मनात रेंगाळणार्या लोककथा
लोकांची, लोकांसाठी, लोकांना सांगितलेली कथा म्हणजेच लोककथा! ही कथा किंवा गोष्ट जो ऐकतो ती त्याचीच होऊन जाते. वार्याच्या झुळकेसारखी, संगीताच्या सुरावटीसारखी ती लहरत, विहरत जगभर प्रवास करते. या कथेला बांधून ठेवण्याची मुळी गरजच पडत नाही. म्हणजे ती कथा लिहून ठेवलीये, तिच्या लेखकाचं नाव त्याखाली उदृत केलंय वगैरे. जो ऐकतो तो तिला घेऊन पुढे जातो आणि म्हणून अशा अनेक कथा किंवा गोष्टी जगभर एकसारख्याच ऐकायला मिळतात. फक्त नावं वेगळी, गावं वेगळी असतात. पण त्या कथेचा आत्मा मात्र तोच असतो.
अगदी लहानपणापासूनच अशा अनेक कथांनी आपल्या मनावर गारूड घातलंय. अगदी सुरुवातीला कापूसकोंड्याची गोष्ट असेल, किंवा चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं ही गोष्ट असेल, तर कधी लाकूडतोड्याची कुर्हाड पाण्यात पडल्यावर देवी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला सोन्या, चांदी आणि लोखंडाची कुर्हाड कशी देते अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो, मग आपली मुलं ऐकतात आणि पुढे तीही त्यांच्या मुलांना ऐकवतात. अशा रीतीनं या कथांचा प्रवास सुरूच राहतो. यात विक्रम-वेताळ, पंचतंत्रातल्या गोष्टी, इसापनीति, बिरबलाच्या किंवा तेनालीरामाच्या गोष्टी आपण सगळ्यांनीच ऐकल्या आहेत.
या लोककथा का वाचायच्या, किंवा का ऐकायच्या? लोककथा आपल्या जाणिवांना समृद्ध करतात. त्या मुळातच चिरतारुण्याचा आणि चिरसौंदर्यांचा वारसा घेऊन चालत असतात. या कथा आपल्याला काही सांगू पाहतात, काही शिकवू पाहतात आणि पुढे जायचा मार्गही दाखवायला मदत करतात.
विक्रम-वेताळ मालिकेतली एक कथा आठवतेय. एका राज्यात यशकिर्ती नावाच्या एका राजाला विद्याकेतू नावाचा मुलगा असतो. त्या राजाचा प्रधान याचा मुलगा बलकेतू आणि विद्याकेतू हे दोघं खूप चांगले मित्र असतात. दोघंही खूप घनिष्ठ मित्र असले तरी विद्याकेतूची भद्रकाली देवीवर खूप श्रद्धा असते, तर बलकेतूचा भक्तीपेक्षा शक्तीवर विश्वास असतो. एके दिवशी बलकेतू सुकेशा नावाच्या नावाच्या एका सुंदर तरूणीला बघतो आणि त्याला ती खूपच आवडते. भद्रकालीजवळ तो नवस बोलतो, 'सुकेशाशी माझं लग्न झालं तर मी माझं उत्तमांग तुला अर्पण करीन’
त्यानंतर विद्याकेतू सुकेशाच्या विचारानं झुरत चालला असल्याचं लक्षात येताच, यशकिर्ती राजानं कारण शोधलं आणि सुकेशाच्या वडिलांना भेटून आपल्या मुलासाठी तिचा मागितला. गंमत म्हणजे बलकेतूनं देखील सुकेशाला बघितलं होतं आणि तीही त्याला खूप आवडली होती. पण हे सगळं कळताच बलकेतूनं आपल्या मनातली इच्छा मनातच दडवली आणि तो आपल्या मित्राच्या लग्नासाठी राबराब राबला.
