठवलं ते परत घरातच घेतलं नाही. तिला केवळ महिना पन्नास रुपये पाठवत राहिला. माहेरीही ती ओझं झाली. आठ मुलांसह कुठे जायचं या विचारानं कासावीस झाली. त्यातलीच एक नवर्‍याची कारणाशिवाय मारहाण सहन करत राहिली मात्र एके दिवशी तिनं त्याला ‘तुझ्या लाथा खायला मी काही फूटबॉल नाही’ असा उलटा जाब देताच त्यानं तिला तलाक दिला. तेव्हा न डगमगता तिनं शिक्षण पूर्ण करून शिक्षिकेची नोकरी केली आणि पुढे त्याच शाळेत ती मुख्याध्यापिका म्हणून मानाचं जीवन जगू लागली. या अधिवेशनात आलेल्या प्रत्येक स्त्रियांना माहेरच्या आणि सासरच्या अत्याचारांना बळी जावं लागलं होतं. कुणाचं डोकं मोठं आहे म्हणून, तर कुणाच्या आई-वडिलांनी लग्नात जुनं फर्निचर दिलं म्हणून, तर कुणाला नीट चालता येत नाही म्हणून तलाक दिले गेले होते. या सगळ्यां स्त्रियांचं मनोगत, त्यांच्या व्यथा मी साधना साप्ताहिकातून मांडल्या होत्या.

याचबरोबर जेव्हा एखादी परिषद किंवा अधिवेशन दिमाखदार आणि दिखावू असतं, तेव्हा त्यातली विसंगतीही माझी लेखणी टिपत असते. जातीप्रश्न, दंगली, आंदोलनं, धरणग्रस्तांचे प्रश्न, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न आणि आरोग्य क्षेत्रातले प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर गावोगाव, ठिकठिकाणी फिरून पूर्वी मी लिहायचो. समाजात पसरलेल्या धार्मिकत्वाचा आसरा घेऊन बुवावाजीनं लोकांच्या भावनेला हात घालून लुबाडणार्‍यांविरुद्धही मी लिहिलं. या भटकंतीमधूनच मग पारध्यांचे प्रश्न, वाघ्या-मुरळींचं शोषित जगणं आणि देवदासी प्रथेविरोधातही मी लिहीत गेलो. देवदासींविषयी पसरलेल्या अंधश्रद्धा, भीती आणि त्यांचं गरिबीतलं असाहाय्य जगणं मी जवळून  बघितलं आणि त्यातल्या कितीतरी जणींना प्रत्यक्ष भेटलो, बोललो आणि लोकांसमोर मांडलं. गाणगापूरसारख्या धार्मिक स्थळी होणार्‍या अंधश्रद्धेवरही लिहिलं. देवाच्या नावावर चालणारा सगळा सावळा गोंधळ बघितला आणि तिथले पुरोहित, अंगात येणार्‍या स्त्रिया अशा अनेक गोष्टी लोकांसमोर मांडल्या.

 अनेक लोक मला म्हणतात, महात्मा फुलेंपासून अनेकांनी अशा गोष्टींवर लेख लिहिले, पण आपला समाज कुठे बदलला? कशाला लिहिता? त्यावर मी फक्त हसतो. कारण आवाज तर उठवलाच पाहिजे. खरं तर अशा अनेक लेखांमुळे, कार्यकर्त्यांमुळे तर बदल घडताना दिसतो आहे.

कवी

माझ्या आयुष्यात कविता थोडी उशिराच आली. ही कविता कधी चित्र बनून येते, तर कधी बासरीतले सूर बनून येते. ती कधी मूल होउन हितगुज करते, तर कधी निसर्गाशी संवाद साधते, कधी अस्वस्थ मनाला शांत करते, तर कधी ओठांवर हलकेच हसू पेरते.

मला पाहिल्यावर,
ती अक्षरे...
आकसून घेतात अंग
त्यांचे होतात ठिपके
त्या ठिपक्यांशी
खेळावे म्हटले तर
तेही एकत्र येऊन
बनतो मोठा गोळा
काय डोकं आपटणार त्यावर?
आपटणार शब्द ऐकल्यावर
आपटलाच खाली तो
झाले त्याचे तुकडे तुकडे
मग ते मी गोळा केले
उभे केले त्यांना ओळीत
ती झाली आता
एक नवीच भाषा
त्या भाषेत लिहू लागलो मग
मी माझी कविता

    अस्वस्थ, बेचैन माणसं सर्वत्र दिसतात. काहीतरी हवंय, काहीतरी नाहीये आणि मग ते मिळवण्यासाठीची धडपड प्रत्येकाचीच चालू असते. या परिस्थितीत मनाला शांतता ती कुठली? समाधान ते कसलं? मग पुन्हा कविता येते आणि म्हणते :

अतृप्तीच्या भांड्यात
एक थेंब तृप्तीचा टाकावा
आणि
छान ढवळत बसावं
की
मस्त दही लागतं
कवडीदार
तृप्तीचं

कधी कधी मनाचं लहरीपणही कवितेतून दिसतं :

कधी कधी मन रुसतं
आणि झाडावर जाऊन बसतं
किती पटवा, आर्जव करा
नाकदुर्‍या काढा, माफ्या मागा
ते आपलं ढिम्म

मध्यंतरी प्रदूषण, कचरा हे सगळे विषय देखील कवितेनं आपलेसे केले. त्यानंतर मला कबीराचा लळा लागला. अनेक दिवस, अनेक महिने मी कबीरमय होउन गेलो.

कीर्तन सुनत भजन करत
मस्तक रखत पाषाण मुरत
मन का ताला नाही रे खोलत
बुराई कितनी भरी रे अंदर
डरत क्युं रे खोल दे ताला
निकाल कचरा फेक दो बाहर
जियो रे जिन्दगी सब के कारण
यही है तेरी पूजा की रतन

एकदा एका मित्रानं मला ओरिगामीचा एक पक्षी भेट दिला आणि तो पुन्हा तसाच करून बघता बघता मी या कलेच्या प्रेमातच पडलो. त्या वेळी तसा पक्षी करणं म्हणजे ओरिगामीचा प्रकार आहे हेही मला माहीत नव्हतं.

