पुरोगामी जनगर्जना
मध्यंतरी आसावरी या मैत्रिणीला घेऊन बाबा म्हणजेच अनिल अवचट यांच्याकडे गेले होते. बाबानं त्या वेळी आमचे अनेक फोटो काढले. त्याला आसावरीचं हसणं खूपच आवडलं. मला म्हणाला, ‘तूही अशी खळखळून दात दाखवत हस बघू.’ पण मला आसावरीसारखं मनमोकळं हसणं प्रयत्न करूनही जमलं नाही आणि मन एकाएकी भूतकाळात गेलं. लहानपणी मी आणि माझी बहीण रूपा आम्ही मोठमोठ्यानं हसत, खिदळत असू. एकदा माझ्या मोठ्या भावानं आमचा तो आवाज ऐकला आणि 'मुलीच्या जातीनं इतक्या मोठ्या आवाजात दात दाखवत हसू नये' असं सांगत गालातल्या गालात कसं हसायचं याचे कितीतरी वेळ चक्क धडे दिले. घरात मोठ्या भावाचा धाक आणि दरारा आम्हा सर्वच भावंडांवर होता. त्यामुळे ते खळखळून मोठ्यानं हसणं तिथेच थांबलं.
खरं तर लहानपण खूप बंधनात किंवा दुःखात गेलं असंही नाही. वडील सरकारी अधिकारी होते आणि आई गृहिणी तर मोठे तीन भाऊ, नंतर आम्ही दोघी बहिणी असं आमचं कुटुंब होतं. घरात धार्मिक वातावरण होतं. सगळे सण, पूजा-अर्चा, नवरात्र, महालक्ष्म्या, गणपती, कुलधर्म-कुळाचार असं बरंच काही वर्षभर चालायचं. त्या वेळी त्या सगळ्या सणांमधला आनंदही लुटला. मला आजही सगळ्या आरत्या, मंत्रपुष्पांजलीसह तोंडपाठ आहेत. नवरात्रीला देवघराला रंग देणं, देवांची वस्त्र शिवणं, रांगोळ्या काढणं, फुलांचे हार करणं, देवपूजेला ब्राह्मण (पुरोहित) आला नाही की पूजा करणं अशी कामं मी कधी आनंदाने तर कधी नाईलाजाने करत असे. घरात मुलामुलींसाठी वेगळे नियम होते. त्यामुळे त्या वेळी मनात अनेक प्रश्नं निर्माण होत. त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसत. तसंच ‘सांगितलंय ना मग कर’, किंवा ‘पिढ्यानपिढ्या चालत आलंय त्यामुळे करावं लागतं’ अशी उत्तरं मिळत. काही गोष्टींविरोधात बंड केलं, तर ‘जे काय करायचंय ते नवर्याच्या घरी गेल्यावर करा’ अशी तंबीही मिळायची. कसं वागावं, किती वाजता (पाचच्या आत घरात) घरात यावं, मुलांशी बोलू नये असे अनेक नियम रक्षणकर्त्यां मोठ्या भावानं घालून दिले होते.
अशा वातावरणात वाचन सुरू झालं होतंच. किशोर, कुमार, चांदोबा, किलबिल, फास्टर फेणे, कार्टून्स, कॉमिक्स, दक्षता वाचायला आवडायचं. यातूनच मनात वेगवेगळ्या गोष्टी आकाराला यायच्या. हिवाळ्यात अंगणात शेकोटी पेटवली की मी, बहीण रुपा आणि माझा भाऊ सुनिल आम्ही एकमेकांना काल्पनिक गोष्टी तयार करून सांगत असू. नंतर एक वही आणून मनाने गोष्टी लिहिण्याचाही मला नाद लागला. त्यानंतर सतत होणाऱ्या बदल्यांमुळे वडलांनी आमच्या शिक्षणासाठी औरंगाबादला घर करण्याचा निर्णय घेतला आणि आईने मला पं. नाथराव नेरलकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला पाठवलं. त्यांच्याबरोबरच नंतर पं. उत्तमराव अग्निहोत्री, शिवराम गोसावी, मंगल कुलकर्णी, जगदीश गोडसे यांच्याकडेही काही काळ गाणं शिकता आलं. त्यातच कधीतरी डायरी लिहिण्याची सवय लागली. मनातल्या भावना व्यक्त करणं जमायचं नाही. मी मनातलं बोलत नाही म्हणून माझी आई मला चिडून ‘घुमी’ असं विशेषण बहाल करायची. पण मला मात्र बोलण्यासाठी डायरी हे माध्यम आवडायला लागलं होतं.