एके दिवशी विद्याकेतू आणि सुकेशा जंगलात घोडस्वारी करत असताना विद्याकेतूला आपण भद्रकालीजवळ नवस बोललो होतो याची आठवण झाली. त्यानं बलकेतूला बोलावणं पाठवलं. तू नौकाविहार कर, तोपर्यंत मी भद्रकाली देवीचं दर्शन घेऊन येतो असं विद्याकेतूनं सुकेशाला सांगितलं. मंदिरात जाताच विद्याकेतूनं भद्रकाली देवीपुढे हात जोडले आणि बोलल्याप्रमाणे नवस फेडायला आपण विलंब केला याबद्दल क्षमा मागितली. आता आपण आपला नवस पूर्ण करत आहोत असं म्हणत त्यानं कमरेची तलवार काढली आणि आपलं मस्तक देवीच्या चरणाजवळ अर्पण केलं.
इकडे बलकेतू आणि सुकेशा विद्याकेतूची वाट बघत बसले. खूप वेळ झाला आणि तरीही आपला मित्र परतला नाही बघून बलकेतू त्याला आणण्यासाठी मंदिरात जाऊन पोहोचला. तिथलं दृश्य पाहून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. राजपुत्राच्या पत्नीची मनात मनिषा धरून प्रधानपुत्रानं आपल्याच मित्राचा घात केला अशी बातमी सर्वत्र पसरेल आणि सगळी लोकं आपल्याला दुषणं देतील या प्रकारचे विचार बलकेतूच्या मनात येऊ लागले. मात्र त्याच वेळी आपला जिवलग मित्र नसेल तर आपल्या जगण्याला तरी काय अर्थ उरलाय या विचारानं त्यानंही आपली तलवार काढली आणि आपलं मस्तक उडवलं.
त्यानंतर बराच वेळ गेला तरी विद्याकेतू आणि बलकेतू दोघंही आले नाहीत, बघून सुकेशा मंदिरात पोहोचली. तिथलं दृश्य पाहून धरणी दुभंगतेय की काय असं तिला वाटलं. आपल्यासाठी या दोघांनी मारामारी केली आणि त्यात दोघंही मरण पावले असं म्हणत लोक आपल्याला कुलटा म्हणतील या विचारानं ती गर्भगळित झाली. लोकविचार जरी सोडला, तरी आता पतीशिवाय जगण्यात काय अर्थ असं म्हणत तिनं देखील आपली तलवार उपसली आणि स्वतःवर वार करणार एवढ्यात भद्रकाली देवी सुकेशावर प्रसन्न झाली आणि तिनं तिला वर दिला. सुकेशानं विद्याकेतू आणि बलकेतू यांची मस्तकं त्यांच्या धडाला लावली की ती जिवंत होतील असं सांगून देवी अंतर्धान पावली.
सुकेशाला इतका आनंद झाला की तिला काय करावं तेच सुचेनासं झालं. तिनं देवळातल्या त्या अंधुक प्रकाशात मस्तकं उचलली आणि धडांना जोडली. मात्र यात एक गडबड झाली आणि मस्तकांची आणि धडांची अदलाबदल झाली. विद्याकेतूच्या शरीरावर बलकेतूचं मस्तक आणि बलाकेतूच्या शरीरावर विद्याकेतूचं मस्तक! दोघंही क्षणात जिवंत झाली.
ही गोष्ट वेताळानं राजा विक्रमाला सांगितली आणि तो म्हणाला, 'हे राजन, आता सुकेशाचा खरा पती कोण हे सांग. अन्यथा तुझ्या मस्तकाची शकलं शकलं उडतील.’
राजा विक्रम म्हणाला, ‘आपलं मस्तक म्हणजे उत्तमांग! त्यावरूनच माणसं ओळखली जातात. ज्या धडाला विद्याकेतूचं मस्तक तोच तिचा पती!’
विक्रमाचं उत्तर ऐकून वेताळ प्रसन्न झाला आणि तो क्षणात नाहिसा झाला.
