चिंतन आदेश दिवाळी 2019 - प्रभाव
विचार करत होते, माझ्या जगण्यावर प्रभाव पाडणार्या व्यक्ती कोण? या प्रसंगाचं नेमकं उत्तर मला सापडत नव्हतं. कारण कधी एखादी व्यक्ती दिसायची, तर कधी मनावर कोरला गेलेला एखादा प्रसंग आठवायचा. कधी प्रवासातली नागमोडी वळणं सापडायची, तर कधी परिस्थितीनं दिलेला धडा असायचा. मग ही सांगड नेमकी घालू कशी हा प्रश्न मनाला आणखीनच सतावायला लागला. ठरवलं, पुन्हा भूतकाळाची जरा सैर करू या, गवसेल तिथंच काहीतरी!
अगदी लहानपणी चांदोबापासून ते अनेक परीकथांची पुस्तक आठवली. यातल्या पर्यांनी माझ्यावर चांगलाच प्रभाव टाकला होता. त्यांचे ते नाजुकसे, रंगीबेरंगी पंख, हातातली जादूची कांडी आणि अंगातला पायघोळ तलम झगा! ही परी कायमच प्रसन्न, हसतमुख असायची. तिच्याकडे जादूची कांडी असल्यामुळे आणि पंख असल्यामुळे तिला हवं ते करता येत असे. तसंच ती नेहमीच चांगलंच काम करायची. आपणही परीसारखं व्हावं असं मग अनेकदा वाटायचं. तशी कित्येकदा स्वप्नंही पडायची. या परीकथांचा परिणाम कितीतरी काळ मनावर होता. अजूनही अनेकदा स्वप्नांत आपण हाताचे पंख करून ते पसरवतो आहोत आणि उडतो आहोत असं दिसतं! हळूहळू परीकथांची जागा साहसकथांनी घेतली. मग साहसी हिरो होण्याची इच्छा निर्माण व्हायला लागली. एखादा शोध लावण्यासाठी अतिशय सावधपणे त्या गोष्टीचा माग काढत काढत ती साध्य करायची असंही मन सांगायला लागलं. मग चोर-पोलीस हा खेळ या साहसकथांना पूरक ठरायचा. कधी चोर तरी कधी पोलीस होण्याची संधी खेळताना मिळायची. मग चोर असताना खजिना शिताफीनं सापडू नये अशा ठिकाणी लपवून ठेवायचा, तर कधी पोलीस असल्यावर चोरांनी लपवलेला खजिना शोधण्यासाठी एक एक जागा पिंजून काढायची, त्याच वेळी या चोरांना पकडलं आणि बोलतं केलं तर आपोआपच उकल होईल असंही वाटायचं. दक्षता, बाबुराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, फास्टर फेणे, सत्यजित रे यांच्या कथा, पुढे नारायण धारप यांच्या शोधकथांनी आणि गूढकथांनी मनावर प्रभाव पाडला. खर्याखोट्याची सरमिसळ असलेलं हे जग त्या वेळी खूपच अदभुत वाटायचं.
हळूहळू या प्रवासात सानेगुरूजी, पु.ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, गो. नि. दांडेकर, आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, जी. ए. कुलकर्णी, अण्णा भाऊ साठे, गौरी देशपांडे, सानिया, ही मंडळी कधीतरी प्रवेश करती झाली. सानेगुरूंजींनी हळवं, कोमल मन आणि इतरांबद्दलचा जिव्हाळा, प्रेम दिलं. पुल आणि अत्रें यांनी विनोदाबरोबरच समाजातली व्यंग आणि दांभिकता दाखवली. आनंद यादवांच्या झोंबीनं मन गरिबीच्या वास्तवानं पोळून निघालं. व्यंकटेश माडगुळकरांनी समाजाचं, माणसांमधल्या स्वभावाचं शब्दचित्र रंगवलं. गौरी आणि सानिया यांनी स्वतंत्र अस्तित्वाची ठिणगी मनात पेरली. त्यामुळे या सगळ्यांचा प्रभाव त्या त्या टप्प्यावर पडत गेला. कर्हेचे पाणी असो वा सत्याचे प्रयोग अशा आत्मचरित्रांनी माणसं कशी असतात, त्यांचा तळ कसा ओळखावा, ती कशी घडली, त्यांचा स्वभाव असा का बनला यातले अनेक कंगोरे ओळखण्याची ताकद दिली.