शाळेत असताना प्रत्येक महिन्यांत निघणार्या 'आशय' नावाच्या भित्तीपत्रकाची संपादकही होते. महाविद्यालीन विश्वात प्रवेश केल्यावर आपोआपच त्या वातावरणात कवयित्री बनले. त्यानंतर बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर, व. पु. काळे, नारायण धारप, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, अनिल अवचट, जी. ए. कुलकर्णी, सानिया, गौरी कुलकर्णी यांचं लिखाण माझ्या वाचनविश्वाचा भाग बनलं. नारायण धारप, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर यांच्या कथा-कादंबर्यातला गूढ थरार अंगावर काटा आणत असे, तर अत्रे, पु.ल.चं लिखाण हसवत, चिमटे काढत विचार करायला भाग पाडत असे. सानिया आणि गौरी यांच्या लिखाणानं अस्तित्वाची ठिणगी मनात रुजवली आणि व्यंकटेश माडगुळकरांनी प्रसंग आणि व्यक्तिचित्रणाची पेरणी मनात केली. या सगळ्यांत अनिल अवचट जास्त भावले. गप्पा मारत, सोप्या भाषेत त्यांनी साधलेला संवाद मनाला भिडू लागला. अनेक चिटकलेले विचार गळून पडू लागले आणि नवे विचार मनात पक्के होऊ लागले. याच काळात यमाजी मालकर, रविंद्र चिंचोलकर, अशा काही मित्रांमुळे आकाशवाणीवर नाटिकेंचं लिखाण, मुलाखती, निवेदन अशा गोष्टी करायला लागले. हा अनुभव खूप वेगळा होता. रविंद्र चिंचोलकर या मित्रामुळे ट्रकड्रायव्हर, क्लिनर, ज्येष्ठ नागरिक यांच्या मुलाखती घेत फिरण्याचा प्रसंग आला आणि त्या वेळी एक वेगळं जग माझ्यासमोर आलं. त्यांचे प्रश्न आणि त्यातलं गांभीर्य लक्षात आलं. खरं तर या प्रसंगामुळेच सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची नजर मिळाली असं आज वाटतं.
त्या वयात महत्वाकांक्षेनं आयुष्यात प्रवेश केला नव्हता. फक्त मुलगी म्हणून अनेक गोष्टींवर बंधनं असलेल्या घरातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा होता. तो मार्ग निवडताना चुकीचा निर्णय घेतला गेला आणि पुढे त्याची किंमतही मोजावी लागली. मात्र यात काही वर्षं गेली. पुन्हा उभं राहायचं होतं. पण काय नेमकं करायचं कळत नव्हतं. मग नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण कर, एका शैक्षणिक संस्थेत कंटेट क्रिएटर म्हणून काम कर, योगाचे क्लासेस घे, स्त्रियांसाठी ब्युटी पार्लर चालव, ड्रेस डिझायनर म्हणून काम कर अशी अनेक कामं केली. त्यानंतरच्या काळात औरंगाबादमधल्या गझलप्रेमी मंडळींशी संपर्क आला. तसंच पुण्यातून चालणार्या विद्या बाळ यांच्या 'मिळून सार्याजणी' परिवाराशी नातं जोडलं गेलं आणि महाराष्ट्रातल्या समविचारी मैत्रिणींचं मैत्र मिळालं. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची साथ मिळाली. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची आणि युवांची ओळख झाली. त्यातूनच दत्ता बाळसराफसारखा कार्यकर्ता मित्र मिळाला आणि आपल्याला कुठे जायचंय याची वाट दिसायला लागली.