ही गोष्ट मी लहानपणी अनेकदा वाचली. पुढे 'हयवदन' या नाटकात या लोककथेचा संदर्भही बघितला. खरं तर आता या कथा काल्पनिक भासतात, वास्तवाशी त्यांचा संबंध नाही असंही वाटतं. पण तरीही त्या त्या वयातच नव्हे तर आजही या गोष्टी आपल्याला त्यांच्यात गुंतवतात. आपल्या कल्पनाशक्तीला नव्याने धुमारे फुटायला मदत करतात आणि आपल्यातल्या सर्जनशक्तीला चालना मिळते. त्यामुळे उडत्या गालिच्यापासून ते पंखामुळे उडणार्या पर्यांच्या गोष्टींपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आजही मला तितक्याच आवडतात.
काही गोष्टी तर पुन्हा पुन्हा ऐकायला किंवा वाचायला मजा येते. अकबर-बिरबल या मालिकेत तर अनेक गोष्टी लोकांनी त्यांच्या नावानं खपवल्या आहेत. तरीही या कथांचं मोल कमी होतच नाही. यातलं अकबराचं मित्राविषयीचं प्रेम, आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी अविरत करत असलेले प्रयत्न, त्याचं धर्मनिरपेक्ष वागणं हे सगळं आपल्याला खेचून घेतं. पण त्याचबरोबर बिरबलासारखी अनेक रत्नं अकबराच्या दरबारात कशी होती याबद्दलच्याही कथा आपल्याला वाचायला मिळतात. अकबर आणि बिरबल यांच्यातली मैत्री तर आपल्याला खूपच उल्हसित करुन जाते. बिरबलाच्या चातुर्याच्या कथा आपल्याला खूप काही शिकवून जातात. अनेक बिकट प्रसंगातून वाट कशी काढायची हेही शिकवतात.
आपल्या सगळ्यांना बिरबलाच्या खिचडीची लोककथा ठाऊकच आहे. पण तरीही ती सांगायचा मोह काही केल्या सुटत नाहीये. एकदा बादशाह अकबर आणि बिरबल रात्रीच्या वेळी फिरत असताना एका उद्यानातल्या सरोवराजवळ येऊन पोहोचले. त्या सरोवरातल्या पाण्याला स्पर्श करताच अकबराची बोटं त्या थंड पाण्याच्या स्पर्शानं काकडली आणि त्याला अक्षरशः हुडहुडी भरली. ‘या अशा पाण्यात रात्रभर कोणी उभा राहू शकेल का?’ असा प्रश्न त्यानं बिरबलाला केला. बिरबल म्हणाला, 'जहाँपनाह, एखाद्याची तीव्र इच्छाशक्ती त्याला काहीही करायला लावू शकते.’ झालं, अकबरानं दुसर्याच दिवशी राज्यात दवंडी पिटवली. 'जो कोणी राजउद्यानातल्या सरोवरात रात्रभर उभा राहील त्याला इनाम म्हणून एक गाव देण्यात येईल आणि एक हजार सुवर्णमोहरा वेगळ्याच' असं जाहीर करण्यात आलं.
