वॉल्ट डिस्ने
एके दिवशी एका चर्चच्या धर्मोपदेशकानं एका गरीब तरुणाला व्यंगचित्र बनवण्याचं काम दिलं. आवडीचं काम मिळाल्यामुळे तो तरुण खुश झाला आणि आपण चर्चच्या परिसरातच बसून व्यंगचित्र काढून देतो असं त्यानं त्या धर्मोपदेशकाला सांगितलं. धर्मोपदेशकानं त्याला तिथे बसायची परवानगी दिली. तरुण तिथेच मांडी ठोकून बसला आणि नेमकं कुठलं चित्र काढावं याचा विचार करायला लागला. काहीच क्षणात त्याच्या आजुबाजूच्या जागेतून काहीतरी विचित्र आवाज ऐकायला आले. आपलं काम थांबवून त्या तरुणानं बघितलं तर, अनेक उंदीर त्या ठिकाणी उड्या मारत इकडून तिकडे पळताना त्याला दिसले. ते उंदीर आपल्यातच मग्न होते. तो तरुण आपलं काम विसरून उंदरांची पळापळ बघण्यात रंगून गेला. त्याच क्षणी आपण या उंदराचंच व्यंगचित्र बनवलं तर? असा त्याच्या मनात विचार आला. अशा रीतीनं जगावर राज्य करणार्या मिकी माऊस या उंदराचा जन्म झाला. या उंदराचा निर्माता, तरूण चित्रकार होता - वॉल्ट डिस्ने!
वॉल्ट डिस्ने हा एक अमेरिकन फिल्म निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक, नेपथ्यकार, अॅनिमेटर, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. वॉल्ट डिस्ने या व्यंगचित्रकारानं व्यंगचित्राच्या जगात एक वेगळा इतिहास घडवला. जिद्द, परिश्रम आणि तीव्र इच्छाशक्ती यांच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो हे त्या ध्येयवेड्या झपाटलेल्या चित्रकारानं सिद्ध करून दाखवलं. आज जगातली सगळ्यात मोठी दुसर्या क्रमांकावर असलेली कंपनी म्हणजे ‘द वॉल्ट डिस्ने मल्टिनॅशनल मास मिडिया कंपनी’. आज इएसपीएन, एबीसी, डिस्ने यासारखी टीव्ही चॅनेल्स ४० देशांमध्ये पसरलेल्या डिस्ने कंपनीच्या मालकीची आहेत. ऑस्करपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोजता येणार नाहीत इतके पुरस्कार वॉल्ट डिस्नेच्या चित्रपटांनी पटकावले आहेत.
प्रचंड यश मिळवलेल्या वॉल्ट डिस्नेचा इथंपर्यंत पोहोचण्यासाठीचा संघर्षमय प्रवास सोपा नव्हता. वॉल्ट डिस्नेचा जन्म ५ डिसेंबर १९०१ या दिवशी शिकागोमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याला चित्रकलेत प्रचंड रस होता. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यानं आपलं पहिलं चित्र काढून ते आपल्या शेजार्याला विकलं होतं. घरच्या गरिबीमुळे वॉल्ट लोकांकडे वर्तमानपत्रं टाकणं वगैरे कामं करत असे. त्याला अनेकदा उपाशीपोटी झोपावं लागे. थकलेला वॉल्ट शाळेत गेल्यावर चक्क झोपी जायचा. याच कारणानं त्याला अभ्यासात कधी फारसे गुण मिळाले नाहीत.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी वय कमी भरल्यानं वॉल्टला सैन्यात भरती होता आलं नसलं, तरी त्याला रेडक्रॉसमध्ये सामील होऊन अॅम्ब्युलन्स चालवण्याचं काम मिळालं. त्यानं आपली अॅम्ब्युलन्स रंगिबेरंगी कार्टून्सनी सजवली होती. तिथून परतल्यावर वॉल्ट पुन्हा शाळेत गेलाच नाही. त्यानं एका जाहिरात कंपनीमध्ये कार्टूनिस्ट म्हणून नोकरी पकडली. या कंपनीद्वारे चित्रं काढून छोट्यामोठ्या उद्योगांच्या जाहिराती चित्रपटगृहात दाखवली जात.
याच काळात वॉल्टनं आयवर्क्स नावाच्या माणसाबरोबर ‘आयवर्क्स-डिस्ने’ नावाची जाहिरात कंपनी काढली. पण लोकांना आयवर्क्स या शब्दामुळे ही चष्म्याची कंपनी असावी असं वाटायला लागलं आणि परिणामी एका महिन्याच्या आत कंपनीला टाळं ठोकावं लागलं. त्यानंतर त्यानं दुसर्या एका अॅनिमेशन फिल्म्स बनवणार्या जाहिरात कंपनीमध्ये नोकरी पत्करली. या दरम्यान वॉल्ट अॅनिमेशनचं तंत्र शिकला. डोळयांवर भ्रम निर्माण करणारं अॅनिमेशनं तंत्र वॉल्टला खूपच आवडलं. त्यातूनच प्रेरित होऊन त्यानं पुन्हा स्वतःची ‘लाफ-ओ-ग्रॅम’ नावाची कंपनी काढली. मात्र ती कंपनीही काहीच काळात बुडाली आणि डोक्यावर कर्ज होऊन बसलं. वॉल्टला राहतं घरही सोडावं लागलं.