ही वाट थेट आदिवासी भागाला जाऊन मिळत होती आणि मला कधी न तुडवलेली ही वाट अनुभवावीशी वाटली. मी मासवण या दीडदोन हजार लोकसंख्येच्या आदिवासी गावात आदिवासी सहज शिक्षण परिवारात शिक्षण विभागातलं काम करण्यासाठी दाखल झाले. सूर्या नदीच्या काठावर बसलेलं हे छोटुंसं गाव खूप देखणं होतं. आयुष्यात प्रथमच कुठलंतरी खेडेगाव मी जवळून बघत होते. स्वप्नातल्या गावासारखंच हे गाव मला रोमँटिक वाटलं. इथलं निसर्गसौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षाही सरस होतं. मासवण आणि आसपासची १५ गावं म्हणजेच ७८ पाड्यांवरच्या मुलांची शिक्षणाची स्थिती समजावून घेत मला काम करायचं होतं. तिथे राहायला लागल्यावर मोबाईलला टॉवर्स नाहीत, रोज सकाळी चार तास आणि सायंकाळी चार तास असं आठ तास लोडशेडिंग होतं या आणि अशा अनेक अडथळ्यांच्या गोष्टी लक्षात आल्या. विंचू, साप यांचा वावर आजूबाजूला सर्रास असे. त्यात मी मुलखाची भित्री, त्यामुळे साप, विंचू, पाली, उंदीर आणि अंधार ही संकटं मला महाभयानक राक्षसासारखी वाटत. हळूहळू हे सगळं असणारच आहे हे स्वीकारून मी माझ्या कामाला सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रात सर्वशिक्षा अभियान काय असतं, आश्रमशाळा कशा असतात, शाळाबाह्य मुलांची संख्या का वाढते, शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या कोणत्या, स्थलांतरितांच्या शिक्षणाची समस्या काय अशा अनके प्रश्नांची माहिती करत मी शिक्षण क्षेत्रांत काम करायला लागले. मला त्यातले बारकावे आणि अनेक गोष्टी ठाऊक नव्हत्या. रोज कार्यकर्त्यांबरोबर पाडान्पाडा फिरून मला ते जाणून घ्यावं लागलं.
आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेत सुमन देशपांडे आणि डॉ. सुधा रणदिवे यांनी आपल्या वयाची उमेदीची ३० वर्षं या गावांना देऊन गावात अनेक बदल घडवले होते. त्यांना तिथले आदिवासी खूप मानत. सुरुवातीला माझ्याशी मात्र ती सगळीच मंडळी फटकून वागत. माझं शहरी वागणं आणि कमी बोलणं त्यांना खटकत असावं. मुळातच आदिवासी लोक स्वतः कमी बोलतात. त्यातच आमचे सगळे कार्यकर्ते आदिवासीच असल्यानं ते आपसांत मनमोकळं बोलत. मला सुरुवातीला ते आपल्याशी बोलत नाहीत या गोष्टीचं फार वाईट वाटे. पण नंतर लक्षात आलं, की मी त्यांच्यातलीच एक स्वतःला समजत असेल, तर मला त्यांच्यातली एक बनून वावरावं लागेल. मलाच त्यांच्याशी बोलण्यात पुढाकार घ्यावा लागेल. आणि या माझ्या निर्णयासरशी सगळ्याच गोष्टी सुकर होत गेल्या. ड्रायव्हर प्रमोदपासून ते सरपंच विकासपर्यंत सगळे माझ्याशी हळूहळू मनातलं बोलू लागले. माझी सगळ्यांशी छान गट्टी जमली. मग गावातली मंडळी, शिक्षक, मुलं सगळ्यांबरोबरचा संवाद वाढत गेला. मासवणमधल्या वास्तव्यानं मला खूप काही शिकवलं. तिथल्या लोकांच्या कष्टाची जाणीव झाली. सुरुवातीला गाडी उपलब्ध नसेल तर तिथले कार्यकर्ते चालत पुढल्या गावाचा रस्ता कापत, मला मात्र तेवढं अंतर कापताना मनातल्या मनात रडायला यायचं. पण हळूहळू तिथे रुळल्यावर, त्या कार्यकर्त्यांबरोबरची मैत्री वाढल्यावर ते अडथळे अडथळे राहिलेच नाही. तसंच हळूहळू तिथल्या प्रश्नांची तीव्रता समजत गेली आणि माझ्या भौतिक गरजा कमी होत गेल्या.