ओरिगामी ही कला मूळची जपानची - असाच समज सर्वत्र आहे. खरं तर ओरिगामी ही कला मूळ चीनमधून आली आणि कागदाचा जन्मही चीनमधलाच. चीनमधून नंतर ओरिगामी जपानमध्ये गेली. सुरुवातीला कागद केवळ श्रीमंत लोकच वापरत. कागदाची फुलपाखरं भेटवस्तू किंवा शुभशकुन म्हणून ते एकमेकांना देत असत. मग पुढे कागदाचा प्रसार वाढला तशी ओरिगामी देखील सर्वदूर गेली. इतकी की जपानी लोकांच्या आय्ाुष्याचा भागच बनून गेली. हीच कला आफ्रिका आणि स्पेनमध्येही गेली. आणि मग य्ाुरोप, अमेरिकेसह सर्वत्र पसरली. 1911 साली अकिरा येशोझोआ या लोहारकाम करणार्‍यानं ओरिगामीत मोलाचं काम करून ठेवलं.

ही ओरिगामी मला दिसली आणि तिनं मला झपाटून टाकलं. एक वेळ चित्र काढणं सोपं, पण ओरिगामी म्हणजे तितकं सोपं काम नाही. कागदाची घडी बरोबर यायला हवी. तिचे कोन बरोबर यायला हवेत आणि मग त्या घड्यांमागून घड्या होतात आणि त्यातून तयार होतो एखादा पोपट, एखादी चिमणी, तर कधी एखादा हत्ती, गणपती, फुलं, मोर, उंट, विमानं....पक्षी, प्राणी आणि अनेकविध वस्तूंचं साम्राज्यच आजूबाजूला तयार होतं. त्यातच एखादं रॉकेट डोक्यावरून सुईकन जातं, तर एखादं भिरभिरं गोल फिरत समोर येऊन आदळतं. कोणीतरी मध्येच बंदूक घेऊन हॅन्डस अपही करतं. आणि ही सगळी किमया घडते ती केवळ त्या वेगवेगळ्या आकाराच्या कागदांमधून!

मी घरी असो, वा प्रवासात, थिएटरमध्ये असो वा रस्त्यात. जिथे रिकामा वेळ मिळाला रे मिळाला, की ओरिगामी मला खुणावते आणि माझ्या बरोबरच्या पोतडीतून कागदं हातात येतात आणि एक एक वस्तू तयार होऊ लागते. ओरिगामीची अनेक शिबिरं भरतात, तिथे मी उत्साहानं जातो. तिथं गेल्यावर ओरिगामी मला मुलांमधलाच एक करून टाकते. माझं आणि मुलांचं विश्व एकच होऊन जातं. यातूनच मी ओरिगामीवरची पुस्तकंही लिहिली. ही पुस्तकं बघून अिाण वाचून कोणीही व्यक्ती ओरिगामीच्या अनेक वस्तू बनवू शकते. ओरिगामीचा कुठलाही पक्षी असो, वा प्राणी... समोरच्यानं कुतूहलानं डोळे विस्फारून बघितलं की मी त्याला तो देऊन टाकतो. समोरच्याच्या डोळ्यातला आनंद मला खूप काही देउन जातो....कलेच्या बदल्यात हवा फक्त कलेचा निर्मितीतला आनंद !

चित्रकला

माझी चित्रं कधीही त्याच्या कानात येऊन सांगतात, “आम्ही आलो, आम्हाला तुझ्याजवळच्या कागदावर आम्हाला जागा दे.” आणि मग मी प्रवासात असो, एखाद्या कार्यक्रमात असो, वा सभेच्या ठिकाणी, अगदी गर्दीच्या ठिकाणी असले तरी माझं चित्रं रेखाटन सुरू होतं. ही चित्रं काढताना इतर चित्रकारांसारखी ती आणि तीच साधनं मला लागत नाहीत. एखादी पेन्सिल, एखादा पेन आणि एखादा रंगीत खडूही चालतो. कधी कधी  चित्र बिघडतं, मग त्याला वळणावर आणता आणता दुसरंच नवं चित्र त्यातून तयार होतं. याचं कारण त्या बिघडलेल्या रेषेलाही लाईनवर आणायचं काम त्याची बोटं करतात.

रंग पसरतो कागदावर
कळेल न कळेल असा
त्याला येऊन मिळते
दुसर्‍या रंगाची हलकीशी छटा
त्या मीलनातून जन्म घेतो
तिसराच रंग किंवा छटा
एका छोट्या कागदावर
अनेक रंगांची
केवढी प्रणयदृश्ये
बोलू नका, पायही वाजवू नका
इथं जन्म घेताहेत
नवी रंगबाळे...

खरं म्हणजे चित्रकलेची कला माझ्या अंगात आली असावी ती आई - इंदुताईमुळे. लहानपणी पहाटे उठून दारासमोर सडा टाकून इंदुताई रांगोळी काढायची. ती रांगोळी खूप सुबक असायची. सकाळची वर्दळ सुरू झाली की ती पुसलीही जायची. त्या रांगोळीचं आणि इंदुताईचं कधी कौतुकही कोणी केलं नाही. पण ती तन्मयतेनं काढत राहायची. तिची प्रत्येक कृती ही एखाद्या कलाकारासारखी असायची. बहुधा ती जे जे करायची, त्याची दखल इतरांनी घ्यावी यासाठी ती करतच नव्हती मुळी. करण्यातला आनंदच तिला तिला खूप काही देऊन जात असे आणि नेमका हाच गुण माझ्यामध्येही आला असावा.

