माझे गुज निरंजन दिवाळी 2019

माझे गुज निरंजन दिवाळी 2019

मला आठवतं, लहानपणी मी फारशी बोलायची नाही. माझ्या मनात जे काय चाललंय ते इतरांनी ओळखावं असं मला वाटायचं. तसं झालं नाही तर मला फार राग यायचा. त्या वेळी मी चार-पाच वर्षांची असेन. आई-वडील तिरुपतीला गेले होते आणि माझी रवानगी आजी-आजोबांकडे परभणीला केली होती. मला खेळायला एक फुलाफुलांची पत्र्याची पेटी होती. त्यात माझी बाहुली आणि अनेक वस्तू होत्या. ही पेटी नेहमीच माझ्या सोबत असायची. हाताच्या मुठीत एक संगमरवरी शुभ्र ग्रीक शिल्पं असावीत अशी जोडी होती. ती गुळगुळीत शिल्पं मला खूपच आवडायची. माझी मूठ त्यामुळे घट्ट झाकलेली असायची. ते शिल्प हरवू नये यासाठी मी त्यांना जिवापाड जपायची. माझी अंबूआत्या दिसायला गोरीपान, नाजूक, चवळीच्या शेंगेसारखी....मला ती खूप आवडायची. तिच्यासोबत मी अनेक ठिकाणी फिरायची. एकदा परभणीत राहणार्‍या माझ्या मामांनी मी दोन दिवस तिकडे राहायला यावं असा प्रस्ताव ठेवला आणि आजी-आजोबांनी मला मामांकडे पाठवलं. मामाचं क्वार्टर खूप छान होतं. आजी-आजोबाचं मातीचं, शेणानं सारवलेलं जुनं घर, नानलपेठ या भागात, तर मामाचं क्वार्टर सिमेंट काँक्रिटचं हवेशीर...! मला मामाचं घर आवडलं. दिवसभर बाहेर बागेत खेळण्यात मी रमले. रात्री थकल्यामुळे लवकरच झोप लागली. रात्री केव्हातरी जाग आली आणि आपल्याला खूप भूक लागली आहे असं जाणवलं. मी झोपेतून उठून रडायला सुरुवात केली. मामा-मामी, मामेबहीण सगळे उठले. मी का रडतेय हे त्यांना कळेना. माझं पोट दुखतंय का, मला आईची आठवण येतेय का असे अनेक प्रश्न विचारून झाले. पण माझं रडणं काही केल्या थांबेना. मामींनी मला उचलून डायनिंग टेबलवर बसवलं आणि मला आणखी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या क्षणी मला टेबलवर ठेवलेली केळी दिसली. ती केळी मला त्या क्षणी हवी होती. आणि नेमकी केळी सोडून बाकी सगळ्या गोष्टींबद्दल सगळे मला विचारत होते आणि माझ्या रडण्यात आता संतापाची भर पडली होती. मला काय हवंय हे या लोकांना कळत का नाहीये याचा मला राग येत होता. तुला बाहुली हवी का, लाडू हवा का असं करत करत मामेबहिणीनं ‘तुला केळी हवी का’ असा प्रश्न विचारला आणि माझं रडणं थांबलं! केळी खाऊन मी शांतचित्ताने झोपले आणि बाकी सगळ्यांनी देखील हुश्श केलं. 