सुमनताई आणि सुधाताई यांचं आपलं वैयक्तिक आणि सार्वजनिक असं वेगळं आयुष्य नव्हतंच. जे काही होतं ते एकच होतं. त्यांच्या गरजा खूप कमी होत्या. आपलं आयुष्य त्यांनी आदिवासींच्या विकासासाठीच वाहिलं होतं. आमच्या प्रकल्पाच्या सल्लागार विजया चौहान दर पंधरा दिवसाला मासवणला येत, त्या वेळी त्या येताना अनेक पुस्तकं, डायर्या, भेटवस्तू, खाऊ असं खूप सामान बरोबर घेऊन येत. कधी कठोर तर कधी प्रेमळ अशा स्वभावाच्या विजयाताईंनी भरभरून प्रेम दिलं आणि कार्यकर्ता म्हणून घडण्यासाठी क्षमता कशा वाढवल्या पाहिजेत याचे धडे दिले. त्यांच्यामुळेच नर्मदा बचाव आंदोलनात मी आणि आमचे कार्यकर्ते सहभागी होऊ शकलो. त्यांच्या परवानगीमुळेच नर्मदा प्रश्न आणि मेधाताई पाटकर यांना जवळून बघता आलं. अनुभवता आलं. तिथले प्रश्न जाणून घेता आले. बंगळूरपासून अनेक ठिकाणी शिक्षणविषयक परिषदांमध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो. विशाल, वर्षा, शैलेश, विजया, साधना दधिच, वर्षा गुप्ते, सुधा वर्दे, सोमनाथ परब, अशा अनेक मंडळींमुळे सगळी माणसं एकाच स्तरावर आली तर त्यांच्यातला संवाद हा सुसंवाद कसा बनतो हे शिकता आलं. मासवणच्या वास्तव्यात असताना कार्यकर्त्यासाठी पथनाट्य लिही, शिबिरांचं आयोजन कर, मुलांसाठी छोट्यामोठ्या नाटुकल्या लिही, कामाचे रिर्पोट्स रंजक आणि वाचनीय कसे होतील ते बघ, कार्यकर्त्यांसाठी गाणी रच असं माझं अवांतर काय काय काम चालत असे.
सुट्टीच्या दिवशी मी मुंबईला माझ्या मुलाला अपूर्वला हॉस्टेलवर शिकायला ठेवलेलं असल्यामुळे त्याला भेटायला जात असे आणि त्याच वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा सामाजिक कार्यकर्ता हा कोर्स पूर्ण करत समन्वयाचंही काम करत होते. एकीकडे मासवणसारखं इवलंस खेडेगाव आणि दुसरीकडे मुंबईसारखी अवाढव्य महानगरी म्हणजे माझ्यासाठी दोन टोकं होती. मुंबईत गेल्यावर लोकल ट्रेनपासून अनेक गोष्टी मला राक्षसासारख्या भेडसावत. पण हळूहळू मुंबईनं मला आपलंसं केलं. प्रचंड ऊर्जेनं भरलेली मुंबई मला आवडायला लागली.
याच दरम्यान अच्युत गोडबोले या विख्यात संगणकतज्ज्ञ आणि लेखक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. मला त्या व्यक्तीचं लौकिकार्थानं मोठेपण ठाऊक नसल्यानं मी आदिवासी भागात कशी गुडघ्यापर्यंतच्या चिखलात फिरून काम करते, गझल कशा रचते, गाते कशी, माझ्या कविता कशा आहेत, मी कथा लिहून राज्यस्तरीय पुरस्कार कसे मिळवलेत, मी नाटकांत काम कशी करते, मला संगणकातलं ज्ञान किती आहे अशा अनेक बाबतीतल्या फुशारक्या मी त्यांच्याजवळ मारल्या. त्यांनीही माझं सगळं (उथळ) ज्ञानमहात्म्य कौतुकानं ऐकून घेतलं.
पण माझा स्वतःबद्दलचा भ्रमनिरास लवकरच दूर झाला. अच्युत गोडबोले संगणकतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, गणितज्ञ, संगीतातले गाढे अभ्यासक आणि दर्दी आणि सिद्धहस्त लेखक कसे आहेत हे मला लवकरच समजलं. मी नको त्या वल्गना त्यांच्याजवळ केल्याची मला मनोमन लाजही वाटली. त्यांनी मात्र मला त्यांचे लेख इंटरनेटवरून वाचायला पाठवायला सुरुवात केली. मी पाठवलेल्या माझ्या कथा, कविता वाचल्या आणि त्यातूनच 'तुझी लेखनशैली खूप सुंदर आहे मला माझ्या लिखाणात मदत करशील का?' असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. माझ्यासाठी हा आणखीन एक आनंदाचा क्षण होता. एक नवीन वाट आता खुणावायला लागली होती आणि याच वाटेचा पुढे राजमार्ग होणार आहे हे त्या वेळी ठाऊकही नव्हतं.