बहिणीमुळे- रेखामुळेही - ही आवड पुढे वाढत गेली. लहानपणी दारा-खिडक्यांवर खडूनं कधी रावणाचं तर कधी शिवाजीचं चित्र मी काढत असे. रेखानं पुस्तकात जशी चित्रं काढलेली असतात, तशी कशी काढायची हे शिकवलं. शिकायला जेव्हा पुण्यात आलो, तेव्हा कुणीतरी फोटोवरून चित्र कसं काढायचं शिकवलं. म्हणजे मूळ फोटोवर अनेक चौकोन आखायचे आणि मग प्रत्येक चौकोन काढत जायचा. असं करत करत सगळे चौकोन करून झाले की झालं चित्र तयार. या पद्धतीनं मग रवीन्द्रनाथ टागोर आणि चर्चिल यांचीही चित्रं काढली होती.

माझा एक मित्र शरद त्रिभुवन यानं चित्रातली भाषा जास्त खोलवर मला शिकवली. त्याच्याकडे खूप पुस्तकं असायची. त्याच्यामुळेच मला पिकासो, व्हॅन गॉग, गोगँ, सिझान, पॉल क्ली हे जगप्रसिद्ध चित्रकार भेटले. पिकासोच्या चित्रांमधली रेषांची ताकद पाहून तर मी अचंबित झालो. तसंच अगदी बारीक सारीक गोष्टीचं निरीक्षण कसं करायचं हे त्रिभवुनकडून मी शिकलो.

चित्र काढताना मला जे वाटतं, त्याला जे भावतं ते मी काढत जातो. म्हणजे, जर मोर काढायचा असेल, तर नंतरचे अनेक दिवस, अनेक आठवडे, अनेक महिने मोरच काढत राहणार. मुली लहान असताना तर एकदा यशो मुक्ताला म्हणाली होती, “ताई, आपल्या बाबाला मोराशिवाय काहीच काढता येत नाही.”

सुरुवातीची चित्रं नग्न मानवी देहाची आहेत. जवळ आरामात बसलेली, हितगुज करणारी अशी अनेक नग्न चित्रं, यात स्थूलतेकडे जाणारा असा त्यांचा प्रवासही दिसतो. तसंच स्त्री-पुरुष असा फरक सहसा जाणवत नाही. काही नग्न देहांच्या पायांना तर मुळं फुटलेली आणि डोक्याच्या जागी पानांचा डोलारा असंही दिसतं. नंतर नंतर तर झाड आणि मानवी देह यांची इतकी एकत्र गुुंफण झाली, की झाड की मानवी आकृती असा प्रश्न पडावा. नात्यातली जवळीक या चित्रांमधून दिसते. मग काही चित्रांमधून स्थूलपणा जणूकाही गायबच झाला आणि रेषा शिडशिडीत झाल्या आणि त्यातून दोन, तीन, पाच असे कितीतरी जण नाचताना, धावताना आणि पळताना दिसतात. या चित्रांची गंमत म्हणजे एका रेषेतून दुसर्‍याकडे, दुसर्‍यातून तिसर्‍याकडे असा तो प्रवास आहे. ही माणसं डोंगरावर चढताना इवल्याशा मुंग्यासारखीही भासतात.

काही चित्रांमध्ये तर डोकं म्हणजे पानं, डोळे म्हणजे पानं, ओठ म्हणजे पानच अशी चित्रं होत गेली. यांना मी ‘युगल चित्र’ म्हणतो. गंमत म्हणजे ही चित्रं एका रेषेतून वळणं घेत धावत सुटल्यासारखी आहेत.

झाडांची चित्रं कशी अवतरतात? -
आकाश उतरलं झाडात
आणि झाड माझ्यात
मी उतरलो चित्रात
चित्रात आलं
परत ते झाडच
मग ते झाड पसरलं
आकाशात
आकाश पक्ष्यात
पक्षी मनात
मन चित्रात
मग आलेच ते पक्षी उडत
चित्रात...

मला पॉल क्ली हा चित्रकार खूप आवडतो. त्या चित्रांचा काहीसा प्रभाव माझ्या जाडसर रेषांच्या चित्रातून जाणवतो.

कॅमेरा

कॅमेरा या वस्तूचं मला विलक्षण आकर्षण आहे. थोडक्यात, मी कॅमेरावेडा आहे. मी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा कॅमेरा बघितला. तो माझ्या मुंजीच्या पत्रिकेत फोटो टाकण्यासाठी काढायला मला पुण्यात नेलं, तेव्हा फोटोग्राफरच्या दुकानात. त्या फोटोग्राफरनं मला स्थिर राहायला सांगितलं होतं आणि मग त्याच्या कॅमेर्‍याला असलेलं पुढलं झाकण उघडून ते जादूगारासारखं तीनदा हवेत गोल वेढे घालत फिरवलं होतं आणि पुन्हा लावून टाकलं होतं. आजही तो गंभीर फोटो बघितला की ती आठवण मला होते.

पुढे माझ्या इंजिनिअर मामाकडे सुट्टीत मी कल्याणला जायचो. तेव्हा त्याच्या कॅमेर्‍यानं तो नेहमी फोटो काढायचा. त्यानंतर पुण्यात आल्यावर बादशाही बोर्डिंगजवळच्या प्रतिभा फोटो स्टुडिओतल्या आनंद आगाशे यांच्याशी संपर्क आला. त्या वेळी फोटो डेव्हलप करायची डार्करूम कशी असते, केमिकल्स, झिरोचा बल्ब, एनॅमलचे ट्रे, हायपोच्या बाटल्या, एन्लार्जर, निगेटिव्हचे रोल सगळं खूप जवळून बघायला मिळालं. त्यानंतर काही काळानं अमीर शेख नावाच्या वेधशाळेत नोकरी करणार्‍या फोटोग्राफरची दोस्ती झाली. त्याच्याकडूनही फोटो कसा काढायचा यातली तंत्रं मी शिकत गेलो.