हा झाला एक प्रसंग पण त्यानंतरही अनेक वर्षं माझा हाच ‘मनातलं न बोलायचा’ स्वभाव कायम होता. आई तर मला ‘घुमी’ असं म्हणायची. ‘कार्टी मनातलं बोलतच नाही’ असं तिचं म्हणणं असायचं. त्यामुळेच की काय मी खूप लहानपणापासून डायरी लिहायला लागले. वडील सरकारी अधिकारी असल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक डायर्‍या त्यांना भेट मिळत आणि त्यातल्या बहुतांश डायर्‍यांवर माझाच जन्मसिद्ध हक्क असल्यागत मी त्या ताब्यात घ्यायची. या डायरीमध्ये मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवायची. माझ्या लहानपणची आणखी एक आठवण आई नेहमी सांगायची. आम्ही जेव्हा कधी बाहेर जायचो, तेव्हा रस्त्यात दुतर्फा अनेक दुकानं लागायची. दुकानात लावलेल्या रंगीबेरंगी वस्तू मनाला आकर्षित करायच्या. एकदा असंच एका दुकानात मला कुठलीतरी वस्तू दिसली आणि ती मला हवी होती. मी सांगितल्याशिवाय ते आईला कसं कळणार? हळूहळू ते दुकान मागे पडायला लागलं आणि माझी घालमेल व्हायला सुरुवात झाली. हे दुकान मागे पडलं तर मला हवं ते मिळणार नाही हे मला कळत होतं आणि ते आईला समजत नाहीये म्हणून रागही येत होता. अखेर मी काय करावं, तर त्याच दुकानासमोर, रस्त्यावर चक्क गडबडा लोळायला सुरुवात केली. मला कसं आवरावं हे आईला कळेना. तिनं समजवून सांगण्याचा प्रयत्न केला, रागावून बघितलं, पुन्हा कधीही बाहेर नेणार नाही अशी धमकी दिली, पण मी जाम बधले नाही. माझा लोळण्याचा कार्यक्रम चालूच होता. अखेर त्या दुकानदारानं ‘बेबी, तुला हे हवंय का?’ असं म्हणत ती वस्तू माझ्यासमोर नाचवली आणि माझं लोळणं एका क्षणात थांबलं. (मला त्यानं बेबी अशी का हाक मारली याचा थोडा राग आला पण मी तो विसरले!) आईनं ती वस्तू विकत घेतली आणि मला फरफटतच घरी नेलं. पुढे मोठी झाले, लेखिका झाले आणि आम्ही लिहिलेली ‘जीनियस’ ही वैज्ञानिकांवरची मालिकाही खूप लोकप्रिय झाली. त्या वेळी जगविख्यात गणितज्ञ रामानुजन याच्याविषयी लिहिताना एक गोष्ट वाचण्यात आली आणि मी चक्क उडालेच. 

वयाच्या तीन वर्षांपर्यंत रामानुजन बोलतच नव्हता. फारच मागे लागलं तर एखादं अक्षर तोंडावाटे काढायचा. त्याच्या आईनं  त्याला त्या वेळी लहान वयात अक्षरांची ओळख करून देणारा ‘अक्षर अभ्यासम्’ विधी केला. त्यानंतर हळूहळू रामानुजन बोलायला लागला. रामानुजन लहानपणी खूप एकलकोंडा, हट्टी, अतिशय भावनाप्रधान आणि मनस्वी होता. एखादी गोष्ट त्याला हवी असली आणि ती मिळाली नाही, तर तो चक्क जमिनीवर, मातीत किंवा चिखलातही गडबडा लोळत असे.

रामानुजनविषयीचा हा किस्सा ऐकून, चला आपण त्याच्यासारखे बुद्धिमान नसलो तरी या बाबतीत मात्र आपली आणि त्याची बरोबरी होऊ शकते असं म्हणून मी स्वतःशीच हसले. 
मी शाळेत असताना, म्हणजे चांगली दहावीत असताना औरंगाबादच्या अप्सरा नावाच्या थिएटरमध्ये अमोल पालेकरचा ‘चितचोर’ चित्रपट बघायला गेलो होतो. आई, मी आणि माझा भाऊ! चित्रपट सुरू झाला आणि मला मात्र समोरच्या रांगेत एक मनुष्य दिसला. त्यानं आपल्याबरोबर त्याच्या पाळलेल्या मांजरालाही आणलं होतं. ते मांजरही अगदी शांतपणे मांडीवर बसून चित्रपट बघत असावं. मध्यंतरात त्या माणसानं वेफर्सचं पाकीट विकत आणलं. स्वतः खात तो त्या मांजरालाही भरवत होता. त्याचं प्राणिप्रेम बघून मीही भारावून गेले होते. चित्रपटापेक्षाही समोर घडणार्‍या प्रसंगातच मला जास्त रस वाटायला लागला होता. चित्रपटाचा शेवट जवळ आला आणि अचानक तो मनुष्य उठला आणि शेवट बघण्याआधीच निघूनही गेला. मला आश्चर्यच वाटलं. शेवट हा तर उत्कंठा वाढवणारा असतो आणि हा काय विचित्रासारखा निघून गेला? मी पुन्हा चित्रपटात लक्ष घातलं. चित्रपट संपला. शेवट सुखद झाला होता. आई, भाऊ आणि मी गर्दी पाठोपाठ बाहेर पडण्यासाठी निघालो आणि एका आर्त आवाजानं माझं लक्ष वेधलं. तो आवाज एका मांजराच्या पिल्लाचा होता. मी आवाजाच्या दिशेनं बघितलं. ते मांजराचं पिल्लू आपल्या मालकाला शोधत त्या खुर्च्यांच्या रांगेतून केविलवाण्या आवाजात ओरडत फिरत होतं. आत्ता झालेला प्रकार माझ्या लक्षात आला. त्या मांजराच्या पिल्लाला सोडण्यासाठीच त्या माणसानं ही शक्कल काढली असणार आणि म्हणून कोणाला कळायच्या आत तो निघून गेला असणार. त्या मांजराच्या पिल्लाला आता आपणच आधार द्यायला हवा, या भावनेनं त्याला पकडण्यासाठी मी त्याच्या मागे धावू लागले आणि माझी ओळख नसल्यानं ते घाबरून आणखीनच सैरावैरा पळायला लागलं. शेवटी आईच्या ओरडण्यानं मी भानावर आले आणि आईबरोबर घरी आले. घरी आल्यावर खूप रडले. माझ्या रडण्यामुळे वडिलांनी काय झालं याबद्दल खूप चौकशी केली, पण मी कारण सांगूच शकले नाही. 

त्यानंतर कॉलेजला गेल्यावर शहागंज परिसरातल्या मोहन टॉकीज या चित्रपटगृहात त्या वेळी ‘द ग्रेट अमिताभ बच्चन’चा मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट लागला होता. तो बघण्यासाठी आई आणि मी गेलो होतो. सहा ते नऊ या वेळात चित्रपट होता. चित्रपट संपल्यावर आम्ही चालतच घराचा रस्ता  पकडला. मात्र मी त्या चित्रपटाच्या बाहेर येऊच शकले नव्हते. अमिताभ हा माझा अत्यंत आवडता अभिनेता आणि या चित्रपटात त्याला त्याचं लहानपणापासून मेमसाबवर असलेलं प्रेमही मिळत नाही. चित्रपटाच्या शेवटी त्याचा मृत्य्ाू होतो. मृत्य्ाूपूर्वी तो त्याच्या मित्राला विनोद खन्नाला म्हणतो, माझ्यासाठी तू ते गाणं गा....आणि तशाही अवस्थेत विनोद खन्ना ते गाणं गातो, जिन्दगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत महेबुबा है अपने साथ लेके जायेगी..........मला ते सगळं आठवून खूप रडायला येत होतं. मी रस्ताभर रडत होते. रस्त्यानं लोक बघत होते, पण मला त्यांचं भान नव्हतं. आई सारखं ‘डोळे पूस’ म्हणत होती, पण तिचं ऐकण्याच्या मनःस्थितीत मी नव्हते. घरी पोहोचल्यावर तर मी टाहोच फोडला. अमिताभचं जाणं मला सहनच होत नव्हतं. आईनं माझी काहीतरी खोडी काढली असेल या विचारानं वडील आईवर खूप रागावले. माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, काय झालं हेही त्यांनी विचारलं. पण मला सांगताच येत नव्हतं. आईनं मात्र, ‘कार्टे आता यापुढे तुला घेऊन कुठल्याही चित्रपटाला जाणार नाही’ असं सांगून टाकलं!

एक ना अनेक अशा कितीतरी गोष्टी ज्या बोलायचा स्वभावच नव्हता. सगळं काही मनात साचून राहायचं. मग पुढे आय्ाुष्यात अनेक वळणं आली, मी चालत राहिले आणि एका वळणावर मी आदिवासी भागात जाऊन पोहोचले. इथं आल्यावर मात्र खरोखरंच गमंतच झाली. आदिवासी लोक चांगली ओळख झाल्याशिवाय त्यांचं मन तुमच्याजवळ मोकळं करत नाहीत. मी त्यांच्याबरोबर काम करत असूनही माझे आदिवासी कार्यकर्ते मित्रमैत्रिणी माझ्याशी थोडं अंतर राखूनच वागायचे. मला खूप वाईट वाटायचं. ही सगळीजण आपल्याशी बोलली पाहिजेत असंही वाटायचं. मग एके दिवशी एका मित्रानं मला सांगितलं, ‘तू स्वतःला काय समजतेस? त्यांनी बोलायला सुरुवात का करायची? तू स्वत: प्रयत्न कर. जमेल तुला.’ आणि मग मी प्रयत्न करायला सुरुवात केली. मी स्वतःहून त्यांच्याशी बोलायला लागले. हळूहळू ते सगळे माझ्याशी मनातलं सगळं बोलायला लागले आणि आमची खूप चांगली गट्टी जमली. संवादानं, आपल्या भावना व्यक्त केल्यानं काय घडतं हे मी अनुभवत होते. त्यानंतर रिया असो, वा प्रमोद, संजू असो वा उषा, विजया असो वा कैलास सगळ्यांबरोबर काम करण्यात खूप मजा येत गेली. मी त्यांच्यासाठी पथनाट्य लिहिलं आणि बसवलं. आम्ही बक्षीसही मिळवली. तो प्रवास खूपच विलक्षण होता. आमच्यातलं अंतर मिटलं होतं. आय्ाुष्यभरासाठी एक अतुट नातं आमच्यात निर्माण झालं होतं. आज मी तिथे नाही पण आजही ती सगळीजण माझ्याबरोबरच आहेत. या आदिवासी कार्यकर्त्यांनी मला बोलायला शिकवलं. 
त्यानंतर मी बोलायला लागले गॅलिलिओमुळे, न्य्ाूटनमुळे आणि आईन्स्टाईनमुळे! हो खरंच! चित्र-शिल्पकलेवर लिहिलेलं 600 पानी कॅनव्हास हे पुस्तक प्रकाशित झालं आणि मी लिहिलेलं भाषण एस. एम. जोशी सभागृहातल्या व्यासपीठावरून केलं. माझं मनोगत, माझं भाषण जरी मी वाचून दाखवलं असलं तरी ते  आवडल्याची पावती जमलेल्या उपस्थित स्नेह्यांनी दिली. मात्र कार्यक्रमावरून घरी आल्यावर अपूर्वनं माझ्याजवळ तीव्र शब्दात नापसंती दर्शवली. तो म्हणाला, ‘तुला काय बोलायचंय हे तुला माहीत होतं ना ममा, मग तरीही तुला कागदाची गरज का भासावी?’ मी त्याला उत्तर देऊ शकले नाही. आपला तो पिंड नाही असं म्हणून मी मनाला समजावलं. त्यानंतर ‘जीनियस’ ही आमची वैज्ञानिकांवरची मालिका आली आणि असं ठरलं, मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर आणि मी अनेक शहरांत जाऊन जीनियसबद्दल शाळाशाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन बोलायचं. जेणेकरून हे सगळे जगप्रसिद्ध वैज्ञानिक त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, विज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे आणि अर्थातच त्यामुळे पुस्तकांची विक्री देखील चांगली होईल. नेहमीप्रमाणे मी काय बोलायचं याचे मुद्दे काढले आणि अहमदनगरच्या एका शाळेत नववी/दहावीच्या मुलांसमोर बोलायला उभी राहिले. मुलांना काय वाटतंय, त्यांना समजतंय का, त्यांना मी सांगतेय ते आवडतंय का हे बघणं मला महत्वाचं वाटत होतं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली. बोलण्यात मी इतकी रंगून गेले की गॅलिलिओ, न्य्ाूटन, आईन्स्टाईन, लुई पाश्चर, रिचर्ड फाईनमन या वैज्ञानिकांनी मला लिखित कागदाची आठवणच होऊ दिली नाही. माझं बोलणं संपलं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. मुलांनी माझ्याभोवती एकच गर्दी केली होती, त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. मी मात्र वेगळ्याच आनंदात होते. कारण त्या प्रसंगानंतर माझ्या हातात कधीही भाषणाचा कागद आला नाही. याचं सगळं श्रेय या सगळ्या वैज्ञानिकांना जातं हेही तितकंच खरं!