माझी कामं आटोपून घरी परतल्यावर कम्प्युटरवर मी अच्युत गोडबोले यांच्याकडून आलेल्या फाईल्स बघायची. वाचून झाल्यावर त्यातल्या दुरुस्त्या करायची. यातूनच हळूहळू मी त्यांचे पुस्तकासाठीचे सगळे लेख टाईप करणं, लेख संक्षिप्त करणं, लेखांसाठी आवश्यक माहिती गोळा करणं, कधी कधी लेख तयार करण्यात मदत करणं, लेखाचा क्रम (सिक्वेन्स) योग्य आहे की नाही बघणं, लेखामध्ये सखोलता आहे की नाही तपासणं, लेख अभ्यासपूर्ण जसा हवा तसाच तो रंजकही हवा या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं, एकच एक लेख ५० वेळा जरी बदल करावे लागले तरी ते आनंदानं करणं अशा अनेक गोष्टी मी हळूहळू शिकत गेले. यातूनच मी फोटोशॉपमध्येही प्रगती केली. अच्युत गोडबोले यांच्या मनात, मुसाफिर, नॅनोदय, गणिती, थैमान चंगळवादाचे, झपुर्झा, कॅनव्हास या पुस्तकांची मी मुखपृष्ठं तयार केली. शिवाय मनात, मुसाफिर, नॅनोदय, थैमान चंगळवादाचे आणि जीनियस ही पुस्तकांना शीर्षकंही सुचवली. त्यांना माझ्याविषयी खूपच विश्वास वाटू लागला. यातूनच 'मनात' या त्यांच्या मानसशास्त्रावरच्या पुस्तकावर आम्ही एकत्रित काम करताना खूप अभ्यास करता आला. जणू काही ते पुस्तक मीच लिहितेय इतकी मी त्यात बुडून गेले. त्याच वेळी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे आपण समुपदेशनाचा कोर्स करायचा असं मनाशी पक्कं ठरवलं आणि तो कोर्स पूर्ण केला.
या प्रवासात मासवणचं वास्तव्य संपलं आणि मी डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या युवांसाठीच्या निर्माण उपक्रमात सामील झाले. मी निर्माणची समन्वयक म्हणून काम हाती घेतलं. या प्रवासात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक युवा जवळचे झाले. त्यांच्याबरोबर काम करताना समाजातले अनेक प्रश्न समजून घेता आले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना त्यांच्याबरोबर साक्षी होता आलं. या काळात रिपोर्ट्स, निर्माणचा अंक, ई-अंक, लेख असं लिखाण सुरू होतंच. तसंच ५ वर्षं मी मुलांसाठीच्या चांदोबा या मासिकाचं इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्याचं कामही केलं. त्यानंतर 'प्रथम' या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्या संस्थेत अल्पकाळ काम करण्याची संधी मिळाली. इथे कमी उत्पन्न गटातल्या कुटुंबातल्या युवांसाठी व्यवसाय प्रशिक्षण घेणं, त्यांचा अभ्यासक्रम तयार करणं (कोर्स डिझाईन करणं) या कामाचा खूप चांगला अनुभव मिळाला.
हे सगळं सुरू असतानाच 'महात्मा गांधी सेवा संघ' या अपंगासाठी काम करणार्या संस्थेबरोबरही माझं काम सुरू होतं. अपंग व्यक्तींचे प्रश्न समजावून घेणं आणि वेगवेगळ्या संस्था आणि संस्थाचालक यांना भेटून त्यांचं काम समजावून घेणं, अपंगांची साहित्य संमेलनाच्या आयोजनात भाग घेणं, त्यावर लिखाण करणं सुरू होतं. तसंच यमाजी मालकर यांच्या 'अर्थपूर्ण' या अर्थविषयक मासिकातून लिखाण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्याबरोबर मुलांसाठी, पालकांसाठी आणि पर्यावरणाविषयी विशेषांकांचं संपादकीय काम करता आलं.