माझ्या एका मैत्रिणीच्या नवर्‍यानं परदेशी जाताना माझ्याकडे कॅमेरा ठेवायला दिला आणि वापरायलाही सांगितला. माझ्यासाठी एवढ्या महागाचा तो कॅमेरा हाताळणं म्हणजे आनंदाची पर्वणीच होती. मग कॅमेराचे वेगवेगळे पार्ट्स हाताळून बघ, त्याचे प्रयोग कर, इतर मित्रांकडून समजून घे अशा गोष्टी सुरू झाल्या. कॅमेर्‍याची वेगवेगळी तंत्र त्यातून उलगडत गेली. सुरुवातीला मी काढलेले फोटो घरातल्या कुटुंबाचे काढण्याइतपतच मर्यादित होते. पण हळूहळू तो नाद वाढतच गेला आणि त्यातूनच रस्त्यावर उभा असलेला माकडवाला, मित्रांच्या घरातली माणसं, असं करत करत त्या कॅमेर्‍यात हळूहळू निसर्गही अलगद येऊन बसायला लागला.

अमेरिकेत जायची संधी मिळाली आणि तिथला फॉल सिझन बघायचा ठरवलं.  सप्टेंबर ते  ऑक्टोबर या काळात मग शिकागो, सॅनफ्रान्सिस्को, लॉसएंजेलिस, सॅनडियेगो, फिनिक्स, ह्यूस्टन, उत्तरेला कॅनडातलं ब्रॅम्टन, बफेलो, वॉशिंग्टन, न्यू जर्सी असा प्रवास केला. या प्रवासात तो फॉल सीझन मला कॅमेर्‍यात टिपता आला. माझ्या ‘बहर शिशिराचा‘ या पुस्तकात त्यातले अनेक फोटो आहेत. 

लाकडातली शिल्पं

   लाकडाचे ठोकळे बघितले की माझा जीव वेडापिसा होतो. पुस्तकांच्या गर्दीत, कवितांच्या डायर्‍यांबरोबर, फोटोंच्या आल्बमसह, चित्रांच्यासहित आणि ओरिगामीच्या लवाजम्याबरोबर हे वेगवेगळ्या आकाराचे लाकडी ठोकळे घरभर आपापली जागा करून बसलेले आहेत. घरातल्या माळ्यावर जाण्यासाठी जो अरुंद वीतभर जिना आहे, त्या पायरीपायरीवर माझं वर्कशॉप सुरू असतं. तिथं मग ही ठोकळ्यातून शिल्पं होण्यासाठी आसुसलेली मंडळी हातोडी, दगड, कानसी, पटाशी, करवत, पॉलिशपेपरचे तुकडे यांच्याकडे कौतुकानं पाहत असतात. ती सगळी मांडून ठेवलेली असली, की मलाही बरं वाटतं. कारण आवरून ठेवणं म्हणजे त्या सगळ्या वस्तू बंदिस्त करून टाकणं आणि त्या बंद पेटीत गेल्या की वापरण्यावर आपोआपच बंधनं येतात असं मला वाटतं. मग काय, सगळं घरच वर्कशॉप!

या वर्कशॉपचा मालक, नोकर, कामगार असलेला मी सगळी कामं स्वतःच करतो. खरं तर ही सुरुवात झाली होती, मेडिकलला असताना. त्या वेळी मी शाडूमातीची शिल्पं केली होती. पण ती तिथेच थांबली. अगदी लहान असताना मी खडूत ताजमहालचे मिनार कोरायचो. त्यातच आमचा ज्ञानू सुतार घरातल्या दुरुस्त्या करायचा, तेव्हा मी एकटक त्या सगळ्या करामती बघत राहायचो. रंधा मारल्यावर लाकडाचा सपाट होत जाणारा पृष्ठभाग बघायला मला खूप आवडायचं. कधी कधी ज्ञानू काम करायला जाताना मला बरोबर न्यायचा. पुढे शाळेत मुलं पेन्सिलींना टोक करून घेण्यासाठी माझ्याजवळ नंबर लावून उभे राहात. त्या पेन्सिलला टोक करण्यातही एक वेगळीच मजा यायची.

 माझे आवडते शिल्पकार म्हणजे इन्स्टिन, रोदा आणि हेन्री मूर. अर्थात त्यांची शिल्पं ब्राँंझ धातूमधली आहेत. परदेशातल्या प्रवासात त्यांनी केलेली शिल्पं मनसोक्त बघितली. अगदी हात लावूनही स्पर्शानं ती अनुभवली. फ्रान्समध्ये सापडलेली, आदिमानवाने कोरलेली गुहेतली चित्रं बघितली, तर कधी जपानमधली प्रदर्शनं बघितली. मला वाटतं, शिल्प हे असं माध्यम आहे की त्याला डोळ्यांनी अनुभवता तर येतंच, पण स्पर्शानंही अनुभवता येतं. लाकडावर काम करताना फार पूर्वनियोजित पद्धतीनं काम करणं मला आवडत नाही.  शिल्प कोरता कोरता त्यातलं स्वातंत्र्य घेत मुक्कामी पोहोचायचं हेच मला जास्त भावतं.

आता हे शिल्प कसं कोरलं जातं? सुरुवातीला स्केचपेननं लाकडाच्या ठोकळ्याच्या चारी बाजूनी आधी चित्र काढतो. आणि मग लाकूड खणायला सुरुवात करतो. ही सगळी प्रक्रिया खूपच मजेशीर आणि उत्कंठावर्धक असते. कधी कधी वाटतं की आपल्याला हवा असलेला भागच उडवला गेला नाही ना, तर कधी आपल्याला हवा तो आकार नजरेच्या टप्प्यात येतच नाही अशी स्थिती होते. मनातल्या कल्पनेशी दोन हात करत शेवटी ते चित्र शिल्पाच्या रूपात साकार होत जातं हे मात्र खरं. एखादं शिल्पाचं काम कधी कधी पंधरा दिवस तर कधी महिनाभरही चालतं. सुरुवातीच्या काळात तर लाकूड आणि हत्यारं यांच्या झटापटीत नेहमीच बँडएडच्या पट्टया सोबत ठेवाव्या लागायच्या. एकदा तर माझ्या पाचही बोटांना बँडएडच्या पट्टया लागलेल्या आणि तरीही मी शिल्प कोरत होतोच. पण पुढे त्यातलं कसब माहीत झाल्यावर जखमी होणं बंद झालं. एकदा शिल्प तयार झालं की मग फिनिशिंगच्या मागे लागतो. तेही तितकंच उत्कृष्ट झालं पाहिजे असं मला वाटतं.

जवळच्या चार माणसांनी ती बघितली त्यावर प्रतिक्रिया दिली की त्या निर्मितीमागचा आनंद मिळतो.

ही शिल्पं नाकडोळे नसलेली, पण तरीही बोलत असतात. एखादी आई बाळाला खेळवत असते, तर एखादी बाळाला पायावर घेऊन अंघोळ घालत असते. मध्येच एखादा संन्यस्त पुरुष धीरगंभीर आव चेहर्‍यावर घेऊन सगळीकडे बघत असतो. बागेतल्या एखाद्या बाकड्यावर बसलेले वृद्ध एकत्रित बसलेले दिसतात, पण तरीही त्याच्या शरीराच्या पोश्चरमधून त्यांना वाटणारा एकटेपणा जाणवत राहतो. एखादा घोडेस्वार घाईत असल्यासारखा निघाल्यासारखा दिसतो. अवखळ मुलांना बरोबर घेऊन चालणारं जोडपंही नजरेस पडतं, तर पाठमोरं शिल्प तिचं किंवा त्याचं - कसला एवढा विचार करत असेल असाही प्रश्न त्याच्याकडे बघताना मनाला पडतो.

गाणं

     लहानपणी मीही इतर सगळ्यांसारखाच बाथरूम सिंगरप्रमाणे स्वतःशी गुणगुणायचेा. लहानपणी झोकात कीर्तनंही करायचो. पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. सुरुवातीला मित्राच्या घरी गेल्यामुळे नाट्यसंगीताची आवड लागली. मित्राचे वडील नाट्यसंगीत छान गात.

नंतर मेडिकलला गेलो आणि तिथून गाण्याची आवड खोलवर प्रभाव टाकून गेली. आर्ट सर्कलच्या वतीनं झालेला पहिला कार्यक्रम अमीर खाँंच्या गायनाचा होता. स्वतःमध्ये धुंद होऊन गाणार्‍या अमीर खाँना बघताना मी त्या गाण्यात रंगून गेलो. त्यानंतर मोठमोठे गायक पंडित रवीशंकर, अलीअकबर खाँ, भीमसेन जोशी, कर्नाटक सीमेवरचे बसवराज, राजेश्वरगुरू अशा अनेक गायकांचं गाणं ऐकलं. तसंच पंडित जसराज, परविन सुलताना यांनाही ऐकलं. त्या वेळी गाणं व्यावसायिक झालं नव्हतं. कुमार गंधर्व काय, किंवा मल्लिकार्जुन मन्सूर काय, ही सगळी गायक मंडळी गाण्यावर जीवापलीकडे प्रेम करणारी होती. प्रेमानं येत आणि गात. स्वतःमध्ये तल्लीन होऊन गाणं म्हणजे काय असतं याचा अनुभव मला त्या वेळी यायचा. त्यातूनच चांगलं गाणं कसं असतं, हे कळायला लागलं. कधीही सिनेमा, नाटक आणि गाण्याची मैफिल असे पर्याय समोर आले की मी डोळे मिटून मैफिलीचा पर्याय निवडत असे.

मी कधी गाणं शिकलो नाही, पण गाणं ऐकता ऐकता राग ओळखता यायला लागले. शिवरंजनी राग म्हटलं की ‘जाने कहाँ गये वो दिन’ हे ‘मेरा नाम जोकर’मधलं मुकेशचं दर्दभर्‍या आर्त स्वरातलं गाणं जीभेवर घोळायला लागे. दरबारी कानडा कळायला लागला. त्या वेळी सवाई गंधर्व मैफिली पुण्यातल्या नू. म. वि. मुलांच्या शाळेत होत. तिकिटासाठी पैसे तर नसत. मग अशा वेळी काही मित्र नू. म. वि. च्या गेटजवळ घोटाळत उभे राहायचो. गायक आणि वादक मंडळींची टॅक्सी गेटजवळ आली रे आली की धावत जायचो आणि त्यांचे तंबोरे आणि इतर वाद्यं उचलायला मदत करायचो. आयोजकांना वाटायचं ही गायक-वादक मंडळींची माणसं आहेत आणि गायकांना वाटायचं हे आयोजकांचे स्वयंसेवक असावेत. अशा तर्‍हेनं आत जायचा मार्ग मला आणि मित्रांना मोकळा व्हायचा आणि मग आतल्या गाण्याच्या मैफिलीचा आस्वाद घेता यायचा.

एके दिवशी एका कार्यक्रमात मला कविता (खरवंडीकर) नावाची मुलगी भेटली. तिचं गाणं मला आवडलं. मग फोनवरून मी तिच्याकडून चिजा शिकायला लागलो. खरं तर बिभास रागातल्या चिजेपासून ते ‘आती क्या खंडाला’पर्यंत सगळी गाणी मला आवडतात. एकीकडे अमीर खाँच ‘मन सुमीरन’ हे बैरागी भैरव मधलं गाणं मनात घोळत असतं, तर दुसरीकडे मन ‘चल छैंया छैंया’, ‘मेरी मखना’ असं म्हणत असतं.

बासरी

बासरीचा नादही अचानकच लागला. अमेरिकेत राहणारा माझा मित्र प्रमोद हा भारतात आला असताना एके दिवशी भेटवस्तू विकत घेण्यासाठी फिरत असताना एका सरदारजीच्या दुकानात भलीमोठी बासरी दिसली. ती मोठ्या उत्साहात घरी आणली. पण ती न्यायची कशी हा प्रश्न नंतर प्रमोदला पडला आणि ती बासरी त्यानं मला दिली.  पहिलीच बासरी अशी भलीथोरली हातात पडली होती.