याच प्रवासात चित्रपटासारख्या सशक्त माध्यमानंही मनावर परिणाम केला. लहानपणी तर प्रत्येक चित्रपट खरा वाटत असे. त्यातली सुखदुःखं, मारामार्या, खून सगळं काही खरं वाटत असे आणि ती दृश्यं, ते प्रसंग बघून मन कासावीस होत असे. चित्रपटांनी प्रेम शिकवलं, धाडस दिलं, अन्यायाविरोधात उभं कसं राहायचं हे दाखवलं. कधी कल्पनेच्या जगाची सफर करून आणली तर कधी समाजातलं भीषण वास्तवाचे चटकेही दिले. जाणिवेच्या पलीकडलं एक मोठं जग चित्रपटांनी दाखवलं. त्यामुळेच कधी साहिरची प्यासा आणि कागज के फूल यातली गाणी अंतःकरण कापत गेली, तर कधी बिमल रॉयच्या चित्रपटांनी अंतर्मुख करून सोडलं. कधी देवानंद आणि अमीर खान यांची कलती मान आणि डान्स आवडायला लागला, तर कधी शम्मी कपूरची उछलकूद केलेली छबी मनावर राज्य करायला लागली. कधी अमिताभचा अँग्री यंग मॅन अन्याय सहन करायचा नाही हे ठासून सांगायला लागला, तर कधी दिप्ती नवल, शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्यासारख्या अभिनेत्री 'स्व' म्हणजे काय याची जाणीव करून देऊ लागल्या.
प्रवास सुरूच होता....यात अनेक व्यक्ती देखील येत होत्या, जात होत्या. पहिला प्रभाव होता तो अर्थातच आईचा! तिचं दिवसभरातलं टापटीप राहणं आणि त्याचबरोबर कामातलं व्यस्त असणं प्रभाव पाडून गेलं. संगीत असो वा चित्रकला, भरतकाम असो वा विणकाम, चित्रपट असो वा साहित्य, तसंच अनेक कला शिकण्याची तिची असोशी, तिची उत्कृष्ट पाककला, तिच्यातलं माणूसवेडेपण खूप जवळून बघितलं. त्या त्या वयात त्याचं महत्त्व जरी कळलं नसलं तरी आज मागे वळून बघताना तिचेच काही अत्यल्प गुण आपल्यात आले असावेत असं मन सांगत राहतं. आईनंतर प्रभाव पाडणारी व्यक्ती म्हणजे दादा (वडील). त्यांचं करारीपण, त्यांच्यातलं वर्क्तृत्व, त्यांच्यातला स्पष्टवक्तेपणा आणि पुस्तकांची आवड, खाण्याची आवड! आपल्यालाही असंच बोलता आलं पाहिजे, खूप खूप वाचता आलं पाहिजे असं त्या वेळी नेहमी वाटायचं. आज कधीही व्यासपीठावर हातात माईक आला, की त्यांची हटकून आठवण होते. त्यानंतर प्रभाव पाडणार्या दोन व्यक्ती म्हणजे नंदू आणि सुनिल हे माझे दोघं भाऊ! नंदू काड्यांच्या पेट्या जमवायचा, तिकिटं जमवायचा, नवा व्यापार खेळ घरीच तयार करायचा, चित्रं, रेखाटनं, अक्षरं, अशा अनेक गोष्टींनीयुक्त अशी त्याची पत्रं असायची. मोठ्या भावाचा आव न आणता तो आमच्यातलाच एक होऊन वागायचा. लहानपणी त्यानं खुर्च्या जोडून केलेला आगगाडीचा खेळ तर कधीच न विसरता येण्याजोगा! इतकंच नाही तर प्रत्येक स्टेशनवर खाण्यासाठी काही हवं म्हणून हा पठ्ठया डायनिंग टेबलवरचा पोळ्यांचा डबा लंपास करायचा आणि त्या सगळ्या पोळ्या (ज्या आईनं आमच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवलेल्या असायच्या!) कुस्करून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कैरी, तिखट, मीठ, दही असं बरंच काय काय टाकून त्याची एक प्रकारे भेळ तयार करायचा आणि त्या त्या काल्पनिक स्टेशनवर तो आम्हाला ती खायलाही द्यायचा. त्याची गाण्यांची आवड, त्यानं जमा केलेल्या रेकॉर्ड्स, त्या रेकॉर्ड्सना