आणि अचानक एके दिवशी मनाविकास प्रकाशनाच्या आशिश पाटकर आणि अरविंद पाटकर यांच्याशी गप्पा मारताना ‘तुमचे आमचे सुपरहिरो’ या मालिकेविषयी बोलणं झालं आणि किशोरवयीन मुलांसाठी आकाराला येत असलेल्या या मालिकेसाठी मी लिहावं असा प्रस्ताव त्यांनी माझ्यासमोर ठेवला. या मालिकेतल अरविंद गुप्ता, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. आनंद नाडकणी, अनिल अवचट, अच्युत गोडबोले आणि डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं आयुष्य आणि कार्य यावर मी सहा पुस्तकं लिहिली आणि ती चांगलीच प्रसिद्ध झाली. या मालिकेतलं डॉ. रवी बापट यांच्यावरचं माझं सातवं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
ही पुस्तकं लिहून होण्याआधीच अच्युत गोडबोले यांनी चित्र-शिल्प कला आणि विदेशी चित्रकार-शिल्पकार यांच्यावर आधारित (कलेचा इतिहास आणि चित्रकार, शिल्पकार यांचा कलाकृतींसहचा जीवनप्रवास) 'कॅनव्हास' हे पुस्तक लिहिण्यासाठी तू माझ्याबरोबर या लेखनप्रवासात बरोबरीनं सामील होशील का असा प्रश्न विचारला. अर्थातच नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. 'कॅनव्हास'च्या निमित्तानं शाळेबरोबर संपलेल्या चित्रकलेचा अभ्यास पुन्हा घडणार होता आणि त्याचबरोबर अच्युत गोडबोलेसारख्या सुप्रसिद्ध लेखकाबरोबर नाव झळकणार होतं. तसंच 'कॅनव्हास'च्या प्रवासातले पिकासो, मायकेलअँजेलो, लिओनार्दो दा व्हिंची, रेम्ब्रॉं, व्हॅन गॉघ, रोदँ, सेझान, लॉत्रेक, टर्नर, क्ली, दाली, असे अनेक खंदे शिलेदार ओळखीचे होणार होते. 'कॅनव्हास' लिहिण्याचा कालावधी कसा भुरर्कन संपला कळलंच नाही. या पुस्तकाच्या वेळी घडलेल्या अभ्यासामुळे यात दाखल झालेल्या कलाकारांचं झपाटलेपण, त्यांच्यातली सर्जनशीलता आणि निर्माण झालेली कलाकृती खूप जवळून कळत गेली. 'कॅनव्हास'च्या लिखाणानं इंग्रजी वाचनाची भीती दूर झाली. 'कॅनव्हास' लिहिताना जवळजवळ १२० इंग्रजी पुस्तकांचं वाचन करावं लागलं. त्यासाठी मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि एनसीपीए यांच्या ग्रंथालयात जाऊन सतत ८ दिवस १० ते ५ या वेळात जाऊन विद्यार्थ्यांसारखं बसून तिथल्या चित्र-शिल्पकलेवरच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागला. 'कॅनव्हास' प्रकाशित होताच दोनच महिन्यात चार आवृत्या हातोहात संपल्या. सुप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते, अमोल पालेकर आणि अनिल अवचट यांनी कॅनव्हासची प्रंशसा केली.
'कॅनव्हास'च्या प्रकाशनाच्या दुसर्याच दिवशी अच्युत गोडबोले यांनी ‘जीनियस’ प्रकल्पाविषयी सुतोवाच केलं आणि ‘जीनियस’ ही मालिकाही आम्ही दोघं मिळून लिहिणार असल्याचं निश्चित झालं. जगावर प्रभाव पाडणार्या ७२ व्यक्ती आम्ही जीनियस मालिकेसाठी निवडल्या आणि १२-१२ पुस्तकांच्या क्रमाने ही मालिका सहा सहा महिन्यांच्या अंतरानं वाचकांसमोर आणण्याचं ठरवलं. जग बदलवणारे पहिले बारा जीनियस हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक गॅलिलिओ गॅलिली, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट कॉख, लुई पाश्चर, ऍलेक्झांडर फ्लेमिंग, लीझ माईट्नर, मेरी क्यूरी, रॉबर्ट ओपेनहायमर आणि रिचर्ड फाईनमन हे वाचकांसमोर दाखल झाले. पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'जीनियस'नं सर्वाधिक विक्रीचा मान पटकावला. ही पुस्तकं लिहिताना शाळेत गणित आणि विज्ञान या विषयांना घाबरणारी मी या दोन्ही विषयांची माझी भीती या वैज्ञानिकांनी घालवली. अच्युत गोडबोले यांच्यातल्या कुशल शिक्षकानं मला हे दोन्ही विषयच नव्हे तर गुरुत्वाकर्षण, गतीचे नियम, सापेक्षतावाद, अणुऊर्जा, अणुबॉम्ब, सूक्ष्मजंतूचं जग या सगळ्या विषयांतलं विज्ञान सोप्या भाषेत शिकवलं. माझ्यातला आत्मविश्वास वाढवला आणि वन टू वन किंवा एकत्रित कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणारी मी जी वर्क्तृत्व कलेपासून कोसो दूर होते; माझं भाषण मी आत्तापर्यंत लिहून वाचत असे. जीनियस मंडळींनी मला वक्तृत्व कला बहाल केली. माझ्या हातातला लिखित कागद त्यांनी दूर भिरकवायला लावला. त्या दिवसापासून मी पंधरामिनिटांपासून ते दोन-अडीच तासांपर्यंतचं व्याख्यान सहजपणे द्यायला शिकले.