ती भली मोठी बासरी हातात घेऊन ओठाशी नेऊन तिच्यातून आवाज काढायचा प्रयत्न करायचो. पण नुसती हवाच बाहेर पडायची. आवाज नाही. माझ्या शेजारी सुहास नावाचा एक जण यायचा. त्याच्याकडेही बासरी होती. मग मी आणि तो - दोघं मिळून फू फू बासरी फुंकत राहायचो. शेवटी घरातले लोक चिडवायला लागले आणि म्हणायला लागले, ‘एका घमेल्यात कोळसे पेटत टाका आणि यांच्यासमोर ठेवा. म्हणजे तो विस्तव तरी चांगला फुलेल.” पण अशी बोलणी मनावर न घेता माझं काम चालूच राहिलं. एके दिवशी एकाला दया आली आणि त्यानं बासरीतून आवाज कसा काढायचा याची य्ाुक्ती सांगितली आणि मग बासरीतून पहिला मंजूळ आवाज बाहेर पडला.

माझ्या खुर्चीजवळच्या दिवाणावर एका मोठ्या फ्लॉवरपॉटमध्ये तीन-चार फुटाच्या बासर्‍या नेहमी असतात. इतर कलावंतासारखं आपल्या वाद्यांचा सन्मान करत त्यांना हाताळणं मला काही केल्या जमत नाही. माझ्यासारख्याच त्याही त्या पसार्‍याचा एक हिस्सा बनलेल्या असतात. कधी कधी पुस्तक शोधायला जावं, तर त्या ढिगार्‍याखाली बासरी निवांत पहुडलेली सापडते. या सगळ्या बासर्‍यांमधून मला जी वाटेल ती त्या वेळी घेतो. मनाला येईल तेवढा वेळ वाजवतो. अगदी कुठलीही वेळ मला वर्ज्य नाही. म्हणजे अगदी दूध तापवायचं असेल तर गॅसजवळ मी बासरी वाजवत उभा राहतो. एक डोळा दूध वर येण्यावरही असतो. एखादं काम करताना मध्येच कंटाळा यायला लागला, की ही बासरीच कामी येते. ती म्हणते, ‘चल वाजव मला, आळव तुझे सूर. मग बघ तुझा कंटाळा कसा पळून जातो ते’ आणि खरंच तसं घडतं. पाच-दहा मिनिटांच्या बासरीवादनानं मी एकदम ताजातवाना होतो आणि पुन्हा आपल्या पहिल्या कामाला जोमानं लागतो.

मला बासरी हे वाद्य सगळ्यात सुटसुटीत वाटतं. एका बांबूपासून तयार झालेलं. प्रवासातही अडचण होत नाही. सीटच्या कडेला ठेवलं की झालं काम. बासरी धातूची हवी, की बांबूचीच चांगली, तसंच बासरीची भोकं किती मोठी असायला हवीत, बासरी बेसूर कशी ओळखावी अशा अनेक गोष्टी हळूहळू मला माहीत झाल्या. तसंच चांगल्या सुरात बनलेल्या बासर्‍या कुठे मिळतात यांची ठिकाणंही कळत गेली. ती बनवणारे कलावंत सापडत गेले. गिंडे यांच्यासारखा गुरूही मला लाभला.

आजही सकाळ होताच बासरी समोर येउन उभी राहते. तिला बघताच मला सकाळ जास्तच प्रसन्न वाटते. पहाटेच्या शांत वातावरणात अंघोळ करून ताजंतवानं होऊन मी हातात बासरी घेतो आणि हळुवार आवाजात ती वाजवायला सुरू करतो.

माझा बासरीचा सूर कुठं हिंडतो आकाशी
गाऊ लागतात पक्षी, तिचा सूर ऐकला की
माझा बासरीचा सूर, पसरतो हो सकाळी
सूर्य राजालाही जाग, त्याची आवराआवरी
माझ्या बासरीचा सूर, लाडाचं माझं पोर
किती हिंडतो मी जगी, तरी असतं कडेवरी
माझा बासरीचा सूर, किती लेकरू शहाणं
मन नसलं थार्‍यावर, पुसे डोळ्याची आसवं
माझा सूर बासरीचा, नाही दिसत डोळ्याला
देई आनंद जगाला, म्हणू या का देव त्याला?

स्वयंपाक

‘आमच्या अन्याला साधा चहासुद्धा करता येत नाही’ असं माझ्या बहिणी त्यांच्या मैत्रिणींना तक्रारीच्या सूरात नव्हे तर अभिमानानं सांगत. मात्र जेव्हा सुनंदाशी लग्न झालं आणि तिची नोकरी आणि उडणारी तारांबळ यातून मोकळा वेळ असणार्‍या मला हा प्रांतही खुणावू लागला. खरं तर सुरुवातीला मला साधा कुकरही लावता यायचा नाही. कधी भात जास्त शिजून लगदा व्हायचा, तर कधी डाळ कच्ची राहायची. मग कालांतरानं ते नीट जमायला लागलं.

मला रवाळ तूप आवडतं आणि लोणी कढवताना ते तसं व्हायचं नाही, मग पुन्हा अनेकांना व्याकूळपणे विचारायचो. अनेकजणी अनेक उपाय सुचवायच्या. मग कळलं तूप झालं की कढईवर झाकण ठेवायचं आणि या प्रयोगानं मात्र तूपही हवं तसं जमायला लागलं.

दही लावताना मूळ विरजण चांगलं असावं लागतं ही माहिती कळाली. तसंच दही लावताना दूध थोडं कोमट ठेवावं लागतं आणि विरजण लावल्यानंतर ते अनेक वेळा चांगलं ढवळायचं. उन्हाळ्यात दही लवकर लागतं, तर हिवाळ्यात उशिरा, अशा अनेक गोष्टी कळून मी दही लावण्यात चांगलाच पारंगत झालो.