दवंडी ऐकल्यावर अनेकांनी प्रयत्न केले. पण काही सेकंदाच्या वर ते त्या थंडगार पाण्यात उभेही राहू शकले नाहीत. अशा वेळी एक अतिशय गरीब माणूस आपल्या मुलीच्या लग्नासाठी चिंतातुर झालेला होता. लग्न करण्यासाठी त्याच्याजवळ एक दमडीही नव्हती. अशा वेळी आपण हा प्रयत्न केला, तर आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि आपल्या मुलीचं लग्न आपण थाटात करून देऊ शकू या विचारानं ते आव्हान त्यानं स्वीकारलं. रात्रभर तो गरीब माणूस सरोवरातल्या त्या बर्फासारख्या थंड पाण्यात उभा राहिला. पहारेकरी आणि जमलेले सगळे लोक चकित झाले. सकाळी ही वार्ता सगळीकडे पसरली. मात्र काही जळाऊ वृत्तीचे लोक राजा अकबराजवळ जाऊन पोहोचले आणि त्यांनी 'महालातल्या रात्रभर जळणार्या दिव्यांची ऊब त्या माणसाला मिळाली आणि त्या सरोवराचं पाणी देखील कोमात झालं म्हणूनच तो रात्रभर पाण्यात उभा राहू शकला, तेव्हा त्याला बक्षिसी देण्याची गरज नाही' असं सांगितलं. बादशाहाला त्यांचं म्हणणं पटलं. त्यानं त्या गरीब माणसाला बक्षिसी देणं दूरच पण त्याला हाकलून लावलं.
तो गरीब माणूस बिरबलाजवळ आला. बिरबलानं त्याला न्याय मिळवून देण्याचं वचन दिलं. त्यानंतर बिरबलानं आपल्या अंगणातल्या एका झाडाच्या शेंड्यावर अगदी उंच टोकाशी दोन मुठी तांदुळ, डाळ आणि पाणी टाकून एक मडकं बांधलं. झाडाच्या बुंध्याशी त्यानं शेकोटी पेटवली आणि एक चौरंग मांडून तो त्यावर बसला. त्याच वेळी अकबर बादशाहाचा एक सेवक तिथे आला आणि त्यानं बिरबलाला राजदरबारात बोलावल्याचा आदेश दिला. बिरबल म्हणाला, 'आज माझं व्रत असल्यामुळे मी खिचडी शिजायला ठेवली आहे, ती खावून व्रत सोडून लगेच येतो.' बराच वेळ झाला तरी बिरबलाचा पत्ता नाही बघून अकबरानं पुन्हा दुसरा सेवक पाठवला. तरीही त्याला तेच उत्तर ऐकायला मिळालं. यात दोन-तीन तास उलटले. आता मात्र अकबराचा संयम संपला. बिरबलाला आणण्यासाठी तो स्वतःच बिरबलाकडे पोहोचला.
खरं तर बिरबलाला अकबर खूप रागावणार होता. पण झाडाच्या टोकाशी लावलेलं खिचडीचं मडकं आणि बुंध्याशी लावलेली शेकोटी हे दृश्य बघून राजा पोट धरून हसू लागला. ते बघून अकबराचे खुशमस्करे देखील हसू लागले. 'बरं झालं बिरबलाचा मूर्खपणा राजाला दिसला' असं ते मनातल्या मनात म्हणू लागले. राजा अकबर म्हणाला, ‘अरे बिरबला, तुझं खिचडीचं मडकं झाडाच्या शेंड्यावर आणि शेकोटीचा जाळ बुंध्याजवळ. या सगळ्यात अंतर किती मोठं आहे. तुझी ही खिचडी शिजणार कशी?’ त्यावर बिरबल शांतपणे म्हणाला, ‘तुमच्या महालातल्या दिव्यांच्या उष्णतेवर जर उद्यानातल्या सरोवरातलं पाणी गरम होवून एखाद्याला ऊब मिळत असेल तर माझी खिचडी त्याच ऊबेवर शिजू शकेलच की.’
बिरबलाला काय म्हणायचंय हे राजा अकबराला कळलं. त्यानं त्या गरीब माणसाला पाचारण केलं आणि त्याला ठरलेल्या मोहरा आणि एक गाव बक्षिसीदाखल दिलं. त्या गरीब माणसानं आपल्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल बिरबलाचे हात जोडून आभार मानले. बिरबलाची खिचडी बघून मात्र त्याचे टीकाकार खजील होऊन घरी परतले.