यानंतरचे बारा तंत्रज्ञ जीनियस आम्ही वाचकांसमोर आणणार होतो. जवळपास साठ टक्वे काम पूर्णत्वास आलं असताना लोकांच्या मेल, फोन यावरून ते सतत भारतीय जीनियसची उत्सुकतेनं चौकशी करत असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि आम्ही तंत्रज्ञ जीनियस नंतर पूर्ण करू या विचारानं आधी १२ भारतीय जीनियस निवडले. यात आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर आणि इतर गणितज्ञ, सर जगदीशचंद्र बोस, रामानुजन, विश्वेश्वरैया, मेघनाद साहा, चंद्रशेखर, सी.व्ही. रामन, डॉ. होमी भाभा, डी. डी. कोसंबी, लॉरी बेकर, स्वामीनाथन आणि डॉ. जयंत नारळीकर यांना वाचकांसमोर आणलं. शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि वाचनाची आवड असणार्या सर्वांनीच भारतीय जीनियसला भरभरून प्रतिसाद दिला.
यानंतर अच्युत गोडबोले आणि मी लिहीत असलेलं पाश्चिमात्य संगीतावरचं ‘सिंफनी’ हे साडेपाचशे पानी पुस्तक लवकरच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. यात 'कॅनव्हास'प्रमाणेच पाश्चात्य संगीताचा इतिहास आणि मध्ययुग, रेनेसान्स, अभिजात, बरोक, रोमँटिक, आधुनिक काळ यातलं संगीत आणि बाख, बीथोवन, मोत्झार्ट यांच्यासारखे अनेक प्रमुख संगीतकार तसंच जॅझ, कंट्री म्युझिक, पॉप, रॉक या संगीत प्रकारांची ओळख आणि एल्व्हिस प्रीस्ले, मायकेल जॅक्सन, बीटल्सपासून धुंद करणार्या अनेक संगीतकार-गायक यांची सफर घडवली आहे. मराठीत या विषयावरचं हे पहिलंच पुस्तक असेल.
सिंफनीनंतरचेही अनेक एकत्रित प्रकल्प आणि स्वतंत्र प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची प्रतीक्षा करताहेत. या सगळ्या प्रवासात लेखक म्हणून रोजच खूप काही शिकायला मिळतं आहे. अच्युत गोडबोले यांच्याबरोबर काम करता करता लेखक म्हणून घडता आलं. या बारा वर्षांत त्यांच्या लिखाणाची शैली आणि काम करण्याची पद्धत जवळून माहीत झाल्यामुळे आणि अनेक विचारांच्या बाबतीत दोघांची मतं एकसारखी असल्यानं त्यांच्याबरोबर लिखाण करताना कधीच अडथळा आला नाही. तसंच मला स्वतःला कोणी जोरात, रागावून ओरडून बोललेलं आवडत नाही आणि मीही कोणाशी त्या प्रकारे वागत नाही. नेमका हाच स्वभाव अच्युत गोडबोले यांचा असल्यानं एखादी गोष्ट समजेपर्यंत ते पुन्हा पुन्हा समजावून सांगतात. लिखाणात चुका झाल्यास त्या शांतपणे लक्षात आणून देतात. लिखाण चांगलं झालं की प्रोत्साहन देतात.
एखादं पुस्तक लिहिताना त्याचा विषय आम्ही बघतो. त्या विषयाचा अभ्यास करताना त्यात पूर्ण झपाटल्यागत होतं आणि मग हा इतका सुंदर विषय आपल्याला जितका कळलाय, तो इतरांपर्यंत पोहोचवण्याची भावना मनात प्रबळ होते. स्वतंत्र लिहिलेली पुस्तकं असोत वा अच्युत गोडबोले यांच्याबरोबर लिहिलेली पुस्तकं असोत, आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्वच पुस्तकांना वाचकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळालाय. सुरुवातीला व्याख्यानांचे कार्यक्रम ठरताना अच्युत गोडबोले माझं नावही आयेाजकांना सुचवत. अच्युत गोडबोले हे नाव खूप मोठं असल्यानं अशा जाहीर कार्यक्रमांमध्ये मला दुय्यम स्थान मिळणार हे मला सुरुवातीला ठाऊक होतं आणि मला ते मान्यही होतं. कारण अनुभवानं, बुद्धीनं आणि कर्तृत्वानं ते माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. मात्र त्यांच्याबरोबरीनं माझं व्याख्यान संपल्यावर ते आवडल्याच्या प्रतिक्रिया देण्यासाठी लोक माझ्याही भोवती गराडा घालू लागले, स्वाक्षरी मागू लागले तेव्हा आपण बोललेलं लोकांपर्यंत पोहोचण्याचा आनंद मिळत गेला आणि आजही मिळतो. यातूनच मला माझ्या स्वतंत्र कार्यक्रमांचेही प्रस्ताव यायला सुरुवात झाली. माझ्या या लेखनप्रवासाची नोंद घेत २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत मला कला, विज्ञान आणि सामाजिक कार्य यातल्या योगदानाबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर स्मृतिपुरस्कार आणि स्त्री सक्षमीकरणाबद्दल डॉ. ज्ञानेश्वर मुळे फ्रेंड्स पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं. माझ्यासाठी हे पुरस्कार म्हणजे माझ्या कामाची पावती आणि पुढे जाण्यासाठीची प्रेरणा वाटते.
पुस्तक लिखाणाबरोबरच दिवाळी अंकाचे एकत्रितपणे आणि स्वतंत्रपणे लेख मी आजही लिहीत असते. अधुनमधून वृत्तपत्रीय आणि नियतकालिकांमध्ये लिखाण करते. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर सक्रिय असते. लोकांशी संवाद साधण्यासाठी ही माध्यमं मला खूप आवडतात. पुस्तकातून भेटणारी माणसं, प्रत्यक्षात भेटणारी माणसं आणि तंत्रज्ञान ही सगळीच माध्यमं मला सकारात्मक ऊर्जा देतात. तंत्रज्ञानानं फेसबुकवर नवनवीन मित्र-मैत्रिणी मिळवून दिले आहेत. जगभराचं ज्ञान पुढ्यात आणून ओतलं आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मी कधी पुस्तकांची परीक्षणं, कधी सिनेमाविषयीचे रिव्हयूज, कधी कार्यक्रमांचं रिर्पोताज, तर कधी अनवट वाटेवरून प्रवास करणार्या वाटसरूंचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय, कधी रोजच्या जगण्यातल्या गमतीजमती, बघितलेल्या अनुभवलेल्या सुंदर गोष्टी, प्रसंग, स्थळं यांच्याविषयी लिहीत असते. आमच्या पुस्तकांची ऑडिओ बुक्स देखील बुकगंगातर्फे माझ्या आवाजात प्रकाशित झाली आहेत. या लिखाणामुळे आणि ऑडिओमुळे जगभरातली माणसं माझ्याशी संवाद साधतात. माझ लिखाण आवडल्याचं कळवतात. हे सगळं खूप आनंद देऊन जातं. समुपदेशनाचं कामही एकीकडे सुरूच असतं. या सगळ्या प्रवासात मुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळेच माझे सहप्रवासी आणि सोबती असतात. माझं जग यातून आणखी आणखी विस्तारत जात असल्याचा आनंद मला मिळतो. माझ्या हातातले लिखाणाचे ठरवलेले सर्व प्रकल्प मला पूर्ण करायचे आहेत. समतेवर आधारलेलं, वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारं, कलेचं सौंदर्य दाखवणारं आणि सामाजिक प्रश्नांचं भान देणारं असंच लिखाण मला यापुढेही करायचं आहे आणि आयुष्याचा आनंद घेत ही विस्तारलेली वाट चालत राहायची आहे, बस्स हेच माझं स्वप्न आहे!
दीपा देशमुख,
Add new comment