माझे मित्र सीताराम रायकर यांच्याकडून मी सुरी चालवायला शिकलो. काकडीची कोशिंबीर बनवण्यात त्यांचा हातखंडा! कडू काकडी कशी ओळखायची, बारीक काकडी कापताना ती कशा पद्धतीने कापायची यातली तंत्रं मी रायकरांकडूनच शिकलो. कांदा असो, काकडी असो, कैरी असो वा कोथिंबीर असो, एकसारखी बारीक कापण्यात मी तरबेज झालो. इतकं बारीक कापायचं कशाला, या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं होतं कारण चिरण्यावरही त्या पदार्थाची चव अवलंबून असते.

यातूनच मग मंडईत जाऊन भाजी आणि फळं कशी खरेदी करायची याही गोष्टी शिकलो. कोथिंबीरीची बुटकी, रुंद पानं असलेली कोथिंबीर चवीला चांगली, तसंच मेथीच्या पानांना लालसर किनार असेल तर ती मेथी चांगली, हापूस आंबा सुरकुतलेला असेल तर तो तयार समजायचा, अंजिर घेताना त्याचा जांभळट रंग देठापर्यंत सारखा असायला हवा, तो हिरवट असेल तर तो कच्चाच जबरदस्तीनं पिकवलाय असं समजायचं अशा अनेक गोष्टी मला कळायला लागल्या. तसंच स्वयंपाकासाठी माल थोडा महाग असला तरी चांगलाच घ्यायचा हेही मी शिकलो.

पूर्वी मला तळलेले पदार्थ आवडायचे. एकदा मुंबईला जाताना शिळफाट्याला गाडी थांबली तेव्हा तिथे कांदाभजी तळत असलेल्या माणसाला बघितलं. त्यानं डाळीच्या ओल्या पिठात लांबलांब कांदे चिरून ठेवलेले होते. कढईतल्या तेलात भजी सोडताना मात्र तो बाजूला एका पातेल्यात ठेवलेल्या कोरड्या पिठात बुचकळून मग कढईत सोडायचा. यामुळे ती भजी जास्तच कुरकुरीत लागायची. हाच प्रयोग मी घरी आल्यावर करून बघितला आणि तशीच चव आणि कुरकुरीतपणा आणण्यात यशस्वी ठरलो.

माझ्या हातची साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांनाच आवडते. साबुदाणा गिचका व्हायचा नसेल तर कसा भिजत घालायचा याचंही तंत्र मी शिकलो. साबुदाणा पातेल्यात घेऊन नळाखाली धुवून घ्यायचा आणि मग पाणी निथळून टाकायचं, पण नंतर पातेलं तिरपं करून थोडं पाणी दिसलं पाहिजे असं बघायचं. तसंच शेंगदाणे भाजताना मंद आचेवर एकसारखे भाजायचे. खिचडी सारखी परतण्यापेक्षा ती वाफेवर चांगली शिजवायची. कधी बटाटे उकडून त्यांच्या फोडी तुपात परतून खरपूस करायच्या, तर कधी त्यात लिंबू,साखर टाकायचं. खिचडी झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. असल्यास खोवलेला ओला नारळ! मग काय तोंडाला पाणी सुटेल अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालीच समजायचं.

अशाच पद्धतीनं पातळ पोह्यांचा चिवडा करणं, कैरीचं वेगवेगळ्या पद्धतीनं लोणची करणं, कैरीची डाळ करणं, ब्रेडचं पॅटिस करणं दुधी भोपळा, नारळ, गाजर यांच्या वड्या करणं, टोमॅटोचा सॉस करणं हे सगळेच पदार्थ करण्यात मी तरबेज झालो. मी जेव्हा अशा पदार्थवेड्या लोकांकडे जातो, तेव्हा नवीन काय लिहिलंस असं विचारण्याऐवजी नवीन काय बनवलंस असा प्रश्न मला विचारला जातो आणि माझ्या अंगावर मूठभर मांस चढतं.

इतर कला नसत्या तरी माणूस जगला असता, पण ही कला नसती तर असा प्रश्न मला पडतो. स्वयंपाकानं माझ्या जीवनात आनंद आणि स्वास्थ्य आणलं. इतरांना पदार्थ करून खाऊ घालणं आणि त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बघणं हा अनुभव मला विलक्षण वाटतो.

वाचन

माझ्या खोलीत एक आख्खी भिंत पुस्तकांनी भरली आहे. तसंच खाली आजूबाजूला पुस्तकं, मासिकं, कागदं असं सगळं असतंच. सुरुवातीच्या काळात नवीन पुस्तकं घेण्याची ऐपत नव्हती, म्हणून रस्त्यावर मांडलेली जुनी पुस्तकं बघू लागलो. मग घासाघीस, दिनवाणा चेहरा करत ती जमेल तशी घेऊ लागलो. मग पुढे परिस्थिती बरी झाल्यावर पुस्तकं घेण्याचा हव्यास वाढत गेला. रात्री झोपायच्या वेळी ज्योकच्या पुस्तकातला एखादा ज्योक वाचून स्वतःशीच हसत झोपून जातो.

खरं तर हे पुस्तकांचं वेड माझ्या आय्ाुष्यात थोडं उशिरा सुरू झालं. ओतुरला असताना अभ्यासाच्या पुस्तकात फडके-खांडेकर यांची पुस्तकं लपवून वाचायची सवय लागली होती. फडक्यांच्या गोष्टीतला नायक मीच असल्याचा भास मला होई, कधी खांडेकरांच्या कादंबरीतला कोणी होऊन मी एखाद्या श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडलो आहे आणि तिला श्रीमंती कशी वाईट आहे हे सांगत असे. कधी देशासाठी, गरीबासाठी तळमळ असणारा मी मला दिसे. त्या वयात मला र. वा. दिघे यांचं ‘पड रे पाण्या’ हे पुस्तक खूप आवडलं होतं. त्यानंतर न. र. फाटक यांचं ‘1857 ची शिपाईगर्दी’ हे पुस्तक वाचलं होतं. त्यानंतर शेजवलकरांचं लिखाण आवडू लागलं. तसंच गो. स. सरदेसाई यांच्या ‘नानासाहेब पेशवे’ या पुस्तकातल्या पेशव्यांचा कर्जबाजारीपणा, पेशव्यांचे दिल्ली बादशहाचे चलन स्वीकारणे वगैरे गोष्टींनी मला गदागदा हलवलं. पानिपत यापुस्तकानंही माझ्यावर प्रभाव पाडला.

मुंबईला सुट्टीत काकांकडे जायचो, तेव्हा त्यांच्या शेजारी बबन प्रभू राहायचे. त्यांच्या मोठ्या कपाटातले बाबुराव अर्नाळकर वाचून काढले. धनंजय-छोटू, झुंजार-विजया-नेजाजी, काळापहाड ऊर्फ चंद्रवदन- सुहासिनी - ललवाणी-बाबाजी, दर्यासारंग, भीमसेन, डिटेक्टिव्ह रामराव, अशा सगळ्या मालिकांनी मला वेडच लावलं होतं.

त्यानंतरच्या काळात दुर्मिळ पुस्तकं जमवण्याचा नाद लागला. कॉलेजला असताना सुर्वे, महानोर, ग्रेस या सगळ्यांच्या कविता वाचायची गोडी लागली. जी.ए.चं हिरवा रावा वाचलं आणि मग त्यांचीही पुस्तकं वाचतच गेलो. पण पुढे त्यांचा सुरुवातीचा प्रभाव माझ्यावर राहिला नाही. त्यानंतर जेव्हा बिहारला जाऊन आलो अिाण मीच लिहू लागलो. खानोलकरांची ‘कोंडुरा’ कादंबरी खूप आवडली. गौरी देशपांडेची ‘एकेक पान गळावया’ वाचून तर मी हादरलोच. ‘श्यामची आई’ मी खूप उशिरा वाचलं. पण जेव्हा वाचलं तेव्हा त्यातलं आई-मुलाचं घट्ट नातं, दारिद्र्यं, आईचं आजारपण हे सगळं वाचून खूप हलून गेलो.

माझं वाचन थोडं अडेलतट्टू आहे. म्हणजे माझ्या मनाला वाटेल तेव्हाच मी वाचणार. माझे मित्र रायकर यांच्यामुळे माझं इंग्रजी वाचन सुरू झालं. सुरुवातीला पेरी मॅसन, मग जेम्स बाँड मग शेरलॉक होम्स , टॉलस्टॉय त्यानंतर सरकलो ते डोस्टोव्हस्कीकडे! ‘क्राईम अँड पनिशमेंट’नं मला खूप अस्वस्थ केलं. डी. एच. लॉरेन्सचं ‘सन्स अँड लव्हर्स’, रेनबो, विमेन इन लव्ह, जेम्स जॉईसची पोर्टेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट अ‍ॅज अ यंग मॅन याही खूप आवडल्या. सॅलिंगरची ‘कॅचर इन द राय’ ही कादंबरी तर चरचरत आत गेली. गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ आवडायला लागला.

हिंदी वाचायला लागलो आणि मग प्रेमचंद वाचून काढला. प्रेमचंदच्या साहित्यात मला खरा भारतीय माणूस सापडला. ‘गोदान’ ही मला त्यांच्या सर्वश्रेष्ठ कादंबर्‍यांपैकी एक वाटते. फणीश्वरनाथ रेणू यांची ‘मैला आँचल’ ही कादंबरी वाचली. त्यांची बिहारच्या प्रवासात भेटही झाली. प्रेमचंदांनी निर्माण केलेला प्रवाह रेणूंनी पुढे नेला. त्यांच्या ठुमरीमधल्या तिसरी कसम या कथेनं मला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यातल्या हळुवार, तरल काव्यानं मनाला स्पर्श केला. त्यावरून तयार झालेला ‘तिसरी कसम’ सिनेमा मात्र फारसा भावला नाही.

त्यानंतर जैनेंद्र कुमारांचं ‘त्यागपत्र’ खूपच आवडलं. निर्मल वर्मा याचं ‘वे दिन’, मोहन राकेश यांची ‘न आनेवाला कल’, मन्नू  भंडारीचं ‘आपका बंटी’ ही सगळी पुस्तकं प्रभाव पाडून गेली. शिवराम कारंथ यांची पहाडी जीव खूप आवडलं.

पुस्तकं वाचताना त्या लेखकाच्या एकेका तपशीलानं तो परिसर माझ्या डोळ्यांपुढे उभा राहू लागतो. एकेका चित्रांत मग रंग भरू लागतात. तसंच जेवढं शब्दांत, वाक्यांत असतं, तसं त्यातल्या गॅपमध्येही असतं. दोन ओळींमध्येही असतं. एवढंच काय बाजूच्या जागांमध्येही असतं. ती दृश्यं, त्या भावभावना उभ्या करणार्‍या लेखकाचं चित्रं तिथे हळूहळू उमटत असतं. तो माणूस आवडला की मग पुस्तकही आवडायला लागतं.

अनिल अवचट या माणसामधला पत्रकार, चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर, कवी, लेखक, वादक, गायक, उत्कृष्ट स्वयंपाकी, वाचक या सगळ्यांना अनुभवणं म्हणजे एक विलक्षण जादुई अनुभव आहे. हे सगळं अनुभवताना त्याच्यातलं मनस्वीपण खूप भावणारं आहे. ‘सबके लिए खुला है मंदिर ये हमारा’ या संत तुकडोजी महाराजांच्या गीताप्रमाणे त्याच्या घराचे दरवाजे चोवीस तास सर्वांसाठी खुले असतात. आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठेवणारा, साधं राहणारा, माणुसकी जपणारा हा माणूस आबालवृद्घांचा लाडका आहे!!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.