घरीच बनवलेली कव्हर्स, माळ्यात ठेवलेले माठांचे बनवलेले स्पीकर्स, हे सगळं त्याच्यातल्या कलाकाराची साक्ष द्यायचं. घरातल्या टायगरला आंघोळ घालणं, पोपटाचा पिंजरा साफ करून त्याच्याशी गप्पा मारणंही तो आनंदानं करायचा. प्रत्येक राखीपोर्णिमेला काहीतरी सरप्राईज द्यायचा. तो कधीही आमच्यावर रागावला नाही. त्याला मुकेश आवडत असल्यानं मुकेशची अनेक गाणी तो गाऊन दाखवायचा. आपण याच्यासारखंच असायला हवं असं मन तेव्हा आवर्जून सांगायचं. त्यानंतरचा भाऊ सुनिल! चित्रपट असो वा एखादं पुस्तक - त्याचं विश्लेषण तो खूपच अचूकपणे करायचा. अभ्यासातही तो खूप हुशार होता. तो एखाद्या विषयाबद्दल बोलत असेल तर ऐकताना वाटायचं, आपल्याला कधी हे जमेल?
प्रवासली वाट वळणं घेत होती, कधी परिस्थिती अनुकूल तरी कधी प्रतिकूल असायची. घरात समानता असावी असं वाटायचं. पण मुलामुलींसाठी वेगळे नियम होते. मुलींनी जोरात हसायचं नाही, पाच नंतर बाहेर जायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही, उलटून उत्तर द्यायचं नाही, घरातली सगळी कामं आलीच पाहिजेत वगैरे वगैरे. यातली एखादी गोष्ट मोडली की त्याचे परिणामही वाईट व्हायचे. पण या परिस्थितीनं बंडखोरी बहाल केली. जे पटत नाही ते करायचं नाही हे या परिस्थितीनं शिकवलं. नुकसान झालं तरी चालेल, लोकांनी नावं ठेवली तरी चालतील, चुका झाल्या तरी चालतील, पण मन काय सांगत तेच करायचं हे या परिस्थितीनं शिकवलं. त्यामुळे तेव्हापासूनच ते ते त्या त्या वेळी होणारं नुकसान तात्पुरतं आणि क्षणिक असतं हेही कळलं आणि त्यामुळे ‘लोग क्या कहेंगे’ हा विचार मनाला कधी शिवलाच नाही. प्रतिकूल परिस्थितीनं आहे त्या परिस्थितीत तग धरून कसं राहायचं, कधी बंड करायचं, कधी उलट्या प्रवाहात सामील व्हायचं, सारं सारं शिकवलं आणि हे सगळं पार केल्यानंतरची वाट किती सुकर आणि सुखकर आहे हेही परिस्थितीनंच दाखवलं. म्हणूनच शहरी वातावरणातून एकदम आदिवासी भागात पोहोचलेली मी - तिथल्या निसर्गसौंदर्यात स्वतःला विसरून गेले. तिथल्या आदिवासींच्या निर्मळ मनानं स्वतःही आरपार स्वच्छ होत गेले. निसर्ग भौतिक गरजा कमी करतो, जगण्याला अर्थपूर्ण करतो, शांती आणि समाधान बहाल करतो. त्यामुळे या हिरव्यागार निसर्गाचा, सूर्या नदीचा, पालघरच्या घाटाचा, रंगीबेरंगी झाडांचा माझ्यावर नक्कीच प्रभाव पडला.
अनेक माणसं बरेवाईट अनुभव देण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उभी होती. कसं वागू नये याचे पाठही काहींनी दिले. काहींनी रडवलं, काहींनी चिडवलं. तरीही ते लोक जर या प्रवासात भेटले नसते तर मी समृद्ध झाले नसते. सुरुवातीला ही माणसं अशी का, या प्रश्नानं मन बेजार झालं. त्यांच्या दुटप्पी, ढोंगी वागण्यानं मन अस्वस्थ झालं. त्यांच्या अस्तित्वानं मन दुःखी झालं. पण त्याच वेळी मन हेही शिकलं की जग असंच वैविध्यपूर्ण असणार आहे. जंगलात जशा उपयुक्त वनस्पती असणार आहेत, तशाच विषारी, काटेरी वनस्पतीही विळखा घालण्यासाठी सज्ज असणार आहेत. त्यामुळे काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे याच मनानं शिकवलं.