या सगळ्या प्रवासात वेगवेगळ्या कारणांनी माझा भिडस्तपणा कमी झाला, मी बोलायला शिकले. व्यक्त व्हायला शिकले. आणि मग त्यात काय आनंद असतो, जो मी अनेक वर्षं गमावला होता तो मला गवसत गेला. मुंबईत असताना मी अगदी अनोळखी लोकांजवळ जाऊनही कॉम्प्लिमेंट देऊ लागले. कोणाचा हेअरकट आवडायचा, कोणाची साडी, कोणाचा फुलाफुलांचा स्कर्ट तर कधी समोर उभी असलेली प्रेमिकांची जोडी! मी त्यांच्याजवळ जाऊन मला काय आवडलंय हे सांगितल्यावर सुरुवातीचे अनोळखी भाव झरझर बदलत जाऊन त्याजागी हसू पसरायचं आणि ते हातात हात घेउन•थँक्य्ाू म्हणत त्या वेळी खूप छान वाटायचं. या सगळ्या प्रसंगात एके दिवशी एक मित्र बरोबर होता. तो म्हणाला, ‘दीपा तू हे काय करतेस? ओळख नसताना त्या माणसाला जाऊन म्हणालीस, तुमचा शर्ट किती छान आहे. त्याचा तुझ्याविषयी गैरसमज होईल. कळतंय का तुला?’ मी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं, ‘झालाच•गैरसमज तर त्याचा होईल ना, होऊ दे. माझा तर नाही होणार. मला काय वाटतंय, मला काय करायचंय आणि मला कसं व्यक्त व्हायचंय हे मला चांगलं कळलंय’.....तेव्हापासून हा सिलसिला सुरूच आहे. आता ओला-उबेर कॅबमधला कॅब ड्रायवर बरोबरचा प्रवास असो, कुठल्याही रेस्टारंटमधला मॅनेजर असो वा वेटर्स, भाजीवाला असो वा मेडिकल स्टोअरचा दुकानदार सगळ्यांशी देवाणघेवाणीपलीकडला संवाद रंगतो. एक छान नाव नसलेलं नातं तयार होतं. प्रत्यक्ष संवादाची मौज काही वेगळीच असते. ती इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अडकलेल्या पिढीला कळणं खूप महत्वाचं आहे. तरुणच नव्हे, तर वृद्घांनाही आज परस्पर संवाद हवा आहे. तो नसेल तर त्यांचा एकाकीपणा वाढत जाईल. संवादानं मनावरचा ताण हलका होतो, पिढीपिढीमधलं अंतर कमी होतं आणि त्यांच्याशी मैत्रीचं नातं जुळतं.

संवादाचं महत्व किती आहे हे सांगायलाच नको. मानवी इतिहासात डोकावून बघितलं तर परस्पर संवादासाठी गुहेतल्या चित्रलिपीपासूनचा माणसानं केलेला प्रवास अचाट आहे. चित्रलिपी, विशिष्ट प्रकारचे आवाज काढणं, खाणाखुणा करणं, दवंडी, तुतारी, कबुतर यांचा वापर करणं, भाषेची निर्मिती करणं, त्यानंतर छपाई, वर्तमानपत्र, वृत्तसंस्था, तार, पोस्ट, टेलिग्राफ, रेडिओ, टेलिफोन, मोबाईल, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, फेसबुकसह अनेक सोशल माध्यमं, सॅटेलाईट असा किती मोठा प्रवास माणसानं केला. या प्रवासात त्याला किती अडथळे आले, किती वेळा अपयशाशी सामना करावा लागला, किती उपेक्षा सहन करावी लागली, हे सगळं अचंबित करणारं होतं आणि आहे. तरीही माणसानं हार न मानता हा प्रवास केला अिाण तो करतोच आहे. संवादासाठी केलेली मानवी प्रगती बघताना थक्क व्हायला होतं. त्या सगळ्या ज्ञात-अज्ञात वैज्ञानिकांना/तंत्रज्ञाना सलाम! मात्र त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या यशाला मानवंदना द्यायची असेल तर हा संवाद चांगल्या गोष्टींसाठीच करायला हवा. कुणाला दुखवणं, शाब्दिक हिंसा करणं, सूडबुद्धी बाळगणं, राजकारण करणं, स्वार्थ साधणं यासाठी हा संवाद होत असेल तर संवादाच्या प्रवासातल्या त्या सर्व दिग्गजांना काय वाटेल, यासाठीच त्यांनी हा अट्टाहास केला होता का? असा प्रश्न विचारावा लागेल. म्हणूनच चांगल्या गोष्टींसाठी व्यक्त होणं, आपल्या मनातल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवणं यासारखी मोलाची दुसरी गोष्ट नाही! हेच माझ्या मनीचं गुज - दुसरं काय?

दीपा देशमुख, पुणे 
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.