यानंतर वॉल्ट डिस्नेनं थेट हॉलिवूडचा रस्ता पकडला. आपल्या रॉय नावाच्या भावाला मदतीला घेऊन त्यानं ‘डिस्ने बदर्स’ नावाचा स्टुडिओ सुरू केला आणि सिनेमांच्या मध्यंतरांमध्ये दाखवण्यासाठी कार्टून फिल्म्स तयार करायला सुरुवात केली. याच दरम्यान वॉल्टनं लिलियन या तरुणीशी लग्न केलं. लिलियनला हॉलिवूड आणि कार्टून फिल्म्स यात जराही रस नव्हता. मात्र गृहिणी म्हणून तिनं वॉल्ट डिस्नेला झकास साथ दिली. हळूहळू वॉल्ट डिस्नेचा धंद्यात जम बसायला लागला. त्यामुळे त्यानं आपल्या स्टुडिओसाठी मोठी जागा घेतली आणि अनेक चित्रकार नेमले. त्याला आता नवनवीन विषय सुचायला लागले. याच वेळी त्याला पुन्हा एका वितरकानं फसवलं आणि त्याची काम करणारी माणसं फोडली. वॉल्टला हा सगळा प्रकार समजल्यावर खूपच वाईट वाटलं, पण तो खचला नाही आणि याच वेळी त्याच्या डोक्यातून मिकी माऊसनं जन्म घेतला.
काही मूक चित्रपट काढल्यानंतर वॉल्ट डिस्नेनं ‘स्टीम बोट विली’ नावाचा चित्रपट काढला. यात मिकी माऊस बोलताना, गाताना आणि चक्क नाचताना दाखवला होता. या चित्रपटाला साउंड इफेक्ट देण्यासाठी वॉल्ट डिस्नेनं रात्रंदिवस मेहनत घेतली. भूतकाळात झालेली फसवणूक आणि अपयश यातून शहाणपण घेऊन आपला चित्रपट आपणच प्रदर्शित करायचं त्यानं ठरवलं आणि सर्व हक्क स्वतःकडे ठेवले आणि चमत्कार घडला. मिकी माऊसनं वॉल्ट डिस्नेचं आयुष्यच बदलून टाकलं. लोकांना मिकी माऊस इतका आवडला की लोक तोच चित्रपट पुन्हा पुन्हा बघायला चित्रपटगृहाची वाट पकडायला लागले! वॉल्ट डिस्नेचा मिकी माऊस लोकांच्या मनावर आपलं राज्य असा गाजवायला लागला होता की लोकांच्या ब्रीफकेसेस, हेअर ब्रश, टी-शर्ट्स, साबण, खेळायचे पत्ते, घड्याळं अशा सगळ्या वस्तूंवर मिकी माऊस झळकायला लागला होता. वॉल्टनं या यशानंतर मागे वळून बघितलंच नाही. त्यानं आपल्या लाडक्या मिकीवर अनेक चित्रपट काढले आणि ते सगळेच गाजले. याही काळात त्याला वितरक, सहकारी यांनी खूप त्रास दिला. पण वॉल्ट डिस्ने आता या त्रासातून मार्ग काढायचा शिकला होता. या काळात त्यानं लाखो डॉलर्स नफा मिळवला. वॉल्ट डिस्ने आता प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. चार्ली चॅप्लिनसारख्या अभिनेत्यालाही त्याची भुरळ पडली होती.
टेलिव्हीजनचं माध्यम सुरू झाल्यावर त्याचंही महत्व वॉल्ट डिस्नेनं लगेचच ओळखलं. त्यानं डिस्नेलँड नावाचा कार्यक्रम सात वर्षांचा करार करून सादर केला. तसंच ‘मिकी माऊस क्लब’ हा डिस्नेचा दुसरा कार्यक्रम ३ ऑक्टोबर १९५५ पासून टीव्हीवर दाखवला जायला लागला. ‘वंडरफुल वर्ल्ड ऑफ कलर’ हा कार्यक्रम १९६१ साली सुरु झाला. या दरम्यान डिस्नेच्या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड वाढल्यामुळे ते कार्यक्रम ‘कोकाकोला’ आणि ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ अशा नामांकित कंपन्यांनी स्पॉन्सर करायला सुरुवात केली होती.
आता वॉल्ट डिस्नेला कॅलिफोर्नियामध्ये भव्यदिव्य असं डिस्नेलँड पार्क उभं करायचं होतं. सगळ्यांनी पुन्हा त्याला वेड्यात काढलं. पण वॉल्ट डिस्नेनं कोणाचंही न ऐकता आपलं राहतं घर, विम्याच्या सगळ्या पॉलिसीज, होतेनव्हते ते सगळे पैसे या कामासाठी लावले. डिस्नेलँडच्या हजारो एकरच्या जागेमध्ये कृत्रिम नद्या, त्यावरचे आकर्षक पूल, डोलणारी हिरवीगार झाडं आणि वेली, असं सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं वॉल्ट डिस्नेनं उभं करून आपलं स्वप्नं पूर्ण केलं. डिस्नेलँडला जेव्हा अमेरिकनच नव्हे तर जगभरातल्या लोकांनी भेट द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचे डोळे अक्षरशः दिपून गेले. डिस्नेलँडच्या उद्घाटन प्रसंगी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन उपस्थित होते. रशियाचा व्रुश्चेव्ह जेव्हा अमेरिका भेटीला आला, तेव्हा त्यानं आपल्याला फक्त डिस्नेलँड बघायचंय असं म्हटलं. वॉल्ट डिस्नेनं कॅलिफोनिर्यानंतर ऑर्लेंडो फ्लॉरिडा या ठिकाणीही डिस्नेवर्ल्ड उभं केलं.
वॉल्ट डिस्ने तसा खूप शांत, लाजाळू, अस्वस्थ, संतापी, विचित्र आणि विक्षिप्त स्वभावाचा माणूस होता. आपल्या कल्पकतेनं निसर्गसौंदर्यांन नटलेले, संगीतानं मंत्रमुग्ध करणारे आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारे चित्रपट बनवणार्या वॉल्ट डिस्नेची राजकीय मतं मात्र खूपच कट्टर होती. डिस्नेचे वडील कम्युनिस्ट विचारसरणीचे असताना वॉल्ट डिस्ने मात्र प्रचंड कट्टर उजव्या विचारसरणीचा होता! तो कम्युनिस्टविरोधी ‘मोशन पिक्चर अलायन्स फॉर द प्रिझर्व्हेशन ऑफ अमेरिकन राईटस्’ गटाचा संस्थापक सदस्य होता. तसंच आपल्या मृत्यूपर्यंत डिस्नेनं ‘फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन’चा (एफबीआय) स्पेशल एजंट म्हणून काम केलं. अॅनिमेटर्स कम्युनिस्ट असल्याचं आढळलं तर त्यांना देशोधडीला कसं लावता येईल हेही तो बघत असे. आर्थर मिलरसारख्या नाटककारालाही त्यानं कम्युनिस्ट असल्याचा शिक्का मारून उदध्वस्त केलं. चार्ली चॅप्लिन हा तर वॉल्ट डिस्नेचा चाहता होता, पण त्यालाही कम्युनिस्ट ठरवून अमेरिका सोडून जायला भाग पाडलं होतं. खरं तर चार्ली चॅप्लिननं स्नोवाईट अँड सेवन ड्वार्फस या चित्रपटाच्या वितरणासाठी डिस्नेला आर्थिक साहाय्यही केलं होतं.
वॉल्ट डिस्ने काम करताना आपल्या सहकार्यांना यशाचं श्रेय देत असे. त्याच्याबरोबर काम करणं हा इतरांसाठी एक चैतन्यदायी अनुभव असायचा. १९५० साली वॉल्ट डिस्नेनं काढलेला ‘सिंड्रेला’ हा चित्रपटही प्रचंड गाजला. सिंड्रेलाची गोष्ट अॅनिमेशन तंत्राद्वारे दाखवणं हा एक विलक्षण रोमांचक जिवंत अनुभव होता. त्यानंतर वॉल्ट डिस्नेनं अॅक्शन चित्रपटांवर भर दिला. त्यानं ‘ट्रेझर आयलँड’,‘द स्टोरी ऑफ रॉबिन हूड अँड हिज मेरी मेन’, ‘द स्वॉर्ड अँड द रोझ’ ‘ट्वेंटी थाऊंजड लीगज् अंडर द सी’, ‘मेरी पॉपिन्स’, ‘रॉब रॉय’ ‘द लेडी अँड द ट्रँप’असे अनेक चित्रपट काढले. डिस्नेनं ‘जंगल बुक’ हा रुडयार्ड किपलिंग या लेखकानं लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आपला शेवटचा अॅनिमेशनपट काढायचं ठरवलं.
आयुष्यभर डिस्नेनं प्रचंड प्रमाणात धूम्रपान केलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्याला फुप्फुसाचा कर्करोग झाला. १५ डिसेंबर १९६६ या दिवशी वॉल्ट डिस्नेचा मृत्यू झाला. त्याचा अर्धवट अवस्थेत असलेला ‘जंगल बुक’ हा चित्रपट त्याच्या सहकार्यांनी त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण केला आणि त्याला प्रचंड यशही मिळवून दिलं. ‘स्वप्नं पाहा आणि कृतीच्या मागे लागा, त्यासाठी सर्वस्व पणाला लावा. यश तुमचंच आहे’, असं म्हणणार्या कल्पक, जिद्दी, कष्टाळू असलेल्या वॉल्ट डिस्नेला जग कधीही विसरू शकणार नाही!
दीपा देशमुख
Add new comment