यातूनच काही माणसं आपलीशी झाली. त्यांच्यातला सच्चेपणा मनाला भिडला. या सगळ्यांची नावं आणि अनुभव सांगण्यासाठी जागा पुरणार नाही. सार्वजनिक जगात वावरताना सत्याची वाट दाखवणारा रवीशकुमार प्रभाव पाडतो, तर कधी धृव राठीसारखा तरूण मुलगा इतक्या लहान वयात जगभरातल्या घडामोंडींचं भान करून देतो. कधी रिचर्ड अॅटनबरोसारखा म्हातारा जगातल्या अनेक गोष्टी कळल्या पाहिजेत, त्यासाठी कुतूहल जागं ठेवलं पाहिजे हे सांगत राहतो. गुन्हेगारी जगाबद्दल माहिती सांगणारा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देणारा शम्स ताहीर खान असो वा अनुप सोनी हेही प्रभाव पाडून जातात.
मासवणच्या प्रवासात प्रकल्पाच्या संचालक विजया चौहान होत्या. त्यांना माझं लिखाण आवडायचं. मासवणला त्या आल्या की येताना खूप पुस्तकं, डायर्या असा खजिना घेऊन येत. इतकंच नाही तर मुंबईला कधी जावं लागलं तर त्यांचं घर २४ तास आम्हा कार्यकर्त्यांसाठी खुलं असायचं. आणि घरातल्या एका सदस्यासारखीच काळजी आणि वागणूक असायची. विजयाताईंनी शिस्त शिकवली आणि त्याचबरोबर भरभरून प्रेमही दिलं. इंग्रजी चांगलं आलंच पाहिजे, कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजेत, त्याचबरोबर वेळेवर कामं करणं अशा अनेक गोष्टी केवळ त्यांच्यामुळेच शिकता आल्या.
ज्या वेळी पुण्यात अपूर्व शिकायला आला, त्या वेळी 'मिळून सार्याजणी'ची व्यवस्थापक सुहासिनी जोशी ही मैत्रीण अपूर्वची आईच होऊन धावून आली. अपूर्वला राहायची जागा मिळेपर्यंत तिचं घरचं अपूर्वचं घर बनलं. त्याला हवं नको ते बघणं हे मायेनं तिनंच केलं. त्यामुळे मी पूर्णपणे निर्धास्त राहू शकले. मासवणहून पुण्याला यायला दोनच बस त्या वेळी होत्या. पुण्यात मिटिंग ठरली की लेखिका आशा साठे यांच्या घरी माझा मुक्काम असायचा. मध्यरात्रीचा दीड वाजो, वा दोन मी रिक्षानं त्यांच्या लोकमान्य नगरमधल्या घरी पोहोचायची. माझ्या येण्याबद्दल त्यांनी कधीही कुरकूर केली नाही. आजही इतक्या वर्षांची मैत्री तशीच घट्ट आहे. या मैत्रीतल्या गप्पा जगण्यासाठी बळ देऊन जातात. आपलं कोणीतरी आहे ही भावना मनाला उभारी देऊन जाते. त्यांच्या कविता, त्यांचं लिखाण, त्यांचं वाचन, त्यांचे अनुभव, त्यांचं बोलणं मला खर्या अर्थानं खूप शिकवून जातं हेही तितकंच खरं!
मुंबईत असताना कामाच्या एका दौर्यात असताना आसावरी कुलकर्णी ही सकाळमध्ये काम करणारी मैत्रीण मिळाली. खरं तर स्वभाव, आवडीनिवडी, विचार यांनी आम्ही दोघी एकदम भिन्न! पण तरीही मैत्र जुळलं. कुठल्याही अपेक्षेविना अर्ध्या रात्री कुणासाठीही मदतीला धावत येणारी ही मैत्रीण कायमच माझ्याजवळ आजही आहे. आयुष्य जरा स्थिरावतं आहे असं वाटत असतानाच त्या संथ पाण्यात अनेक तरंग उमटावेत आणि त्या तरंगांचं एखाद्या वादळी जलसमुहात रुपांतर व्हावं असे काहीसे प्रसंग आयुष्यात एकामागून एक आले आणि त्या अनपेक्षित प्रसंगांनी मी गांगरून गेले. या स्वार्थी जगासमोर आपला टिकाव लागू शकत नाही या विचारानं मन अस्वस्थ झालं होतं. आपण या जगात जगायला कदाचित लायकच नसू असं वाटायला लागलं होतं. अशा वेळी सुवर्णसंध्या ही मैत्रीण हसतमुखानं सामोरी आली. तिचं स्वतःचं आयुष्य अनेक प्रतिकूलतेनं आणि संकटांनी भरलेलं होतं. पण माझ्यासाठी दिवसरात्र ती मला सोबत करत राहिली. सगळे दरवाजे कधीच बंद होत नसतात, हा आशावाद तिनं दिला आणि माझ्यापेक्षा लहान असूनही खंबीरपणे जगण्याची ताकद मला दिली.
या प्रवासात माझा प्रवास सुखकर होण्यासाठी, ताजातवाना होण्यासाठी धनंजय सरदेशपांडे, यमाजी मालकर, सुधीर महाबळ, धनंजय कुलकर्णी हे मित्रही कायमच बरोबर राहिले. धनंजय अकरावीपासूनच नाट्यवेडा मित्र, आजही कायमच बरोबर उभा असतो. त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त करण्याची कधी आवश्यकताच भासत नाही. धनंजय कुलकर्णी याला मित्र म्हणून माझ्या एकूणच प्रवासाचं खूप कौतुक असलं तरी वेळप्रसंगी शाब्दिकतर्हेनं तो कानही पकडायला कमी करत नाही. यमाजी देखील कॉलेजच्या काळापासूनच मित्र, कायमच योग्य रस्ता दाखवण्याकडे त्याचा कल असतो. तसा बघताक्षणी गंभीर वाटतो, पण माझ्या सतत फिरक्या घेत असतो. शांतपणे समोरच्याला त्याच्या चुका न दुखवता दाखवणं आणि त्या दुरुस्त करायला लावणं यात तो माहीर आहे. तसंच सुधीर महाबळ हा आयटी क्षेत्रातला मित्र! ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यासक! खरं तर तो आयटी क्षेत्रातला वाटतच नाही. पारदर्शी स्वभावाचा, मैत्र जपणारा आणि एकदा मित्र म्हटलं की बोट न सोडणारा, वारंवार चुका केल्या तरी कधी तरी बदल होईल या गोष्टीवर विश्वास असणारा हा मित्र मला सुखदुःखापासून थोडं अलिप्त कसं राहायचं हे शिकवून गेला.
याबरोबरच अच्युत गोडबोले, अरविंद गुप्ता, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. आनंद नाडकर्णी, अनिल अवचट आणि डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या कर्तृत्वाचा प्रभावही माझ्यावर नक्कीच पडला. पण या प्रत्येकाबद्दल लिहायचं म्हणजे एक एक पुस्तक लिहावं लागेल (मी या सगळ्यांवर स्वतंत्र पुस्तकं लिहिली आहेत आणि ती मनोविकास प्रकाशनानं 'तुमचे आमचे सुपरहिरो' या मालिकेत प्रसिद्धही केली आहेत!)
याबरोबरच जग बदलणारे अनेक वैज्ञानिक आहेत, पर्यावरणावर काम करणारे आहेत, कार्यकर्ते आहेत, चित्रकार-शिल्पकार, संगीतकार-गायक, कवी-लेखक असे अनेकजण आहेत ते दृश्य-अदृश्य रुपात येऊन सतत प्रभाव टाकत असतात. इतकंच नाही तर या निसर्गातले प्राणी असोत वा पक्षी त्यांचं निरीक्षण करतानाही त्यांचं प्रतिकूल परिस्थितीतलं तग धरून जगणं खूप काही शिकवून जातं. त्यामुळे माझ्यातरी आयुष्यावर या सगळ्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडलाय, पडतोय आणि पडत राहील. त्यामुळे या निसर्गाची, त्यातल्या माणसांची, त्यातल्या पशुपक्ष्यांची, मिळालेल्या अनुभवांची, परिस्थितीची मी कायम ऋणी आहे!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment