मनामनातल्या विद्याताई
विद्या बाळ! मिळून सार्याजणी या प्रथितयश मासिकाच्या संस्थापक-संपादक! नारी समता मंचाच्या संस्थापक, स्त्रियांनी व्यक्त व्हावं म्हणून 'बोलते व्हा' केंद्राच्या संस्थापक, पुरुषांनाही बोलायचं आहे हे जाणवताच 'पुरुष संवाद केंद्र' सुरू करणार्या विद्याताई. सामाजिक कार्य करताना अन्यायाविरोधात कायम उभ्या राहणार्या विद्या ताई संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. खरं तर त्यांची ओळख इथं संपत नाही. त्या माझ्यासारख्या अनेकींच्या आणि अनेकांच्या मनामनात एक विद्या सोडून गेल्या आहेत. त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांची कृती हे सगळं एक होतं. त्यामुळेच त्या प्रत्येकाला आपल्याशा वाटत होत्या.
साधारणतः १८ ते २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी स्वतः स्वताचा मार्ग शोधण्यासाठी चाचपडत होते. सगळ्याच दिशा आपल्यासाठी बंद झाल्या आहेत असं वाटत होतं. आशेचा किरण दाखवणारी अगदी छोटीशी गोष्ट असेल तरी मी तिकडे धावत होते आणि अशा वेळी माझ्या शाळेतल्या चित्रकलेच्या बाई ( त्या मिळून सार्याजणीच्या औरंगाबादच्या प्रतिनिधी होत्या) चित्रलेखा मेढेकर यांच्यामुळे माझा मिळून सार्याजणी आणि त्याचबरोबर विद्याताईंशी परिचय झाला.
मी माझ्या बाईंबरोबर पुण्याला आले, मी विद्याताईंना प्रथमच पाहत होते. गोर्यापान, उंच्यापुर्या, कपाळावर मोठी टिकली, काठापदराची साडी आणि तसाच धारवाडी खणाचा ब्लाऊज, चेहर्यावर प्रसन्न हासू! मेढेकर बाईंनी माझी ओळख करून दिली आणि त्या क्षणी मी 'मिळून सार्याजणी' परिवाराचा भाग झाले. विद्याताईंनी माझं प्रेमपूर्वक स्वागत केलं. त्यानंतर पुणे शहराबद्दलचे माझे सगळे पूर्वग्रह केवळ विद्याताईंमुळे दूर झाले. पुणे शहर मला आवडायला लागलं. त्यानंतर विद्याताई मला वारंवार भेटतच गेल्या. त्यांनी स्वत्व म्हणजे काय, स्वाभिमान म्हणजे काय, स्वतःचं अस्तित्व म्हणजे काय हे सगळं कुठलेही उपदेश न करता सांगितलं. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, माझा अनुभव मोठा आहे, मी सांगते तेच खरं, माझंच ऐका, असं त्या कधीही म्हणाल्या नाहीत.
मला आठवतं, दापोलीजवळच्या असोंडमाळ इथे सुप्रियाच्या घरी - आमची महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रतिनिधींची मिटिंग आणि एक गेटटुगेदर मिळून सार्याजणींनं ठरवलं होतं. असोंडमाळ इथे कामाबरोबरच, सगळ्या मैत्रिणींनी म्हणजेच प्रतिनिधींनी एकमेकींना जाणून घ्यावं, आपला आजपर्यंतचा प्रवास, मनातले सल, खंत सारं व्यक्त करावं या दृष्टीनं त्या रात्री विद्याताईंनी प्रत्येकीनं बोलावं असं सगळ्यांना सांगितलं. खरं तर मनात खूप काही खदखदत होतं, पण असं इतक्या व्यक्तींसमोर मोकळं होण्याची सवय नव्हती. आम्ही सगळ्या एकमेकींकडे पाहत होतो आणि त्याच वेळी विद्याताई म्हणाल्या, 'चला, माझ्यापासूनच मी सुरुवात करते'....त्या बोलू लागल्या. वयाच्या ३५ पर्यंत एक साधीशी असलेली गृहिणी आणि त्यानंतरचा तिचा स्व च्या शोधाचा प्रवास त्या उलगडत होत्या. त्यातले चांगले वाईट प्रसंग आमच्यासमोर सांगत होत्या. त्यांचं बोलणं थांबलं आणि मग एखादा धबधबा कोसळावा तशी हिम्मत प्रत्येकीमध्ये आली आणि आपला प्रवास सांगत असतानाच पहाट कधी झाली ते कोणाला कळलंच नाही. त्या प्रवासानं आम्ही सार्याजणी एकमेकींशी घट्ट बांधल्या गेलो, ते आजपर्यंत! हे सगळं घडलं विद्याताईंमुळे.
माझा माझ्या पायावर उभं राहण्याचा प्रवास सुरू होता. अनेक मित्रमैत्रिणींची मदत होत होती. अशा वेळी एक मायेचा आश्वस्त करणारा स्पर्श हवा होता आणि तो स्पर्श मला विद्याताईंनी दिला. पुण्यात आल्यावर, 'माझं घर तुझं आणि अपूर्वचं आहे असं समज' म्हणाल्या. ते शब्द केवळ बोलण्यासाठी नव्हते तर अगदी मनातून निघालेलं ते प्रेम होतं.
मी मासवण, विरार, पालघर, मुंबई, करत पुण्यात येऊन पोहोचले. पुण्यात आल्याबरोबर विद्याताईंनी मला पुण्यातल्या वाडेश्वरची सैर करवून आणली. सेट डोसा कसा छान असतो हे दाखवलं. मग महिन्यातून एकदा फोन तर कधी प्रत्यक्ष भेट असं सत्र सुरू झालं. या भेटींमधून विद्याताई माझ्याकडून आणि अपूर्वकडून कम्प्युटरच्या अनेक खुब्या शिकल्या. त्यांचं जीमेलचं अकाउंट काढणं, मेल कशी पाठवायची आणि अॅटेचमेंट कशा जोडायच्या, डाऊनलोड कसं करायचं आणि सेव्ह कसं करायचं हे सगळं त्या केवळ दोन ते तीन भेटीत शिकल्या. इतकंच नव्हे तर त्या युनिकोडमधून आपल्या मेल आपण टाईप करून पाठवायला लागल्या. मी आणि अपूर्व त्यांच्यापेक्षा लहान आहोत, आमच्याकडून कसं शिकावं असा कुठलाही भाव त्यांच्या चेहर्यावर नसायचा. उलट अपूर्वला ‘तू या क्षेत्रातला माझा गुरू आहेस बरं’ असं म्हणून प्रत्येक वेळी त्याची पाठ त्या थोपटायच्या. काळाबरोबरच चालणं, अपडेट राहणं त्यांच्या स्वभावाचाच भाग होता.
विद्याताईबरोबर वागताना त्यांच्या मोठेपणाचं कधीही दडपण आलं नाही. मीही तुमच्यातलीच एक हीच त्यांची वागण्याची पद्धत होती. त्यांना मुंबईत नरिमन पॉइंट, एनसीपीए इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक मोठा पुरस्कार मिळणार होता. त्या वेळी पुणे ते मुंबई असा प्रवास करतानाचा आनंद आम्हा सगळ्यांना जो मिळाला तो शब्दातीत होता! तसंच एकदा वाशीत त्यांचं व्याख्यान होतं, मी बरोबर होते. त्या वेळी त्या म्हणाल्या, 'दीपा वय वाढायला लागतं, तसं बोलताना भरकटण्याचा संभव असतो. त्यामुळे मी लक्षात ठेवून बोलण्याचे मुद्दे काढते आणि त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं नाही याची दक्षता घेते.' आपल्या वाढत्या वयाचा, त्या वयातल्या धोक्यांचा, त्या भरकटलेल्या बोलण्याचा त्रास कोणाला होऊ नये याची त्या किती तर्हेनं काळजी घेत हे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरून दिसायचं.
एकदा आमचं नवं आलेलं पुस्तक त्यांना द्यायला मी त्यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांच्या टेबलवर एक छोटासा सुबकसा लाल रंगाचा कंदील होता. त्यांच्याशी बोलण्यासाठी काहीतरी सुरुवात करायची म्हणून मी म्हणाले, 'विद्याताई, हा कंदील किती सुरेख आहे.' बस्स म्हणायचाच अवकाश, विद्याताईंनी जाताना मला तो कंदील एका खोक्यात व्यवस्थित पॅक करून दिला आणि 'माझ्याकडून ही छोटीशी भेट' असं सांगितलं.
आयुष्यात झालेल्या अनेक चुका, वाईट प्रसंग याविषयी त्यांच्याजवळ मन मोकळं केलं की त्या त्यांच्या आयुष्यातले काही अनुभव सांगत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे चढउतार येतात, त्यातूनही बाहेर कसं पडायचं हे बोलता बोलता सहज सांगून जायच्या. पैशामागे धावण्यापेक्षा खरा आनंद कशात आहे हे त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवलं होतं. एका चाकोरीतलं जग सोडून चाकोरीबाहेरचं जग बघण्याचा त्यांचा अनुभव त्यांनी मिळून सार्याजणीतून प्रत्येक वाचकाला दिला. बाह्यरुपानं बदलण्यापेक्षा आतून बदललं पाहिजे हे विद्याताईंनीच पहिल्यांदा मनावर बिंबवलं. त्यांच्यामुळेच गौरी देशपांडेच्या मृत्यूनंतर तिच्यावर तयार झालेल्या ‘गौरी मनातली’ पुस्तकात लिहिण्याची संधी मला मिळाली. पहिलं पाऊल उचलणं कठीण असतं, पण एकदा का ते उचललं की पुढली वाट स्पष्ट दिसायला लागते आणि त्या वाटेवरून चालताना ती वाट किती सोपी आहे हेही कळायला लागतं हेही त्यांनीच शिकवलं. स्त्री-पुरुष समानता या विषयांवर बोलताना त्यांनी कधीही पुरुषांवर आगपाखड केली नाही. धार्मिक बाबींबर, आरक्षणावर बोलताना त्यांनी अतिशय शांतपणे समोरच्या व्यक्तींचा उद्वेग बाहेर येऊ दिला आणि त्यानंतर शांतपणे आपलं बोलणं सुरू केलं. त्या वेळी माणूस म्हणून माणसाकडे जातीधर्म यापलीकडे जाऊन बघण्याची, तसं जगण्याची किती गरज आहे हे समजलं.
तृतीयपंथी असणं, गे असणं किंवा लेस्बियन असणं याकडे संपूर्ण समाज तिरस्कृत नजरेनं बघत होता, त्या वेळी विद्याताईंनी त्या विषयाकडे, अशा व्यक्तींकडे माणूस म्हणून कसं बघायचं, आपले पूर्वग्रह किती चुकीचे आहेत हे दाखवून दिलं.
आपल्या एका मुलाखतीत विद्या बाळ म्हणाल्या होत्या, 'मी माझ्या मूळच्या भावनाशील स्वभावाला आवर घातला आणि विचारांचा काठ पकडला.' खरंय विद्याताईंमुळे भावनांवर कसं नियंत्रण ठेवायचं आणिi कठोर कुठे व्हायचं हे शिकता आलं. 'आपल्याला नकार देणं जमलं पाहिजे' असं त्या म्हणत. मला आठवतं एका स्त्री-वादी संस्थेनं स्त्रियांच्या विकासाची काही कामं हाती घेतली होती. संस्थापक असणार्या स्त्रिया साठी आणि साठीच्या पुढच्या वयाच्या होत्या. अध्यक्ष म्हणून एखादी तरूण व्यक्ती निवडली तर कामं जास्त होतील आणि आपण मार्गदर्शनाला पाठीशी आहोतच की असं त्यांचं म्हणणं होतं. मी अध्यक्ष व्हावं असं सगळ्यांचं मत होतं. मी द्विधा अवस्थेत सापडले होते. एकीकडे ते पद, तो मान मला खुणावत होता. काम करणं आवडणारच होतं. पण कामाचा अनुभव नव्हता. जो या माझ्यापेक्षा ज्येष्ठ स्त्रियांना अनेक वर्षांचा होता. त्या सगळ्या अभ्यासू आणि ज्ञानी होत्या. मी त्या वेळी विद्याताईंकडे सल्ला मागितला. त्या म्हणाल्या, 'तुला मनातून काय वाटतं?' मी म्हणाले, 'विद्याताई, मी या पदासाठी या क्षणी लायक नाही असंच मला वाटतं. कारण मला कुठल्याच कामाचा अनुभव नाही. आधी ती पात्रता माझ्यात यावी आणि मग मी ते पद स्वीकारावं असं मला मनापासून वाटतं, पण त्याच वेळी मला कोणालाही दुखवायचं देखील नाही.' माझं बोलणं ऐकताच त्या म्हणाल्या, 'तू अगदी योग्य विचार करते आहेस. ते अध्यक्षपद स्वीकारू नकोस.' त्यांनी मला सौम्य भाषेत आपलं म्हणणं समोरच्याला सांगून नकार कसा द्यायचा हे त्या वेळी शिकवलं.
स्त्री एकटी असली की अख्खा समाज तिच्याकडे सहानुभूतीनं तरी बघतो किंवा कीव करत तरी बघतो. तिचं एकटं राहणं म्हणजे 'ती फारच बिचारी आहे' असं त्या समाजाला वाटत असतं. अशा वेळी एकटी स्त्री किती आनंदात राहू शकते हे विद्याताईंनी दाखवलं. त्यांनी एकटेपणातल्या आनंदाच्या शेकडो वाटा दाखवल्या. अर्थपूर्ण आयुष्याची, समृद्ध जगण्याची वाट आणि त्यातली ताकद त्यांनी दाखवली.
विद्याताई, शरीरानं गेल्या असल्या तरी मनानं प्रत्येकाच्या मनामनामध्ये राहणारच आहेत. माझ्याही मनात त्या काल होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहतील. कारण जी मूल्यं त्या मनात रुजवून गेल्या, ज्या समतेच्या विचारांची ज्योत त्या पेटवून गेल्या, विवेकाच्याच मार्गानं चालत राहा असं सांगून गेल्या, वागणं आणि जगणं एक असू द्या, असं सांगून गेल्या, त्या विद्याताई, हो त्या विद्याताई, आहेत ना आपल्या प्रत्येकीजवळ आणि प्रत्येकाजवळ!
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
Add new comment