अशा शेकडो, लोककथा मला आठवताहेत. पंचतंत्रामधल्या तर प्राण्यांच्या संवादाच्या अनेक गोष्टी आपल्याला खूप मोठी शिकवण देतात. कोल्हा आणि करकोचा यांची गोष्ट देखील अशीच आहे. कोल्हा करकोच्याला जेवायला बोलावतो आणि एका उथळ बशीत खीर ठेवतो. बिचार्या करकोच्याला आपल्या लांबलचक चोचीमुळे ती खीर काही केल्या खाता येत नाही. उपाशीपोटी करकोचा घरी परततो. काही दिवसांनी करकोचा कोल्ह्याला आपल्या घरी मेजवानीचं निमंत्रण देतो आणि अतिशय चविष्ठ असं पक्वान्न करून तो एका सुरईत ठेवतो. कोल्हा येताच तो त्याला ते खाण्याचा खूप आग्रह करतो. मात्र सुरईच्या अरूंद तोंडामुळे कोल्ह्याला काही केल्या त्या पदार्थाचा वास घेण्याशिवाय काहीच करता येत नाही. करकोचा मात्र मिटक्या मारत आपल्या चोचीच्या साहाय्यानं पोटभर जेवतो. अखेर आपली मान शरमेनं झुकवत करकोच्याची माफी मागत कोल्हा घरी परततो. काही वेळा जशास तसे कसे वागावे याचा पाठ पंचतंत्रामधल्या अनेक कथा आपल्याला देतात.
शेवटी, मला आवडलेली एक लोककथा म्हणजे माझी लेखिका मैत्रीण आशा साठे हिनं मला सांगितलेलीः एकदा काय होतं, संसारात गांजलेली, त्रासलेली, सगळ्यांचा छळ सहन करत असलेली एक स्त्री एके दिवशी निश्चय करते आणि या त्रासातून आपली सुटका करून घ्यायची असं ती ठरवते. एके रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर ती उठते आणि नदीकाठाच्या रस्त्याला चालू लागते. अंधाराची, जंगली जनावराची कशाचीही भीती तिला वाटत नसते. नदीच्या पलीकडल्या तीरावर तिला पोहोचायचं असतं. नदीच्या या काठावर असलेल्या नावेत ती बसते. रात्रभर ती नाव वल्हवत राहते. पहाटेचं झुंजूमुंजू होतं, अर्धवट अंधार आणि अर्धवट प्रकाश असं सगळं वातावरण.....आपण किती अंतर कापलंय, समोरचा काठ दिसतोय की नाही हे बघण्याचा ती प्रयत्न करते आणि हाय, ती ज्या नावेत बसलेली असते, जी नाव तिनं रात्रभर वल्हवलेली असते, तिचा बांधलेला दोर सोडायचा मात्र ती विसरून गेलेली असते. त्यामुळे रात्रभर नाव वल्हवून देखील ती आहे त्याच ठिकाणी असते.
आपण सगळेच काही प्रमाणात असेच तर आहोत. खूप काही करायचं असतं, मनाचा निश्चय देखील अनेकदा होतो. मात्र कृती न घडल्यानं आपण आहे तिथंच राहतो. कृतीशिवाय कुठल्याही विचारांना काहीच अर्थ नाही असं या लोककथेनं मला सांगितलंच, पण एक स्त्री म्हणूनही तिची असाहायता आणि अनेक गोष्टींची बंधनं, संस्कारांची ओझी, नात्यांची आगतिकता तिला पुढे जाऊच देत नाही, हेही सांगितलं. मात्र कृतीचं पहिलं पाऊल उचललं की पुढला मार्ग दिसत राहतो, सापडत जातो हेही या लोककथेनं शिकवलं.
त्यामुळे आपण खूप खूप वाचलंच पाहिजे. प्रत्येक प्रकारातलं लिखाण वाचलं पाहिजे. कारण तो आपला समृद्ध होण्याचा, माणूस म्हणून घडण्याचा मार्ग आहे हे मात्र नक्की!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment